पृथ्वीवरील संघर्षांत नाही म्हणायला तहनामे, करार, शस्त्रबंदी आदी उपाय उपलब्ध तरी आहेत. अंतराळाच्या बाबतीत अद्याप तसले काही अस्तित्वातच नाही.

‘तिसरे महायुद्ध कोणत्या शस्त्रांनिशी लढले जाईल हे सांगता येत नाही. पण चौथे महायुद्ध काठ्या-दगडांनिशी लढले जाईल हे नक्की…’ हे उद्गार आहेत, दुसऱ्या महायुद्धाचा विध्वंस आणि अण्वस्त्रयुगाची नांदी यांचे साक्षीदार राहिलेले विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे. शस्त्रास्त्रे आणि वर्चस्ववादाची कधीही न शमणारी भूक एक दिवस आधुनिक मानवाला एखाद्या संहारपर्वानंतर आदिमानवावस्थेकडे घेऊन जाईल, याविषयी त्यांना खात्री असावी. त्यांना ‘न उमगलेले’ तिसरे महायुद्ध कदाचित पृथ्वीतलावर लढले जाणारही नाही. ते कसे, याची कल्पना यावी यासाठी एका बातमीचा दाखला देणे आवश्यक ठरते. अमेरिकेत व्हाइट हाउस प्रवक्त्याने परवा एक निवेदन जारी केले, ज्यात रशियाने विकसित केलेल्या एका गूढ कृत्रिम उपग्रहविरोधी अस्त्राचा (अँटी-सॅटेलाइट वेपन) उल्लेख आहे. हे अस्त्र रशियाने विकसित केले आहे, पण तैनात केलेले नाही. त्याच्या आधीच्या दिवशी अमेरिकी प्रतिनिधिगृहातील एका सदस्याने अमेरिकी सुरक्षेला रशियाकडून असलेल्या ‘गंभीर धोक्या’चा उल्लेख केला होता. हे अस्त्र अणुऊर्जाचलित आहे, की ते अण्वस्त्रे डागू शकते याबाबत संदिग्धता आहे. अमेरिकेतील उपग्रहांचे परिचालन पूर्णपणे बिघडवण्याचा रशियाचा उद्देश असू शकतो. मात्र त्याचा वापर पृथ्वीवर मानवी संहार करण्यासाठी केला जाणार नाही, असेही सांगितले जाते. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत असल्या अगम्य आणि संदिग्ध संवाद-संज्ञापनाचा इतिहास अमेरिकेसाठी नवा नाही. सत्य अर्धवट वदले की ते गूढ बनते. धोका अमुक इतका गंभीर आहे हे सांगणे वेगळे, नि धोका किती गंभीर आहे हे आम्हालाच ठाऊक नाही असे सांगणे वेगळे! दुसऱ्या शक्यतेतून सार्वत्रिक भीती अधिक प्रसृत होते. या सार्वत्रिक भीतीतून एक मोठी शस्त्रास्त्र उद्याोगशृंखला उभी राहते. शिवाय अशी चर्चा करणारे उच्चपदस्थ असतात तेव्हा त्यास निराळे परिमाण प्राप्त होते. तिकडे रशियानेही, युक्रेनला तातडीने मदत मंजूर व्हावी म्हणून जो बायडेन प्रशासनाचा हा कांगावा आहे, असे जाहीर करून टाकले. बायडेन प्रशासन रशियाच्या कथित धोक्याबद्दल पुरेशी माहिती देत नसले, तरी हे क्षेत्र गेली काही वर्षे सातत्याने विकसित होताना दिसत आहे. एकीकडे रणांगणात रशियासारख्या सामरिक महासत्तेला युक्रेनचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडावे लागत असले, तरी अंतराळातील संभाव्य युद्धामध्ये या दोन देशांमध्ये तुलनाच होऊ शकत नाही. कारण फारच थोड्या देशांनी सिद्धता अवगत केली आहे, ज्यात रशिया अग्रणी आहे. जमीन, समुद्र, आकाशापलीकडे अंतराळात शिरू पाहणाऱ्या या सत्तास्पर्धेची व्याप्ती अपरिमित आहे.

