चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पराधीनता माणसाला आवडत नाही, पण प्रत्यक्षात ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे सत्य आयुष्य कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर शिकवत असतंच. हे सर्वपरिचित, पण तरीही पटकन लक्षात न येणारं जीवनसूत्र अवधूत आता यदु राजाला सांगत आहे. तो म्हणतो की, ‘‘प्राप्त जें जें सुखदु:ख। तें तें अदृष्टाआधीन देख। आत्मा मानुनी सकळ लोक। पराधीन देख वर्तत।।३९८।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). जीवनात जे जे काही आपल्या वाटय़ाला येतं, मग ते सुखाचं असो वा दु:खाचं असो; ते अदृष्टाच्या म्हणजे प्रारब्धाच्या अधीन आहे! अदृष्ट म्हणजे जे दिसत नाही ते. आपल्या प्रारब्धात पुढे काय काय आहे, हे आपल्याला माहीत नसतं आणि म्हणूनच जे दिसत नाही, अगम्य आहे, त्याची माणसाला भीती वाटत असते. पण प्रारब्ध म्हणजे तरी काय? तर आपल्याच कर्माची जी फळं पक्व होऊन आपल्या वाटय़ाला येण्यासाठी योग्य परिस्थितीची वाट पाहत असतात, ते फलभोग म्हणजेच प्रारब्ध आहे. मी आंब्याचं झाड लावलं, तर आंबेच मिळणार. तगरीचं झाड लावून मी आंबे मिळण्याची इच्छा धरली, तर ती हास्यास्पद होईल. मग मी किती खत घातलंय, किती प्रेमानं रक्षण केलंय, किती जोपासलंय, मग आता या तगरीच्या झाडाला आंबे लागतील अशी कृपा देवानं करावी, अशी अपेक्षा बाळगली तरी ती फलद्रूप का होणार आहे? मी आंब्याचं झाड लावलं असेल, तर आंबेच मिळतील. अमृतवल्ली लावली तर अमृतयोग साधेल; विषवल्ली लावली आणि जोपासली, तर भवदु:खाचं विषच पचवत जगावं लागेल. तेव्हा प्रारब्ध हे माझ्याच कर्माचं फळ आहे. मी सत्कर्म करावं की दुष्कर्म, याचं स्वातंत्र्य मला आहे; पण एकदा कर्म झालं की, त्याचं अचूक फळ मला स्वीकारावंच लागतं. ते फळ कोणतं, त्या कर्माचे परिणाम कोणते, हे निश्चित असतं. ते फळ वा ते परिणाम ठरविण्याचं स्वातंत्र्य मला नाही! मग जग माझ्याशी जो सुखदायक किंवा दु:खदायक व्यवहार करतं, त्याची बीजं वा कारणं माझ्याच कोणत्या ना कोणत्या जन्मांतल्या पूर्वकृत्यांत दडली आहेत, हे जाणून घेतलं पाहिजे. मी ज्यांना कधी काळी सुख दिलंय, ते माझं सुख परत करायला आले आहेत; मी ज्यांना दु:ख दिलंय, ते दु:ख परत करायला आले आहेत. त्यामुळे प्रारब्धानुसारच मला सुख-दु:ख लाभणार आहे, हे लक्षात ठेवून आणि ते स्वीकारून जीवनाला सामोरं गेलं पाहिजे. हे सोपं नाहीच; पण हा अभ्यास मला केलाच पाहिजे. बरं, याचा अर्थ दु:खातच राहायचं आहे का? तर नाही. दु:खं दूर करण्याचे स्थूल आणि सूक्ष्म उपाय अवश्य करावेत. प्रत्यक्ष देहाने होणारे प्रयत्न हे स्थूल पातळीवरचे आहेत, तर त्या प्रयत्नांत सद्गुरू स्मरण आणि चिंतन टिकवणं, हा सूक्ष्म उपाय आहे. दु:ख दूर करणं आणि सुख मिळवणं यासाठीचे प्रयत्न जेव्हा असे स्मरणसोबतीनं सुरू होतील, तेव्हा जीवनाचं खरं रूप, प्रारब्धाचा सिद्धांत हे सारं उलगडू लागेल. मग, ‘‘आत्मा मानुनी सकळ लोक। पराधीन देख वर्तत।’’ हे जाणवेल. म्हणजे आत्मभावानं जगाकडे पाहिलं, तर प्रत्येक जणच कसा पराधीन जगत आहे, वावरत आहे, हे जाणवू लागेल. पण जीवनात ही पराधीनता वाटय़ाला आली असूनही आपली वर्तणूक आपल्या स्वरूपाला अनुरूप कशी राखता येते, हे वृक्षाकडून शिकल्याचं अवधूत सूचित करतो.

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmyog article number 301 zws
First published on: 12-03-2020 at 04:34 IST