‘मुंबई महानगर क्षेत्र’ हे महाराष्ट्राच्या राजधानीचा स्वभाव घडवणारं ठरलं, याची साक्ष वास्तूही देतात..

अभिजीत ताम्हणे

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

‘एमएमएआरडीए’ ही इंग्रजी अक्षरं किंवा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (मुंबई मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथोरिटी) हे त्यामागचं मूळ नाव प्रत्यक्ष मुंबईत शिरण्याआधीच रस्त्यात कुठे कुठे दिसत असतं. अनेक उड्डाणपुलांच्या खांबांवर हीच अक्षरं दिसतात. ज्याचा विकास त्या प्राधिकरणामार्फत होतोय, ते ‘मुंबई महानगर क्षेत्र’ ४३ हजार चौरस किलोमीटरचं आहे! ‘मुंबई’ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते दोन (शहर आणि उपनगर हे) जिल्हे मिळून फार तर ५४३.५६ चौरस किलोमीटरचे. मुंबईपेक्षा कैकपटींनी मोठं असलेल्या या महानगर क्षेत्रात इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून- किंवा त्याही आधीपासून- मानवी वस्ती आहे, म्हणून त्यापुढल्या सात बेटांकडे लक्ष जाऊ शकलं आणि पुढे त्या बेटांची मुंबई बनली. दोन हजार वर्षांच्या या इतिहासापैकी किमान पंधराशे वर्षांपासूनचा इतिहास लेणी, शिलालेख यांच्या स्वरूपात आजही पाहाता- अभ्यासता येतो. या वारसा-स्थळांसाठी ‘एमएमएआरडीए’नं स्वत:च्या स्थापनेनंतर २१ व्या वर्षी- १९९६ मध्ये ‘मुंबई महानगर क्षेत्र वारसा संधारण संस्था’ स्थापली. इंग्रजीत हिचं नाव ‘मुंबई मेट्रोपोलिटन रीजन हेरिटेज कॉन्झव्‍‌र्हेशन सोसायटी’ आणि लघुरूप ‘एमएमआर-एचसीएस’! या संस्थेच्या स्थापनेवेळी मुंबई महानगर परिसरात साधारण ६४० वारसा-स्थळांची मोजदाद झालेली होती, तर पुढल्या २५ वर्षांच्या वाटचालीत ‘एमएमआर-एचसीएस’नं २७०० वारसा-स्थळं मोजली. त्यांच्या संधारणासाठी फक्त कुंपणं उभारायची नसतात, जाणीवजागृती हेच वारसास्थळं जपण्याचं साधन असतं, हेही या संस्थेनं ओळखलं.. या जाणीवजागृतीचा तगडा प्रयत्न म्हणजे, ‘मल्टिप्लिसिटीज- अर्बन कल्चर्स ऑफ द मुंबई मेट्रोपोलिटन रीजन’ हे नीरा आडारकर यांनी सिद्ध केलेलं पुस्तक!

पुस्तकाच्या लेखकांपैकी सूरज पंडित हे ‘महाराष्ट्रातील बौद्ध लेणी’, ‘बुद्धिस्ट अ‍ॅण्ड पाशुपत केव्हज इन मुंबई’, ‘मुंबई बियॉण्ड बॉम्बे’ अशा पुस्तकांचे लेखक. पुरातत्त्ववेत्ते अरविंद जामखेडकर यांचे शिष्य असलेल्या पंडित यांचा विशेष अभ्यास मुंबई परिसराबद्दल आहे. त्यामुळे पुस्तकाच्या पहिल्या दोन प्रकरणांवर त्यांची छाप दिसते. नीरा आडारकर या वास्तुरचनांच्या इतिहासकार आहेत, स्वत: वास्तुरचना आणि नगररचना क्षेत्रात कारकीर्द केल्यानं मुंबई तसंच ठाण्याच्या मोकळय़ा जागा आणि बागांचा अभ्यास, शिवाजी पार्कसारखा खेळता-नांदता परिसर ‘वारसा’ म्हणून कसा जपायचा याचा अभ्यास, मुंबईच्या चाळींचा तसंच गिरणगावचा यापूर्वी त्यांनी ग्रथित केलेला असल्यानं मौखिक इतिहासाचा अनुभवही त्यांना आहे आणि मुख्य म्हणजे मुंबई परिसराच्या सर्वसमावेशकपणाची, तसंच ‘मुंबई कोणाची? लोकांचीच!’ या वास्तवाची त्यांना जाण आहे. या पुस्तकासाठी १८९२ सालापासूनची ५५ इंग्रजी वा मराठी पुस्तकं, १२ स्थापत्यशास्त्रीय अभ्यास आणि ११ विद्यापीठीय संशोधन-प्रबंध यांचा आधार घेतलेला आहेच. पण पुस्तकाच्या लिखाणात मात्र प्रवाहीपणा आहे.. या सुमारे ४०० पानी मोठय़ा आकाराच्या जाड आणि जड पुस्तकात लिखाणाची पानं असतील फार तर दोनशेच्या आसपास. बाकी छायाचित्रं, नकाशे, जुनी छापील चित्रं, असा दृश्य-ऐवज भरपूर आहे. हे नकाशेही, ‘मुंबईतील प्रमुख धर्म आणि भाषा (शहराच्या नकाशात कुठले धर्म/ भाषा कुठे आढळतात)’ असा १८८१ मधला नकाशा ते ‘मुंबई महानगर क्षेत्रामधील सर्व २१ किल्ले’, ‘वर्सोवा गावाचा नकाशा’ असे वैविध्यपूर्ण आहेत. मुंबई जुळत कशी गेली याचे नकाशे आपण पाहिलेले असतातच (नसतील, तर ते ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’त आहेत), पण या पुस्तकातले नकाशे निरनिराळी कुतूहलं शमवणारे आहेत. पुस्तकाच्या या दृश्य भागाची जबाबदारी चित्रकार अर्चना हांडे यांनी निभावली आहे. काही ठिकाणी हांडे यांची स्वत:ची चित्रंही आहेत. माणसांच्या इतिहासामध्ये अर्चना हांडे यांना रस होता हे त्यांच्या यापूर्वीच्या प्रदर्शनांतून दिसलं आहे, पण या पुस्तकात अगदी मोजक्या ठिकाणी जुने ‘फॅमिली फोटो’ आणि अगदी जुने ‘ग्रुप फोटो’ असावेत असं पुस्तकाच्या दृश्यसंकल्पक म्हणून हांडे यांनी ठरवल्यामुळे आपण ज्याला वास्तुवारसा म्हणतो आहोत, तिथल्या त्या काळाच्या माणसांशी वाचक नातं जोडतो.

