– चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एकनाथी भागवत’सारखे सद्ग्रंथ नीट वाचू लागलो, तर ते आपल्याला जगण्याकडे नव्यानं बघायला शिकवतात. अलिप्तपणे जेव्हा आपण एखादी गोष्ट न्याहाळतो ना, तेव्हाच त्या गोष्टीतले खरे गुण-दोष जाणवतात. मग ‘एकनाथी भागवत’च्या प्रकाशात आपलं जीवन कसं दिसतं? आपलं जीवन कसं आहे हो? तर सतत कर्मशील आहे. कर्माशिवाय आपल्या जीवनातला एक क्षणदेखील सरत नाही. भगवंतही गीतेत सांगतात की, ‘न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत्।’ अर्थात कोणताही जीव कर्म केल्याशिवाय क्षणभरदेखील राहू शकत नाही. ‘काही न करणं’ हेसुद्धा कर्मच आहे! तसंच जोवर देहात चैतन्य आहे, तोवर देहाचा प्रकृतीशी अर्थात दृश्याशी संपर्क आहे आणि जोवर हा संपर्क आहे तोवर कर्मरूपी प्रतिसाद आहेच. माऊली म्हणतात, ‘‘जंव प्रकृतीचें अधिष्ठान। तंव सांडी मांडी हें अज्ञान!’’ त्रिगुणात्मक प्रकृतीचा, दृश्याचा पाया आहे तोवर मी कर्म सोडतो किंवा मी कर्म करतो, हे बोलणं अज्ञानाचं आहे. कर्म घडतच असतं. ‘‘म्हणऊनि संग जंव प्रकृतीचा, तंव त्याग न घडे कर्माचा!’’ दृश्य जग पाहणं, ऐकणं हेदेखील कर्मच आहे ना? श्वासोच्छ्वासाचं सूक्ष्म सहज कर्म तर जन्मापासून सुरूच आहे! या कर्माचे स्थूलमानानं चार प्रकार आहेत. श्रीकृष्ण परमसखा उद्धवाला सांगतात की, ‘‘कर्म चतुर्विध येथ। ‘नित्य’ आणि ‘नैमित्त’। ‘काम्य’ आणि ‘प्रायश्चित्त’। जाण निश्चित विभाग।।४७।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय दहावा). आता शास्त्रांनी नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध असे कर्माचे चार प्रकार सांगितले असून, त्यांतील पहिली तीन कर्मे ही धर्मानुसारच्या कर्मकांडाशीच निगडित आहेत. म्हणजे रोजची पूजा-अर्चा, स्नान-संध्या ही नित्य कर्मे आहेत, विशिष्ट दिवसाला धरून विशिष्ट धर्मकार्य करतात ती नैमित्तिक आहेत, भौतिकातील प्राप्तीच्या हेतूनं केली जाणारी धार्मिक व्रतवैकल्यं, यज्ञ आदी ही काम्य र्कम आहेत आणि मनाच्या ओढीनं होणारी विपरीत र्कम ही निषिद्ध र्कम आहेत. पण आपण सर्वसामान्य माणसाच्या अंगानं सामान्य पातळीवर नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त र्कम कोणती, याचा विचार करू. शास्त्रार्थानुसार कर्माची बैठक वा कर्मकांडांची बैठक आपल्या या विवेचनात मांडलेली नाही, एवढं लक्षात घ्यावं. तर नित्य म्हणजे काय? तर दररोज जी आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपल्यापासून सकाळी जाग येईपर्यंत श्वासोच्छ्वासापासून जी जी कर्मे करतो ती नित्य र्कम म्हणता येतील. काही वेळा विशेष निमित्तानं आपण र्कम करतो ती नैमित्तिक ठरतील. काम्य म्हणजे मनाच्या इच्छेनुसार, ओढीनुसार केली जाणारी र्कम! आता ‘एकनाथी भागवता’त कर्माच्या प्रकारात निषिद्ध कर्म न देता एकदम प्रायश्चित्त कर्माचा उल्लेख येतो. याचं कारण बरीचशी काम्य र्कम ही निषिद्ध कर्मामध्येच परावर्तित होऊ शकतील, अशीही असतात! काम्य आणि निषिद्ध कर्मातली सीमारेषा अतिशय धूसर आहे. त्या निषिद्ध कर्माचा पश्चात्ताप झाल्यावर त्यात दुरुस्ती करण्यासाठी घडणाऱ्या प्रायश्चित्त कर्माना म्हणूनच इथं स्वतंत्र स्थान दिलं आहे. ते अभिनव आहे. तर असा जीवनाचा प्रत्येक क्षण यांपैकी कोणतं ना कोणतं कर्म करण्यात सरतच असतो. यातली नित्य, नैमित्तिक आणि काम्य र्कम ही मनाची इच्छा आणि अनुमती असते म्हणूनच घडत असतात. मन हे विचारशील आहे, पण ते भावनाशील अधिक आहे. त्यामुळे बुद्धीला डावलून मनाच्या भावनिक ओढीनं बरीच र्कम घडतात आणि त्यांच्या गुंत्यात जीवनाचा प्रवाह गुरफटतो!

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmayog article 459 abn
First published on: 24-12-2020 at 00:01 IST