या तथाकथित अस्त्राविषयी तीन शक्यतांची चर्चा सध्या माध्यमांत सुरू आहे. अण्वस्त्रांच्या साह्याने बाह्य अंतराळातील कृत्रिम उपग्रह निकामी करणे, ही एक शक्यता. यासाठी अण्वस्त्रे प्रक्षेपकाच्या साह्याने तेथे न्यावी लागतील, कारण सध्याच्या कोणत्याही दीर्घात दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रामध्ये बाह्य अंतराळापर्यंत पोहोचण्याची क्षमता नाही. दुसऱ्या शक्यतेनुसार, बाह्य अंतराळात निव्वळ अण्वस्त्रे सज्ज ठेवायची. तिसऱ्या शक्यतेनुसार, अणुऊर्जाचलित उपग्रह सोडायचे आणि त्यांच्याद्वारे इतर देशांच्या उपग्रहांमध्ये बिघाड घडवून आणायचा अशी योजना असू शकते. पण अण्वस्त्रे बाह्य अंतराळात बाळगणे हा १९६७ मधील बाह्य अंतराळ कराराचा (ओएसटी) भंग ठरतो, ज्यावर रशियानेही स्वाक्षरी केली आहे. अर्थात पृथ्वीवरील करारांची ऐशीतैशी करणाऱ्या देशासमोर अंतराळातील करारांची काय मातबरी, असा प्रश्न उपस्थित होतो. जेथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम उपग्रह कार्यरत आहेत, अशा विशाल अंतराळ टापूत अण्वस्त्रांच्या स्फोटातून सुटणाऱ्या विद्याुतचुंबकीय लहरींनी हाहाकार उडू शकतो. रोजच्या व्यवहारातील संज्ञापनापासून ते हवामान यंत्रणा, रडार यंत्रणा निकामी होऊ शकतात. आज अशा प्रकारे रशियाची भीती अमेरिकेकडून घातली जात असली, तरी मुळात ‘ओएसटी’ कराराची गरजच अमेरिकेने १९६२ मध्ये केलेल्या एका उचापतीमधून निर्माण झाली होती. त्या वेळी अमेरिकेने प्रचंड उंचीवर घेतलेल्या अणुचाचणीमुळे पृथ्वीच्या नजीक असलेले जवळपास सर्व उपग्रह निकामी झाले होते. त्या वेळेपेक्षा सध्या कृत्रिम उपग्रहांची संख्या काही हजारपट आहे.

रशियाने २२ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर आक्रमण केले, ज्याची दखल जगाने घेतली. हे युद्ध अजूनही सुरू आहे. परंतु आणखी एका युद्धाची – किंवा खरे तर युद्धाच्या प्रारूपाची – दखल फारशी घेतली गेली नाही. अमेरिकेच्या एका संदेशवहन उपग्रह कंपनीच्या प्रणालीत ‘मालवेअर’ने शिरकाव केला. परिणामत: या कंपनीचे ग्राहक असलेल्या अनेक युरोपीय वापरकर्त्यांचा आंतरजाल संपर्कच खंडित झाला. यांत काही युक्रेनी लष्करी विभाग होते. पण, हा विध्वंस फार काळ टिकला नाही. कारण या विभागांनी लगेचच स्टारलिंक या आणखी एका उपग्रह संदेशवहन प्रणालीशी संधान जुळवले. स्टारलिंकचे उपग्रह सोडले होते स्पेसएक्स या कंपनीने. म्हणजे एक छोटे उपग्रह संपर्क युद्ध खेळले गेले, ज्यात रशियावर अमेरिकेने विजय मिळवला. मात्र हा विजय अमेरिकेच्या खासगी क्षेत्राचा होता, कारण स्पेसएक्स ही इलॉन मस्क यांच्या मालकीची खासगी कंपनी आहे. या लघुसंघर्षाच्या कित्येक मोठे आणि व्यापक संघर्ष भविष्यात उद्भवू शकतात. अमेरिका आणि रशिया यांच्यात अंतराळ स्पर्धा गतशतकाच्या मध्यावर सुरू झाली. परंतु सध्याच्या काळात अमेरिकेला रशियापेक्षा चीनची भीती अधिक वाटते. कारण गेल्या काही वर्षांमध्ये चीनने या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केलेली आहे. अमेरिकेची प्रगती ही ज्ञात तरी असते. चीन काय विकसित करत आहे किंवा करू शकतो याचा केवळ अंदाजच बांधता येतो. सरकारी अंतराळ मोहिमांचे युग, खासगी कंपन्यांचा या क्षेत्रातील शिरकाव या महत्त्वाच्या कालखंडानंतर आता सामरिक अंतराळ युगाला सुरुवात झालेली आहे.

