ऊटपटांग निर्णय, प्रशासकीय हडेलहप्पी आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरील धरसोड यांमुळे ट्रम्प यांची लोकप्रियता अन्य अध्यक्षांपेक्षाही अधिक घसरली…
जगातील एकमेव महासत्तेच्या प्रमुख पदावर डोनाल्ड ट्रम्प आरूढ झाले त्यास आज २९ एप्रिल रोजी १०० दिवस होतील. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांस पराभूत केल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकी रिवाजानुसार २० जानेवारीस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्या वेळी ‘लोकसत्ता’ संपादकीयाने त्यांच्या झंझावाती प्रारंभाचे वर्णन ‘वॉशिंग्टनची कुऱ्हाड’ (२२ जानेवारी) असे केले. ते किती रास्त होते ते नव्याने सांगण्याची गरज नाही. या वॉशिंग्टन-स्थित ‘कुऱ्हाडी’ने जागतिक अर्थकारण, समाजकारण यांवर सावली धरणाऱ्या वृक्षांची कत्तल इतक्या जोमाने केली की त्यानंतरच्या वणव्यात हा कुऱ्हाडीचा दांडाच आता बळी पडतो की काय अशी स्थिती निर्माण होताना दिसते. या १०० दिवसांत ट्रम्प यांनी जे करून दाखवले ते अद्वितीयच. एरवी समर्थकांचे रूपांतर इतक्या तातडीने विरोधकांत करून दाखवणे हे तसे येरागबाळ्याचे काम नव्हे. ट्रम्प हे अशा सामान्य नेत्यांतले नसल्याने त्यांना हे शक्य झाले. हे यश इतके देदीप्यमान आहे की ते पुन्हा निवडून यावेत यासाठी एके काळी देव पाण्यात घालून प्रतीक्षा करणाऱ्यांची वळलेली बोबडी बराच काळ तशीच राहील असे दिसते. तथापि कडव्या टीकाकारांसही त्यांच्यातील एका दुर्मीळ गुणाचे कौतुक करावेच लागेल. माघार घेणे हा तो गुण. आज पहिल्या शंभर दिवसीय धडाक्यातील एकही मोठा निर्णय असा नाही की ट्रम्प यांनी त्यापासून माघार घेतली नाही वा त्या भूमिकेत बदल केला नाही. त्यांच्या पहिल्या शतकदिन पूर्तीनिमित्ताने या माघारींचा आढावा घ्यायला हवा. तसेच ही वेळ त्यांच्यावर का आली त्या कारणाचाही स्पष्ट उल्लेख करायला हवा.
यातील सगळ्यात ढळढळीत आणि पहिली भव्य माघार म्हणजे त्यांनी स्वत:च स्वत:चा लांबणीवर टाकलेला आयात शुल्क वाढीचा निर्णय. या निर्णयामुळे जगातील सर्व देशांची उत्पादने अमेरिकी बाजारात विकण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणे अपेक्षित होते. ही घोषणा झाली आणि अमेरिकी बाजारात जी घसरण सुरू झाली त्यामुळे ट्रम्प यांच्या सल्लागारांचे डोळे पांढरे झाले. जे अमेरिकन ट्रम्प यांच्या सत्तारोहणामुळे येऊ घातलेल्या ‘अच्छे दिनां’कडे डोळे लावून होते त्यांनी आहे ते तरी राहणार की जाणार या भीतीने डोळे फिरवले. अखेर स्वत:च्याच निर्णयास ९० दिवसांची स्थगिती देण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्याकडे ‘होते असे कधी’ असे म्हणून डोळेझाक करता आलीही असती. पण ट्रम्प यांनी या काळात आपल्या निर्णयांपासून माघारी जाण्याचा सपाटा लावला. ज्या शत्रुपक्षीय चीनवर त्यांनी २४५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क वाढवण्याची धमकी दिली त्याच चीनबाबत त्यांचा सूर नरमाईचा झाला. इतका की चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग अमेरिकेकडे ढुंकून बघण्यास तयार नसताना ट्रम्प यांच्यावर त्यांची आर्जवे करण्याची वेळ आली. तीच बाब अमेरिकेत आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांबाबत. हजारो विद्यार्थ्यांना ट्रम्प यांनी ‘चले जाव’चा आदेश दिला खरा. पण अमेरिकेचे यामुळे काय नुकसान होईल याचा अंदाज आल्यावर त्यातील निम्म्याहून अधिकांचा हा आदेश त्यांनी मागे घेतला. परदेशी कंपन्यांच्या परदेशातच बनवलेल्या मोटारींवर खच्चून आयात कराची घोषणा करणारे ट्रम्प नंतर हळूच मोटार उद्याोगाचा अपवाद करते झाले. ही माघारमौज फक्त आर्थिक निर्णयांबाबतच दिसून आली असे नाही. मुत्सद्देगिरीतही तेच झाले. ज्या युक्रेनच्या झेलेन्स्की यांना युद्धखोर ठरवत व्हाइट हाऊसमधून अपमानित होऊन जावे लागले त्याच झेलेन्स्की यांची भलामण करण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर आली. कारण? झेलेन्स्की यांना दूर सारत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा पत्कर घेणे राजकीयदृष्ट्या महाग पडेल याची त्यांना उशिरा का असेना झालेली जाणीव. सामान्य अमेरिकी नागरिक अनेक गुन्हे माफ करू शकतो. पण अमेरिकेत एका प्रमादास क्षमा नाही. रशियाची तळी उचलणारा अध्यक्ष अमेरिकी नागरिक सहन करू शकत नाहीत. हे आणि असे बरेच काही अवघ्या १०० दिवसांत घडले.
