– चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यांशाच्या बळावर देवयोनी प्राप्त होते, पण ते पुण्य क्षीण झाल्यावर देवलोकातून पुन्हा मृत्युलोकातच फेकलं जातं, असं ‘भगवद्गीता’ही सांगते. याचाच अर्थ, अतुलनीय पुण्य करून तुम्हाला स्वर्ग मिळू शकतो, पण मुक्ती नाही! मुक्त होण्यासाठी मनुष्यजन्मास येऊन खरी साधना करणं, हाच एकमेव उपाय आहे. आता जसं पुण्य करून स्वर्ग लाभतो, तसंच घोर पापाचरण करून नरक लाभतो. पण त्या नरकातूनही पुन्हा मनुष्यजन्माला आल्याशिवाय मुक्तीच्या प्रयत्नांची शक्यताच नाही. थोडक्यात, नरक असो की स्वर्ग, पाप असो की पुण्य; या कशाचाच खऱ्या अर्थानं मुक्त होण्यासाठी उपयोग नाही. दोन्हीही गुंतवणारेच आहेत. ‘स्वात्मसुख’ या लघुग्रंथात एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘लोखंडाची बेडी तोडिली। मा आवडी सोन्याची जोडिली। तरी बाधा तंव रोकडी। जैशीतैशी।।२४९।। खैराचा सूळ मारी। मा चंदनाचा काय तारी। तैसी ज्ञान अज्ञान दोन्ही परी। बाधकचि।।२५०।।’’ म्हणजे लोखंडाची बेडी तोडून टाकली, पण सोन्याची बेडी हातात घातली, यानं गुलामीत काय फरक पडला? खैराच्या लाकडाचा सूळ केला आणि त्यावर चढवलं तर माणूस मरतो, पण चंदनाचा सूळ काय त्याला तारतो काय? चंदन भले शीतल आहे, पण ते शरीरात भोसकलं गेलं तर ते शीतल नव्हे, घातकच आहे. यात लोखंडाची व सोन्याची बेडी आणि खैराचा व चंदनाचा सूळ हे दोन्ही जसे घातक, तसंच ज्ञान आणि अज्ञान दोन्ही घातकच, असं म्हटलं आहे. हे वाचून आपण चक्रावून जाऊ, यात नवल नाही. कारण अज्ञान घातक, हे माहीत आहेच. त्यात ज्ञानही घातक म्हटल्यानं धक्का बसणं स्वाभाविक आहे. त्यासाठी नीट विचार करून नाथांना काय सांगायचं आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. कोणतं ज्ञान घातक आहे? तर ज्ञातेपणाचा अहंकार वाढवणारं ज्ञान घातक आहे. ती सोन्याची बेडी आहे, चंदनाचा सूळ आहे! ‘स्वात्मसुख’ लघुग्रंथातच नाथ पुढे सांगतात की, ‘‘जेथ सूक्ष्मत्वें अभिमानू असे। तेथ सूक्ष्मत्वेंचि विषयो वसे। तेणें अभिमानें लाविलें पिसें। मी मुक्त म्हणोनी।।२५८।।’’ जिथं अगदी सूक्ष्मत्वानं अहंकार वास करीत असतो, तिथं सूक्ष्मपणे विषयांची ओढ असते. जिथे विषयांची ओढ आहे, तिथं अपेक्षा आहेत. मग त्या अपेक्षापूर्तीची तळमळ आणि अपेक्षाभंगाची भीती आहे, चिंता, मत्सर, द्वेष आहे. तरीही मी मुक्त झालो, असा भ्रम मनात रुंजी घालू लागतो. नाथच विचारतात, ‘‘जैं मीपण जीवाचे पोटीं। तैं मुक्तता कैची।।२५६।।’’ जीवाच्या अंत:करणात जोवर ‘मी’पणा आहे, तोवर मुक्ती कसली? मग हा अभिमान जर देवांच्याही मनात उत्पन्न झाला, तर काय होतं, हे नमूद करताना एकनाथ महाराज सांगतात, ‘‘मीपण ईश्वरा बाधी। तोही शबल कीजे सोपाधी। शुद्धासी जीवपदीं। मीपण आणी।।२५७।।’’ ईश्वराच्या मनात मीपणा झिरपला, तर तोही हतबल होतो. शुद्धाचं मन अशुद्ध होत असेल, तर ते केवळ मीपणामुळेच. तेव्हा माणसाचा जन्म हा मुक्तीचा व बंधनाचाही दरवाजा आहे! दरवाजा उघडून जसं बाहेर पडून मुक्तपणे वावरता येतं, तसंच दरवाजा बंद करून, स्वत:ला कोंडून घेऊन बंधनात कुढतही जगता येतं. मनुष्यजन्माची सुवर्णसंधी आपल्याला लाभली आहे. तो दरवाजा उघडायचा की बंद करून घ्यायचा, हे आपल्या हाती आहे! कपोतानं बंधनाच्या पारडय़ातच उडी घेतली. जन्म-मृत्यूच्या चक्राचीच निवड केली. आपल्याकडून तसं होऊ नये, ही जाणीव कपोताच्या निमित्तानं झाली, असंच अवधूत सुचवत आहे. म्हणूनच कपोत हा त्याचा एक गुरू ठरला आहे!

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmayog article 372 abn
First published on: 20-08-2020 at 00:06 IST