– चैतन्य प्रेम

केवळ रसनासक्तीने पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं, हे कुणाला पटणार नाही, हे जाणून अवधूत म्हणतो की, ‘‘इंद्रियांची सजीवता। ते रसनेआधीन सर्वथा। रसनाद्वारें रस घेता। उन्मत्तता इंद्रियां।।१७८।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). आता ‘आहारा’चा व्यापक अर्थ लक्षात घेतला, तर जे जे मी बाहेरून आत अंत:करणात ग्रहण करतो तो सगळाच आहार आहे. हा आहार आपण गेल्या वेळी पाहिला की पाहणं हा डोळ्यांचा आहार आहे, ऐकणं हा कानांचा आहार आहे, गंध घेणं हा नाकाचा आहार आहे.. तर या इंद्रियविषयांत जेव्हा इंद्रियं रमतात तेव्हा त्यांना जणू सजीवता प्राप्त होते आणि त्या विषयांवर पोसून ती उन्मत्त होतात. रसनेचा जो आहार आहे तोही दोन प्रकारचा आहे. आवडीचे पदार्थ खाणं हा जसा सर्वपरिचित आहार आहे तसाच आत्मस्तुती आणि परनिंदा हाही जिव्हेवाटे चित्तात जमा होणारा कुसंस्काररूपी आहारच आहे! पदार्थ खाण्याची ओढ मनालाच असते. जिव्हा ही फक्त पदार्थ तिखट आहे की गोड, खारट आहे की कडू, तुरट आहे की आंबट एवढी चव ओळखण्याचं माध्यम आहे. तेव्हा लोलुप्य खरं तर मनाचंच असतं पण जिव्हालोलुप्य म्हणून रसनेच्या माथी खापर फोडलं जातं. आत्मस्तुती आणि परनिंदेची गोडीही त्याचप्रमाणे जिव्हेला नसते. मनालाच असते. मनाच्या घडणीनुसार जीभ फक्त उच्चार करते, पण ‘जिभेला काही हाड आहे की नाही,’ या टीकात्मक प्रश्नाचं बोट तिच्याच नावानं मोडलं जातं. जी गोष्ट जिव्हेची तीच इतरही इंद्रियांची. डोळे हे पाहण्याचं, कान हे ऐकण्याचं केवळ माध्यम आहेत. पाहण्या-ऐकण्याची ओढ मनालाच असते. तेव्हा हे जे इंद्रिय विषय म्हटले जातात ते खरं तर मनाचेच विषय आहेत. मन जेव्हा त्या त्या इंद्रियात प्रकट होतं तेव्हाच त्या इंद्रियांत विषयांबाबत सजीवता जागी होते. मग मनाच्या जोरावर जेव्हा इंद्रियं विषय ओढीनुसार वेगानं फरपटत जातात तेव्हा काय घडतं? अवधूताच्या माध्यमातून एकनाथ महाराज सांगतात की, ‘‘मातली जे इंद्रियसत्ता। ते नेऊनि घाली अध:पाता। रसना न जिणता सर्वथा। भवव्यथा चुकेना।।१७९।।’’ इंद्रियं याप्रमाणे मातली की ती अध:पात घडवतात. जोवर ही ‘रसना’ म्हणजे मनाची बाह्य विषय भोगण्याची ओढ जिंकली जात नाही तोवर भवव्यथा काही चुकत नाही. शारदामाता म्हणत की, ‘बर्फीचा अर्धा तुकडा खायची इच्छा जरी उरली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो!’ तर अनंत इच्छारूपी बर्फीचे असे अनंत अर्धे तुकडे जोवर उरले आहेत तोवर त्या त्या इच्छांच्या पूर्ततेसाठी पुन्हा जन्मणं भाग आहे. पुन्हा जन्म म्हणजे पुन्हा अनंत अवास्तव नव्या इच्छा, अशाश्वताची ओढ आणि आसक्ती, त्यासाठीचा संघर्ष हे सगळं आलं. हीच तर भवव्यथा आहे. भ्रम, मोह आसक्तीत रुतलेल्या मनाला ‘अमुक व्हावं’ (भव) असं वाटत राहणं म्हणजे वारंवार अपेक्षाभंगही सोसणं आहे. कारण भ्रम-मोहामुळे जे योग्य आहे, वास्तव आहे ते उमजत नाहीच आणि जे अयोग्य, अवास्तव, अव्यवहार्य आहे तेच हवंसं वाटतं. जोवर मनाच्या भ्रामक ओढीला लगाम कसा घालावा, हे कळत आणि वळत नाही, तोवर काही उपयोग नाही. अवधूत म्हणतो, ‘‘आहारेंविण देह न चले। सेविल्या इंद्रियवर्गू खवळे। रसनाजयाचें मूळ कळे। तैं दु:खें सकळें मावळलीं।।१८०।।’’ म्हणजे देहव्यवहारासाठी आहार हवाच, पण त्याच्या आधीन न होण्याचा उपाय समजला, तरच भवदु:ख मावळणार आहे!