जगात साथीच्या आजारासारखं एखादं संकट ओढवतं, यादवी युद्धासारखी परिस्थिती उद्भवते, तेव्हा स्वत:ला आध्यात्मिक न मानणारी माणसं स्वत:ला आध्यात्मिक मानत असलेल्या माणसांकडे अधिकच टोकदारपणे पाहतात! घरातल्या घरातसुद्धा हे घडतं म्हणतात, बरं का! मग- ‘काय म्हणतोय तो तुमचा देव? आता कुठाय?’ असे प्रश्न नजरेतूनही विचारले जातात! स्वत:ला आध्यात्मिक मानत असलेल्या माणसाच्या मनातही जगताना अनेक टप्प्यांवर अनेक प्रश्न उमटतात. त्यातले बरेचसे प्रश्न हे जगण्यातील अडचणी आणि संकटांभोवती फिरणारे असतात. आपण देवाधर्माचं इतकं करतो, इतकी साधना करतो, तरी आपल्यावर संकट का यावं, आपल्या प्रगतीत अडथळे का यावेत, आपल्या वाटय़ाला आजारपण का यावं, असे प्रश्न मनात येतात. पण हेच तर जीवन आहे. ते सुख-दु:ख, यश-अपयश, लाभ-हानी, मान-अपमान, अनुकूलता-प्रतिकूलता, रोग-निरोगीपणा.. अशा दोन टोकांमध्येच हिंदकळत राहणार. अध्यात्त्माच्या मार्गावर वळलात तर तुमच्या वाटय़ाला सुखच सुख, यशच यश, लाभच लाभ, मानच मान, अनुकूलताच सतत येईल, असा कोणाही संताचा दावा नाही. पण या मार्गानं प्रामाणिक वाटचाल सुरू असेल, तर हा मार्ग जीवन खऱ्या अर्थानं जगण्याची कला शिकवतो. तो सुखानं, यशानं, लाभानं हुरळू देत नाही की दु:खानं, अपयशानं, हानीनं खचू देत नाही! मान आणि अपमान या दोन्ही परिस्थितींत मनाची समता कशी टिकवायची, याचा वस्तुपाठ तो देतो. अनुकूल परिस्थितीनं तो बेसावध होऊ देत नाही की प्रतिकूल परिस्थितीनं गांगरू देत नाही. रोगादि देहदु:खांकडेही तो धीरानं पाहतो आणि आवश्यक ते उपचार करीत असतानाही मनात बोधाचे संस्कारच जागवतो. काही जणांच्या मनात अध्यात्त्म आणि कर्तव्य, याबाबतही गोंधळ असतो. न्यूनगंड आणि भयगंडाचं सावट मनावर असतं. त्यात आपण प्रपंचापासून, पती वा पत्नीपासून दुरावणार आहोत आणि हा ‘त्याग’ परमार्थासाठी आवश्यकच आहे, असाही भ्रम त्यांच्या मनात असतो. प्रारब्ध आणि प्रापंचिक कर्तव्यांपासून पळ काढण्याचीही इच्छा असते. मात्र त्यांनी आंतरिक तपास आणि सखोल विचार केला पाहिजे. असं पाहा, आपल्या जीवनातली सुख-दु:खं ही आपल्याच कोणत्या ना कोणत्या कर्माची फळं असतात. मग ती र्कम या जन्मातील असोत वा मागील जन्मांतली असोत. त्या कर्मफळांनाच प्रारब्ध म्हणतात. हे प्रारब्ध स्वीकारावंच लागतं. आपण जगात आलो आहोत, विशिष्ट घरात, विशिष्ट परिस्थितीत जन्मलो आहोत. आपले जे जे नातेसंबंध आहेत, त्यांना आपण काही देणं लागतो आणि काही घेणं लागतो. मग ही देव-घेव प्रेमाची असू शकते वा द्वेषाचीही असू शकते. ती संपेपर्यंत प्रत्येक नात्याप्रतिचं कर्तव्यं संपत नाही आणि ते टाळणं चूकही असतं. तेव्हा प्रपंचातली कर्तव्यं परमार्थाच्या आड येत नाहीत. ती पार पाडत असतानाच नामस्मरण आणि मानसिक जपाची उपासना करता येते. त्या जोडीला संत-सत्पुरुषांचा बोध हा भगवद्गीतेसारखा वाचत जावा. तो आचरणात आणावा. पती वा पत्नी तसंच आपल्या घरची व सासरची मंडळी, यांच्याबाबतची कर्तव्यं प्रेमानं पार पाडावीत. ती कशी पार पाडावीत आणि प्रपंच करीत असताना परमार्थ कसा करावा, हे जाणण्यासाठी सत्पुरुषांच्या बोधाचं वाचन, मनन, चिंतन आणि आचरण हाच एकमात्र उपाय असतो. तो अमलात आणावा.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!