नितीन सखदेव
जोसेफ मेंगेले अज्ञातवासात चारचौघांसारखाच राहाण्याचा प्रयत्न करत होता.. आणि ऑश्विट्झच्या छळछावणीतला डॉक्टर होईपर्यंत सामान्य आयुष्यच जगत होता..

जोसेफ मेंगेलेचे नाव हे नाझींनी ज्यूंवर केलेल्या अत्याचारांशी कायमचे जोडले गेले आहे.  ऑश्विट्झच्या  छळछावणीत काम करणारा तो एक डॉक्टर; पण मृत्यूचा दूत म्हणून त्याची दुष्कीर्ती पसरली कारण छळछावणीत येणाऱ्या ज्यूंपैकी विषारी वायूंच्या तोंडी कोण जाणार आणि वैद्यकीय प्रयोगात वा कष्टाच्या कामांसाठी कोणाची निवड होणार हे तो ठरवत असे. त्याने तेथे केलेले वैद्यकीय प्रयोग म्हणजे मानवी क्रौर्याची परिसीमाच होती. निरोगी लोकांचे हातपाय तोडणे, माणसांना टायफससारख्या जंतूंचा हेतुपुरस्सर संसर्ग करणे, जुळय़ांपैकी एकाचे रक्त दुसऱ्याला देणे किंवा जुळय़ांची शरीरे एकमेकांना शिवून सयामी जुळे निर्माण करणे असे विविध प्रकारचे वैद्यकीय प्रयोग तो करीत असे. युद्ध संपल्यानंतर त्याच्या मागावर असणाऱ्या लोकांना नेहमीच चकवा दिल्यामुळे, युद्धकैदी न होता त्याने युरोपमधून दक्षिण अमेरिकेला पलायनही केले. दक्षिण अमेरिकेतील त्याच्या वास्तव्याबाबत अनेक दंतकथा आहेत. सिमॉन विझेनथाल हे पलायन केलेल्या नाझींचा शोध घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. १९८२ मधील एका मुलाखतीत त्यांनी तो चिली, ब्राझील आणि अर्जेटिनामध्ये दिसल्याचे सांगितले होते.  तो ड्रग माफिया बनून बराच श्रीमंत झाला आहे; त्याच्या अवतीभवती अंगरक्षक आणि सुंदर मुलींचा तांडा असून तो चैनीत राहात आहे असाही दावा त्यांनी केला होता. ‘बॉइज फ्रॉम ब्राझील’ आणि ‘मॅरेथॉन मॅन’ हे लोकप्रिय सिनेमे त्याच्याच द. अमेरिकेतील तथाकथित आयुष्यावर बेतलेले आहेत. पण मेंगेलेने  दक्षिण अमेरिकेतील ३० वर्षे नेमकी कशी व्यतीत केली?

Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
dairy industry in maharashtra
अग्रलेख: दूध गेले, दही चालले..
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..

हेही वाचा >>>सदानंद दाते करत आहेत, अशा कठीण काळात काम करणे आम्हाला नसते जमले…

‘द डिसअ‍ॅपिअरन्स ऑफ जोसेफ मेंगेले’ ही फ्रेंच पत्रकार आणि निबंधकार ऑलीव्हिए  गेज यांची कादंबरीच; पण ती त्यांनी ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास करून लिहिली आहे. क्रूरकर्मा मेंगेलेच्या दक्षिण अमेरिकेतील वास्तव्याच्या पाऊलखुणा आणि त्याच्या मृत्यूपर्यंतच्या ३० वर्षांत कायद्याच्या कचाटय़ातून त्याने कसा पळ काढला याचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात आहे. २०१७ मध्ये हे पुस्तक फ्रेंच भाषेत प्रकाशित झाले आणि उत्कृष्ट फ्रेंच कादंबरीचे ‘प्री रोनेडु’ हे अतिप्रतिष्ठित पारितोषिक त्या वर्षी या कादंबरीला मिळाले. २०२२ मध्ये या कादंबरीचे प्रथमच इंग्रजीत भाषांतर झाले.

