चैतन्य प्रेम

सद्गुरूशी एकरूप होण्याची गरज काय? तर सद्गुरू हा शुद्ध आनंदस्वरूपाशी एकरूप असतो म्हणून! जन्मापासूनच्या आपल्या प्रत्येक हालचालीचा, प्रत्येक कृतीचा एकमेव हेतू म्हणजे अखंड विशुद्ध आनंदाची प्राप्ती! तो आनंद भोगण्याचा मार्ग सद्गुरू दाखवतो आणि म्हणून त्याच्याशी एकरूप झालो तर आपण आपोआप व्यापक होऊन त्या परमतत्त्वाचाच अंश आहोत, हे उमगू लागेल. आता ही ‘एकरूपता’ म्हणजे तरी काय? तर ती आचार, विचार आणि उच्चाराच्या पातळीवरची एकरूपता आहे. त्या पातळीवरचं अभेदत्व आहे. अर्जुन हा श्रीकृष्णाचा सखा होता, कृष्णावर त्याची अनन्य निष्ठा आणि निरतिशय प्रेमही होतं; पण तरी प्रत्यक्ष रणांगणावर आपल्यासमोरच्या विरुद्ध पक्षात आपल्याच आप्तस्वकीयांना पाहून त्याची गात्रं कर्तव्यशिथिल झाली! त्याचक्षणी त्याचा विचार आणि श्रीकृष्णाचा विचार यांत भेद भासू लागला! म्हणजेच श्रीकृष्णावर प्रेम होतं, पण एकरूपता नव्हती. त्या एकरूपतेची प्रक्रिया ‘गीते’च्या अठराव्या अध्यायाच्या अखेपर्यंत सुरू राहिली. अखेर ती एकरूपता निर्माण झाल्यावर युद्धाआधीच युद्धाचा निकाल संजय या एका साध्या राजसेवकाच्या मुखातूनही प्रकटला! श्रीकृष्णानं सर्व मनोधर्म सोडून शरण यायला सांगितलं आणि श्रीकृष्णकृपेनं ही शरणागती साधलीदेखील. ती साधल्याचा पुरावा म्हणजे अर्जुनाच्या मुखातून प्रकटलेला श्लोक. तो म्हणाला, ‘‘नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत। स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव।।’’ माउलींनी याचं विवरण फार सुंदर केलं आहे; ते मुळातून वाचावं अशी विनंती आहे. पण त्यातल्या महत्त्वाच्या ओव्या पाहू. अर्जुन म्हणाला की, ‘‘आतां मोह असे कीं नाहीं। हें ऐसें जी पुससी काई। कृतकृत्य जाहलों पाहीं। तुझेपणें।।१५६२।।’’ हे कृष्णा, आता माझ्यात मोह आहे की नाही, हे विचारत आहेस; तर ऐक- मी सर्वस्वी सर्वभावे तुझा झाल्यानं कृतकृत्य झालो आहे. मग, ‘‘गुंतलों होतों अर्जुनगुणें। तो मुक्त जालों तुझेपणें। आतां पुसणें सांगणें। दोन्ही नाहीं।।१५६३।। जें मज तुम्हां आड। होतें भेदाचें कवाड। तें फेडोनि केलें गोड। सेवासुख ।।१५७४।।’’ मी ‘अर्जुनगुणा’नं म्हणजेच ‘मी’भावानं, जीवभावानं गुंतलो होतो, तो ‘तू’भावानं त्यातून मुक्त झालो. आता विचारण्याची वा समजावण्याची गरजच उरलेली नाही. म्हणजेच तुमची इच्छा काय आहे, हे मला लगेच उमगू लागलं आहे. तुमच्या-माझ्यात जे भेदाचं कवाड- म्हणजे दरवाजा होता तो आता उघडला आहे आणि सेवासुखाच्या प्रांतात मी प्रवेश केला आहे! दरवाजाला दोन फळ्या असतात. या भेदाच्या कवाडाच्या दोन फळ्या म्हणजे- अहंता आणि ममता! त्याच तुटल्यानं आता ऐक्यता पूर्ववत झाली आहे. मग अशी एकरूपता जिथं आहे तिथं काय होणार? संजय सांगतो, ‘‘यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:। तत्र श्रीर्विजयो भूतिध्र्रुवा नीतिर्मतिर्मम।। ७८।।’’ माउली म्हणतात, ‘‘कृष्ण विजयस्वरूप निजांगें। तो राहिला असे जेणें भागें। तैं जयो लागेंवेगें। तेथेंचि आहे।।१६४०।। जेथ तो श्रीवल्लभु। जेथ भक्तकदंबु। तेथ सुख आणि लाभु। मंगळाचा।।१६५७।।’’ कृष्ण मुळातच विजयस्वरूप आहे. तो जिथं आहे तिथं जय ठरलेलाच आहे. जिथं भगवंत आणि भक्तात ऐक्य आहे, तिथं सुख, लाभ आणि मांगल्य अखंड आहे. इथं ‘भक्तकदंब’ असा शब्द योजला आहे आणि त्यामागे मनोहर भाव दडला आहे.