काय साध्य केल्यावर आपण थांबायचे याचेच उत्तर मुख्य आक्रमकाकडे नाही आणि काही साध्यही होताना दिसत नाही अशी इस्रायल-हमास युद्धाची गत.. 

वसंत ऋतूत वनातील मोह वृक्षांस बहर येतो आणि सारा परिसर मोह-फुलांच्या मादक गंधाने भरून जातो. जंगलातील हत्ती त्या मोह-फुलांच्या गंधाने वेडेपिसे होतात आणि त्यातला एखादा गजराज त्या मोहमद्याच्या अतिसेवनाने सगळे भान हरपून कमालीचा हिंसक होतो आणि विध्वंस करू लागतो. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचे वर्तन हे अशा मद्यपी हत्तीसारखे आहे. फरक इतकाच की त्यांना बेभान करणारा मोह हा झाडांवर फुलणारा नैसर्गिक नाही आणि त्याला फुलवण्यास वसंत ऋतूची गरज नसते. हा मोह राजकीय आणि अलीकडच्या संस्कृतीनुसार त्याचे फुलणे राजकीय गरजेवर अवलंबून. भ्रष्टाचार, न्यायव्यवस्था नामशेषास झालेला नागरिकांचा तीव्र विरोध इत्यादी कारणांनी संत्रस्त नेतान्याहू यांना हा राजकीय मोह फुलवण्याची संधी ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने दिली. त्या घटनेस ७ एप्रिल या दिवशी, सहा महिने झाले. त्या दिवशी ऑक्टोबरात भल्या पहाटे हमासच्या दहशतवाद्यांनी बेसावध इस्रायलवर नृशंस हल्ला करून १२०० जणांचे प्राण घेतले. इस्रायली स्वत:स युद्धसज्ज मानतात. आपली सुरक्षा व्यवस्था अभेद्य आहे, असा त्यांचा दावा असतो. हे दोन्ही मुद्दे किती पोकळ आहेत हे हमासच्या या हल्ल्याने दाखवून दिले आणि इस्रायलची सुरक्षा अन्य कोणत्याही देशाप्रमाणे सहजभेद्य आहे हे साऱ्या जगास कळले. सहा दशकांपूर्वी अरब फौजांनी शस्त्रास्त्रसज्ज इस्रायली विमानांना धावपट्टींवरच टिपले होते. त्यानंतरची या अजेय आदी इस्रायलची ही दुसरी नामुष्की. आत्ममग्न नेतान्याहू यांचा इतका अपमान करणे त्यांच्या राजकीय विरोधकांसही कधी जमले नव्हते. ते गाझा पट्टयातील मूठभर हमास दहशतवाद्यांनी करून दाखवले. त्यानंतरचे नेतान्याहू यांचे वर्तन जंगलातील मोह-ग्रस्त हत्तीचे विध्वंसक स्मरण करून देणारे. ही आकडेवारी पाहा.

loksatta analysis death of ex indian army officer vaibhav kale in israel attack
गाझामध्ये ‘यूएन’चे मराठी अधिकारी वैभव काळे यांचा मृत्यू इस्रायलच्या हल्ल्यात? इस्रायलचे म्हणणे काय? भारताची भूमिका काय?
Why Israel compassion for Hamas war victims cost lives
युद्धग्रस्तांबाबतची सहृदयताच जीवावर बेतली, असे का व्हावे?
Loksatta samorchya bakavarun opposition parties Prime Minister Narendra Modi campaign
समोरच्या बाकावरून: ‘५६ इंची छाती’च्या नेत्याने खोटे का बोलावे?
world chess championship marathi news, world chess championship latest marathi news
विश्लेषण: बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीचे यजमानपद भारताला मिळणार की नाही? हा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात का सापडला?
loksatta analysis Israel and Hamas delay in cease fire
विश्लेषण : इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धविरामाला उशीर का? चर्चेचे घोडे नेमके कुठे अडते?
Unnatural intercourse, husband,
पतीने अनैसर्गिक संभोग करणे गुन्हा नाही; कायद्याने अशी मोकळीक मिळणे धोकादायक
What Raj Thackeray Said About Hitler?
राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत, “हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त, त्याच्या चांगल्या गोष्टी..”
shantigiri maharaj nashik lok sabha , shantigiri maharaj mahayuti marathi news
आधीच्या पाठिंब्याची परतफेड करा, शांतिगिरी महाराजांचा महायुतीवर दबाव

हेही वाचा >>> अग्रलेख: प्रवक्त्यांची पक्षांतरे!

