या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

परम तत्त्वाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीची आस आणि आवड नसणं, हीच खरी भक्ती आहे. आस आणि आवड, या दोन शब्दांत खरं तर भक्तीच्या आंतरिक यात्रेचा प्रवास सांगितला आहे. आस किंवा ओढ ही जी गोष्ट आपल्यापाशी नसते तिची असते आणि जी गोष्ट आपल्यापाशी आहे, जिचा अनुभव आहे, तिचीच आवड असू शकते. आज भक्तीची आवड नाही, कारण तिचा खरा अनुभवच नाही. खरं तर भक्तीची आसदेखील आपल्या मनात उपजलेली नाही. जी आस आहे ती भौतिकाची आहे आणि ते भौतिक मनाजोगतं सावरलं जावं, यासाठीचा उपाय म्हणून आपण भक्ती ‘करीत’ आहोत! खरी आस भौतिकाचीच आहे आणि तिच्यामुळेच आपण बंधनात अडकून आहोत. ‘हस्तामलक टीके’त एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘ज्याची नि:शेष आस तुटली। त्याचीचि अविद्या निवटली। त्यासीचि शांती नि:शेष जाली। स्थिति वंदिली सदाशिवें॥’’ ज्याच्या मनातून भौतिकाची आस, म्हणजे अमुकच व्हावं आणि अमुक होऊ नये, ही नि:शेष तुटून गेली आहे त्याच्याच अज्ञानाचं निरसन होतं! नि:शेष म्हणजे मुळापासून. नि:शेष म्हणजे मनात त्या आशेचा मागमूसही उरलेला नाही. आणि ही आस तुटली आहे बरं का! म्हणजे त्या आशेच्या नित्यनूतन आवर्तनाचा जो क्रम होता तोच संपुष्टात आला आहे. आपल्या मनातल्या आशा या अनेकदा दुराशाच असतात. म्हणजे अवास्तव ते वास्तवात यावं, असंही आपल्याला वाटत असतं. श्रीगोंदवलेकर महाराजांचं एक वचन आहे, ‘‘भगवंत आवश्यक तेवढं देतोच, पण आपण आणखी मागतो!’’ आता या वचनाचा पुढला भाग- मागणं हे कसं कमीपणाचं लक्षण आहे, ते समजावतो. पण मला वर नमूद केलेलं पहिलं वाक्यच फार सूचक वाटतं. ते काय सांगतं? तर, आपल्या वाटय़ाला घोर प्रारब्ध होतं. पण त्यातलं जेवढं आवश्यक आहे, आपल्याला भोगणं शक्य आहे, झेपणार आहे तेवढंच तो आपल्या वाटय़ाला देतो. पण आपण भौतिकाच्या लालसेपायी व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीशी संबंधित इतकं काही मागत असतो, की ज्यायोगे नवनवं प्रारब्धच निर्माण होतं! म्हणजे त्या भगवंतानं पुरेसं प्रारब्ध दिलं असताना आपण ते वाढवून मागत असतो. मग प्रारब्धही आपल्याला पुरून उरतं, यात काय नवल! तेव्हा भौतिकाची आस ही भ्रममोहातूनच निपजत असल्यानं ती आहे तोवर अज्ञानही आहेच. ती आस पूर्ण तुटली की अज्ञानही ओसरतं. आणि अज्ञान ओसरलं की मन शांत होतंच. अज्ञानामुळे वास्तवाचं अचूक आकलन नसतं. जे हिताचं आहे तेच अहिताचं वाटतं आणि जे अहिताचं आहे तेच हिताचं वाटत असतं. वेडय़ा आशेत गुंतून आपण आपली मानसिक, शारीरिक शक्ती आणि वेळ वाया घालवत असतो. या सगळ्याच्या परिणामी मन अशांत होणार, यात काय शंका? तेव्हा ज्याच्या मनातून भौतिकातल्या हवे-नकोपणाची आस गेली, तोच अज्ञान निरसून शांत झाला आणि त्याचीच स्थिती सदाशिवाला वंदनीय झाली. म्हणजे जे सदा-शिव, सदा सत्य, सुंदर, मंगल तत्त्व आहे त्याचं स्थान ठरली! आता इथं अनेक प्रश्न आपल्या मनात घोंगावतात. ते असे की- भौतिकातील दुखांना इतकं नाकारता येईल का? ते व्यवहार्य आहे का? भक्ती करताना दुखाची जाणीवही न उरणं शक्य आहे का? आणि इतकं टोकाचं ध्येयच मुळात सामान्य माणसाला अवास्तव वाटणारं नाही का? त्यामुळे भौतिकातील वास्तवाला नाकारणारी अध्यात्माची शिकवणच अवास्तव नाही का?

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmyog article 277 abn
First published on: 06-02-2020 at 00:09 IST