याचा परिणाम त्यांच्या लोकप्रियतेवर झाला नसता तरच नवल. ऊटपटांग निर्णय, प्रशासकीय हडेलहप्पी आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरील धरसोड वृत्ती यांमुळे ट्रम्प यांची लोकप्रियता झरझर घसरत असून पहिल्या १०० दिवसांत इतकी घसरण अनुभवणारे ते अलीकडच्या काळातील पहिले अध्यक्ष ठरतील. इतकेच नव्हे तर उठता-बसता ट्रम्प ज्यांना लाखोली वाहतात ते माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्यापेक्षाही पहिल्या १०० दिवसांत ट्रम्प यांच्या लोकप्रियतेची अधिक धूप झाली असे ताज्या पाहण्यांतून दिसते. अध्यक्षपदी आरूढ झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यात ट्रम्प यांचे समर्थक निम्म्यापेक्षा कमी होऊन ४७ टक्क्यांवर आले आणि आज १०० दिवसांचा टप्पा ते पूर्ण करत असताना हे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. या तुलनेत बायडेन याचा लोकप्रियता निर्देशांक पहिल्या १०० दिवसांत ५९ टक्के इतका होता. त्यांच्या तुलनेत स्वत:स कर्तबगार, धाडसी इत्यादी समजणाऱ्या ट्रम्प यांची घसरण फारच केविलवाणी. ट्रम्प यांच्यावर जनता रुष्ट होण्याची कारणेही लक्षात घ्यावी अशी. आपला उद्याोगपती मित्र ‘टेस्ला’कार आचरट इलॉन मस्क यांच्या सल्ल्याने ट्रम्प यांनी ‘सरकारी कार्यक्षमता विभाग’ सुरू केला आणि एकापाठोपाठ एक अनेक खात्यांत नोकरकपात सुरू केली. हे जनतेस रुचले नाही. प्रत्येकी १०० अमेरिकी नागरिकांतील ५५ जणांनी या नोकरकपातीविरोधात आपले मत नोंदवले. हा रोष इतका आहे की त्याचा फटका खुद्द मस्क यांच्या ‘टेस्ला’ कंपनीसही बसला. लोकांनी या कंपनीच्या मोटारी खरेदी करणे कमी केले. परिणामी कंपनीच्या नफ्यात तब्बल ७१ टक्क्यांची घट झाली. या फटक्याने मस्क यांच्याही डोळ्यासमोर काजवे चमकले आणि त्यांनी या सरकारी खात्यातून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली. यापेक्षा अधिक अमेरिकी जनता ट्रम्प यांच्यावर नाराज आहे ती आयात शुल्काबाबतच्या धोरणाने. सणसणीत ६० टक्के नागरिकांनी ट्रम्प यांची ही आयात धोरणे चुकीची असल्याचे मत नोंदवले. अमेरिकेस पुन्हा (?) महान बनवण्याच्या नादात ट्रम्प अधिकाधिक जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती देशांतर्गत करून आत्मनिर्भर होऊ पाहतात. पण तसे केल्याने अमेरिकेत अनेक घटकांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने नागरिकांस संभाव्य चलनवाढीची, म्हणजेच महागाईची, चिंता आहे. त्यामुळे नागरिकांस हे धोरण मंजूर नाही. याचबरोबर अमेरिकी नागरिक ट्रम्प यांच्यावर यापेक्षाही अधिक नाराज दोन बिगर-आर्थिक कारणांमुळे आहेत.
एक म्हणजे ट्रम्प यांची सरकारी उच्चपदस्थांवर असलेली भिस्त आणि न्यायालयाप्रति ते सातत्याने दाखवत असलेला अनादर. पाहणीतील ५१ टक्के नागरिकांस ट्रम्प यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मतांस इतकी किंमत देणे पसंत नाही. मंत्रिमंडळातील राजकीय सहकाऱ्यांपेक्षा आपला अध्यक्ष नोकरशहांवर अधिक विसंबून आहे हे बहुसंख्यांस आवडलेले नाही. तसेच सर्वाधिक म्हणजे ७५ टक्के नागरिकांनी ट्रम्प यांचा न्यायालयांबाबतचा अनुदार दृष्टिकोनही अस्वीकारार्ह ठरवला. त्यातही मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करण्याचा असेल तर ८० टक्के नागरिकांनी या पाहणीत ट्रम्प यांच्या वागण्याचा निषेध केला. तेव्हा आपली लोकप्रियता झपाट्याने घसरू लागल्याचे पाहून ट्रम्प यांस भान आले आणि आपल्याच भूमिकांपासून माघार घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. अशा तऱ्हेने आपल्या बोलघेवड्या नेत्यावर जागरूक अमेरिकी लोकशाहीने पहिल्या १०० दिवसांतच शंभरी भरल्याची वेळ आणली. ही घसरण ट्रम्प कशी रोखतात ते आता पाहायचे.