हमासच्या हल्ल्यात १२०० इस्रायली मारले गेले आणि दोनशेहून अधिक यहुदी नागरिक हमासने ओलीस ठेवले. त्यानंतर या हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात आजतागायत तब्बल ३४ हजार जणांचे प्राण गेले आणि त्यात सर्वाधिक मृत या महिला आणि बालके आहेत. या काळात आपण हमासच्या १३ हजार सदस्यांस ठार केले असा दावा हा इस्रायली पंतप्रधान करतो. या १३ हजार जणांच्या नावांची छाननी काही प्रमुख वृत्तसंस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी केली. त्यातून नेतान्याहू यांचा दावा फोल ठरला. कारण यात मृत जाहीर केलेले बरेच अद्यापही जिवंत आहेत आणि काही मृतांची नावे तर तीन-तीनदा देऊन संख्या फुगवण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय संरक्षणतज्ज्ञांच्या मतानुसार हमासची सदस्य संख्या ३० हजारांच्या आसपास आहे. त्यातील एकदशांशांचाही नायनाट या युद्धात इस्रायलला करता आलेला नाही. तेव्हा हा इस्रायली पंतप्रधान या आघाडीवरही खोटा ठरला. मारले गेले त्यातील बहुतांश हे सामान्य नागरिक आहेत. या सहा महिन्यांत हमासची गुप्त भुयारे आपण उद्ध्वस्त केली, असे इस्रायल म्हणते. तो दावाही फोल ठरला. गाझाच्या भूपृष्ठाखाली तब्बल ५०० किमी लांबीची भुयारे हमासने खणलेली आहेत. त्यातील कित्येक भुयारांचा अंदाजही अद्याप इस्रायली फौजांना आलेला नाही. त्यांच्या शोधासाठी इस्रायलने कित्येक रुग्णालये जमीनदोस्त केली. पण निरपराधांच्या हत्येखेरीज यातून काहीही साध्य झाले नाही. सर्व ओलिसांची सुटका करण्याची वल्गना नेतान्याहू करतात. पण हमासने ताब्यात घेतलेल्या अडीचशे यहुदींपैकी १२९ ओलिसांचा थांगपत्ता अद्यापही इस्रायली फौजांस लागलेला नाही. ते जिवंत आहेत वा नाही याचीही माहिती नाही. उत्तर गाझा परिसर संपूर्णपणे आपल्या अखत्यारीत आल्याची फुशारकी हे इस्रायली पंतप्रधान मारतात. पण तरीही त्या प्रदेशात इस्रायली सैनिकांचे हमासहातून मरणे अद्यापही थांबलेले नाही. अडीचशेहून अधिक इस्रायली सैनिक या सहा महिन्यांत हुतात्मा ठरले. इतिहासातील अरब युद्धांतही इतकी जीवितहानी इस्रायलने कधी अनुभवलेली नाही. आणि इतक्या संहारानंतर इस्रायलने नक्की साधले काय?

