या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

साधक आणि सामान्य माणूस यांच्यात काय फरक असतो किंवा असला पाहिजे हो? साधक हा वरकरणी सर्वसामान्य माणसासारखाच दिसतो. प्रापंचिक साधकाचं जीवनही चारचौघांसारखंच भासत असतं. त्याच्याही जीवनात चढउतार होत असतात. पण साधकांचेही दोन प्रकार आहेत. एक जन्मजात साधक असतो. त्याला फार लवकर जाग आलेली असते आणि तो साधनपथावर अधिक सजगपणे वाटचाल करीत असतो. साधकाचा जो दुसरा प्रकार आहे त्यात बहुतांश प्रमाणात आपण सगळे जण मोडतो. हा जन्मजात साधक नसतो. जीवनातल्या अडीअडचणींनी त्याला जाग येऊ लागलेली असते. ही पूर्ण जाग नसते बरं का. मोहनिद्रेचा अंमल पुरता उतरलेला नसतो. भ्रामक स्वप्नं पूर्णपणे खोटी वाटत नसतात. अशा साधकानंही साधना चिकाटीनं चालू ठेवली, तर त्याचा आंतरिक संघर्ष कमालीचा तीव्र होऊ शकतो. आता सर्वसामान्य माणसात आणि आपल्यात काय फरक असावा, हे अशा साधकानं शोधणं गरजेचं असतं. काय हा फरक? तर वरकरणी काहीच नाही, पण आंतरिक फरक निश्चितच असला पाहिजे आणि दृढावला पाहिजे! म्हणजे विकार-वासनांतून आपणही मुक्त नसू, पण निदान त्यातून मुक्त व्हावं, ही ओढ असली पाहिजे. त्यासाठी अंत:करणात सद्गुरूंची आळवणी झाली पाहिजे. आपल्या मनात विकार जागृत होतात, मग आवेग उत्पन्न होतो आणि मग त्या आवेगाच्या भरात कृती घडते. आपण विकार तर काही नष्ट करू शकत नाही, पण एकदा सद्गुरू म्हणाले की, ‘‘आवेगांवर ताबा मिळवला तरी खूप आहे. तीच मोठी तपश्चर्या आहे.’’ म्हणजे  विकार जागृत होतील, आवेगही उत्पन्न होईल, पण तो आवेग आवरला की प्रत्यक्ष कृती घडणार नाही. म्हणजे पूर्वी जी कृती सहज घडून जात होती ती घडली नाही तर कर्म परिणामांचं ओझं आपसूक दूर होईल. इथं पुन्हा लक्षात घ्या. प्रापंचिक साधकाला देहरक्षण, कुटुंबपोषण आणि जोडीदाराचंही सुख लक्षात ठेवावंच लागतं. त्यासाठी विकारांचा आवश्यक वापर अपरिहार्य आहे. पण माणूस साधनी असो वा नसो, एक वेळ किंवा आयुष्यात एक टप्पा असा येतोच जेव्हा विकारवशता सुटली नसेल तर स्वत:ची कोंडी होते. कामवासनाच नव्हे, तर इतरही विकारांबाबत हीच स्थिती असते. समजा क्रोध हा विकार तुमच्यात प्रमाणाबाहेर आहे, तर तरुणपणी आणि गृहस्थ जीवनात तो एक वेळ खपून जातो, पण वृद्धपणी? वृद्धपणी मुलं तुमचा क्रोध धुडकावतात. लोभ, मोह, मद या सर्वाची हीच दशा असते. तेव्हा प्रापंचिकालाही जिथं कृतीमागील विकारांचा उद्रेक थोपवणं भाग पडतं तिथं साधकानं आधीच त्या दिशेनं अभ्यास का करू नये? म्हणून केवळ आवेगांवर नियंत्रण आणायचं आहे. बरं हे नियंत्रण सामान्य माणूसही आणतो बरं का! समजा कार्यालयात घरून दूरध्वनी आलाय आणि घरच्यांशी काही खटका उडालाय. त्याच वेळी आपल्या वरिष्ठांनी बोलावलं तर त्यांच्यासमोर आतला राग लपवला जातोच ना? अगदी घरात खटका उडालाय तेवढय़ात दार वाजलं, पाहुणे आले. मग त्यांचं आगत-स्वागत हसऱ्या चेहऱ्यानं केलं जातंच ना? तेव्हा असं नियंत्रण ही काही अशक्य कोटीतली गोष्ट नाही. साधकानं त्यामुळेच आवेग आवरण्याचा अभ्यास केला पाहिजे. आता सर्व विकारांमध्ये कामवासना बलिष्ठ आहे. तिचा आवेग आवरणं काही सोपी गोष्ट नाही. बरं ती आवरताना जे नैसर्गिक आहे त्याचा एकांगी, अनाठायी त्याग करण्याचं टोकही गाठायचं नाही.

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmayog article 420 abn
First published on: 28-10-2020 at 00:06 IST