ब्रिटनच्या राजघराण्यातील ‘राणी एलिझाबेथ द्वितीय’ यांना सर्वाधिक काळ राणीपद भूषवण्याचा मान मिळाला आहे.

  • २१ एप्रिल १९२६ : एलिझाबेथ यांचा पहाटे दोन वाजून ४० मिनिटांनी लंडन येथे जन्म. २९ मे रोजी बकिंगहॅम राजवाडय़ात त्यांचा नामकरण विधी. 
  • ११ डिसेंबर १९३६ : त्यांचे काका एडवर्ड आठवे यांनी राजपदाचा त्याग केल्यानंतर त्यांचे वडील जॉर्ज सहावे हे राजे. त्यांची ज्येष्ठ कन्या या नात्याने वयाच्या दहाव्या वर्षी एलिझाबेथ राजे पंचम जॉर्ज यांच्या उत्तराधिकारी. 
  • २० नोव्हेंबर १९४७ : लंडनच्या वेस्टमिन्सटर अ‍ॅबे येथे एलिझाबेथ यांचा विवाह ग्रीक राजपुत्र व नौदल लेफ्टनंट फिलिप माऊंटबॅटन यांच्याशी झाला. या दांपत्याला चार मुले झाली. राजपुत्र चार्ल्स (जन्म- १९४८), राजकन्या अ‍ॅन (१९५०), राजपुत्र अँडर्य़ू (१९६०) व राजपुत्र एडवर्ड (१९६४) 
  • फेब्रुवारी १९५२ : राजकन्या एलिझाबेथ आपले पती फिलिप यांच्यासह आफ्रिका आणि आशियाच्या दौऱ्यावर असताना ६ फेब्रुवारी रोजी त्यांचे पिता राजे पंचम जॉर्ज यांच्या मृत्यूची बातमी आली, त्यावेळी एलिझाबेथ या केनिया येथे दौऱ्यावर होत्या. परदेशी असताना राजसिंहासन ग्रहण करणाऱ्या त्या दोनशे वर्षांच्या इतिहासातील पहिल्या व्यक्ती.
  • २ जून १९५३ : राणी एलिझाबेथ यांचा वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला. हा सोहळा प्रथमच दूरचित्रवाणीद्वारे पाहण्याची सोय.
  • २४ नोव्हेंबर १९५३ : राणी एलिझाबेथ यांचा ४३ हजार ६१८ मैल अंतर प्रवासाचा पहिला राष्ट्रकुल दौरा सुरू.  १९७७ : राणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दीचा रौप्यमहोत्सव (२५ वर्षे पूर्ण) साजरा. त्यानिमित्त राष्ट्रकुल राष्ट्रांचा दौरा तसेच ब्रिटनमध्ये दिमाखदार सोहळा. १९८१ : राजपुत्र चार्ल्स यांचा लेडी डायना स्पेन्सर यांच्याशी दिमाखदार सोहळय़ात विवाह.  १९९१ : राणी एलिझाबेथ यांचा अमेरिका दौरा. अमेरिकेच्या संसदेत (काँग्रेस) भाषण देणाऱ्या ब्रिटनच्या राजघराण्यातील पहिल्या व्यक्ती. 
  • १९९२ : हे त्यांच्या कारकीर्दीचे चाळिसावे वर्ष. मात्र, आपल्यासाठी हे वर्ष ‘भयानक’ ठरल्याचे एलिझाबेथ यांची भावना. या वर्षी राजपुत्र अँडर्य़ू व सारा विभक्त. राजकन्या अ‍ॅन आणि मार्क फिलिप विभक्त.  विंडसर राजवाडय़ाचे आगीमुळे मोठे नुकसान. एलिझाबेथ यांची प्राप्तिकर भरण्यास मान्यता. या वर्षांच्या अखेरीस डिसेंबरमध्ये राजपुत्र चार्ल्स आणि डायना यांची विभक्त होण्याची घोषणा.
  • १९९५ : मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संसदेत १९४७ नंतर भाषण देणाऱ्या ब्रिटन राजघराण्यातील पहिल्या व्यक्ती. डिसेंबरमध्ये राणी एलिझाबेथ यांनी राजपुत्र चार्ल्स आणि डायना यांना घटस्फोट घेण्याचे लेखी आवाहन केल्याच्या वृत्तास बकिंगहॅम राजवाडय़ाकडून अधिकृत दुजोरा.
  • १९९६ : राजपुत्र चार्ल्स आणि डायना यांचा घटस्फोट. 
  • १९९७ : ३१ ऑगस्ट रोजी डायना आणि तिचा करोडपती मित्र दोडी अल फायेद यांचा अपघाती मृत्यू. डायनाच्या मृत्यूवर राणी एलिझाबेथ व  राजघराण्याच्या थंड प्रतिक्रियेबाबत त्यांच्यावर टीका. नोव्हेंबरमध्ये राणी एलिझाबेथ आणि राजे फिलिप यांच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव साजरा. त्यासाठी मोठा समुदाय दांपत्यास शुभेच्छा देण्यासाठी जमा असताना राणी एलिझाबेथ यांच्याकडून ‘राजघराणी ही प्रजेच्या पाठिंब्यामुळेच अस्तित्वात असतात,’ असे मनमोकळे भाष्य.
  • ९ फेब्रुवारी २००२ : राणी एलिझाबेथ यांच्या भगिनी राजकन्या मार्गारेट यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन.
  • ३० मार्च  २००२: विंडसर राजवाडय़ात वयाच्या १०१ व्या वर्षी राणी एलिझाबेथ यांच्या मातोश्री एलिझाबेथ यांचे निधन.
