scorecardresearch

अनंतनागच्या चकमकीनंतरही सैनिकांची व्यथा कायमच राहणार?

वरिष्ठ अधिकाऱ्यासह चौघांना वीरमरण आल्यानंतर काही काळ शोक व्यक्त झाला, पण अशा दुर्दैवी घटना होतात कशा आणि त्या झाल्यानंतर आपण करतो काय?

soldiers
१९ आरआर, काश्मिर पोलीस आणि भारतासाठी हा दुर्दैवी दिवस होता.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

दक्षिण काश्मिरमधील अनंतनागच्या जंगलात पाकिस्तान- पुरस्कृत दहशतवाद्यांच्या विरोधात १३ सप्टेंबर रोजी कारवाई करताना १९ राष्ट्रीय रायफल बटालियनचे (आरआर) कमांडिंग ऑफिसर, कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौनक आणि माजी काश्मिर डीजपी मुलगा, डेप्युटी सुप्रीटेंडेंट ऑफ पोलीस हुमायून बट्ट यांना वीरमरण आले. १९ आरआर, काश्मिर पोलीस आणि भारतासाठी हा दुर्दैवी दिवस होता. याच चकमकीत आठ सैनिकही जखमी झाले होते, त्यांपैकी एक हुतात्मा झाला. ही संख्या वाढूही शकते.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
IND vs AUS: It's not easy to hit the ball where there is no fielder Aussie legend Mark Waugh's big statement on Suryakumar
Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

आपल्या पासिंग आउट परेडच्या वेळी सर्व कॅडेट्स आणि रिक्रूट्स, संविधानाच्या रक्षणासाठी प्राण निछावर करण्याची आणि जीव धोक्यात घालूनही, आदेश मिळेल तेथे, जमीन, समुद्र किंवा आकाश मार्गे जाऊ, अशी शपथ घेतात. सर्व अधिकारी आणि सैनिक या शपथेचे शब्दशः पालन करतात. इट इज ‘नेशन फर्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाईम ’ हे शब्द या कारवाईतही खरे ठरले. कोकरनागच्या गरोल एरियातील निबिड, घनदाट जंगलातील पहाडांमधे अत्याधुनिक शस्त्रांसहित लपलेल्या दहशतवाद्यांना हुडकून ठार करणं हा पोरखेळ नाही. १९ आरआर बटालियनचे कमांडिंग ऑफिसर, कर्नल मनप्रीत सिंग यांनी या एन्काऊंटरमधे अग्रणी भूमिका, ज्याला आर्मीत ‘लीडिंग फ्रॉम फ्रंट’ म्हटले जाते, तशी निभावली होती. कर्नल सिंग आणि त्यांचा कंपनी कमांडर, मेजर आशिष धौनक हे दोघेही, गॅलंटरी सेना मेडल या शौर्य पुरस्कारानी या आधीच्या कारवायांसाठी विभूषित झाले होते. कदाचित या कारवाईसाठी आताही त्यांना वीरता पुरस्कार मिळेल… पण तो धारण करण्यासाठी त्यांची छाती मात्र नसेल. जेव्हा जेव्हा त्यांच्या वीरपत्नी आणि त्यांची मुले ते वीरता पुरस्कार पहातील त्या वेळी त्यांची मने दुःखाने गदगदतील. पण त्यांचे अश्रू पुसण्यासाठी कोणीही नसेल.

आणखी वाचा-नवीन संचालक मंडळ आल्यानंतर एसटी बँक संभ्रमात?

वाहिन्यांवरला ‘तमाशा’

नेहमी प्रमाणे चित्रवाणी वृत्तवाहिन्यांनी आपल्या टीआरपी वृद्धीसाठी या एन्काउंटरचाही वापर केला अजूनही करताहेत. सामान्य माणसाच्या कथा, व्यथांना कव्हर करण्यात या वृत्तवाहिन्यांना तिळमात्र इंटरेस्ट नसतो. हुतात्मा सैनिकांच्या घरी आणि/किंवा त्यांच्या अंतसंस्काराच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांच्या तोंडासमोर माईक घुसडून/धरून ज्या प्रकारे, असंबद्ध, अतार्किक आणि रुचिहीन प्रश्न विचारतात ते असहनीय असते. कुटुंबीयांना त्यांचे दुःख उदात्तरीत्या (डिग्निफाईड वे) सहन करू देण्याऐवजी या वाहिन्या त्याचा तमाशा मांडतात. या एन्काउंटरचे आपापल्या परीनी वर्णन करणारे विविध व्हिडिओज, इंटरनेटवर मिनिटा गणिक प्रसृत झाले आणि अजूनही होताहेत. यात हौशे- गवशे सारे सामील आहेत.