हाच प्रश्न इस्रायलच्या प्रेमाने आंधळे झालेल्यांनाही आता सतावू लागलेला असून दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर तो थेट नेतान्याहू यांनाच विचारण्याची वेळ आली. त्याआधी काही आंतरराष्ट्रीय मदतकार्य कार्यकर्ते इस्रायली सुरक्षारक्षकांकडून मारले गेले. ‘‘ही आमची अक्षम्य चूक’’, अशी कबुली नेतान्याहू यांना द्यावी लागली आणि त्यानंतर बायडेन यांचे बोलणे ऐकावे लागले. आज परिस्थिती अशी की अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या चाळीसहून अधिक नेत्यांनी इस्रायलविरोधात खमकी भूमिका घेतली असून तीत लोकप्रतिनिधिगृहाच्या माजी सभापती नॅन्सी पालोसी यांच्यासारख्यांचाही समावेश आहे. ‘‘इस्रायलचा शस्त्रपुरवठा ताबडतोब थांबवा’’, अशी मागणी हे सर्व करत असून त्यांस अमेरिकेत समर्थक वाढू लागले आहेत. त्याच्याबरोबरीने ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शूल्ट्झ हेदेखील आता नेतान्याहूंविरोधात भूमिका घेऊ लागले असून इस्रायलविरोधातील वातावरण तापू लागले आहे. मानवी हक्कविषयक परिषदेत शस्त्रसंधीच्या ठरावावर भारताने भले बोटचेपी भूमिका घेतली असेल! पण त्यामुळे इस्रायलसंदर्भात महत्त्वाचे देश आणि जागतिक नेत्यांच्या बदलत्या भूमिकेस आळा बसण्याची शक्यता नाही. तथापि या सगळयांपेक्षा अधिक अपेक्षा आहेत त्या खुद्द अ-भक्त अशा इस्रायली जनतेकडून.

हेही वाचा >>> अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?

कारण याच सामान्य इस्रायली जनतेने शनिवारी रात्रीही पंतप्रधान नेतान्याहू यांच्याविरोधात लाखोंच्या संख्येत निदर्शने केली. आता या जनते ची मागणी नेतान्याहू यांनी धोरण बदलावे वगैरे अशी नाही. तर थेट यांनी सत्तात्याग करून निवडणुका घ्याव्यात अशी मागणी आता ही जनता करू लागली आहे. त्यात हमासने ओलीस धरलेल्या आणखी एका ओलिसाच्या मृत्युवार्तेने इस्रायली जनता अत्यंत क्षुब्ध झाली असून सर्व आघाडयांवर अपयशी ठरणाऱ्या या आपल्या पंतप्रधानास आता घरी पाठवायची वेळ आली आहे असे त्यांस वाटू लागले आहे. ही अत्यंत आश्वासक बाब. हमासचा पुरता बीमोड करण्याच्या वल्गना करत युद्धखोरीतून स्वत:ची खुर्ची तेवढी बळकट करणाऱ्या या पंतप्रधानांस आता पदावर राहण्याचा अधिकार नाही असे बहुसंख्यांस वाटू लागणे आणि या बहुसंख्यांनी सरकारी यंत्रणांस न घाबरता, कोणताही दबाव न घेता मोकळेपणाने आपल्या भावनांस वाट करून देणे हा लोकशाहीचा जिवंतपणा या यहुदी देशात अद्यापही शाबूत दिसतो. नेतान्याहू यांच्यासाठी ही खचितच काळजी वाटावी अशी बाब. त्यात विरोधी पक्षीयांनी या पंतप्रधानाविरोधात दबाव वाढवला असून काही विरोधी पक्षीय नेते तर अमेरिकेत अध्यक्ष बायडेन यांच्याशी संधान साधताना दिसतात. तथापि या सर्व राजकीय चर्चा एका टप्प्यानंतर निरर्थक वाटू लागतात. जेव्हा ३४-३५ हजार जणांचा बळी घेऊनही आपल्या राजकीय स्वार्थास आळा घालावा असे ना इस्रायलच्या पंतप्रधानांस वाटते आणि ना इतक्या नरसंहाराच्या वेदनांचा ओरखडा जागतिक शांततेवर उमटतो. ही एकविसाव्या शतकातील प्रगत म्हणवणाऱ्या समाजाची स्थिती. अशाच युक्रेन युद्धास नुकतीच दोन वर्षे उलटली आणि गाझा युद्धास सहा महिने झाले. दोन्हीही ठिकाणी अखंड नरसंहार सुरू आहे. त्यात गाझा युद्धातील परिस्थिती अधिक केविलवाणी. कारण काय साध्य केल्यावर आपण थांबायचे याचेच उत्तर मुख्य आक्रमकाकडे नाही. सुरुवातीच्या दाखल्यातील हत्तीची नशा काही काळाने उतरते तरी. पण या नरसंहाराची नशा चढलेल्यांबाबत तीही शक्यता नाही. निवडणुका आणि इस्रायली जनता हाच या नशेवरील उतारा असेल.