गुरुपौर्णिमा अवघी एका आठवडय़ावर येऊन ठेपली असताना आपण एकनाथ महाराज यांच्या प्रासादिक शब्दांतून सद्गुरू माहात्म्य जाणून घेणार आहोत, यासारखा दुसरा योग कुठला? नाथ सांगतात की, मंत्रतंत्राचा उपदेश करणारे गुरू जागोजागी आहेत, पण जो शिष्याला सद्स्वरूपात स्थित करतो तोच खरा सद्गुरू, असं भगवान कृष्णही सांगतात! (मंत्रतंत्र उपदेशिते। घरोघरीं गुरु आहेत आइते। जो शिष्यासी मेळवी सद्वस्तूतें। सद्गुरू त्यातें श्रीकृष्ण मानी।।४८१।।) त्या सद्गुरूची महती गाताना नाथ म्हणतात, ‘‘गुरु देवो गुरु माता पिता। गुरु आत्मा ईश्वर वस्तुतां। गुरु परमात्मा सर्वथा। गुरु तत्त्वतां परब्रह्म।।४८२।।’’ गुरू हा देव आहे. देव म्हणजे देणारा. माणूस जे देतो ते कधी टिकत नाही आणि भगवंत जे देतो ते कधी संपत नाही, असं साईबाबाही म्हणत. पण कुणाकडून काय मागायचं, हे आपल्यालाच उमगत नाही. दुसऱ्या माणसांकडून आनंद मिळेल, असं आपण मानतो, पण न संपणारा आनंद कुणीच देऊ शकत नाही. भगवंत अक्षय आनंद देऊ शकतो, पण आपण त्याच्याकडे नश्वर वस्तूच मागतो, अशाश्वताची शाश्वतीच मागतो. मग अशा शेकडो वस्तू भगवंतानं दिल्या तरी काय उपयोग? तेव्हा जो खरा अक्षय आनंद देऊ शकतो अशा भगवंताशी एकरूप झालेला सद्गुरू हा खरा दाता आहे. कारण तो त्या भगवंताशी अर्थात सहज आनंदाशी एकरूप होण्याची कला शिकवतो. माता जन्म देते आणि पिता पालन करतो. सद्गुरू हाच खरा मायबाप आहे. कारण तो माझ्या अंतरंगात भक्तीचा जन्म घडवतो आणि पिता होऊन त्या भक्तीबीजाचं पालन करतो. भौतिक जगात ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यूही ठरलेलाच. माता जन्म देते, पण शाश्वत जीवन नाही देऊ शकत. सद्गुरूच्या बोधामुळे ज्या भक्तीप्रेमाचा जन्म अंत:करणात होतो, ते कधीच नष्ट होत नाही. या गुरुइतका आत्मीय कोणी नाही. तोच माझं आत्मस्वरूप आहे. तोच परमात्मस्वरूपही आहे. नव्हे, तोच परब्रह्म आहे! ‘गुरुगीते’चा संदर्भ आठवतो ना? पार्वती मातेनं शिवजींना विचारलं की, हे स्वामी जीव ब्रह्ममय कसा होईल? त्यावर शिवजी म्हणाले की, हे माते, जीव ब्रह्ममय कसा होईल, हे जाणण्याआधी ब्रह्म म्हणजे काय, हे जाणलं पाहिजे. मग म्हणाले, सद्गुरूशिवाय ब्रह्म नाही, हे सत्य मी तुला सांगतो! म्हणजे काय? तर हे चराचर व्यापून जे तत्त्व उरलं आहे ते परमतत्त्व सद्गुरूच आहे. देहरूपानं या जगात वावरत असलेला सद्गुरू हा त्या परमतत्त्वाचा प्रत्यय आहे. ‘मंथुनी नवनीता तैसे घे अनंता’ जो अनंत आहे तोच ताक घुसळून लोणी निघावं त्याप्रमाणे समोर देहरूपात प्रकटला आहे, त्याचाच स्वीकार करा, त्यालाच ग्रहण करा, असं माउलीही सांगतात. मग भावमधुर शब्दांत एकनाथ महाराज सांगतात, ‘‘गुरूचे उपमेसमान। पाहतां जगीं न दिसे आन। अगाध गुरूचें महिमान। तो भाग्येंवीण भेटेना।।४८३।।’’ कोणतीही उपमा देऊन या गुरुचं पूर्ण वास्तविक वर्णन करताच येत नाही हो! त्याचा महिमा अगाध आहे आणि एक सांगू का? ‘तो भाग्येंवीण भेटेना’! भाग्याशिवाय त्याची भेट घडत नाही! जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले..  बहुत सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठलु आवडी.. अनंत जन्मांच्या सुकृतांच्या, पुण्याच्या बळावर या विठ्ठलरूपी सद्गुरूची भेट झाली आहे. नाहीतर या जगात तो उघडय़ा डोळ्यांनी दिसत असूनही त्याला डोळे भरून पाहण्याची बुद्धी थोडीच होते!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmatayog 134 abn
First published on: 10-07-2019 at 00:08 IST