– चैतन्य प्रेम

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

यदुराजानं अत्यंत नम्रतेनं अवधूताला आनंदप्राप्तीचं कारण विचारलं. त्या अनुषंगानं गीतेतल्या चौथ्या अध्यायातला ३४ वा श्लोक आणि माउलींनी केलेलं त्याचं विवरण आपण पाहिलं. गीतेतील मूळ श्लोकाचा प्रचलित अर्थ असा सांगितला जातो की, ‘‘गुरूंकडे जाऊन नम्रपणे त्यांना प्रश्न विचारा, त्यांची सेवा करा, मग ते तुम्हाला परमज्ञान देतील!’’ आता थोडा विचार करा, आधी गुरूंकडे जायचं, मग त्यांना प्रश्न विचारायचा, मग त्यांची सेवा करायची, मग ते प्रश्नाचं उत्तर म्हणजे ज्ञान देणार, ही प्रक्रिया किंवा ही क्रमवारी थोडी विचित्र नाही का वाटत? खरं तर आधी गुरूंकडे जा, त्यांची सेवा करा, मग त्यांना नम्रतेनं प्रश्न विचारा, मग ते ज्ञान देतील; हे अधिक सुसंगत नाही का? कारण प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मिळण्यादरम्यान जी सेवा करायची ती काही पाच-दहा मिनिटांची अभिप्रेत नाही. मग सेवाच आधी आणि मुख्य प्रश्न आणि उत्तर नंतर, हे योग्य नाही का? मग हा गोंधळ भासतो तो या श्लोकाच्या शाब्दिक अनुवादातील क्रमवारीत. माउलींच्या भावानुवादात मात्र हा क्रम मुळात जसा अभिप्रेत आहे तसाच सांगितला आहे. म्हणजे, ‘‘हे साधका, ते परमज्ञान प्राप्त व्हावं, अशी इच्छा असेल, तर आधी सर्वभावे सदगुरूंचं भजन कर, सदगुरूंना शरणागत हो. अरे गुरुस्थान हे ज्ञानाचं माहेरघर आहे. सेवा त्या घराचा उंबरठा आहे. तो उंबरठा स्वाधीन करून घे. तन, मन, प्राण अर्पून अहंभाव सोडून त्यांच्या चरणी लाग, त्यांचं दास्य कर. मग तुला अपेक्षित परमज्ञान ते सांगतील. त्यानं तुझं मन नि:शंक आणि  विकल्परहित होईल.’’ इथं माउलींच्या विवरणात, ‘‘जे ज्ञानाचा कुरुठा। तेथ सेवा हा दारवंटा,’’ हा चरण फार मोलाचा आहे. कुरुठा म्हणजे माहेर. तर, ‘‘सदगुरू हे ज्ञानाचं माहेरघर आहेत. त्या घराचा उंबरठा सेवा!’’ असं वाचलं की अंतर्मनात अर्थ प्रकाशमान होऊ लागतो. ‘सेवा’ म्हणजे ‘सेवन करा’ या दृष्टीनं पाहिलं की श्लोकही अधिक अर्थपूर्ण भासू लागतो. आता ‘उंबरठा’ म्हणजे काय? तर मर्यादा! सदगुरूंना अपेक्षित मर्यादांचं पालन माझ्याकडून झालं पाहिजे, हा एक अर्थ आहे. आता उंबरठा कुठे असतो? तर घराच्या दाराला. उंबरठय़ाच्या आत घर असतं आणि उंबरठय़ापलीकडे जग. आता जग मोठं असतं की घर? तर अर्थात जग. पण तरीही जगात फार काळ राहिल्यावर माणसाला घराचीच ओढ असते. घरी गेल्यावर त्याला वेगळंच समाधान लाभतं. इथलं घर तर ज्ञानाचं माहेरघर आहे आणि म्हणूनच जग अज्ञानप्रधान ठरतं. पण माणसाला दोन्ही सांभाळावं लागतं. घर (परमार्थ) आणि जग (प्रपंच) या दोन्हीत प्रथम वावरावं लागतं, पण त्यात ‘उंबरठय़ा’चं सेवन म्हणजे योग्य मर्यादेचं पालन आणि सदगुरू बोधाचं सेवन आवश्यक असतं, प्रपंच आणि परमार्थात योग्य ते संतुलन राखावं लागतं. प्रपंचात राहून परमार्थ साधायचा असेल तर हा उंबरठा सेवावाच लागतो, स्वीकारावा लागतो. म्हणजे गुरूकडे जा नम्रपणे त्यांना प्रश्न विचारा पण तुमच्या अंतर्मनात प्रपंच आणि परमार्थाचं संतुलन असेल, परमार्थाचं महत्त्व उमगलं असेल, तर मग तुमच्या प्रश्नाचं उत्तरही लगेच दिलं जातं.

chaitanyprem@gmail.com