scorecardresearch

Premium

अग्रलेख : नवीन प्राण चाहिये..

राजकारणात पक्षांतरे नवीन नाहीत. परंतु २०१४ सालच्या नव-भाजपच्या उदयानंतर झालेली पक्षांतरे आणि त्याआधीचे हे प्रकार यांत मूलत: फरक दिसतो..

bjp flag
(संग्रहित छायाचित्र)

स्वत:कडे स्वत:ची युद्धसक्षमता विकसित करण्याऐवजी प्रतिपक्षाचा युद्धनिपुण सेनानीच पळवण्याचा भाजपचा शॉर्टकट त्या पक्षाच्या मुळावर आलेला आहे..

मणिपुरात भाजपचे सरकार का संकटात आले? पश्चिम बंगाल, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार आदी राज्यांत भाजपचा पराभव का झाला वा हा पक्ष सत्ताच्युत का झाला? आगामी काळात मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा महाराष्ट्र अशा अन्य काही राज्यांत हा पक्ष संकटात येण्याची चिन्हे आहेत, ती का? असे काही अन्य प्रश्नही विचारता येतील. तथापि या सगळय़ा प्रश्नांच्या उत्तरांत एक समान धागा आहे. तो असा की या सर्व ठिकाणी भाजपने नवीन राजकारणाचा प्रयोग केला. ते योग्यच. पण हे नवीन राजकारण करण्यासाठी भाजपने निवडलेले भिडू हे प्राधान्याने जुने होते वा आहेत. येथे जुने हा शब्द वयाने ज्येष्ठ वा राजकारणात मुरलेले, प्रदीर्घ काळ असलेले या अर्थी नाही. तर जुने म्हणजे अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेले. राजकारणात पक्षांतरे नवीन नाहीत. ती भाजपने सुरू केली असे तर अजिबात नाही. पक्षांतर हे भारतीय राजकारणाचे अविभाज्य अंग राहिलेले आहे. परंतु २०१४ सालच्या नव-भाजपच्या उदयानंतर झालेली पक्षांतरे आणि त्याआधीचे हे प्रकार यात मूलत: फरक दिसतो. तो समजून घेतल्यास आजच्या भाजपवर ही वेळ का आली, या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत होईल. त्याआधी राजकारणातील नवे-जुनेपणाबाबतही चर्चा व्हायला हवी. 

maldives parliament fight
Video : मालदीवच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी; राष्ट्राध्यक्ष मुइज्जूच्या पक्षाची दादागिरी
indi Alliance
“इंडिया आघाडीत फूट पडलेली नाही”; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा! भाजपा फूट पाडत असल्याचाही गंभीर आरोप
bharat jodo nyay yatra
‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आसाममध्ये भाजपाशी संघर्ष; ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांचे मात्र मौन, नेमकं कारण काय?
akola mahayuti news in marathi, akola politics marathi news, akola mahayuti coordination news in marathi
अकोल्यात महायुतीमध्ये समन्वय राखण्याचे आव्हान

कारण आपल्याकडे मतदानाद्वारे विरोधी पक्ष सत्तेवर येतो, असे होत नाही. तर सत्ताधारी पराभूत होतात म्हणून विरोधकांस सत्तास्थापनेची संधी मिळते. म्हणजे बहुतांश मतदान हे विरोधी पक्षीय हवेत यापेक्षा सत्ताधारी नकोत या विचारातून होते. म्हणजेच २०१४ साली भाजप सत्तेवर आला तो तत्कालीन मनमोहन सिंग यांच्या सरकारला मतदार विटले होते म्हणून. त्यानंतर लोकांनी ज्या बदलाच्या भावनेतून मतदान केले, तिचा भाजपने आदर केला आणि आपल्या परीने केंद्रीय राजकारण बदलले. पुढे २०१९ साली भाजपच्या याच बदललेल्या राजकारणास मतदारांनी कौल दिला. पण या काळात झालेल्या विविध राज्य विधानसभा निवडणुकांत मात्र काही मोजके अपवाद वगळता भाजप दणकून पराभूत होत गेला. ही पराभवांची मालिका अद्यापही खंडित होण्याची शक्यता नाही. ताज्या निवडणुकीत कर्नाटकातील जनतेने भाजपस चांगलीच धूळ चारली.  तरीही हा पक्ष काही धडा शिकण्याच्या मानसिकतेत आहे असे दिसत नाही. आपल्याकडचा एकमेव हुकमी एक्का हा कोणत्याही समस्येवर उत्तर असल्याची घमेंड या पक्षात दिसून येते. यामागे केवळ राजकारण नाही. तर भाजपतील धुरीणांचा वैचारिक आळस आहे. ही सर्व राज्ये आणि सध्या संकटात सापडलेल्या मणिपुरादी प्रदेशात भाजप अडचणीत आला याचे कारण त्या पक्षाकडील हुकमी एक्क्याचे अपयश इतकेच नाही.