चित्रवाणी वाहिन्यांच्या चर्वितचर्वणासाठी राजकारण आणि नेते हे नेहमीचे खाद्य असताना त्या या हुताम्यांच्या आणि सेनेच्या मोहिमांमागे का लागतात हे अनाकलनीय आहे. जर त्यांना सैनिकांची एवढी काळजी असेल तर त्यांनी निवृत्त सैनिकांच्या प्रश्नांना वाचा फोडावी. पण दिल्लीतील जंतरमंतरवर निवृत्त सैनिकांवर (११ ऑगस्ट २०१५ रोजी) लाठीमार झाला होता तेव्हा एकही प्रसारमाध्यम प्रतिनिधी किंवा व्हिडिओमेकर तेथे दिसला नाही. कुठल्याही एन्काउंटरच्या वेळी निवृत्त सैनिकांनी चित्रवाणी वाहिन्यांपासून दूरच राहणे बरे, कारण आपल्या स्वार्थासाठी या सैनिकांचा वापर कसा करून घ्यायचा हे प्रसारमाध्यमांना चांगल्या प्रकारे अवगत आहे.उद्या हीच माध्यमे निवृत्त सैनिकांना टीव्हीवर राजकीय पक्ष प्रवक्त्यांच्या विरोधात उभे करतील आणि तो प्रवक्ता, त्या एन्काऊंटरसाठी लष्करालाच दोष देईल किंवा त्या निवृत्तांशी गैरवर्तन करेल.

आणखी वाचा-हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास वर्तमानातही महत्त्वाचा का? 

चकमक की गुप्तचर- अपयश?

अनंत नागच्या पहाडी भागातील जंगलात दहशतवाद्यांचा अड्डा आहे ही पक्की माहिती (फर्म इंटलिजन्स) स्थानिक पोलिसांकडून मिळाल्यावर, १९आरआर बटालियनने पोलिसांसह तेथे छापा घालण्याची मोहीम आखली. या दहशतवाद्यांत उझैर खान हा १० लाखांच इनाम असलेला ‘लष्कर ए तोयबा’ चा तथाकथित सिनियर कमांडर असल्यामुळे कारवाईत ‘आरआर’चे कमांडिंग ऑफिसर स्वत: सामील झाले होते. सेनेची तुकडी त्या जागेजवळ पोहोचताच त्याच्यावर तुफान गोळीबार झाला आणि कमांडिंग ऑफिसरसह अनेक सैनिक जखमी झाले. दहशतवाद्यांनी केलेली ही ‘अँबुश’ होती. जवळपास दीड तासांनी गोळीबार थांबल्याने दहशतवाद्यांनी आपली जागा बदलली असावी असा अंदाज करण्यात आला आणि पुढची कारवाई सुरू झाली. दहशतवादी पहाडावर आणि सेना वर चढत असल्यामुळे जखमींना नेण्यासाठी हेलिकॉप्टर येऊ शकले नाही/आणता आले नाही. सेना त्या दहशतवाद्यांच्या मागावर आहे.या चकमकीत लष्कर ए तायबा या पाकिस्तानी इस्लामी दहशतवादी संघटनेच्या द रेझिसस्टंस फ्रंट या उपगटातील होते.

‘या एन्काउंटरमधे १९ आरआर बटालियनला त्यांच्या पोलिस इन्फॉर्मरनी डबल क्रॉस केल्यामुळे त्यांना ही जीवित हानी सहन करावी लागली’ असे वक्तव्य एका चित्रवाणी चर्चेत एका निवृत्त सेनाधिकाऱ्यानी केले होते. हेच वृत्तपत्रांमधेही आल आहे. हे जर इंटलिजन्स फेल्युअर (गुप्तचर यंत्रणेचे अपयश) असेल आणि १९ आरआरला या डबल क्रॉसची कल्पना नव्हती किंवा ही गोष्ट माहीत नव्हती असे असेल तर कठीण आहे. काही सुत्रांनुसार, असा डबल क्रॉस अनपेक्षितही नव्हता.जर हे सत्य असेल तर याचा अर्थ आपण/आपलं लष्कर/आपल्या इंटलिजन्स एजन्सीज,या बाबतीत स्वमग्न (कॉम्प्लेसंट) झाल्या आहेत असा होतो. असे बेईमान इन्फॉर्मर्स, युनिटच्या विनाशाचे कारण बनतात. आतापर्यंत तो इन्फॉर्मर/ त्याच्या दोस्तांना- साथीदारांना १९ आरआर या तुकडीतील अन्य वरिष्ठांनी चांगलाच धडा दिला/शिकवला असेलच.

