गडचिरोली जिल्ह्यातील एका गावात नुकतेच जादूटोणा करण्याच्या संशयावरून एका महिलेसह पुरुषास जिवंत जाळण्यात आले. डॉ. नरेन्द्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे या विचारवंतांच्या निर्घृण खुनांच्या घटनांना १२ वर्षे उलटून गेल्यानंतरही अंधश्रद्धांसह खोट्या इतिहासाच्या प्रभावातून का मुक्त होत नाही? पासष्टीच्या उंबरठ्यावर असणारा महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या अंधाराकडे चाललाय का? ही अधोगती थोपवण्यासाठी काय करता येईल?

पुरोगामी आणि प्रगतिशील ही बिरुदे असणाऱ्या महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील एका गावात जादूटोणा करण्याच्या संशयावरून एका महिलेसह पुरुषास जिवंत जाळण्यात आले तर एका वृद्धास चटके देण्यात आले. या अमानुष घटनेने संवेदनशील मने हादरली आहेत. लोकशाही, विज्ञाननिष्ठा, मानवता, अहिंसा, न्याय, समता कायदा, नीतिमत्ता, सदाचार, नैतिकता वगैरे शब्द फक्त उच्चारण्यासाठीच वापरले जातात का ? या शब्दांच्या अर्थांशी महाराष्ट्राने आपले नाते तोडले आहे का? महाराष्ट्राला अंधश्रद्धा आणि धार्मिक उन्मादच हवा आहे का ? खरे तर महात्मा फुले, सुधारक गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सध्या सर्वत्र अंधश्रद्धांचा धार्मिक उन्माद माजला आहे. हा महाराष्ट्र डॉ. नरेन्द्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे या विचारवंतांच्या निर्घृण खुनांच्या घटनांना १२ वर्षे उलटून गेल्यानंतरही अंधश्रद्धांसह खोट्या इतिहासाच्या प्रभावातून का मुक्त होत नाही? गेल्या दहा वर्षांत तर राजकीय आणि सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अध:पतनाचा विक्रम या राज्याने केला आहे.

सध्या विविध वाहिन्यांवरील हिंदी, मराठी भाषांमधील मालिकांमध्ये अंधश्रद्धांचीच पेरणी झाल्याचे दिसून येते. अंधश्रद्धा आणि इतिहासाचा विपर्यास पाहणे हीच महाराष्ट्राची अभिरुची झाली आहे का? पासष्टीच्या उंबरठ्यावर असणारा महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या अंधाराकडे चाललाय का, हे आणि असे अनेक प्रश्न सजग नागरिकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.

हेही वाचा >>>…तर मग संघ आता काय करणार?

वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय सत्ये नेहमीच धार्मिक अंधश्रद्धांच्या जाचामध्ये अडकलेली असतात. सत्यकथन करणाऱ्या वैज्ञानिकांचा आणि विचारवंतांचा अंधश्रद्ध आणि अविवेकी समाजाने नेहमीच छळ केला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या राज्यासह एकूणच या लोकशाही असणाऱ्या देशात उन्मत्त बुवाबाजीचा हाहाकार माजला आहे. या बुवाबाजीने अंधश्रद्धांना आणि धार्मिक उन्मादांना अभय दिले आहे.

तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक बर्ट्रांड रसेल म्हणाले होते ‘‘सगळेच धर्म माणसावर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पाप-पुण्याच्या, स्वर्ग-नरकाच्या संकल्पना त्याच्यावर ठसवतात. धर्मसंस्था लोकांना खुळचट प्रथांचं अनुकरण करायला सांगतात आणि त्यांच्यावर बंधनं घालतात. धार्मिक असण्यापेक्षा वैज्ञानिक वृत्ती असणं जास्त चांगलं.’’ हे शब्द आता पुन्हा एकदा समजून घेण्याची गरज आहे.