पृथ्वीतलावरील युद्धात अण्वस्त्रांचा वापर बराचसा निषिद्ध आहे. त्यामुळे सरसकट कोणालाही अण्वस्त्र डागता येत नाही. अंतराळ युद्धाच्या बाबतीत असे फारसे करारच अस्तित्वात नाहीत. तेथे अजून तरी प्रसारबंदी स्वरूपाच्या व्यवस्थेचा विचार झालेला नाही. कारण फारच थोडे देश त्या प्रकारच्या युद्धात ऊर्जा, पैसा आणि तंत्रज्ञान व्यतीत करू शकतात. तेथे आजही जो पहिला वार करेल, तोच अंतराळ काबीज करेल अशी स्थिती आहे. यात शत्रूचे उपग्रह नष्ट वा निकामी करणे हेच प्रधान उद्दिष्ट राहील. ती क्षमता सध्याच्या काळात रशिया, अमेरिका, चीन आणि भारत या देशांनी अशा प्रकारे आत्मसात केल्याचे जाहीर केले आहे. पण अशी क्षमता सरकारबाह्य संघटना किंवा गटांकडे आली तर? त्यांना अटकाव कसा करणार? आजवरच्या पृथ्वीतलावरील लढायांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे दोन शत्रुराष्ट्रांमध्ये किंवा राष्ट्रसमूहांमध्ये युद्धरुद्ध झाल्यानंतर करार, तहनामे वगैरे काही तरी स्वरूपाची शस्त्रबंदी घडून आलेली आहे. अनेकदा शंका उपस्थित होऊनही सरकारबाह्य गटांच्या हातात अण्वस्त्रे पडली नाहीत, कारण त्याच्या प्रसारबंदीसाठी आवश्यक व्यवस्था कटाक्षाने राबवण्यात आली. अंतराळाच्या बाबतीत अद्याप तसले काही तहनामेच अस्तित्वात नाहीत. ओएसटी कराराअंतर्गत अंतराळातील ग्रह किंवा तत्सम नैसर्गिक वस्तूंवर ताबा सांगण्यास मनाई आहे. अंतराळ स्थानके किंवा भूस्थिर उपग्रहांवर अण्वस्त्रे बाळगण्यावरही बंधने आहेत. पण पारंपरिक अस्त्रांना मज्जाव नाही. कोणतेही वरकरणी आक्रमण न दर्शवताही, तेथे बाकी देशांच्या संदेशवहन प्रणालीमध्ये बिघाड घडवून आणला जाऊ शकतो. अंतराळातील संघर्ष त्यामुळेच अधिक व्यापक, अधिक विक्राळ ठरू शकतो. लोकशाही न मानणाऱ्या विस्तारवादी देशांचे त्या क्षेत्रातील वर्चस्व, या विक्राळतेत भर घालणारे ठरते.