या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

आकाशाकडून अभेदपणा, सर्वव्यापक असूनही अलिप्तपणा हे गुण आपण ग्रहण केले. म्हणून आकाश आपला तिसरा गुरू ठरला, असं अवधूत सांगतो. यानंतर त्याचा चौथा गुरू आहे तो म्हणजे पाणी! आतापर्यंत पृथ्वी, वायू आणि आकाश या तीन गुरूंचं वर्णन करताना त्यांच्याकडून मी कोणते गुण शिकलो, त्यांना गुरू मानण्यामागे त्यांचे कोणते गुण कारणीभूत आहेत, हे अवधूतानं सांगितलं. मात्र ‘जल’ हा गुरू का केला, हे सांगताना त्यानं आणखी एक पुढचं पाऊल टाकलं आहे. म्हणजे यात प्रथम जलाची महती वर्णिली आहेच, पण त्या जोडीला सत्पुरुषाशी त्याची तुलना करीत जलाची मर्यादाही उघड केली आहे. खरं तर समर्थ रामदासांनी ‘दासबोध’च्या पहिल्या दशकाच्या चौथ्या समासात ‘आतां सद्गुरू वर्णवेना’ असं म्हणत कोणतीही उपमा सद्गुरूंचं वर्णन करण्यात कशी तोकडी आहे, हेच सांगितलं आहे. सद्गुरूला पृथ्वीची उपमाही देता येत नाही, हे स्पष्ट करताना समर्थ म्हणतात, ‘‘धीरपणे उपमू जगती। तरी हेहि खचेल कल्पांतीं। म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं। हीण वसुंधरा।।’’ पृथ्वीची उपमा द्यावी, तर ती कल्पांती खचणार आहे, सद्गुरूतत्त्व मात्र अखंड राहणार आहे. जलाची उपमा द्यावी तर, ‘‘आतां उपमे द्यावें जळ। तरी तें काळांतरी आटेल सकळ। सद्गुरूरूप ते निश्चळ। जाणार नाहीं।।’’ असंही समर्थ सांगतात. तशाच काहीशा मर्यादा प्रथमच अवधूतही प्रकट करतो. प्रथम ‘जला’ची गुरू म्हणून महती गात तो सांगतो की, ‘‘लक्षणें पाहता जळ। स्वभावें अतिनिर्मळ। प्रकृतीस्तव कोमळ। मधुर केवळ सर्वासी।।४६०।। पवित्र व्हावया प्राणियांसी। तीर्थी तीर्थत्व उदकासी। इतुकीं लक्षणें योगियासी। अहर्निशीं असावीं।।४६१।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). म्हणजे पाणी हे स्वभावत:च अतिशय निर्मळ असतं. तसंच ते मधुर आणि कोमलही असतं. इतकंच नव्हे, तर तीर्थस्थानी या जलास तीर्थत्व येतं. योग्याच्या अंगी ही लक्षणं नित्य असावीत, असं अवधूत सांगतो. अर्थात जलाचे निर्मळत्व, माधुर्य आणि कोमलपणा हे गुण गुरुतत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर पाण्यात एक सहजभाव आहे, अहंभाव नाही. अवधूत सांगतो, ‘‘उदकीं रिघाले जे समैळ। ते स्वभावें करी निर्मळ। परी न धरी अहंबळ। जे म्यां हे क्षाळिले।।४६२।। तैसे योगियासी भजनशीळ। भावें भाविक जे केवळ। त्यांचे निरसूनि कळिमळ। न धरी बळ गुरुत्वें।।४६३।।’’ देह जर मलिन झाला असेल, तर पाण्यात शिरताच तो स्वच्छ होतो. पण याला मी स्वच्छ केलं, हा माझ्यामुळे स्वच्छ झाला, हा भावच पाण्याच्या ठिकाणी नसतो. नव्हे, ते तिथं थांबतही नाही. वाहातच जात असतं. तसा योगी हा जे भजनशील आहेत अशा भाविकांच्या अंत:करणातला मल धुऊन टाकतो, पण त्याचं श्रेय घेत नाही. भौतिकाचा अतिविचार, मग अविचार आणि अखेरीस कुविचार याप्रकारे भाविकाचं अंत:करण मलिन झालेलं असतं. योग्याच्या नुसत्या सहवासातच त्याच्या बोधानं, प्रेमयुक्त वर्तनानं आणि तळमळीनं भाविकाच्या विचारांत सूक्ष्म पालट होऊ लागतो. भौतिकाच्या अतिविचाराची सवय खंडित होऊ लागते. मग अविचार आणि त्यापाठोपाठ कुविचारामागे वाहत जाणं थांबतं. पण त्याचं श्रेय योगी घेत नाही. त्याचं अंत:करण प्रेमधारेप्रमाणे वाहतच असतं. ते श्रेय भाविकाच्या सद्गुरुकृपेला देऊन तो मोकळा होतो. पाणीही वाहत राहिलं नाही आणि साचून राहिलं, तर कालांतरानं त्याचं डबकं होतं. योग्याचं अंत:करण तसं कधीच साचून संकुचित होत नाही. म्हणून त्याची निर्मळता आटत नाही.

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmayog article 335 abn
First published on: 30-06-2020 at 00:06 IST