– चैतन्य प्रेम

नामाचं माहात्म्य सांगत असताना मध्येच ध्यानाचं वर्णन कसं आलं, असं वाटू देऊ नका. कारण हा ध्यानलौकिक खरंतर नामलौकिकच उच्चरवानं गाणारा आहे! कसं? ते आता जाणण्याचा प्रयत्न करू. आपण पाहिलं की, साधी अळीदेखील भयातून साधलेल्या भिंगुरटीच्या तीव्र ध्यानानं भिंगुरटी होते, तर मुळातच जो माझा आहे, माझाच अभिन्न अंश आहे, तो माझ्याशी एकरूप होणं काय कठीण आहे, असा भगवंताचा प्रश्न आहे. कारण केवळ भ्रमामुळे जीवाच्या बाजूनं दोघांमध्ये पडदा आला आहे. एकदा तो भ्रम नष्ट झाला की, भगवंताशी असलेली ही तद्रूपता कायम आहेच, असं भगवंत सांगतात. हा भ्रम नष्ट करणं, ही तद्रूपता कायम करणं, हीच मनुष्य जन्माची सार्थकता आहे, असंही भगवंत स्पष्ट करतात. ‘एकनाथी भागवता’च्या नवव्या अध्यायात ते पुढे म्हणतात की, ‘‘येणें देहें याचि वृत्तीं। आपुली आपण न जाणे मुक्ती। नेघवे भगवत्पदप्राप्ती। तैं वृथा व्युत्पत्ती नरदेहीं।।२४५।।’’ या मनुष्यदेहात येऊनही ज्याची वृत्ती अशी होत नाही त्याला मुक्ती म्हणजे काय, हे स्वबळावर कधीच कळू शकत नाही! त्याला परम अखंड आनंदरूप आत्मस्थिती कधीच प्राप्त होऊ शकत नाही. आता ‘तैं वृथा व्युत्पत्ती नरदेहीं,’ याचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ असा की, मनुष्य म्हणून व्युत्पत्ती होऊनही ही वृत्ती न घडल्यानं त्याच्या देहगत सर्व क्षमता व्यर्थ ठरतात. तर दुसरा अधिक समर्पक वाटणारा अर्थ असा की, या देहबळावर शरीराला विविध साधनांत जुंपून भगवंताच्या व्युत्पत्तीचे त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरतात!  भगवंत स्पष्ट फटकारतात की, ‘‘वृथा त्याचें ज्ञान ध्यान। वृथा त्याचें यजन याजन। वृथा त्याचें धर्माचरण। चैतन्यघन जरी नोहे।।४४६।।’’ म्हणजेच आंतरिक वृत्तीत खोट असेल, चैतन्य तत्त्वाचं भान नसेल, पण शरीर मात्र ज्ञानसाधनेत, ध्यानसाधनेत, यजन, याजन, धर्माचरणात जुंपलं असेल, तर ते सारं व्यर्थ आहे. तर व्युत्पत्ती झाली, पण वृत्ती झाली नसेल, तर ती वृत्ती घडायला ‘रामनामाची आवृत्ती’ हाच एक उपाय आहे! कारण ध्यान साधत नसेल तर नाम हाच सोपा उपाय आहे, असं नमूद करीत २८व्या अध्यायात भगवंत सांगतात की, ‘‘असो न टके माझें ध्यान। तैं सोपा उपाव आहे आन। माझें करितां नामकीर्तन। विघ्ननिर्दळण हरिनामें।।६१६।।’’ म्हणजे भगवंत सांगतात की, ‘जर माझं ध्यानही साधत नसेल, तर माझं नामसंकीर्तन, माझा नामघोष करणं हा सोपा उपाय आहे! कारण हरिनामानं समस्त विघ्नांचं निर्दालन होतं!’ तेव्हा पुन्हा सातव्या अध्यायाचा आधार घेत, ‘रामनामाच्या आवृत्तीं। चारी मुक्ती दासी होती।’ या सूत्राकडेच वळावं लागेल. आता आवृत्ती म्हणजे काय? ‘आ’ म्हणजे पूर्ण. जसं ‘आजन्म’चा अर्थ जन्मभर, पूर्ण जन्म. तसं ‘आवृत्ती’ म्हणजे पूर्ण वृत्ती! ही वृत्ती कोणती? तर आधीच सूचित केलेली, नश्वराचा निरास करून ईश्वराशी समरस होणारी भगवद् वृत्तीच! या पूर्ण वृत्तीनंच ‘रामनाम’ घ्यायचं आहे!

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
pune mba cet marathi news, mca cet marathi news
आणखी दोन अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे, अर्ज नोंदणीसाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य