कादंबरीच्या अंगाने आणि शैलीत लेखक सत्य घटनांचेच वर्णन करतो पण नायकाच्या बरोबरीने इतर पात्रांचे  विचार आणि मनातील भावनाही व्यक्त करतो. ही शैली प्रथम ट्रूमन कपोतेने १९६५ मध्ये ‘इन कोल्ड ब्लड’ या कादंबरीत प्रथम वापरली; त्यामध्ये एका शेतकरी कुटुंबातील चौघांची हत्या कशी होते याचे तपशीलवार वर्णन असले तरी हत्याकांडातील दोघा मारेकऱ्यांच्या मनोव्यापाराचे विश्लेषण अधिक आहे. हीच पद्धत वापरून ऑलीव्हिए गेजने  बरीचशी गोष्ट मेंगेलेच्या दृष्टिकोनातून लिहिली आहे आणि त्यात त्याची मनोगते देखील आहेत. त्यात मेंगेले स्वत:च्या वागण्याचे समर्थन तर करतोच पण स्वत:च्या हातून झालेल्या क्रूर वागणुकीचा त्याला जराही पश्चात्ताप  झालेला दिसत नाही.

दुसरे महायुद्ध संपतानाच स्वत:च्या जन्मगावी, गुंजबर्गजवळील एका शेतात हेल्मट ग्रेगर या नावाने मेंगेले लपून राहिला. १९४९ मध्ये त्याच नावाने त्याने पासपोर्ट मिळवला. त्याने अर्जेटिनाला जायचे ठरविले. ‘जर्मनीत पुन्हा नाझींचे वर्चस्व प्रस्थापित होईपर्यंत’ तेथे राहण्याचा त्याचा विचार होता. अर्जेटिनात १९४५ मध्ये हुकूमशहा व्हान पेरॉनची फॅसिस्ट राजवट आली. त्याने नाझींना केवळ आश्रय दिला नाही तर त्यांचे स्वागतच केले. दुसऱ्या महायुद्धातील हुकूमशाही शक्तींचा पाडाव झाल्यावर पेरॉनला अर्जेटिनाला महासत्ता म्हणून प्रस्थापित करायचे होते. त्यामुळे त्याने नाझी शास्त्रज्ञ, उद्योजक आणि सावकार यांचे खुले स्वागत केले. मेंगेलेने अनुसरलेला हा पळून जायचा मार्ग हजारो नाझींनी वापरला. हा मार्ग ‘द रॅट लाइन’ या नावाने प्रसिद्ध होता. हा मार्ग म्हणजे व्हॅटिकन, स्वित्र्झलडमधील पदाधिकारी आणि जर्मन सरकारमध्ये काम करणारे भ्रष्ट नाझी अधिकारी यांची एक मोठी साखळीच होती. ही सगळी लाचखाऊ व्यवस्था उकी गोनी या अर्जेटिनातील इतिहासकाराने तपशीलवारपणे अभ्यासून ‘द रिअल ओडेसा’ हे पुस्तकही लिहिले आहे.

हेही वाचा >>>मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?

मेंगेले मूळचा सुखवस्तू  कुटुंबातला. अर्जेटिनातील अज्ञातवासातील पहिली काही वर्षे तो दक्षिण अमेरिकेत शेतीची यंत्रे विकू लागला; जी त्याच्या वडिलांच्या जर्मनीतील कंपनीत तयार केली जात असत. त्याने एक तरणतलाव व मोठी बाग असलेले टुमदार घर विकत घेतले. जर्मनीत कोणी त्याला शोधत त्याच्या मूळ गावी आले  तर जर्मन पोलीस त्याच्या कुटुंबाला ती खबर  आधीच देत असत. अर्जेटिनात, ब्यूनॉस आयर्समधील पश्चिम जर्मनीचा राजदूत एकेकाळचा नाझी होता. त्याने मेंगेलेला खऱ्या नावाचाही पासपोर्ट  बनवून दिला! १९५६ मध्ये त्याने स्वित्र्झलड मार्गे जर्मनीला भेटही दिली होती. तो तिथे वडिलांना भेटला, तिथे राहाणाऱ्या पत्नीला त्याने आपल्यासह येण्याचे सुचवले पण तिने ते नाकारले. ब्यूनॉस आयर्सला परतल्यावर त्याने स्वत:च्या मृत भावाच्या बायकोशी लग्न केले.

