चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे चरण प्राप्त झाले की समस्त भटकंती थांबते ते चरण आज माझ्यापाशी स्वत:हून चालत आले आहेत, मी धन्य झालो, असा जनकांचा भाव होता. मग जनकानं मनुष्यजन्माचा खरा लाभ वर्णिला तो मांडताना नाथ म्हणतात, ‘‘सकल देहांमाजीं पहा हो। अतिदुर्लभ मनुष्यदेहो। त्याचिया प्राप्तीचा संभवो। तो अभिप्रावो अतिदुर्गम।। २२४।।’’ अहो, सर्व देहांमध्ये नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. तो प्राप्त होणं म्हणजे महाकठीण. मग मनुष्यजन्म लाभण्यात पाप आणि पुण्याचा कसा संबंध असतो, ते सांगतात. ते म्हणतात की, ‘‘सुकृतदुष्कृत समान समीं। तैं पाविजे कर्मभूमी। तेंचि जैं पडे विषमीं। तैं स्वर्गगामी कां नरकीं।। २२५।।’’ पुण्य आणि पाप समसमान होतात तेव्हा कर्मभूमी म्हणजे मृत्युलोकाचा लाभ होतो आणि पुण्य-पापाच्या प्रमाणानुसार स्वर्ग किंवा नरक लाभत असतो. अर्थात पाप-पुण्य समान असेल तर मृत्युलोकात नरदेह प्राप्त होतो, पुण्यांश जास्त असेल तर स्वर्ग लाभतो, पापसंचय अधिक असेल तर नरक लाभतो. आता इथं एक कळीचा प्रश्न असा की, पाप आणि पुण्य समसमान होणं इतकं सोपं आहे का? तर निश्चितच नाही. एकतर पापाकडे ओढा असेल, तर पाप तरी अधिक होईल किंवा पुण्याकडे ओढा असेल तर पुण्य निश्चितच अधिक होईल. पण मग असं का सांगितलं आहे? तर पाप आणि पुण्याची सरमिसळ झाली की जे प्रारब्ध मनुष्यदेहाच्या आधारे भोगणं क्रमप्राप्त असतं त्यासाठी हा माणसाचा देह लाभतो. आता ज्यांचा स्वर्ग-नरक आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर विश्वास नाही त्यांना हे वाचणं आणि पचणं कठीण आहे, पण आपण मूळ भागवत, त्यावरील नाथांची टीका आणि सनातन तत्त्वज्ञान या चौकटीत या विषयाचा मागोवा घेत आहोत. तेव्हा या चौकटीतच तो जाणून घ्यावा, अशी विनंती आहे. मुख्य म्हणजे स्वर्गप्राप्ती ही सुद्धा सामान्यच आहे, हे उघडपणे सांगून साधनेचं उद्दिष्ट तपासायला भाग पाडणं, हे भागवताचं मोठं वैशिष्टय़ही लक्षात घेतलं पाहिजे. मग नाथ सांगतात की, ‘‘समानकर्मी नरदेह जोडे। तरी समस्तां समबुद्धि न घडे। त्यां समांमाजीं विषम गाढें। जेणें पडे तें ऐका।। २२६।।’’ म्हणजे पाप आणि पुण्य र्कम समसमान झाल्यानं माणसाचा देह मिळाला तरी सर्वाची बुद्धी सारखीच असते असं नव्हे! किती महत्त्वाचा विचार आहे पहा. माणूस म्हणून जन्मलेल्या प्रत्येकाची आकलन बुद्धी सारखीच नसते आणि म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनविषयक धारणेत, दृष्टीकोनात आणि जीवन व्यवहारात भिन्नता आणि एक आंतरिक विषमता निर्माण होत असते. विशेष म्हणजे आकलनाचा मुख्य आधार देहबुद्धीच असल्यामुळे या देहबुद्धीला सुखकारक वाटणाऱ्या अशाश्वत जगालाच शाश्वत मूल्य दिलं जातं आणि माणूस देहगत विषयांच्या पूर्तीच्या मागे लागतो. त्यात हा उत्तम असा मनुष्यजन्म वाया जात असतो. नाथ म्हणतात, ‘‘मनुष्यदेहींचेनि आयुष्यें। विषयीं सायास करिती कैसे। अमृत देऊनि घे जैसें। तान्हें सावकाशें मृगजळ।।२३२।।’’ काय उपमा आहे! की विषय तृप्तीच्या सायासात मनुष्यदेह लाभलेलं हे आयुष्य माणूस कसं व्यर्थ दवडतो? तर तहान भागवण्याच्या आशेनं एखाद्यानं आपल्याकडचं अमृत देऊन त्याबदल्यात मृगजळ मागत फिरावं, तसं आहे! ‘‘तैसें नरदेह येऊनि नरां। करिती आयुष्याचा मातेरा।’’ तर नरदेह लाभूनही आयुष्याचं मातेरं माणूस करीत असतो. या आयुष्याचा सदुपयोग केवळ भक्तीच्याच आधारे होतो.

 

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmyog ekatmyog article number
First published on: 25-04-2019 at 03:11 IST