अश्विनी वैष्णव
सुरुवातीच्या काळात संगणक ही संपूर्ण खोली व्यापणारी महाकाय यंत्रे होती. ती त्यांच्या काळातील स्विचप्रमाणे काम करणाऱ्या हजारो व्हॅक्यूम ट्यूबवर चालत आणि जुन्या टेलिफोन एक्सचेंजसारखी दिसत. त्यापेक्षा कितीतरी जास्त कार्यशक्ती आजच्या काळात नखापेक्षाही लहान चिपमध्ये असते. अब्जावधी ट्रान्झिस्टरद्वारे चालणाऱ्या या चिप्स मोबाइल फोन, मोटारी, रेल्वेगाड्या, रेफ्रिजरेटर, टीव्ही, स्कूटी, फॅक्टरी मशीन, विमाने तसेच अंतराळात उपग्रहांना मार्गदर्शन करतात. त्या इतक्या लहान आहेत की त्या आता तुमच्या बोटावर एका स्मार्ट रिंगमध्ये बसतात आणि तुमच्या हृदयाच्या आरोग्याचा मागोवा घेतात. सेमीकंडक्टरची ही जादू आहे!
प्रगतीला चालना
राष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकासाला आकार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवावे लागते. या मूलभूत क्षेत्रांमध्ये पोलाद, वीज, दूरसंचार, रसायने, वाहतूक यांच्याप्रमाणेच सेमीकंडक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सेमीकंडक्टर उद्याोग हा पायाभूत उद्याोग आहे. ज्याप्रमाणे पोलाद कारखाने पूल आणि रेल्वे उभारणीचा आधार आहेत, तसे सेमीकंडक्टर डिजिटल अर्थव्यवस्थेचा आधार आहेत. या चिप्सशिवाय आधुनिक संप्रेषण, डेटा प्रोसेसिंग, एआय, अक्षय ऊर्जा प्रणाली आणि सुरक्षित संरक्षण असूच शकत नाही. जो देश सेमीकंडक्टरचे आरेखन व उत्पादन करू शकत नाही त्याला आरोग्यसेवेपासून सुरक्षेपर्यंतच्या सर्व मूलभूत गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याचा धोका पत्करावा लागतो. त्यामुळे सेमीकंडक्टरमध्ये मजबूत होणे हे एखाद्या उद्याोगापेक्षाही खूप महत्त्वाचे आहे. हे आपले स्वत:चे भविष्य घडवण्याशी संबंधित आहे.
धोरणात्मक आणि भूराजकीय गरज
कोविड-१९ महासाथीने सेमीकंडक्टर चिप्सचे महत्त्व स्पष्टपणे लक्षात आणून दिले. जागतिक चिपपुरवठा साखळी ढासळल्याने विविध उद्याोगांच्या उत्पादनावर परिणाम झाला. वाहन उद्याोग, नेटवर्किंग उपकरणे, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रांना याचा सर्वाधिक फटका बसला. सेमीकंडक्टर आता जागतिक भूराजनीतीच्या केंद्रस्थानी आहेत. सेमीकंडक्टर चिपनिर्मिती काही प्रदेशांमध्ये केंद्रित असल्याने किरकोळ व्यत्ययामुळेही जगभरात हादरे जाणवू शकतात. एका ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा दुसऱ्या ठिकाणी कारखान्यातील अपघातामुळे पुरवठा बंद होऊ शकतो. यामुळे उद्याोग मंदावू शकतात; अर्थव्यवस्था व सुरक्षिततेवर सर्वत्र परिणाम होऊ शकतो.
दुर्मीळ पृथ्वी चुंबकांवर अलीकडेच देण्यात आलेला भर हा महत्त्वाच्या संसाधनांवरील नियंत्रण जागतिक शक्तीला कसे आकार देऊ शकते, याची स्पष्ट जाणीव देणारा आहे. त्याचप्रमाणे, सेमीकंडक्टर हे डिजिटल युगाचे एक महत्त्वाचे संसाधन बनले आहे.
