सर्व सौर ऊर्जा उत्सुकांनी गेल्या आठवड्यात स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्सच्या काही भागांत काय झाले, याचा अभ्यास करायला हवा…
एकेका विषयाचे खूळ सुरू झाले, की शहाणे म्हणवणारेही शिंगे मोडून वासरात शिरतात. सौर ऊर्जा हे एक सध्याचे असे खूळ. ऊर्जा क्षेत्रातील ‘ऊ’देखील माहीत नसलेले भले भले सौर ऊर्जेने असे होईल आणि तसे होईल अशी प्रवचने करत गावगन्ना हिंडताना दिसतात. काही विशिष्ट उद्योगसमूहांस सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय वृद्धीचा कंड सुटणे आणि त्याच वेळी सौर ऊर्जा हा जणू सर्व ऊर्जा समस्यांवरील रामबाण इलाज असल्यासारखे सरकारने वागणे यांतील परस्पर संबंधदेखील या उत्साही कार्यकर्त्यांस दिसत नाही. सूर्य दररोज उगवतो ते केवळ आपणास वीज देण्यासाठीच, असा या मंडळींचा समज असावा. त्यात सौर ऊर्जेची सुरसुरी आलेल्यांस पर्यावरणवाद्यांची साथ. म्हणजे आंधळ्याने बहिऱ्यास पत्ता विचारण्यासारखे. या सर्व सौर ऊर्जा उत्सुकांनी गेल्या आठवड्यात स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्सच्या काही भागांत काय झाले याचा अभ्यास करायला हवा. या तीन ठिकाणी भरदिवसा अचानक वीज गेली आणि पुरता हाहाकार माजला. रस्त्यावरचे वाहतूक सिग्नल, विमाने, मोबाइल फोन सेवा, दूरध्वनी, रेल्वे, रुग्णालये अशा सर्वच सेवा वीजपुरवठा खंडित झाल्याने बंद पडल्या. त्या देशांत ‘विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती’ असा दात कोरून पोट भरण्याचा सल्ला सरकार देत नाही. त्यामुळे सर्व नागरिक सढळ हस्ते वीज वापरतात. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होणे हे श्वास कोंडण्याइतके प्राणघातक होते. पण अशी वेळ या समृद्ध प्रांतांवर मुळात आलीच का?
सौर ऊर्जेवरील अवलंबित्व, हे त्याचे कारण. पर्यावरणस्नेह, हरित ऊर्जा अशा विषयांचे खूळ युरोपियांच्या रक्तात पार खोलवर भिनले असल्यामुळे पारंपरिक ऊर्जा स्राोत बंद करून हे देश अपारंपरिक ऊर्जा स्राोतांकडे अधिकाधिक वळू लागले. आज स्पेनच्या एकूण गरजेतील ५५ टक्के वीज ही सौर ऊर्जा आहे आणि पुढील पाच वर्षांत हे प्रमाण ६० टक्क्यांवर नेण्याचा त्या देशाचा मानस आहे. तथापि गेल्या आठवड्यात जे घडले त्यामुळे सौर ऊर्जेवर एवढे अवलंबून राहावे का, अशी चर्चा केवळ त्याच देशात नव्हे तर संपूर्ण युरोपभर सुरू झाली. ज्या दिवशी स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्सचा काही भाग इत्यादी ठिकाणी वीज खंडित झाली त्या दिवशी ना काही नैसर्गिक संकट आले होते ना ढगाळ वातावरणामुळे सौर ऊर्जा निर्मिती मंदावलेली होती. चांगला प्रसन्न सूर्यप्रकाशी दिवस असूनही या परिसरास सौर ऊर्जेने त्या दिवशी दगा दिला. हे का झाले?
कारण सौर ऊर्जेचा अतिरिक्त पुरवठा. सौर ऊर्जा ही अर्थातच दिवसा तयार होते आणि अंधार पडल्यानंतर वापरण्यासाठी ती साठवून ठेवायची तर वीज साठवणाऱ्या बॅटऱ्या हव्यात. शिवाय अशी अपारंपरिक ऊर्जा ‘डीसी’ (डायरेक्ट करंट) स्वरूपात असते आणि आपली सर्व उपकरणे ही ‘एसी’ (आल्टरनेट करंट) विजेवर चालतात. ‘एसी’ विजेत वीजवाहिन्या धन आणि ऋण भार आलटून-पालटून बदलत राहतात. या बदलास ‘फ्रिक्वेंसी’ म्हणतात. स्थिर वीजपुरवठ्यासाठी ती प्रतिसेकंद ५० इतकी असायला हवी. म्हणजे एका सेकंदात वीजवाहिन्यांच्या दोन तारांत ५० वेळा धन-ऋण भाराची अदलाबदल व्हायला हवी. ही गती मंदावली, म्हणजे ‘फ्रिक्वेंसी’ कमी झाली की वीज वहन बंद पडू शकते.