पण अर्जेटिनाच आर्थिकदृष्टय़ा डबघाईस  आल्यावर जनतेने हुकूमशहा पेरॉनच्या विरुद्ध बंड केले. १९५९ मध्ये पश्चिम जर्मनीने मेंगेलेच्या नावाने अटकेचा आदेश काढल्यावर मात्र सगळेच बदलून गेले. १९६० मध्ये मेंगेलेला आणखी एक धक्का बसला. इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादने अ‍ॅडॉल्फ आईखमन या उच्चपदस्थ नाझी अधिकाऱ्याचे अपहरण करून त्याला इस्रायलला नेले. मेंगेलेलाही पकडण्यात ते यशस्वी झालेच असते, पण तेवढय़ात मेंगेलेने पॅराग्वेला पलायन केले आणि तिथून ब्राझील गाठले. यानंतर मात्र केवळ जिवंत राहण्यासाठीच मेंगेलेची धडपड सुरू झाली. कुटुंबीयांनी त्याला आर्थिक मदत केली पण त्याच्या अटकेमुळे मेंगेले हे आपले व्यवसायातील नाव खराब होण्याची भीती त्यांनाही होतीच.

मेंगेलेने परत एकदा नाव बदलले. पीटर हॉखबिखलर या नावाने तो ब्राझीलला गेला. तिथल्या गेझा व गीटा स्टॅमर या हंगेरियन दाम्पत्याच्या शेतघरात त्याने आसरा घेतला. एक दिवस त्याचे सामान तपासताना गीटाला त्याचे खरे नाव समजले! मेंगेलेने त्यांना पटवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. सुरुवातीला  त्यांनी ते नाकारले पण नंतर तिथल्या नाझी समर्थकांच्या दबावामुळे त्यांना ते मानावे लागले. कालांतराने ते हंगेरियन जोडपे त्याचे गुपित राखण्यासाठी मेंगेलेकडून वारंवार पैसे उकळू लागले. मेंगेले पुढील १५ वर्षांत त्या शेताबाहेर  कधीही पडला नाही. तो अधिकाधिक घाबरून वेडय़ासारखा वागू लागला. डझनभर हिंस्र श्वानांच्या गराडय़ात तो स्वसंरक्षणासाठी राहू लागला. शेतात त्याने एक मोठा मनोरा बांधला व रोज रात्री तेथे जाऊन तो शेतावर लक्ष ठेवू लागला. या खुल्या आकाशाखालील बिन भिंतींच्या तुरुंगात माणसांपासून दूर अनेक वर्षे गेली. इथे गेजने मेंगेलेच्या अंतर्मनातील विचार आणि त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल लिहिले आहे. त्याच्या मनातील श्रेष्ठत्वाचा गंड आणि त्याची तीव्र लैंगिक भूक  याबद्दलही लिहिले आहे. अशी १३ वर्षे काढल्यावर त्याचे व गीटा स्टॅमरचे लैंगिक संबंध उघडकीस आले. यावरून मेंगेलेचे व त्याच्या हंगेरियन यजमानांचे जोरदार भांडण झाले. गेझा स्टॅमरने त्याला शेतावरून हाकलून लावले.

पकडले जाण्याच्या भीतीत सातत्याने इतकी वर्षे जगण्याचा परिणाम होणे स्वाभाविकच होते. वयाआधीच म्हातारपण आलेल्या मेंगेलेला आता साओ पावलो येथील झोपडपट्टीचा आसरा घ्यावा लागला. तेथील लोक त्याला पेद्रो म्हणून ओळखू लागले. त्याने तेथे  खूपच हलाखीत दिवस काढाले.  सगळे त्याला टाळत. अशा मोडकळत्या पार्श्वभूमीवर गेजने मेंगेलेची त्याच्या मुलाशी, रॉल्फबरोबर  झालेली भेट रंगवली आहे. इतके  होऊनही ऑश्विट्झच्या ‘प्रयोगां’बद्दल त्याला जराही पश्चात्ताप झाल्याचे दिसत नव्हते. त्याच्या भेसूर आयुष्याचा शेवट जवळ आल्याचे त्याच्या हळूहळू लक्षात येऊ लागले. वयाच्या ६७ व्या वर्षी- फेब्रुवारी १९७९ मध्ये समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी मेंगेलेचे त्याच्या खोटय़ा नावानेच दफन करण्यात आले. यानंतर पाच वर्षांनी ‘मेंगेलेच्या’ मृत्यूची बातमी वृत्तपत्रापर्यंत पोहोचली. त्याच्या मुलाने रॉल्फनेही मौन सोडायचे ठरवले आणि त्या वार्तेला दुजोरा दिला. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रकारांच्या साक्षीने त्याचा देह उकरून काढण्यात आला. तो देह मेंगेलेचाच असल्याची खात्री न्यायवैद्यकीय तज्ज्ञांनी करून घेतली.  पुन्हा १९९२ मध्ये डीएनए तपासणी करून त्या मतावर शिक्कामोर्तबही झाले.

