प्रवीण राजधर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सर, आम्हना भांडा, गोधड्या, कपडं, समदा बिढ्यार भराई गया, सकाल आमू देसवर जाणार सत..” शाळा सुटण्याच्या वेळी इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणारी बोलकी प्रतिभा सांगत होती. तिचं बोलणं ऐकताना मनात मोठी घालमेल सुरू झाली. ऊसतोडणीकरिता गावातून अनेक कुटुंबांचं स्थलांतर सुरू झालंय. ऊसतोडीला जाताना दिवाळीपूर्वीच गावातून अनेक आदिवासी बांधव आपलं बिढ्यार तर नेतातच, समवेत आपले कुटुंब, लेकरं बाळंही नेतात. ज्यांचे कोणी जवळचे, विश्वासातील, नातेवाईक असतील अशी कुटुंबं आपल्या शाळेत शिकणाऱ्या लेकराबाळांना गावात सोडून जातात. मात्र अशांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच. यंदा करोनापश्चातच्या या स्थलांतरात बहुतांश कुटुंबे त्यांच्या मुलांनाही सोबत घेऊन जात आहेत.

हेही वाचा… दोन्ही ‘शिवसेना’ पराभवाच्या मार्गाने…

“कोण कोण जाणार आहे प्रतिभा?” असा प्रश्न तिला केला. “मना आबा, माय, दुर्गी, कालूबाय, मंगल, मी, मनी धाकली बहीण समदान समदा जाई ऱहायनूत” असं प्रतिभाने उत्तर दिले. प्रतिभाच्या कुटुंबीयांची यंदा ऊसतोडीला न जाण्यासाठी केलेली मनधरणी निष्फळ झालीये, शिक्षक म्हणून मी केलेले प्रयत्न फसल्याचं मला जाणवत होतं. शाळा सुटली, मी घरी निघण्याआगोदर गोड, बोलक्या प्रतिभाला डोळे भरून बघून घेतलं. प्रतिभाने दररोजच्यासारखा टाटा केला. न जाणो उद्या मी शाळेत येण्याअगोदर प्रतिभा व तिचं कुटुंब गेलेलं असेल. ते न जावो या विचाराने मनात बेचैनी निर्माण केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत पोहोचल्यावर माझी नजर प्रतिभाला शोधत होती. प्रतिभा शाळेत आलेली नव्हती. परिपाठ होताच वर्गातील दोघा मुलांना घेऊन प्रतिभाचं घर गाठलं. प्रतिभा व तिची माय अंगणात खाटीवर बसून सर्वात लहान बाळाची तयारी करत होती. प्रतिभाचा आबा नुकताच लगतचं बाजारपेठेचं गाव कळवाडीहून आणलेला बाजार गावी घेऊन जाण्यासाठी सामानात नीटनेटकं ठेवत होता. घरात अठरा विसे दारिद्र्य असलेली प्रतिभा व तिचं कुटुंब मनाने मात्र गर्भश्रीमंत असल्याचं जाणवलं. प्रतिभाच्या कुटुंबीयांचे पुन्हा एकदा मन वळवण्याचा प्रयत्न करूया, त्यांना ऊसतोडणीला जाण्यापासून परावृत्त करूया या उद्देशाने गेलो होतो.

हेही वाचा… अन्वयार्थ : चित्त्यांसाठी हत्तींवर संक्रांत ?

