scorecardresearch

डबल डेकर बस इतिहासजमा होईल, पण…

मुंबईची ओळख असलेल्या आणि ब्रिटिश काळाचा वारसा मिरवणाऱ्या बेस्टच्या लाल डबल डेकर आजपासून बंद होणार आहेत. त्यांची जागा एसी डबल डेकर बस घेणार आहेत. एके काळी कुतूहलाचा, कौतुकाचा भाग असलेल्या या बसविषयी…

double-decker-bus
ब्रिटिश काळापासून शहाराच्या रस्त्यांवर दिमाखात फिरणारी नॉन एसी डबल डेकर बससेवा मात्र बंद होणार आहे. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

मोहन गद्रे

मुंबई शहरातील रस्त्यांवर, एके काळी खाजगी एसी गाडी शोधावी लागत होती, आज नॉन एसी गाडी शोधूनही सहज सापडेल की नाही शंका आहे. मुंबईची जीवन वाहिनी, लोकल ट्रेन सुद्धा आपले जुने मोकळ्या ढाकळ्या सताड उघड्या खिडक्या दरवाजांचे रूप पालटून एसी लोकलच्या स्वरूपात धावण्यासाठी सिद्ध होऊ लागली आहे. ब्रिटिश काळापासून मुंबईकरांना शहरांतर्गत प्रवासाची सेवा देणारी बीईएसटी- बेस्टदेखील आधुनिक स्वरूपात आरामदायी बस सेवा देण्याच्या प्रयत्नात आहे. बेस्टने वातानुकूलित बससेवा सुरू केली असून आता बेस्टच्या आयकॉनिक डबल डेकर बसदेखील वातानुकूलित होणार आहेत. या विकासाच्या रेट्यात मुंबईची ओळख असणारी आणि ब्रिटिश काळापासून शहाराच्या रस्त्यांवर दिमाखात फिरणारी नॉन एसी डबल डेकर बससेवा मात्र बंद होणार आहे. १५ सप्टेंबरपासून ती शहरवासीयांचा कायमचा निरोप घेणार आहे. कदाचित या बस पुढे बेस्टच्या म्युझियममध्ये दाखल होतील, मात्र मुंबईकरांच्या अनेक पिढ्यांच्या आठवणींत त्या नक्कीच कायमस्वरूपी विराजमान होतील.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

एखाद्या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी, मुंबईकर आपल्या कुटुंबीयांना घेऊन जीवाची मुंबई करायला, अशा डबल डेकर बसमधून निघायचा. बसच्या मागच्या कोपऱ्यात असणाऱ्या सताड उघड्या दरवाजासमोरच कोन करून वरच्या मजल्यावर जाणारा छोटासा जिना असे त्यावरून, धडपडत मुलं वरचा मजला गाठायची, पाठोपाठ त्यांचे आई-वडील जायचे. तितक्यात, बस एक झटका देत सुरू व्हायची. वरच्या मजल्यावर आसनांच्या दोन रांगांमधून, बसचे हेलकावे सहन करत एकदम पुढच्या सीटकडे धडपडत खिदळत झेपावत जाण्यात मुलांना जाम मजा वाटायची. तेथे आधीच एखादे जोडपे, भुरभुरणाऱ्या केसांतील मुखचंद्र न्याहाळण्यात गुंग झालेले असे. मुलांना मात्र त्यामुळे काही फरक पडत नसे. ती समोरून येणारा भन्नाट वारा, तोंडाचा मोठ्ठा आ करून मनात भरून घेण्यात रमून जात.

आणखी वाचा-१०५ पुरातन वस्तूंच्या माध्यमातून आपल्या इतिहासाचे विखुरलेले तुकडे भारतात कसे परत आले?

लग्न झाल्यावर, पहिले काही दिवस, टॅक्सीची चैन करून झाली की नवीन जोडप्यांसाठी, डबल डेकर बसची वरच्या मजल्यावरील अगदी पुढची जागा म्हणजे, गार वारा खात, आपल्या संसाराची स्वप्ने रंगवत प्रवास करण्यासाठी एकदम परफेक्ट जागा.

दुमजली बस म्हणजे दोन कंडक्टर आलेच. वरच्या मजल्यावर उभ्याने प्रवास करण्याची परवानगी नसल्यामुळे, वरच्या कंडक्टरला बेलचे विशिष्ट टोले देऊन, खालच्या मजल्यावरील कंडक्टरला संदेश द्यावा लागत असे, म्हणजे अजून वरचे प्रवासी उतरत असतील तर टण टण असा आवाज काढायचा, सगळे प्रवासी खाली गेले की, एकच टोला आणि वर सगळं हाऊसफुल्ल असेल, तर टीण टीण टीण असं पाच सहा वेळा वाजवायचं. अशी ती दोन कंडक्टरमध्ये सांकेतिक घंटाभाषा असे.