  • १ ते ४ जून २००२ : राणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ब्रिटनमध्ये चार दिवसांचा राष्ट्रीय सोहळा.
  • २००५ : एलिझाबेथ यांचे उत्तराधिकारी पुत्र राजपुत्र चार्ल्स कॅमिला पार्कर बॉउल्स यांच्याशी विवाहबद्ध.
  • २९ एप्रिल २०११ : आपला नातू राजपुत्र विल्यम आणि केट मिडल्टन यांच्या विवाहसोहळय़ास एलिझाबेथ यांची उपस्थिती. मेमध्ये राणीचा चार दिवसीय आर्यलड दौरा. आर्यलड १९२१ मध्ये इंग्लंडपासून स्वतंत्र झाल्यानंतर दौरा करणाऱ्या ब्रिटन राजघराण्यातील पहिल्या व्यक्ती. 
  • २०१२ : राणीच्या कारकीर्दीचा हीरक महोत्सव ब्रिटनमध्ये जूनमध्ये चार दिवस साजरा. लाखो देशवासीयांकडून थेम्स नदीकाठी व रस्त्यांवर जल्लोषात महोत्सव साजरा.  २३ ते २६ जून २०१४ – राणीचा जर्मनीचा शेवटचा परदेश दौरा
  • ९ सप्टेंबर २०१४ : ब्रिटनच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एलिझाबेथ यांनी राणी व्हिक्टोरियापेक्षा सर्वाधिक काळ  राणीपद भूषवण्याचा मान पटकावला.
  • २१ एप्रिल २०१६ : एलिझाबेथ यांचा ९० वा वाढदिवस साजरा. राणीपदी असताना वयाचा हा टप्पा पार करणारी पहिली व्यक्ती.
  • २ ऑगस्ट २०१७ :  ६५ वर्षे साथ देणारे पती फिलिप यांचा सार्वजनिक जीवनाचा त्याग.
  • २० नोव्हेंबर २०१७ : एलिझाबेथ आणि फिलिप यांच्या विवाहाचा ७० वा वर्धापनदिन विंडसर राजवाडय़ात एका खासगी सोहळय़ात साजरा.
  • २०१८ : राणीचे नातू राजपुत्र हॅरिस यांचा अमेरिकेची घटस्फोटित अभिनेत्री मेघन मार्कल यांच्याशी विवाह.
  •   ऑक्टोबर २०१९: राजपुत्र विल्यम आणि हॅरी यांच्यातील कौटुंबिक वाद उघड. १५ नोव्हेंबर २०१९  : राजपुत्र अँडर्य़ू यांची बीबीसी टीव्हीला वादग्रस्त मुलाखत. वादग्रस्त व २००८ मध्ये मुलांचे लैंगिक शोषण केल्याने कैदेची शिक्षा भोगलेल्या अमेरिकन अर्थपुरवठादार जेफरी एप्स्टेन याच्याशी संबंध असल्याचे उघड झाल्याने अँडर्य़ू यांचे राजघराण्याचे विशेषाधिकार काढले.  जानेवारी २०२० : हॅरी आणि मेघन यांचा राजघराण्यात न राहण्याचा निर्णय. मार्चमध्ये हे दांपत्य लॉस एंजेलिस येथे स्थायिक.
  • ५ एप्रिल २०२० : राणीतर्फे करोना काळात दूरचित्रवाणी संबोधन. आपल्या कारकीर्दीतील राष्ट्रास उद्देशून फक्त पाचवे दूरचित्रवाणी संबोधन. ९ एप्रिल २०२१ : राणीचे पती फिलिप यांचे वयाच्या ९९ वर्षी विंडसर राजवाडय़ात निधन. राणीस ७३ वर्षांची साथ.
  • ६ फेब्रुवारी २०२२ : राणी एलिझाबेथ यांच्या राणीपदास ७० वर्षे पूर्ण. चार्ल्स हे राजेपदी आल्यावर यांच्या द्वितीय पत्नी कॅमिला यांना ‘क्वीन कन्सोर्ट’ असे त्यांचे नामकरण करून राणी एलिझाबेथ यांनी त्यांना आशीर्वाद दिले. 
  • २० फेब्रुवारी २०२२ : राणी एलिझाबेथ यांना करोना. मात्र, सौम्य सर्दीसारखा संसर्ग झाल्याची माहिती. अल्पावधीत बऱ्या होऊन कार्यरत.

क्रीडाविश्वातूनही राणी एलिझाबेथ यांना आदरांजली!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लंडन : राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाल्यानंतर क्रीडाविश्वातूनही त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राणीच्या निधनाची बातमी कळताच इंग्लंडमधील सरे येथे सुरू असलेली पीजए अजिंक्यपद गोल्फ स्पर्धा आयोजकांकडून गुरुवारी त्वरित स्थगित करण्यात आली. तसेच शुक्रवारीही स्पर्धा झाली नाही. शुक्रवारी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लंडन येथील ओव्हल मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ होणार नसल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने जाहीर केले. अश्व शर्यतीही दोन दिवसांकरिता थांबवण्यात आल्या. इंग्लंड आणि स्कॉटलंड येथील स्थानिक रग्बी सामने गुरुवारी आणि शनिवार-रविवारी स्थगित करण्यात आले. तसेच प्रीमियर लीगसह इंग्लंडमधील कोणत्याही फुटबॉल स्पर्धेचे सामने शनिवारी आणि रविवारी होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. ज्या स्पर्धा सुरू राहिल्या किंवा शनिवारी पुन्हा सुरू झाल्या, तेथे काही मिनिटे शांत उभे राहून राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यात आली.