– चैतन्य प्रेम

आलेल्या संकटातून आपण तरू तर ते केवळ देवाच्याच कृपेनं, हा टोकाचा विश्वास ज्याच्या मनात उत्पन्न होतो, तो दयेला पात्र आहे, हा स्वामींच्या उत्तराचा गाभा आहे. ते पाप पुन्हा करणार नाही, हे दृढ निश्चयात्मक वचन ही मात्र त्या कृपाप्राप्तीची पूर्वअट असते आणि यात एक मोठं रहस्यही लपलं आहे, ते जाणून घेतल्याशिवाय या ‘कृपे’चा खरा अन्वयार्थ आणि ‘खरा कृपावंत’ कोण ते समजणार नाही, असं गेल्या भागात म्हटलं. त्याचा थोडा विचार करू. शिवानंदांच्या चरित्रातला जो प्रसंग आपण पाहिला, त्यातल्या ‘न्यायदाना’त आणि ‘कृपे’त तारतम्य विचार आहेच. संतांची कोणतीही कृती अविचारातून वा क्षणिक भावनिक आवेगानुसार घडत नाही. ज्यानं हत्या वा बलात्कारासारखा अमानुष गुन्हा केलाय, त्याला खऱ्या सत्पुरुषानं संकटमुक्त किंवा शिक्षामुक्त करणारं अभयदान दिलेलं नाही. तसंच या प्रकरणातही शिक्षेचा मुलाबाळांवर परिणाम होऊ नये, एवढीच मुभा देताना दंड आणि नोकरी जाणं, ही सजा भोगायला लावली आहेच. तेव्हा असा गुन्हा पुन्हा करणार नाही, हे अभिवचन घेत अधोगतीला गेलेल्या जीवाला सुधारण्याची किमान एक संधी सत्पुरुष देतो, देव नव्हे! देव केवळ, जीवाचं जसं कर्म तसं फळ त्याला देतो. ते फळ कधी कधी याच जन्मी भोगावं लागतं, तर कधी पुण्यांशानं वाटय़ाला आलेलं प्रारब्धसुख संपल्यावर वाटय़ाला येतं. मग कदाचित तोवर पुढचा जन्मही मिळालेला असू शकतो, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतं. सत्पुरुष मात्र त्याआधीही शरणागताला सुधारण्याची संधी देतो. म्हणूनच तर ज्ञानेश्वर माउलीही ‘‘खळांची व्यंकटी सांडो,’’ असं म्हणतात, ‘खळ सांडो’ असं म्हणत नाहीत. म्हणजे दुष्टांचा वाकडेपणा संपो, दुष्ट संपोत असं नव्हे! आता रहस्य ते हेच आहे. ते अधिक स्पष्ट होण्यासाठी देव आणि सत्पुरुष यांच्यातल्या भेदावर प्रा. सोनोपंत ऊर्फ मामासाहेब दांडेकर यांनी जे म्हटलंय ते पाहू. मामा लिहितात, ‘देवाचे अवतार असतात तसेच संतांचेही अवतार असतात. परंतु देव आणि संत यांच्या अवतारात फरक आहे. दोघांनाही एकच कार्य करायचे असते, ते म्हणजे जगतात आनंदाचा प्रसार करणे. परंतु दोघांच्या कार्य करण्याच्या पद्धतीत मात्र फरक असतो. देवाला दुष्टांचा संहार करावा लागतो, परंतु साधूंनी दुष्टांना मारल्याचे एकही उदाहरण नाही. ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत हे तर भगवंताचेच अवतार आहेत. त्यांच्यावर रामाजनार्दनांनी केलेल्या आरतीतच ‘अवतार पांडुरंग, नाम ठेवियले ज्ञानी,’ असं स्पष्ट म्हटलं आहे. तर ज्ञानेश्वर महाराज ‘अवतार पांडुरंग’ तर खरेच, परंतु त्यांनी किती दुष्टांना मारलं? तर शून्य! साधूंना आपले कार्य करण्याकरिता देवाप्रमाणे दुष्टांना मारावे लागत नाही. जेथे देवाची शक्ती कमी पडते, तिथे साधूंची शक्ती प्रभावी ठरते! यात देवाला काही कमीपणा आहे असे नाही.. हे संत-महात्मे भगवंताच्याच चिंतनाने उच्च अशा संतत्वाच्या पदावर आरूढ होतात, परंतु जगताचे कार्य करण्याच्या दृष्टीने ते जगताला भगवंतापेक्षाही अधिक उपयुक्त ठरतात!’ (पृ. १३-१४, ‘प्रवचन’, प्रसाद प्रकाशन, १९६८). मामासाहेब दांडेकर यांच्या या विवेचनातच त्या रहस्याचा संकेत आहे; तो असा की, खरी कृपा हा खरा सत्पुरुष अर्थात खरा सद्गुरूच करीत असतो. भगवंताला धरतीवर येऊन अवतार घेऊनही जे साधलं नाही ते- दुष्टांत परिवर्तन करण्याचं- कार्य सत्पुरुषांनाच वेळोवेळी साधलं, हेच ते रहस्य आहे!

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
article about income tax reforms in india
लेख : राजकीय-वित्तीय लोकशाहीच्या मिलाफासाठी..
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!