प्रतिभाचे वडील सध्या दापुरे गावाजवळच असलेल्या साकूर, गिरणा धरणाच्या किनाऱ्यावर पोटापाण्यापुरते मासे पकडतात, विकतात व उदरनिर्वाह करतात हे मी जाणून होतो. म्हणून मी प्रतिभाच्या समोरच तिच्या मायला विनंती स्वरूपात सुचवलं की इथं तुमचा छोटेखानी मासे विक्रीचा व्यवसाय चांगला आहे, तुम्ही कंपनीवर ऊसतोडीला न जाता इथेच राहून हा व्यवसाय करा म्हणजे तुमच्या मुलींचे शिक्षणाचे नुकसान होणार नाही. आमचा संवाद सुरू असताना प्रतिभा माझ्याकडे एकटक बघत होती. मी प्रतिभाकडे बघत तिला म्हणालो, “चल बेटा शाळेत” त्या इवल्याशा निरागस लेकराच्या मनात मोठी घालमेल सुरू झाली. शाळेत जायची तर इच्छा आहे पण मायने तर रंगीत कपडे घालून ‘देसवर’ जायची तयारी करून ठेवली आहे. काय करावं तिलाही सुचत नव्हतं. त्या वेळी चुणचुणीत, बोलकी प्रतिभा एक शब्दही बोलली नाही. मग माझ्याही तोंडून शब्द फुटेना. निरागस प्रतिभाची व माझी केवळ नजरानजर सुरू होती. माझ्या डबडबलेल्या डोळ्यांमध्ये डोळे घालत प्रतिभा शांतपणे माझ्याकडे पाहत होती. तिच्या आईकडे बघत मी पुन्हा विनंती करण्याचं धाडस केलं. “ताई नका हिरावून घेऊ लेकरांचं शिक्षण, जमेल तो कामधंदा करून गावातच राहा ना.” प्रतिभाची माय म्हणाली, “सर, आम्हले बी देसवर जावानी हाऊस नही सं ना, मासा ईकीसन पोट तं भरस पण कर्ज नहीं फिटत. आंडरी डोक्याएवलड्या व्हई गयात, ठेकेदार कडताईन कर्ज घेयेल शे, आम्हले जाणंच पडी, थोडीयेळ म्हान गाडी वनी का आम्हले निघणं शे.” मी सगळं ऐकून घेतले, केवळ नि:शब्द झालो.

हेही वाचा… अग्रलेख : उठ जाए गर ये..

प्रतिभाकडे पुन्हा एकदा डोळे भरून पाहून घेतलं. हे लेकरू तीन-चार महिने आता वर्गात दिसणार नाही, तिची बडबड ऐकायला मिळणार नाही, या विचारांनी हुरहुर लागली होती. अगदी आईबापाच्या अंगाखांद्यावर एखादं लेकरू जसं खेळतं, बागडतं, हक्काने त्यांच्याकडे लागणाऱ्या वस्तू आणि खाऊ मागतं, तशाच रीतीने ही प्रतिभा शाळेत दाखल झाल्यापासून माझ्यासोबत वर्गात वागत असे. यामुळे की काय त्या दिवशी तिला ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या पालकांसोबत जाताना पाहून जरा अधिकच संवेदनशील अन् भाऊक झालो होतो. “प्रतिभाला तिकडच्या शाळेत शिकायला पाठवा” हे तिच्या कुटुंबीयांना सांगताना जीभ जड पडली होती. प्रतिभाच्या आबाच्या हाती शिक्षण हमी कार्ड दिले अन् शाळेत परत निघून आलो. आलो तर खरं, पण दिवसभर वर्गात काही मन लागेना. अनेक प्रश्नांनी भरलेले विचार सारखे मनात घोंगावत होते.

हेही वाचा… पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

ऊसतोडणी मजुरांच्या स्थलांतरासारख्या गंभीर अशा सार्वत्रिक समस्येवर काही कायमस्वरूपी उपाययोजना होणार की नाही? या अशिक्षित दरिद्री ऊसतोडणी मजुरांना तिकडे कामावर दिली जाणारी वागणूक कशी असेल? त्यांची पिळवणूक होत असेल का? मुलांना खरंच ते तिकडच्या शाळांमध्ये पाठवतील का? या अशा एक ना अनेक प्रश्नांनी मनात, मनाला हुरहुर लावली होती. दिवाळीसारख्या मोठ्या सणाला ही लोकं स्वतःच्या घरी, गावात नाहीत. दिवाळीत स्वतः अंधारात राहून ऊस बागायतदार आणि कारखानदारांच्या घरातील दिवे उजळवण्यासाठी ही लोकं का बरं जातात? दिवाळीत फटाके वाजवणारे, गोडधोड करून खाणारे लोक बघून या ऊसतोडणी मजुरांची लेकरं कशी राहत असतील? या व अशा असंख्य प्रश्नांनी मनात गोंधळ घातला होता.

(लेखातील काही संवाद स्थानिक अहिराणी भाषेत आहेत.)

लेखक नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात, दापुरे येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत.

pravinshinde1234@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A girl like pratibha is reluctant to leave school you have to go away asj
First published on: 14-10-2022 at 10:41 IST