बुद्धिप्रामाण्यवादी, शास्त्रशुद्ध दृष्टिकोनाचा पाया रचणाऱ्या सॉक्रेटिसला शेवटी विषाचा प्याला देण्यात आला. ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे सिद्ध करूनही गॅलिलिओ गॅलिलीसारख्या विद्वान माणसाला आयुष्यभर संघर्ष करावा लागला. खरे तर गॅलिलिओच्या वाट्याला आलेली उपेक्षा निकोलस कोपर्निकस, जोहॅसन केपलर, जिओर्दानो ब्रूनो यांनी सहन केली होती. जिओर्दानो ब्रूनोला तर जिवंत जाळण्यात आले होते. गॅलिलिओने लिहिलेले ‘डायलॉग : कन्सर्निंग द टू चीफ वर्ल्ड सिस्टम्स’ हे पुस्तक धर्मविरोधी असल्याचा आरोप केला गेला. गॅलिलिओला तुरुंगवास भोगावा लागला. तत्कालीन धर्मसत्ता आणि राजसत्ता गॅलिलिओचा द्वेष, विरोध करीत असताना वैज्ञानिक, साहित्यिक, कलावंत, संगीतकार मात्र त्याच्या बाजूने होते. अस्कानिओ नावाच्या तुरुंगाधिकाऱ्याने मानवतावादी दृष्टीने गॅलिलिओला थोडी मदत केली. गॅलिलिओने दुर्बीण बनवून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खगोलशास्त्रीय संशोधन केले. चंद्र आणि गुरू यांविषयी काही मौलिक निरीक्षणे व निष्कर्ष मांडले, गुरूच्या उपग्रहांचा शोध लावला. तुरुंगात असताना प्रतिकूल परिस्थितीत त्याने ‘डिस्कोर्सेस’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. रोममध्ये छळ होत असताना दुसरीकडे हॉलंडसह साऱ्या जगात गॅलिलिओचे संशोधन आणि विचार स्वीकारले गेले.

हेही वाचा >>>लोकशाहीच्या उत्सवाचा तणावपूर्व सोहळा!

अंधश्रद्ध आणि अमानुष धर्मसत्तेसह राजसत्तेने कितीही विरोध आणि छळ केला तरी वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय सत्य आणि तथ्य यांचा निर्भयपणे शोध संशोधकांनी घेतला आहेच. गॅलिलिओचा संघर्ष तर त्याच्या मृत्यूनंतरही ३४० वर्षे सुरू होता. दीपा देशमुख लिहितात, ‘‘गॅलिलिओच्या मृत्यूनंतर तब्बल ३४० वर्षांनी म्हणजे १९८२ साली ‘सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कुणाभोवती फिरतो’ याविषयीचे जुनेच प्रकरण पुन्हा चर्चमध्ये उभे राहिले. मग त्यावर १० वर्षे विचार आणि उलटसुलट वाद-प्रतिवाद झाले. शेवटी सगळे पुरावे बघून १९९२ साली एकदा कुठे पोप पॉल दुसरे यांनी ‘‘गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच (सूर्याभोवती) फिरते’’ हे कबूल केलं.’’ (जग बदलणारे ग्रंथ, पृष्ठ ११६)

