एखाद्याला वेद जरी मुखोद्गत झाले, पण भगवंताची भक्ती साधली नाही, तर मायेतून निवृत्त होण्याचं ज्ञान त्याला कदापि होणार नाही. केवळ शब्दज्ञानाचीच झूल तो सदोदित पांघरेल आणि त्यानं लौकीक तेवढा वाढेल. पण मायेतून मुक्त करणारं जे ज्ञान आहे त्याची प्राप्ती हरीच्या भक्तीवाचून होणार नाही! (जरी जाहले वेदशास्त्रसंपन्न। तिहीं न करितां भगवद्भजन। मायानिवर्तक ब्रह्मज्ञान। तयांसीही जाण कदा नुपजे।।४६९।। शब्दज्ञानाची व्युत्पत्ती। दाटुगी होय लौकिक स्थिती। मायानिवर्तक ज्ञानप्राप्ती। न करितां हरिभक्ती कदा नुपजे।। ४७०।।) आता प्रश्न असा की मायेतून मुक्त होण्याची गरज खरंच आहे का आणि ही जी भगवंताची भक्ती सांगत आहेत, ती काय आहे? माया म्हणजे काय? तर आधीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला ज्या ज्या गोष्टीबद्दल ममत्व वाटतं ती ती गोष्ट सतत आपलीच असावी, असं वाटतं. मग ती गोष्ट आपलं मनोविश्व व्यापून टाकते. आपल्या मनावर तिचाच अंमल चालतो. हीच सर्व माया आहे. आता आपल्याला  एखाद्या गोष्टीबद्दल, मग ती व्यक्ती असू दे नाहीतर जमीनजुमल्यासारखी निर्जीव गोष्ट असू दे; जे ममत्व  वाटतं त्याचं मूळ आपल्याच स्वार्थपूर्तीच्या हेतूत नसतं का? म्हणजे ज्या व्यक्तीचा आपल्याला भावनिक आधार वाटतो, जी व्यक्ती आपल्याला पूर्णत्व देते, असं आपल्याला वाटतं त्या व्यक्तीबद्दलच आपल्याला ममत्व वाटतं ना? अशा व्यक्तीची साथ, अस्तित्व सदोदित हवंहवंसं वाटतं. पण जी भावना आपल्या मनात असते तशीच भावना त्या व्यक्तीच्या मनात असेलच, असं नाही. मग मुलाला आई सर्वस्व मानते, पण तो मानत असेलच असं नाही. पतीला पत्नी सर्वस्व मानते, पण तो मानत असेलच, असं नाही. मालकाला नोकर सर्वस्व मानत असेल, पण मालक तसं मानत असेल, असं नाही. तेव्हा परस्परांच्या एकमेकांबद्दलच्या भावनांमध्ये असा भेद असतो आणि त्यामुळेच जिथं ममत्व आहे तिथं अपेक्षाभंगाचा आघातही असू शकतो. मग हे ममत्व चांगलं की वाईट? दुसरा कसाही वागत असला, तरी आपण त्याच्यावर निरपेक्षपणे प्रेम करतो का? अर्थात नाही. मग या ममत्वाचं ओझं का? मग या मायेचा प्रभाव आपल्यापुरता निष्प्रभ व्हावा, असं वाटत असेल, तर भगवंताची भक्ती हाच एक मार्ग असल्याचं नाथ सांगतात. आता हा भगवंत तरी कोण आहे? तर आपल्याला अज्ञात असलेलं, पण सर्वसमर्थ असं ते परमतत्त्व आहे. या अज्ञाताच्या  सगुण भक्तीची पायवाट अनेक संतांनी तयार करून ठेवली आहे. तिच्यावरून आपल्याला फक्त चालायला सुरुवात करायची आहे. या वाटचालीनं काय होईल? जो विराट आहे त्याचा शोध सुरू झाला की मनात जे जे काही संकुचित आहे, क्षुद्र आहे, ते ते ओसरू लागेल. माणूस जसा विचार करतो तसा घडतो, असं म्हणतात ना? मग जो अशाश्वताचाच विचार करतो, तो कधी शाश्वत नसतो. ना त्याचा विचार शाश्वत असतो, ना त्याची कृती शाश्वत असते. जो व्यापक विचार करतो, त्याच्या मनाला व्यापकाचंच वळण लागतं. वृत्ती मोकळी होऊ लागते. दृष्टीकोन रूंदावू लागतो. पण हे काही जीवाला स्वबळावर शक्य होत नाही. त्यासाठी व्यापक होण्याची कला शिकवणारा सद्गुरूच लागतो. तोच समस्त भवदु:खाचं हरण करतो म्हणून तोच खरा हरी आहे. त्याच्याशी एकरूप झाल्यावरच खरं ज्ञान उपजतं. त्या सद्गुरूचं माहात्म्य आता नाथ सांगणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmatayog 129 mpg
First published on: 03-07-2019 at 00:07 IST