तर जुन्यांनाच घेऊन नवे राजकारण करीत असल्याचा भाजप आणत असलेला आव हे त्यामागील कारण. स्वत:कडे स्वत:ची युद्धसक्षमता विकसित करण्याऐवजी प्रतिपक्षाचा युद्धनिपुण सेनानीच पळवण्याचा भाजपचा शॉर्टकट त्या पक्षाच्या मुळावर आलेला आहे. या मुद्दय़ाच्या समर्थनार्थ काही उदाहरणे. कर्नाटकात भाजप दणदणीत हरला कारण मतदारांस स्वत:चा चेहरा देण्यात या पक्षास आलेले अपयश. बसवराज बोम्मई हे भाजप रक्ताचे नाहीत. त्यांचे तीर्थरूप समाजवादी विचारांचे. समाजवाद्याच्या पोटी हिंदूत्ववादी जन्मत नाही; असे नाही. पण बसवराज ना समाजवादी राहिले ना हिंदूत्ववादी. तरीही हिंदूत्ववाद्यांस आपण ‘त्यांच्यातले’ वाटायला हवे यासाठी त्यांनी हिजाबादी मुद्दे काढण्याचा प्रयत्न केला. पण हिंदूत्ववाद्यांनी आणि मुख्य म्हणजे भाजपच्या मतदारांनी त्यांस आपले म्हटले नाही. पश्चिम बंगालात सर्व शक्ती पणास लावून भाजपने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढा दिला. पण वंगबांधवांनी भाजपस अजिबात जवळ केले नाही. याचे कारण त्या सर्वास ममतादीदींचे प्रेम अजूनही आहे, असे अजिबात नाही. ममतांच्या जुन्याच तृणमूलांस बरोबर घेऊन भाजप आपले कमळ फुलवू पाहात होता, हे मतदारांस रुचले नाही, हे यामागील कारण. पंजाबात भाजपला मुळातच स्थान नव्हते. मात्र महाराष्ट्रात शिवसेनेचे जे भाजपस करता आले ते पंजाबात अकाली दलाचे करण्यात भाजपला यश आलेले नाही.

अशा परिस्थितीत स्वत:चे स्थान निर्माण करायचे तर भाजपने चेहरा देऊन देऊन कोणता दिला? तर काँग्रेसमध्ये हयात घालवून थकल्या-भागलेल्या अमिरदर सिंग यांचा. म्हणजे जुनाच. आगामी काही महिन्यांत मध्य प्रदेशात निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेथे भाजप संकटात आल्यास त्याचे कारण त्यांच्या स्वत:च्या शिवराजसिंह चौहान यांच्यात नसेल. ते काँग्रेसमधून सर्व उपभोग भोगून नवे काही भोगण्यास नाही हे लक्षात आल्यावर भाजपत आलेले ज्योतिरादित्य शिंदे हे असेल. त्यांची अवस्था कर्नाटकच्या बोम्मई यांच्याप्रमाणे झालेली आहे. हिंदूत्ववाद्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही आणि ज्योतिरादित्यांची जुनी ज्योत आता तेवत नाही. आसामात पुढच्या निवडणुकांत हिमंत बिस्व सर्मा यांचीही अशीच अवस्था झाल्यास आश्चर्य वाटू नये. बारा गावचे पाणी प्यायलेल्या इरसालाप्रमाणे सर्मा बारा नाही पण तीन पक्षांचे तरी पाणी पिऊन आलेले. अलीकडे ते मूळच्या हिंदूत्ववाद्यांपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी होण्याच्या प्रयत्नात आहेत. ते साहजिक. कारण बाटगा हा नेहमीच अधिक जोमाने बांग देतो. टोमॅटोच्या दरवाढीस मुसलमान कारणीभूत आहेत असे म्हणण्यापर्यंत आता त्यांची मजल गेलेली आहे. इतके मूर्ख विधान मूळचे भाजपवालेही करणार नाहीत. पण इतके करूनही त्यांचा आगामी निवडणुकांत बोम्मई होणार नाही, असे नाही. महाराष्ट्रात भाजप अतिरेकी विस्तारवादी आणि साहसवादी राजकारण करताना दिसतो. त्यातून उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीस सत्ताच्युत करणे यात तो यशस्वी झालादेखील. पण हे यश हंगामी असेल यात तिळमात्रही शंका नाही. याचे कारणही तेच. अजितदादा पवार, एकनाथ शिंदे वा अन्य ‘जुन्या’ चेहऱ्यांस घेऊन भाजप घरच्या देवेंद्र फडणवीस यांस डावलून ‘नवे’ काही देऊ शकत नाही. शकणारही नाही.