वाढती मागणी
भविष्यात सेमीकंडक्टर्सची मागणी वाढणार आहे. आपला स्वत:चा इलेक्ट्रॉनिक्सचा वापर आणि उत्पादन अभूतपूर्व वेगाने वाढत आहे. आज भारतात ६५ कोटींहून अधिक स्मार्टफोन वापरकर्ते आहेत आणि आपले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन प्रतिवर्षी १२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे. त्याच वेळी, भारत एआय-आधारित प्रणाली, डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर चिप्सची आवश्यकता असलेली इलेक्ट्रिक वाहनेदेखील विकसित करत आहे. मागणी आणि नवोन्मेष या दोन्हींमध्ये वाढ झाल्यामुळे भारताला जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत आपले स्थान सुरक्षित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
संधी
अनेक दशकांपासून भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रातील ‘बस चुकवली’ म्हणजेच संधी गमावली, असे सांगितले जात होते. ती तक्रार आता खरी राहिलेली नाही. ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’अंतर्गत १० सेमीकंडक्टर कारखान्यांना मंजुरी देण्यात आली असून या कारखान्यांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. आज आपण आत्मविश्वासाने म्हणू शकतो की यावर्षी पहिली ‘मेड इन इंडिया’ चिप बाहेर येईल. साणंदमध्ये एका युनिटमध्ये पथदर्शी उत्पादनरेषा सुरू झाली आहे व एका वर्षात आणखी चार युनिट्समध्ये उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.
अप्लाइड मटेरियल्स, लॅम रिसर्च, मर्क आणि लिंडे यासारखे जागतिक नेतृत्व हे कारखाने आणि पुरवठा साखळ्यांना पाठिंबा देण्यासाठी गुंतवणूक करत आहेत. सेमीकंडक्टरच्या दीर्घकालीन वाढीवर पंतप्रधानांचे लक्ष असण्यातून, परिसंस्थाकेंद्रित दृष्टिकोन दिसून येतो. आपल्या पंतप्रधानांचा सुस्पष्ट दृष्टिकोन, अंमलबजावणीवर लक्ष, व्यावसायिकांच्या हाती निर्णय घेण्याची क्षमता, जागतिक सहकार्य आणि राज्य सरकारांकडून भक्कम पाठिंबा – अशा घटकांमुळे इतक्या कमी कालावधीत हे उल्लेखनीय यश मिळाले आहे. भारताने ‘इतिहासाच्या बसथांब्यावर वाट पाहण्या’पासून ते आता भविष्याकडे प्रवास केला आहे. आमचे आरेखन आणि प्रतिभा समूह यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
भारताचे बलस्थान
भारताची खरी ताकद म्हणजेच त्याचे लोक! त्यांचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी धोरणे आणि गुंतवणूक या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जागतिक डिझाइन क्षेत्रातील २० टक्क्यांहून अधिक कामगार भारतीय आहेत. उद्याोगाशी निगडित एका अंदाजानुसार, पुढील दशकाच्या सुरुवातीला जगात दहा लाखांहून अधिक सेमीकंडक्टर व्यावसायिकांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. भारत ही पोकळी भरून काढण्यासाठी तयारी करत आहे. सरकारने मोफत पुरवलेल्या जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक डिझाइन ऑटोमेशन (ईडीए) साधनांचा वापर आज ३५० संस्था आणि स्टार्ट-अप्समधील ६०,००० हून अधिक वापरकर्ते करत आहेत. निव्वळ २०२५ मध्येच त्यांचा वापर १.२ कोटी तासांपेक्षा जास्त झाला आहे.
भारताच्या चिप डिझाइन परिसंस्थेत सरकारी पाठिंबा आणि स्टार्ट-अप्सची ऊर्जा या दोन्हीचे स्थान मोठे आहे. उदाहरणार्थ, – ‘माइंडग्रोव्ह टेक्नॉलॉजीज’ आयआयटी मद्रासच्या स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या ‘शक्ती’ या प्रोसेसरवर आधारित ‘आयओटी’ अर्थात इन्टरनेट ऑफ थिंग्ज चिप्स विकसित करत आहे. ‘नेत्रासेमी’ या आणखी एका स्टार्ट-अपने अलीकडेच विक्रमी १०७ कोटी रु. निधी मिळवला आहे. भारतातील सेमीकंडक्टर आरेखन क्षेत्रातील हा सर्वात मोठा साहस वित्तपुरवठा आहे, त्यातून या क्षेत्रावरील गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दिसून येतो. भारत सरकारच्या डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (डीएलआय) योजनेअंतर्गत अशा अनेक स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन दिले जात आहे.