मेंगेलेची कथा आपल्याला सध्या समजून घेण्याची काय गरज आहे? हॅना आरेंट या इतिहासकार व राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध होत्या. अ‍ॅडॉल्फ आईखमन या नाझी गुन्हेगारावर जेरुसलेमध्ये चाललेल्या खटल्याचे वृत्तांकन करताना त्यांनी  ‘बॅनालिटी ऑफ एव्हिल’ ही संकल्पना प्रथमच मांडली. इतिहासातील अनेक दुष्ट कृत्ये ही समाजविघातक वा धर्माधांकडून होण्याऐवजी सामान्य माणसाकडूनच झाली आहेत.  त्या कृत्यामागच्या क्रौर्याची जाणीव किंवा फिकीर नसताना झालेली ही कृत्ये त्यांच्या दृष्टीने सामान्य होती. ‘नेबर्स’ या पुस्तकामध्ये यान ग्रॉस यांनी पोलंडमधील जेडवाब्ने या गावाची गोष्ट सांगितली आहे.  जुलै १९४१ मध्ये एके दिवशी, या गावातील निम्म्या लोकांनी उरलेल्या १३०० लोकांची केवळ ते ज्यू होते म्हणून कत्तल केली! दुसऱ्या दिवसापासून काहीच वेगळे न झाल्यासारखे ते सगळे आपापल्या कामाला लागले.

ऑश्विट्झमधील ‘नोकरी’ वगळता मेंगेलेचे आयुष्यही सामान्यच. वैद्यकीय डॉक्टर झाल्यावर त्याने डॉक्टरेटची पदवी मिळवली. संशोधन करून वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक व्हायचे त्याचे स्वप्न होते. १९३७ पर्यंत नाझी पक्षाचा तो सभासदही नव्हता. त्या काळी नाझी डॉक्टर जुळय़ांच्या जन्माचे रहस्य शोधत होते (ज्यामुळे जर्मन आर्यवंशीयांची  लोकसंख्या वाढवायला मदत झाली असती), त्यांच्या तो संपर्कात आला आणि मग पूर्णपणे नाझींच्या प्रभावाखाली गेला. ऑश्विट्झमधील काळात जुळय़ांवर संशोधन करून स्वत:ची कारकीर्द पुढे नेण्याचा त्याचा प्रयत्न होता. या प्रयोगांचा त्याला पश्चात्ताप नव्हता कारण ‘ध्येयासाठी कुठलाही मार्ग वापरणे न्याय्यच’ अशी शिकवण त्याला देण्यात आली होती.

एखादा सामान्य माणूस जर धार्मिक किंवा राजकीय प्रभावाखाली आला असेल तर आपल्या विचारधारेसाठी तो कोणतेही अघोरी कृत्य करू शकतो. मेंगेले याचे उत्तम उदाहरण ठरू शकते. दुष्ट माणसे दुष्ट म्हणून कधीच जन्माला येत नाहीत. अतिरेकी विचारप्रणालीला राजाश्रय व धर्माश्रय मिळाला तर अनुकूल परिस्थितीत कोणाकडूनही  अशा प्रकारची दुष्कृत्ये घडू  शकतात. आजूबाजूला आपण पाहिले तर वाईट कृत्ये कित्येकदा सामान्य माणसांकडूनच केली जातात. आपण जागरूक व दक्ष राहिलो नाही, तर असा इतिहास परत परत लिहायची वेळ येऊ शकते!

द डिसअ‍ॅपिअरन्स ऑफ जोसेफ मेंगेल,

लेखक : ऑलीव्हिए  गेज,

प्रकाशक : व्हर्सो बुक्स,

पृष्ठे : २२४; किंमत : १४०० रु.

(किंडल वा ऑडिओबुक आवृत्त्या स्वस्त)