नेमक्या याच कारणांमुळे भाजपस स्वत:चे सरकार असूनही मणिपूरची समस्या अद्यापही हाताळता आलेली नाही. ती येणारही नाही. याचे कारण ज्यांच्या हाती भाजपने मणिपूरची सत्ता सोपवली ते एन. बीरेन सिंह हे ‘जुन्याच’ साचातील आहेत. तेथील समस्या तर तिहेरी आहे. हे सिंह मुळात स्थानिक प्रादेशिक पक्षातील. तेथील स्थानिकतेस संकुचिततेच्या मर्यादा आहेत. नंतर हे महाशय काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसने विशिष्ट कोनातून त्या स्थानिकतेचा वापर केला. पुढे काँग्रेसकडून काही मिळेनासे झाल्यावर हे गृहस्थ भाजपवासी झाले आणि भाजपने त्यांच्या हाती थेट सत्तासूत्रेच दिली. भाजप देशातील कोणत्याही राजकीय वा सामाजिक समस्येकडे हिंदू-मुसलमान वा हिंदू-ख्रिश्चन याच लोलकातून पाहू शकते. तो त्या पक्षाचा लघुदृष्टिदोष. त्यामुळे आधीच स्थानिक, त्यात काँग्रेसच्या अल्पसंख्याकवादी राजकारणात स्वत:ची पोळी भाजून घेतल्यानंतर हे सिंह भाजपत आल्यावर हिंदू-ख्रिश्चन दुहीचा चष्मा घालून बसले. इतका गोंधळ असल्यावर त्यांच्यावर ना स्थानिक हिंदू विश्वास ठेवू शकतात ना ख्रिश्चनांस ते आपले वाटू शकतात. कुकी आणि मैतेई समस्येवर ते याच चष्म्यातून पाहू लागल्यास जे झाले त्यापेक्षा वेगळे काय होणार?

हा भाजपस धडा आहे. सत्तामद चाखण्यात मशगूल भाजपस हे सत्य लक्षातही येणार नाही. पण जुन्याच चेहऱ्यास घेऊन भाजप राजकारणास नवा चेहरा देऊ  शकणार नाही. ‘‘तीच तीच गोष्ट पुन:पुन्हा करून नवीन काही हाती लागेल, अशी अपेक्षा बाळगणे हा वेडपटपणा झाला,’’ असे विख्यात तत्त्ववेत्ता वैज्ञानिक आइनस्टाईन म्हणत. आइनस्टाईन झेपणे अवघड असल्यास भाजपने ‘नवीन पर्व के लिये, नवीन प्राण चाहिये’ हे संघातील पद्य आठवावे. असा नवीन प्राण जोपर्यंत भाजप आपल्या राजकारणात ओतत नाही, तोपर्यंत त्या पक्षाचे ठेचकाळणे असेच सुरू राहील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Editorial defection in politics after the rise of bjp ysh

First published on: 24-07-2023 at 00:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×