धर्मसत्ता व राजसत्तेला अंधश्रद्ध आणि अमानवीय दृष्टिकोन बदलण्यासाठी शतकांचा कालावधी लागतो. भारतात तर अजूनही वैज्ञानिक सत्याकडे अनेकदा कानाडोळा केला जातो आणि खगोल विज्ञानाच्या अनेक संकल्पना नाकारल्या जातात. ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटनांसंदर्भात भारतात अजूनही अंधश्रद्धेचे दृष्टिकोन बाळगले जातात. आता एवढ्या निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्ष वैज्ञानिक दृष्टिकोनापेक्षा अंधश्रद्ध धार्मिक दांभिकतेचे प्रदर्शन करताना दिसतात. अलीकडे तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी प्रगत राज्यात मराठी वाहिन्यांवर अंधश्रद्धांचा उदोउदो करणाऱ्या मालिका सतत दाखवल्या जात आहेत, त्यांना प्रेक्षक आहेत म्हणून अशा कितीतरी मालिका यशस्वी होत आहेत, जाहिराती, वितरक, कथानक सारे काही त्यांच्यासाठी आहेच. या साऱ्या बजबजपुरीत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक सत्य दोन्हींचा नाहक बळी जातो पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाकडे आहे? पौराणिक कथा, प्राक्कथा, लोककथा, आर्ष महाकाव्ये अशा कितीतरी गोष्टींची मोडतोड करीत इतिहासाशीही बेइमानी करणाऱ्या कितीतरी अंधश्रद्धामूलक कलाकृती वेगवेगळ्या वाहिन्यांवर दाखवल्या जात आहेत. महाराष्ट्राला वैज्ञानिक दृष्टिकोनासह मानवता, अहिंसा, समता बंधुता आणि सामुदायिक सदाचार या मूल्यांची मोठी परंपरा आहे, इतिहास संशोधनाचा मोठा वारसा या राज्याला आहे, याचा विसर आजच्या प्रेक्षकांना पडला आहे का? भक्तीच्या नावाखाली राजकारणी, लोकप्रतिनिधी वगैरे मंडळी अलीकडे जी नौटंकी करतात ती पाहून कोणालाही अक्षरश: चीड येणे स्वाभाविक आहे.

१९५३ मध्ये या देशातील विज्ञानविषयक धोरणाविषयी चर्चा करताना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, ‘सायंटिफिक टेम्परामेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग, मेथड ऑफ अॅक्शन, सर्च ऑफ ट्रुथ, वे ऑफ लाइफ, स्पिरिट ऑफ मॅन.’ खरे तर या देशात वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्राचीन वैचारिक परंपरा आहे. पण आज आपण वैज्ञानिक विचार नाकारत आहोत का? डॉ. नरेन्द्र दाभोलकर लिहितात, ‘‘…आता प्रश्न असा निर्माण होतो की, हा वैज्ञानिक दृष्टिकोन भारतामध्ये का रुजला नाही? भारतामध्ये एके काळी वैज्ञानिक दृष्टिकोन होता, ही गोष्ट खरी आहे. भारतामध्ये नालंदा, तक्षशिला यांसारखी त्या वेळची आंतरराष्ट्रीय कीर्तीची विद्यापीठं होती. बुद्ध, त्याच्या आधीचे चार्वाक आणि लोकायत यांनी त्या काळामध्ये कार्यकारणभाव सांगितलेला होता. इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये या ठिकाणी वराहमिहीर झाला. त्याने! सूर्य हा तारा आहे, असं सांगितलं. त्याच्यानंतर आर्यभट्टाने सांगितलं की, ‘मला स्वत:ला असं वाटतं की, जरी सूर्य पृथ्वीभोवती फिरत असल्याचं दिसत असलं, तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरते.’ शून्याचा शोध भारतामध्ये लागला आणि या शोधाने जगातल्या गणिताची एक फार मोठी अडचण दूर केली. सुश्रुतासारखा एक अतिशय उत्तम दर्जाचा शल्यविशारद भारतामध्ये निर्माण झाला. त्याने रोपण शस्त्रक्रियेची (प्लॅस्टिक सर्जरीची) मुहूर्तमेढ रोवली.’’ (‘विवेकाचा आवाज’, पृष्ठ ३७) प्रश्न हा आहे की आता आम्ही भारताचे लोक जाणीवपूर्वक वैज्ञानिक दृष्टिकोन विसरलोय का?

