– सत्यसाई पी. एम.
भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील राजनैतिक संबंध २६ नोव्हेंबर १९४९ रोजी प्रस्थापित झाले. २०२४-२५ मध्ये भारत-फिलिपिन्स राजनैतिक संबंधांचा ७५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. लोकशाही, कायद्याचे अधिष्ठान आणि बहुविध संस्कृती ही सामायिक मूल्ये या नात्याचा भक्कम पाया ठरली आहेत. ‘ॲक्ट इस्ट पॉलिसी’ अंतर्गत भारताने आसियान देशांशी सहकार्य वाढवताना फिलिपिन्सला महत्त्वाचा रणनीतिक भागीदार मानले. औषधे, माहिती तंत्रज्ञान सेवा, यंत्रसामग्री अशा व्यापार क्षेत्रांबरोबरच ब्रह्मोस क्षेपणास्त्र व्यवहार आणि समुद्री सुरक्षा सहकार्यामुळे हे नाते आर्थिक व सामरिकदृष्ट्या सशक्त झाले आहे. दक्षिण चीन समुद्राच्या मध्यभागी असलेले फिलिपिन्सचे भू-स्थान भारतासाठी समुद्री व्यापारमार्ग आणि इंडो-पॅसिफिकमधील स्थैर्य राखण्यासाठी निर्णायक आहे.
भारतासाठी फिलिपिन्सचे महत्त्व
भारताच्या ॲक्ट इस्ट पॉलिसी आणि इंडो-पॅसिफिक धोरणात फिलिपिन्स हा महत्त्वाचा दुवा आहे. दक्षिण चीन समुद्रातील त्याचे सामरिक स्थान भारताला जागतिक व्यापारमार्गांच्या सुरक्षेत महत्त्वाची भागीदारी मिळवून देते. दोन्ही देशांत लोकशाही, कायद्यांचे अधिष्ठान व वैविध्यपूर्ण संस्कृती आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी, संयुक्त नौदल सराव, सायबर सुरक्षा, उपग्रह तंत्रज्ञान आणि संरक्षण पायाभूत सुविधा यांमुळे द्विपक्षीय संबंध अधिक सशक्त होत आहेत. तसेच माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, नूतनीकरणीय ऊर्जा व पर्यटन क्षेत्रातील वाढते सहकार्य भारत-फिलिपिन्स संबंधांना दीर्घकालीन आर्थिक बळकटी देत आहे.
भारत आणि फिलिपिन्सने आपले संरक्षण आणि सागरी संबंध वाढवण्याचा, थेट विमान उड्डाणे सुरु करण्याचा आणि नविन व्यापारी करारांवर वाटाघाटी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर वाढतील. दोन्ही देशांत व्यापार करारासाठी चर्चा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच संरक्षण करारामध्ये, क्षमता निर्माण, संयुक्त सागरी उपक्रम, अधिकाऱ्यांमधील प्रशिक्षण कार्यक्रमांची देवाणघेवाण यांचा समावेश असेल. त्याचबरोबर भारतानेही फिलिपिन्सला आपल्या हिंद महासागर क्षेत्रासाठीच्या संचयन केंद्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
२००६ मध्ये भारत फिलिपिन्स संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी झाली. २०२२ मध्ये ३७५ दशलक्ष डॉलर्सच्या कराराअंतर्गत भारताने २०२४ मध्ये ब्रम्होस क्षेपणास्त्रप्रणालीची पहिली तुकडी फिलिपिन्सला दिली. त्यामुळे भारताकडून क्षेपणास्त्र प्रणाली मिळवणारा फिलिपिन्स पहिला देश ठरला. संयुक्त संरक्षण सहकार्य समिती (जेडीसीसी) आणि सेवा-ते-सेवा कर्मचारी चर्चा वाढवून भारत फिलिपिन्स संबंध बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच २०२३-२४ मध्ये दोन्ही देशांतर्गत द्विपक्षीय व्यापार सातत्याने वाढून साडेतीन अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहचला. २०२३ मध्ये प्राधान्यक्रम व्यापार करारावरील (पीटीए) वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर फिलिपिन्समध्ये भारतीय लोकांची संख्या सुमारे ७० हजारांच्या जवळ असून पूर्व आशिया शिखर परिषद (इएएस) यांसारख्या प्रादेशिक मंचाचा स्थानिक भारतीय समुदाय सदस्य आहे. प्रादेशिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आर्थिक एकात्मतेला चालना देण्यासाठी या मंचामध्ये स्थानिक भारतीय समुदायाचे महत्व आहे. भारत आणि फिलिपिन्स हे दोन्ही देश, आसियान प्रादेशिक मंच (एआरएफ), पूर्व आशिया शिखर परिषद (इएएस), संवाद यंत्रणा व बीमस्टेक ( फिलिपिन्स निरीक्षक देश ) इ. संघटनांच्या माध्यमातून भारत आणि फिलिपिन्स हे दोन्ही देश बहुपक्षीय आणि प्रादेशिक सहकार्यासाठी प्रयत्नशिल आहेत.
संबंधांमधील आव्हाने
भारत आणि फिलिपिन्सचे राजनैतिक व सामरिक संबंध मजबूत असले तरीही आर्थिक वाढीबाबत दोन्ही अर्थव्यवस्थांच्या आकारमानाबाबत विचार करता द्विपक्षीय व्यापार अत्यंत सामान्य आहे. प्राधान्यक्रम व्यापार कराराची (पीटीए) प्रगती संथ असून वाटाघाटी अद्याप प्राथमिक टप्प्यातच आहेत. तसेच सागरी सुरक्षेबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार अस्तित्वात असले तरीही वास्तविक सागरी सहकार्य, संयुक्त गस्त मर्यादित आहेत. दक्षिण चीन समुद्रातील तणावामुळे विशेषत: बाह्य सहभागाबद्दल फिलिपिन्सच्या संवेदनशीलतेमुळे लष्करी सहकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच फिलिपिन्सचे चीनसोबतचे गुंतागुंतीचे संबंध आणि अमेरिकेच्या संरक्षण मदतीवरील त्यांचे अवलंबित्व यामुळे धोरणात्मक क्षेत्रात भारतासोबत उघडपणे जुळवून घेण्याची फिलिपिन्सची तयारी मर्यादित होते.
इंडो-पॅसिफिक प्रदेशातील भू-राजकिय गतिशिलता, विशेषत: सागरी सुरक्षेबद्दलच्या चिंता आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारत आणि फिलिपिन्स या दोन्ही राष्ट्रांना सखोल आणि धोरणात्मक संरक्षण सहकार्याचा शोध घेण्यास प्रवृत्त केले आहे. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील भारताची ताकद फिलिपिन्सच्या वाढत्या तंत्रज्ञान क्षेत्रासह माहिती तंत्रज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था आणि स्टार्ट अप्ससारख्या क्षेत्रात सहकार्याच्या संधी उपलब्ध करून देते. या क्षेत्रातील सतत प्रयत्नांमुळे एक मजबूत आणि बहुआयामी भागीदारी निर्माण होऊ शकते.
mahamuni.satyasai084@gmail.com