स्पेनमध्ये नेमके हेच झाले. तशी वेळ आली कारण प्रत्यक्ष वापरापेक्षा वीज निर्मिती अधिक होत गेली. ही वीज निर्मिती कमी करता वा थांबवता आली नाही याचे कारण ही वीज सूर्यप्रकाशातून निर्माण केली जात होती. जोपर्यंत चांगला प्रकाश, ऊन आहे तोपर्यंत सौरपट्ट्या वीज तयार करतच राहणार, विजेची गरज असो वा नसो. अपारंपरिक ऊर्जा निर्मिती नियंत्रित करता येत नाही. ऊन नसेल तर सौर ऊर्जा तयार करता येत नाही आणि वारा पडलेला असेल तर पवन ऊर्जा निर्मिती होत नाही. सद्या:स्थितीत जलविद्याुत ही एकमेव अशी ऊर्जा आहे की जी हवी तेव्हा निर्माण करता येते वा नको असेल तर निर्मिती थांबवता येते. कोळसा वा अणू ऊर्जानिर्मिती एकदा का सुरू झाली की ती थांबवण्यासाठी दीर्घ नियोजन करावे लागते. कोळसा जाळणाऱ्या भट्ट्या एकदम बंद करता येत नाहीत आणि अणू ऊर्जेची साखळी तोडता येत नाही. गेली काही वर्षे स्पेन आणि युरोपीय देशांत नियंत्रित करता येईल अशा ऊर्जा स्त्रोतांऐवजी अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर अधिक भर देणे सुरू आहे. त्यामुळे असे झाले, की नको असतानाही आणि मागणी नसतानाही सौर ऊर्जा राष्ट्रीय वीज जाळ्यात येत राहिली. मागणी नसतानाही पुरवठा होत राहिला की अन्य घटकांबाबत जे होते तेच विजेबाबतही झाले आणि ‘फ्रिक्वेंसी’ कमी होऊन संपूर्ण वीज जाळे (ग्रीड) वीजशून्य होत गेले. हे असे प्रथमच घडले वा असे काही होईल याची कल्पना नसताना हा प्रकार घडला, असे अजिबात नाही. सौर ऊर्जेबाबत हे असे होते, हे अभ्यासकांस माहीत होतेच.
तथापि अशा वेळी पारंपरिक नियंत्रित ऊर्जा स्राोत या देशांनी अलीकडच्या काळात इतके कमी केले असतील याचा अंदाज मात्र संबंधितांस अजिबात नव्हता. म्हणजे असे, की ज्यावेळी सौर/ पवन आदी ऊर्जा वहनाची ‘फ्रिक्वेंसी’ घसरते त्यावेळी जल/ औष्णिक/ अणू ऊर्जा स्राोतांतून अधिक वीज निर्मिती करून घसरत्या फ्रिक्वेंसीला टेकू देत ती उंचावायची असते. जल/ औष्णिक/ अणू ऊर्जा स्राोत हे त्यांच्या ठाम स्थिरतेसाठी ओळखले जातात. त्यातून तयार होणाऱ्या विजेची ‘फ्रिक्वेंसी’ आणि ‘निर्मिती’ यांची निश्चित हमी देता येते. पण अपारंपरिक विजेचे खूळ डोक्यात गेलेले असल्याने नेहमीच्या पारंपरिक वीज निर्मितीकडे युरोपियांकडून दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे झाले असे की मुबलक सौर ऊर्जेच्या ‘फ्रिक्वेंसी’चा जेव्हा पाय घसरला तेव्हा तीस आधार द्यायला ना औष्णिक वीज हजर होती ना जलविद्याुत. परिणामी सौर ऊर्जेची घसरती ‘फ्रिक्वेंसी’ हताशपणे पाहण्याखेरीज आणि खंडित वीजपुरवठा सहन करण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय स्पेन, पोर्तुगाल यांच्या हाती राहिला नाही. अखेर फ्रान्सच्या अणुभट्ट्यांनी आधार दिला आणि कित्येक तासांनंतर वीजवाहक तारांच्या जिवात जीव आला.
अपारंपरिक ऊर्जा स्राोतांवर इतके अवलंबून राहणे धोक्याचे. हा धडा शिकण्याची वेळ फक्त या दोन देशांवरच आली, असे नाही. जर्मनीची आताची वाताहत याचमुळे झाली. माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी एका झटक्यात देशातील अणुभट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आणि जर्मनी ऊर्जा क्षेत्र आव्हानाच्या कचाट्यात सापडत गेला. आज युरोपात सर्वांत महाग ऊर्जा जर्मनीत आहे. परिणामी त्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. एरवी अत्यंत धोरणी आणि अभ्यासू मर्केलबाईंचा या बाबतचा निर्णय मात्र चुकला.
त्यांच्या चुकांतून आपण काही शिकणार का, हा प्रश्न! ऊर्जा ही बहुमुखी असावी लागते. सर्व ऊर्जा अंतिमत: एकच असली तरी तिची निर्मिती विविधतेतून झालेली असेल तरच ती स्थिर असते. सबब एकच एक ऊर्जा निर्मितीवर भर देण्याचा मूर्खपणा टाळायला हवा. नपेक्षा स्पेन, पोर्तुगाल यांच्याप्रमाणे ‘कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली’ असे म्हणण्याची वेळ आपल्यावरही येणार नाही; असे नाही.