अगदी सुरुवातीला, सर्व बस इंग्रजी अद्याक्षरे डोक्यावर मिरवीत असत, उदा. एफ रुट, जी रुट, ए रूट वगैरे. काही काळाने त्यांची जागा, नंबरानी घेतली. आमच्या गल्लीतून, म्हणजे प्रभादेवीच्या खेड गल्लीतून- आताचा काका साहेब गाडगीळ मार्ग, एन वन रुट, त्याचीच आता १७१ झाली आहे. ‌वरळी डेअरी ते सी जी एस क्वार्टर्स अशी बस सेवा सुरू झाली होती. ती डबल डेकर आमच्या गल्लीतून जाताना, चाळीच्या गॅलरीत येऊन बघणे आम्हा लहान मुलांना मोठ्ठा आनंदाचा आणि गमतीचा क्षण वाटायचा. आम्ही लहान मुलं, चाळीच्या गॅलरीत येऊन, पुढली डबल डेकर येण्याची वाट पहात असायचो. गल्लीच्या तोंडावर, डबल डेकर गल्लीत वळताना दिसली रे दिसली की आली आली आली करून मोठ्ठा गलका करायचो, मग घरातली मोठी माणसे पण धावत गॅलरीत यायची. बस पुढ्यातून जाताना, परत सगळ्यांचा एकदम गलका व्हायचा. बस पुढे जाऊन स्टॉप वर जाऊन थांबायची, चार दोन पॅसेंजर उतरायचे चढायचे, आणि डबल बेल ऐकू यायची , की परत आमचा गलका गेली… बाहेर आलेली मोठी माणसं परत आपापल्या खोल्यांत शिरायची, आम्ही परत दुसऱ्या बसच्या येण्याची वाट पहात थांबायचो. आमच्याकडे कोकणातून कोणी ना कोणी येत असायचे, त्यांना या माडीच्या बसच किंवा माडीवाल्या बसचं फारच कौतुक आणि अप्रूप वाटत असे. मग त्यांना कधीतरी माडीच्या बसची ट्रीप घडवून आणण्याचा कार्यक्रम पार पाडला जायचा.

आणखी वाचा-राज्य सरकारची अनास्था, केंद्र सरकारची उदासीनता हेच मणिपूरचे आजचे वास्तव… 

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला, फोर्टमधल्या खास इमारतीवर रोषणाई केली जाते, ती पहाण्यासाठी, आम्ही डबल डेकर बसने, वरच्या मजल्यावर बसून जायचो. तो रंगबेरंगी, झगमगाट पाहत, पुडीतील, चणे, खारे शेंगदाणे खात खात, डोळे भरून पाहत पाहत फिरून यायचो. नंतर, बेस्टची आर्थिक बाजू सावरण्याचा एक प्रयत्न म्हणून, कंडक्टर संख्येवर नियंत्रण येऊ लागले आणि मग वरच्या मजल्याला कंडक्टर देण्याऐवजी, वरचा जिन्यात आडवा पत्र्याच्या दरवाजा, वरचा मार्ग रोखून धरू लागला.

आता काळाची गरज म्हणून, एसी डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यांवरून धावू लागणार आहे. आता सध्या त्याचं अप्रूप आहे, थंडगार असेलच, पण अंतर्गत रचना कशी असेल? वरच्या मजल्यावरून प्रवास करण्याचा लहान मुलांचा उत्साह अगदी पूर्वी सारखाच असेल. पण समोरून येणारा भणाणणारा, सर्वांगाला गुदगुल्या करणारा मोकळा वारा नसेल. धावणाऱ्या थंडगार थिएटरमध्ये समोरच्या आणि आजुबाजूच्या काळसर काचांमधून हलणारी मागे मागे पळणारी बरी वाईट दृष्य दाखवणारा मुक चित्रपट पहावा तसा कदाचित अनुभव येईल. आता गॅलरीत नाही, तर चलो‌ ॲपवर, पुढची एसी डबल डेकर कधी येईल, याचा अंदाज घेऊन, नातवाला घेऊन, बस स्टॉपवर जायला सज्ज आहे.

gadrekaka@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-09-2023 at 09:39 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×