आपल्या संविधानात ‘‘इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ रिफॉर्म अॅण्ड ह्युमॅनिझम’’ असे म्हटले आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे आणि समाजमनात रुजवणे हे आपले संवैधानिक कर्तव्य आहे. पण या कर्तव्याचाच आपल्याला आज विसर पडला आहे का ? प्राचीन काळात चार्वाकांना छळले गेले, त्यानंतरच्या प्रबोधन काळात महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, र. धों. कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक सुधारकांचा छळ केला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रासह या देशातील नागरिकांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यासारख्या सुधारकांना समजून घेतलेच नाही. शेवटी क्रूर धर्मांध शक्तींनी निर्घृणपणे त्यांचा जीव घेतला. अनेक अंधश्रद्धांचा उदोउदो मात्र होतच राहिला. अलीकडे तर उन्मत्त बुवाबाजीने अंधश्रद्धांना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.

आज आपली खगोलशास्त्रात मोठी प्रगती झाली आहे. चंद्र, मंगळ, गुरू, सूर्य यासंदर्भातील भारतीय संशोधन जगात मौलिक मानले जात आहे, पण भारतीय माणूस मात्र अजूनही अंधश्रद्ध अशा धर्मसत्तेच्या मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडायला सज्ज झालेला नाही, हे वास्तव आहे. भारतात सध्या सर्वत्र माजलेला धार्मिक उन्माद, राजकीय सत्ताप्राप्तीसाठी सुरू असलेली उन्मत्त बुवाबाजी, विकृत धर्मांध शक्तींची झुंडशाही आदी भीषण वास्तव पाहू जाता संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आपले कर्तव्य अत्यंत निष्ठेने आणि निर्भयपणे पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने पूर्ण करण्याची नितांत गरज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिल्लीत एका भाषणात म्हणाले होते, ‘‘सराफाच्या दुकानी घेत असलेले सोने खरे आहे की खोटे हे समजण्यासाठी त्या दागिन्याला कस लावून पाहण्यात येतो, तसेच धर्माला कस लावून त्याची परीक्षा केली पाहिजे. धर्मतत्त्वांची छाननी करून सिद्धांत आणि व्यवहार पडताळून पाहावयास हवा की, कोणता धर्म माणसाला सुख व समाधान देऊ शकेल. कसोटीवर खरे उतरल्याशिवाय सोने विकत घेत नाही, तसेच धर्मदेखील मानवाला उपयोगी आहे की नाही, या कसोटीवर घासून-पारखून पाहिला पाहिजे. जोपर्यंत धर्माची अशी परीक्षा होत नाही, तोपर्यंत तो स्वीकारणीय ठरत नाही.’’ आज काही राजकीय पक्षांनी धर्म, ईश्वर या प्रत्येकाच्या खासगी बाबींवरच हक्क सांगत ‘आम्ही म्हणू तो आणि तसाच धर्म, आम्ही म्हणू तो आणि तसाच ईश्वर, आम्ही म्हणू तो आणि तसाच इतिहास’ असे अत्यंत मग्रूरीने, उन्मत्तपणे सांगणे सुरू केले आहे. ही मग्रूरी, हा अहंकार, ही झुंडशाही भारताच्या सहिष्णुतेला, विचारस्वातंत्र्याला, वैज्ञानिक वारशाला, सामूहिक सदाचाराला, मानवतावादी दृष्टीला नख लावणारी आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मस्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, विवेकवाद, मानवतावाद, सामुदायिक सदाचार, अहिंसा ही विचारमूल्ये महाराष्ट्रासह भारताच्या व्यापक आणि सर्वसमावेशक तत्त्वज्ञानाचा भाग आहे. सत्तेसाठी कोणत्याही राजकीय पक्षाची अंधश्रद्ध झुंडशाही या देशातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कर्तव्य निर्भयपणे पाळणाऱ्या सुजाण नागरिकांना कदापि मंजूर नाही हे आता सिद्ध करण्याची वेळ आली आहे.

(लेखक समीक्षक आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

deshpandeajay15@gmail.com