वर्गखोलीपासून स्वच्छ खोलीपर्यंत
मोहाली येथील सेमीकंडक्टर लॅबोरेटरी (एससीएल)मध्ये, १७ संस्थांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आधीच २० चिप्स तयार केल्या आहेत. येत्या काही महिन्यांत अशा आणखी चिप्स तयार केल्या जातील. अशा प्रतिभा विकासामुळे भारत सेमीकंडक्टर उद्याोगात मजबूत स्थानावर पोहोचेल. तरुण नवोन्मेषकांची स्वप्ने लक्षात घेऊन ‘सेमीकंडक्टर लॅबोरेटरी लि.’ (एससीएल)चे आधुनिकीकरणही केले जात आहे, जेणेकरून भारताची प्रतिभा वर्गखोलीतून स्वच्छ खोलीत जाऊ शकेल.
या क्षेत्रातील जागतिक नेतेदेखील भारताच्या प्रतिभेमध्ये गुंतवणूक करत आहेत. ‘लॅम रिसर्च’ भारतात ६० हजार अभियंत्यांना प्रशिक्षण देणार आहे. अप्लाइड मटेरियल्स, एएमडी आणि मायक्रोचिप यांनी संशोधन, विकासासाठी १.१ अब्ज डॉलर देण्याचे कबूल केले आहे.
आयआयएससी, आयआयटी आणि इतरांशी भागीदारीमुळे लॅब-टू-फॅब असे मजबूत कार्यदल सुनिश्चित होत आहे. भारत अमेरिका, जपान, युरोपीय महासंघ आणि सिंगापूरमधील भागीदारांसह काम करत आहे. याचा अर्थ, भारत जगासाठीदेखील निर्मिती करत आहे.
डिजिटल इंडिया ते सेमिकॉन इंडिया
भारताचा सेमीकंडक्टर प्रवास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशाल दृष्टिकोनाचा एक भाग आहे. त्याची सुरुवात ‘डिजिटल इंडिया’पासून झाली – या ‘मिशन’ने डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि नागरिकांना सक्षम केले. इंडिया स्टॅक, यूपीआय, आधार आणि आमच्या टेलिकॉम नेटवर्क्सने प्रत्येक भारतीयाला त्यांच्या बोटांच्या टोकावर तंत्रज्ञानाची उपलब्धता दिली.
आम्ही आमची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्थादेखील समांतरपणे मजबूत केली आहे. आता आम्ही सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक घटक आणि उपकरणांसाठी उत्पादन परिसंस्था विकसित करत आहोत. ‘सेमिकॉन इंडिया शिखर परिषद-२०२५’ हा याच प्रवासाचा पुढील भाग! पंतप्रधान मंगळवारी (२ सप्टेंबर) या शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. गेल्या वर्षी सुमारे ४८ देशांतील १०० हून अधिक जागतिक उद्याोग नेते सहभागी झाले होते; त्यांची संख्या यंदा ५०० वर पोहोचली आहे. जग आपल्या दाराशी येत आहे कारण अनिश्चिततेशी झुंजणाऱ्या जगासाठी स्थिर भारत हीच एक आशा आहे. या परिषदेतली जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि मलेशियाची दालने अर्थपूर्ण सहकार्याला चालना देतील. आम्ही उद्याोग आणि तरुणांमध्ये बी-टु-बी चर्चा, सामंजस्य करार आणि भागीदारीही घडवून आणणार आहोत.
‘उत्पादक राष्ट्रा’चे ध्येय
आमचे ध्येय भारताला ‘उत्पादक राष्ट्र’ बनवणे आहे. आपल्या सेमीकंडक्टर कारखान्यांमधून होणारे उत्पादन दूरसंचार, वाहन उद्याोग, डेटा सेंटर्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्याोगिक इलेक्ट्रॉनिक्ससारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी सेवा उपलब्ध करून देईल. केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी.
पुढील दशकात आपला सेमीकंडक्टर उद्याोग परिपक्वता आणि आवाका गाठत असतानाच भारत संपूर्ण सेमीकंडक्टर मूल्य साखळीसाठी एक स्पर्धात्मक केंद्र म्हणून उदयास येण्यास सज्ज झाला आहे.
अश्विनी वैष्णव
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे तसेच माहिती प्रसारण मंत्री