‘महिकावतीची बखर’ हा मुंबईविषयक पुस्तकांच्या सुरुवातीचा परिच्छेद असतोच बहुतेकदा. पण इथं त्या बखरीचा उल्लेख १०० पानांनंतर येतो! कारण मुंबई महानगर प्रदेशाचा इतिहास उत्तरेला वसई-नालासोपारा आणि दक्षिणेला चौलपासून, पूर्वीच्या ‘शूर्पारक’पासून म्हणजे साधारण इसवी चौथ्या शतकापासून सुरू होतो. पहिली दोन प्रकरणं याच काळाबद्दल, याच भागाबद्दल आहेत. या भागात पुण्ण याला बुद्धकाळात पाठवलं गेल्याच्या कथाही येतात. अवांतर कुतूहल शमवणारा संदर्भ म्हणून, गुजरातच्या खंबायत भागात सापडलेल्या नवअश्मयुगीन हत्यारांचंही एकाच पानावर सचित्र दर्शन घडतं. शूर्पारकापासून मंडपेश्वर, कान्हेरी, मागठाणे, जोगेश्वरी इथल्या लेण्यांपर्यंतची वाट शोधली जाते. ही लेणी प्रामुख्यानं बौद्ध, पण काही हिंदू लेणीही इथंच आढळतात, त्याचा खुलासा करताना बौद्ध प्रभाव आणि शैव प्रभाव यांचं विवेचनही या पुस्तकात येतं. ते वाचताना त्या काळातल्या साहचर्याचं भानही येतं.. ही सहाव्या शतकापर्यंतची लेणी. ती खोदताना हिंदूंनी बौद्धांच्या किंवा बौद्धांनी हिंदूच्या लेण्यांची पाडापाड करून ‘लेणी वही खोदेंगे’ असा अभिनिवेश दाखवला नव्हता, याच्या या आजही जिवंतच असलेल्या खुणा आहेत. हे सारं याच पुस्तकात पुढे, माहीमची शीतलादेवी/ मखदूमिया दर्गा, जैन मंदिर आणि चर्च यांच्याबद्दल वाचताना- त्या स्थळांचे फोटो पाहताना पुन्हा आठवतं आणि हिंदू-बौद्ध साहचर्यापासूनची जर या भागाची धर्मसहिष्णुतेची परंपरा असेल तर ती आजही इतक्या सहज तुटणार नाही, असंही वाटू लागतं. पण हे झालं वाचतानाचं मत. त्याआधी माहिती तर प्रचंडच मिळालेली असते. विशेषत: सोपारा भागातल्या स्तूपांमध्ये गोठलेला काळ.. सोपाऱ्यात आढळलेला तिसऱ्या शतकातला सम्राट अशोकाचा शिलालेख (जो आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात आहे) किंवा कान्हेरी लेण्यातल्या एका भिंतीवर ‘सहज कोरलेलं’ चिनी लिपीतलं वाक्य.. त्याआधीच ह्युएन त्संग (युआन श्वांग) यानं कान्हेरी लेणी तीनमजली असल्याची केलेली नोंद, त्रकूटकांनी दिलेली देणगी आणि कल्याणचे श्रेष्ठी (व्यापारी) कान्हेरीत आल्याची नोंद.. अशी सांस्कृतिक समृद्धी!

