– चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनुष्यजन्माचं आणि नरदेहाचं मोल सगळ्यांनाच माहीत असतं, पण आपल्या जगण्याचं मोल किती जण खरोखर जाणतात? आम्ही काही गुरुबंधू एकदा गप्पा मारत बसलो होतो. खरं तर चहा प्यायला म्हणून बसलो होतो. तो संपला आणि गप्पा आपसूक सुरू झाल्या. तोच गुरुजी आले आणि म्हणाले, ‘‘तुमच्याकडे काय वेळच वेळ आहे! अनेक जन्मं यायचं आहे. मला मात्र ठरल्या अवधीत काम संपवायचंय!’’ लगेच सगळे भानावर येऊन कामाकडे धावलो. तर असा अनवधानानं प्रत्येक क्षण मोठय़ा वेगानं सरत आहे. दिवस-रात्र तीच धावपळ, त्याच चिंता, तेच विचार. जरा म्हणून उसंत नाही. थोडी उसंत मिळाली तर दूरचित्रवाणीवरील मालिकांतील घराघरांतील भांडणं पाहून मनावर ताण आणण्याची सोय करणार! त्यांना विरोध नाही बरं, उलट समाजमाध्यमांत अभिनय, कथा, मांडणी या दृष्टीनं अत्यंत सशक्त मालिकांचा ओघ सध्या सुरू आहे. पण त्यांना मर्यादा आहे. मनाशी शांतपणे संवाद साधायला, अंतर्मुख व्हायला, एकाग्र व्हायला, चित्ताला स्थिर होण्यासाठी संधी द्यायला आपण वेळ कधी काढणार? बाह्य़ जगाला आपल्या अंत:करणात कुठवर पसरू देणार? ज्या साधकाच्या अंत:करणात स्थिरता असते, तोच सद्गुरू-सहवासाचा खरा लाभ घेऊ शकतो. कारण तोच या बोधाचं यथायोग्य श्रवण, मनन, चिंतन आणि आचरण साधू शकतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘जैसा दीपु दीपें लाविला। लावितांचि तत्समान झाला। तैसा निश्चळास गुरू भेटला। तो तत्काळ झाला तद्रूप।।१९९।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय दहावा). डोळ्यांसमोर आणा की, एका दिव्यानं दिवा प्रकाशित केला आहे. एकच कशाला, अनेक दिवे तेवू लागले आहेत. तर यातला पहिला दिवा नेमका कोणता, हे ओळखता येईल का? तशी सद्गुरूची इच्छा आपल्या शिष्याला ‘आपणासारिखे’ तत्काळ करण्याचीच असते. ते होण्यासाठी शिष्यही सर्वार्थानं, सर्वागानं सद्गुरुसन्मुख असावा लागतो. सद्गुरुसन्मुख असला की आपोआप विकारवशतेतून तो सुटतो. यानंतरचा सातवा गुण आहे अर्थजिज्ञासा. पोथ्यापुराणं, स्तोत्रं, ग्रंथ सगळं शब्दार्थानं समजलं. आता अनुभवानं कळावं, ही ती जिज्ञासा असते. मग आपल्याप्रमाणेच जे अन्य गुरुभक्त आहेत त्यांच्याविषयी असूया ज्याच्या अंत:करणात नसते, त्या शिष्याचा अनसूया हा आठवा गुण आहे. त्यानंतरचा नववा गुण म्हणजे वाणीसंयम! हा साधक सद्गुरूसमोरही व्यर्थ बोलत नाही, कुणाची निंदा करीत नाही, खोटं बोलत नाही. ज्या वाणीनं नाम घ्यायचं तिचं पावित्र्य तो सांभाळतो. या साधकाचा वावर कसा असतो? तर, ‘‘न मिरवी शब्दज्ञान। न दाखवी आत्ममौन। न धरी वचनाभिमान। सदा स्मरण गुरूचें।।२३३।।’’ म्हणजे तो ऐकीव शाब्दिक ज्ञान प्रकट करून मोठेपण मिरवत नाही, की उगाच मौनात असल्याचा डंकाही पिटवत नाही! तर तो सदैव सद्गुरुस्मरणातच दंग असतो. यात एक रहस्य आहे बरं. जेव्हा शिष्य सद्गुरुस्मरणातच दंग असतो तेव्हा निर्थक गोष्टींपासून गुरूच त्याला दूर ठेवतात आणि अगदी आवश्यक तिथे बोलायला वाव देतात. पू. बाबा बेलसरे यांना एकदा विचारलं, ‘‘आम्ही अचानक येतो, तुम्हाला त्रास होत नाही ना?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘जे येतात ते महाराजांच्या इच्छेनंच येतात, त्यामुळे मला त्रास नाही!’’ तर असं आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढंच जग अशा शिष्याच्या परिघात प्रवेश करू शकतं! ते ध्येय असावं. उद्या या सदराचा समारोप करताना या ध्येयाचंच स्मरण करू.

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmayog article 463 abn
First published on: 30-12-2020 at 00:06 IST