उत्तम जोगदंड
दिनांक २० ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १२ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त त्यांनी १९८९ साली स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अंनिस) मार्फत महाराष्ट्रात रुजवलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आणि व्यापक सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचे स्मरण केले जाईल. तसेच त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचेही स्मरण केले जाईल. एक उत्तम विवेकवादी वक्ता, संवादक, लेखक, संपादक, कुशल संघटक म्हणून ते ओळखले जात. परंतु त्यांच्या ठायी आजच्या काळात दुर्मिळ असलेल्या काही महत्त्वाच्या गुणांवर एक नजर टाकणे हे त्यांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल.
नेता म्हणजेच संघटना नव्हे
एखादी संघटना नेत्याच्या नावाने ओळखली जाणे हे आपल्याला नवीन नाही. अशा संघटनेचा नेता तहहयात त्या संघटनेचे नेतृत्व करीत असतो. परंतु डॉ. दाभोलकर यांना आपल्या संघटनेच्या बाबतीत असे व्हावे हे मान्य नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या हयातीतच, जून २०१० मध्ये, संघटनेचे कार्याध्यक्षपद सोडून अविनाश पाटील या तरुण कर्तबगार तरुणाच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवली. या बाबत जुलै २०१०च्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाच्या अंकातील ‘मी कार्याध्यक्षपद सोडले!’ या लेखात ते लिहितात, ‘तरीही हा निर्णय (अविनाश पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड) ऐकलेल्या अनेकांना सुरुवातीला धक्का बसला. याचे कारण आपल्या सामाजिक मानसिकतेत आहे, ज्याची लागण काही प्रमाणात संघटनेला झाली होती. आपल्या समाजाला अशी सवय आहे की, त्याला संघटनेपेक्षा व्यक्ति लवकर भावते, व्यक्तीच्या नावाने संघटना ओळखू लागतो. संघटनेच्या संस्थापकात कर्तृत्व असेल तर त्यांना याचा फायदा मिळतो. कारण संघटनेची पाटी कोरी असते. मग संघटना आणि ती व्यक्ति यांचे एक द्वैत तयार होते. जणू एका नाण्याच्या दोन बाजू. खरे तर ही काहीशी सरंजामशाही मानसिकता आहे. परंतु अनेक प्रकारची सोय यातून होते, असे सर्वांना वाटत राहते आणि मग ती व्यक्ति हयात असेपर्यंत तिला जणू संघटनेच्या पदाचा ताम्रपटच मिळतो. हे योग्य नव्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या विवेकी चळवळीने ओळखले पाहिजे. व्या व्यवशतेतील फायदे संघटनेला मिळत राहतील, असे पाहत त्यातील दोषांवर मात करण्याचे कौशल्य दाखविले पाहिजे. कार्याध्यक्ष बदलून संघटना म्हणून आपण ते दाखविले आहे.’ केवढा उदात्त हा विचार! सरंजामशाहीची लागण संघटनेला झाल्याचे त्यांनी ओळखले होते. आजही अशी लागण झालेले काही लोक आहेत. परंतु त्यांच्या या निर्णयास मान देणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे त्यांच्या पश्चात आणि त्यांच्या नावाचे नेते नसतानादेखील संघटना जोमाने कार्य करीत आहे.
योग्य वेळी पद सोडणे
जून २०१० मध्ये डॉ. दाभोलकर यांनी कार्याध्यक्षपद सोडले तेव्हा त्यांचे वय केवळ ६४ वर्षे होते. त्यांची तब्येत, कार्य करण्याचा आवाका आणि उत्साह पाहता अजून काही दशके तरी ते आपले पद सांभाळू शकले असते. परंतु आपण कधीतरी थांबले पाहिजे आणि पुढील पिढीच्या हाती सूत्रे सोपवून त्यांना तयार केले पाहिजे हे त्यांनी जाणले आणि अंमलात देखील आणून दाखवले. आजच्या काळात सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात हा गुण अत्यंत दुर्मिळ आहे. त्यांची ही परंपरा कार्यकर्त्यांनी पुढे चालू ठेवली आहे.
घरणेशाहीस नकार
डॉ. दाभोलकर यांच्या कार्यकाळात आणि त्यांनी पद सोडले तेव्हा त्यांनी आपल्या नातेवाईकांना संघटनेतील पदे दिली नाहीत. आजकाल सर्वत्र जिथे तिथे आपल्या नतेवाईकांची वर्णी लावणे हे सामान्य झालेले असताना डॉ. दाभोलकर यांचा हा गुण अगदी उठून दिसतो. याचा अर्थ असा नव्हे की आपल्या नातेवाइकांनी संघटनेचे काम करू नये असे त्यांना वाटत होते. परंतु त्यांनी नातेवाईक आहेत म्हणून कधीही कोणाला विशेष वागणूक दिली नाही. संघटनेत पदे देताना कार्यकर्त्यांचे काम, क्षमता आणि वैशिष्ट्ये यावरच त्यांनी भर दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ‘परिवारवादाचे’ दडपण राहिले नाही. राज्य, जिल्हा आणि शाखांच्या कामात देखील याचे प्रतिबिंब दिसते.
संघटनेची आदर्श निवड प्रणाली आणि रचना
संघटनेत त्यांनी लोकशाही आणि सहमति यावर आधारित अशी निवड प्रणाली अनेक वर्षांच्या अनुभवातून निर्माण केली. त्यानुसार दरवर्षी राज्य, जिल्हा आणि शाखा कार्यकारिणीची निवड केली जाते. या प्रणालीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मतभेद रहात नाहीत आणि सर्वजण एकदिलाने काम करतात. शाखेची कार्यकारिणी एक वर्षासाठी, जिल्ह्याची दोन वर्षांसाठी तर राज्याची तीन वर्षांसाठी निवडली जाते. या कालावधीनंतर अन्य कार्यकर्त्यांना आपल्या कार्यानुसार पदाची संधी मिळते. या प्रणालीद्वारे डॉ. दाभोलकर यांनी आपली संघटना ‘फूट-प्रतिबंधक’ बनवली आहे आणि सर्व स्तरावर ही प्रणाली काटेकोरपणे अमलात आणली जाते.
धर्म, ईश्वर या बाबत तटस्थता
धर्म, ईश्वर किंवा श्रद्धा या बाबतीत संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार बहाल केलेले असल्याने या अधिकाराचा आदर करून शोषण करणाऱ्या सर्व धर्मांतील अंधश्रद्धांना, रूढी परांपरांना विरोध, धर्माची विधायक चिकित्सा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार या सोबतच संत समाज-सुधारकांचा वारसा इत्यादिवर त्यांनी भर दिला. त्यामुळे विचारी लोकांना महा. अंनिसच्या कामाचे कौतुक वाटते आणि ते या कार्यास जमेल तेवढा पाठिंबा देतात.
डॉ. दाभोलकर यांच्या वरील विचारांतून, कृतीतून त्यांची दूरदृष्टि दिसून येते तसेच त्यांच्या कार्यात त्यांच्या जाण्याने खंड पडणार नाही याची काळजी त्यांनी घेतल्याचे दिसून येते. व्यापक सामाजिक परिवर्तन आणि विवेकी समाज निर्माण व्हावा यासाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. दाभोलकर यांना विनम्र अभिवादन. उत्तम जोगदंड
uttamjogdand@gmail.com