नवव्या शतकापासून शिलाहारांचा काळ सुरू होतो आणि ठाणे, कल्याणचे उल्लेख वाढू लागतात. अंबरनाथच्या शिव मंदिराचा कर्ता, शिलाहार छित्तराज याला साहित्य-कलेची आवड असल्याचा आणि त्याच्या पदरी असलेल्या (दहाव्या शतकात) कवी सोद्धल यानं रचलेल्या ‘उदयनसुंदरीकथा’ या काव्यात ज्या राजधानी-नगरीचा उल्लेख आहे ते आजचं ठाणे शहर असल्याचाही उल्लेख पुस्तकात येतो आणि त्यापुढल्या काळात (सन १००९, १०२१.. म्हणजे आजपासून हजार वर्षांपूर्वी) पुन्हा कान्हेरी गुंफांमध्ये पहलवी भाषेत/ लिपीत कोरलेले शिलालेख सापडल्यानं पारसी व्यापाऱ्यांचाही राबता तेव्हापासूनचा असल्याचा निष्कर्ष निघतो. तळवलीपल्लिका (तळवली) कांधेवलिपल्लिका (कांदिवली), वडवली, असलग्राम (आसनगाव), उम्बरवल्लिग्राम (उंबरगाव/ हल्ली गुजरातमध्ये गेल्यामुळे उमरगाम) असे तत्कालीन शिलालेख वा ताम्रपटांवरले उल्लेख शिलाहारांच्या उत्तर कोकणातल्या शाखेचा विस्तार दाखवतात. यापैकी ‘पल्लिका’ या शब्दाचा आताच्या पालिकांशी संबंध काय, असा प्रश्नही पडतो.

पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणापासून फिरंगी, टोपीकर येऊ लागतात. वसई परिसरात हे प्रकरण घडतं आणि पुढलं पाचवं प्रकरण कोळी गावांच्या मार्गानं थेट माझगावपर्यंत जाऊन भिडतं. तोवर ब्रिटिशांनी मुंबई आंदण मिळवलेलीच असते.. पण त्याआधी वसईच्या लढाईचे, राज्यकर्ते होण्याआधी व्यापारी असलेल्या इंग्रजांनी कापसाबरोबरच अफूचाही व्यापार कसा वाढवला याचे आणि पर्यायानं ‘आर्थिक राजधानी’ म्हणून मुंबईची घडण कशी होत गेली याचेही उल्लेख येत राहातात. १८५७ पर्यंतच्या मुंबईत उत्पादन कमी, पण व्यापारउदीम जास्त होता. ईस्ट इंडिया कंपनी जाऊन थेट राणीचं सरकार आल्यावर औद्योगिकीकरण वाढलं. पहिल्या महायुद्धापर्यंत वडाळा ते माझगाव या भागात बरीच भरावकामं झाली, मुंबई शीवपर्यंत सलग झाली. या प्रकरणावर नीरा आडारकर यांची छाप जाणवते. गिरण्यांची वाढ, चाळींची वाढ.. या चाळींमुळे घडलेलं समाजजीवन (अनेकदा एका जातिसमूहाच्या चाळीही असत, तर काही चाळी अठरापगड).. इथपासून ते मुंबईत त्या काळात झालेली संस्था उभारणी यांचा पट इथं उभा राहातो. थोडक्यात, पुस्तक मुंबई महानगर प्रदेशाच्या परिघावरून सुरुवात करून दक्षिण मुंबईच्या टोकांकडे येत राहातं. पण अधेमध्ये लांबही जातं.. उदाहरणार्थ, प्रार्थनास्थळांच्या वास्तुवारशाचा आढावा घेताना अलिबाग परिसरातल्या बेने इस्रायली (ज्यू/ शनवारतेली) समाजापर्यंत जातं. दोन महायुद्धांच्या मधला काळ, त्या वेळी झालेल्या गृहयोजना यांचा आढावा घेऊन, महाराष्ट्र राज्यस्थापनेपाशी हे पुस्तक थांबतं. पुस्तकात दोन पानं भरून वापरलेलं ‘हुतात्मा चौकातील स्मारकाला पहिले अभिवादन’ हे छायाचित्र सांगतं.. ‘मुंबई महानगर प्रदेश’ हा यापुढे महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग झाला आहे आणि राहील.. तीन लाखांहून अधिक चौरस कि.मी.च्या महाराष्ट्रापैकी एवढय़ाच ४३ हजार चौरस कि.मी.चा इतिहास आपण जाणून घेतला कारण समुद्रालगतचा हा भाग म्हणजे जगाचा महाराष्ट्राशी संबंध जोडणारं एक प्रवेशदार होतं. त्या प्रवेशदारानं सर्वाचं स्वागतच केलं आणि म्हणून सर्वसमावेशक वारशाच्या खुणा मुंबई महानगर क्षेत्रात अधिक दिसतात, त्या साऱ्याच खुणा आता ‘आपल्या’ इतिहासाच्या आहेत, याची जाणीव हे पुस्तक देतं.