आणखी वाचा-डबल डेकर बस इतिहासजमा होईल, पण…

जोखीम हवीच, पण…

हा लेख लिहीत असताना, अनंतनागच्या त्या भागातच लष्कराचे ‘कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन’ सुरू झालेले आहे आणि आतंकवाद्यांच्या ठिकाण्याची खात्री झाल्यावर मॉर्टर्स, रॉकेट लॉन्चर्स, ड्रोन्स आणि क्वाड्री कॉपटर्स, ऑपरेशनल एरियात आणण्यात आले आहेत. अनंतनागच्या जंगलातून ते वर पीर पंजाल पर्वत शृंखलेवर चढून रामबन/उधमपूर/जम्मूकडे किंवा पूंछकडे जरी निघून गेले असतील ही शक्यता आहे, तरी १९आरआर त्यांचा पाठलाग करून त्यांना मारेल.१९ आरआर बटालियन या आतंकी नरसंहाराला योग्य वेळी, योग्य ते उत्तर देईलच.

दहशतवाद्यांशी होणाऱ्या चकमकींमध्ये जोखीम नेहमीच घ्यावी लागते आणि प्रसंगी त्याची किंमतही चुकवावी लागते. या वेळी तूर्तास दहशतवाद्यांची सरशी झाल्याचे दिसले.पण आता;जे लोक आतंकवाद्यांना प्रशिक्षण देतात, त्यांची भलावण करतात, त्यांना मदत करतात, त्यांना आसरा देतात आणि त्यांना आपली माहिती पुरवतात त्यांना जिव्हारी लागेल असा धडा शिकवण्याची/ इशारा देण्याची/किंमत चुकवण्याची वेळ परत एकदा आली आहे.

स्थानिक लोकांना आपल्याकडे वळवो व त्यांची मने आणि विश्वास जिंकणे हे (विशेषत: काश्मीरसारख्या ‘ब्रेन वाॅश्ड’ भागात ) फार कठीण असते. त्यांना भारताच्या तेथील जनतेसाठी चालवलेल्या हितकारक धोरणांची माहिती देणे, त्याद्वारे त्यांची प्रगती कशी होईल हे समजावून सांगणे आणि पाकिस्तानच्या कुटील कारस्थानांचा पर्दाफाश करणे हे भारत आणि भारतीय सेनेचे ध्येय आहे. पण, दुःखाची गोष्ट अशी की तेथील बहुतांश लोक – मग तो टॅक्सी ड्रायव्हर असो की हॉटेलमधील वेटर, पोनीवाला असो की दुकानदार, रस्त्यावरील खोमचेवाला असो की शिकारा चालवणारा; हे डबल क्रॉस करणारे दुतोंडी लोक असतात. आजही प्रत्येक व्यापारी/दुकानदार/नोकराला दहशतवाद्यांना खंडणी द्यावी लागते किंवा मरणाला तोंड द्याो लागत. त्यांच्या मनातील दहशतवाद्यांबद्दलची भीती काढून टाकण्याची वेळ हीच आहे आणि त्या साठी प्रशासन व लेफ्टनंट गव्हर्नर यांनी प्रयत्न केले पाहिजेत. जर पाकिस्तान त्याच्या ‘सुरक्षे’साठी अफगाणिस्तानातील तालिबानवर आणि तहरीक ए पाकिस्तान तालिबानविरुध्द सैनिकी कारवाई करू शकतो तर,आपणही पाकिस्तानविरुध्द त्याचा भारत विरोधी पुंडपणा संपवण्यासाठी ठोस पाऊल उचलले पाहिजे. असे केले नाही तर, पाकिस्तान संघटनांना मदत करण थांबवणार नाही.

आणखी वाचा-१०५ पुरातन वस्तूंच्या माध्यमातून आपल्या इतिहासाचे विखुरलेले तुकडे भारतात कसे परत आले? 

देशासाठी प्राणार्पण केलेल्या या वीरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना करण हेच आमच्या सारख्या निवृत्त सैनिकांच्या हाती आहे. हे म्हणताना माझ हृदय पिळवटून निघत आणि हतबल असलो तरी रक्त तापून उसळी मारत. देशाला आपल्या वीरांची अशी सतत हानी मंजूर आहे का आणि असेल तर किती दिवस हे चालू राहील याच उत्तर येणारा काळच देईल.

abmup54@gmail.com.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 09:30 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×