अजित कवटकर
उच्च स्तरावर वावरणारे लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते जेव्हा जमिनीवर म्हणजेच लोकांमध्ये अवतरतात, तेव्हा समजावे की बहुदा लवकरच निवडणुका जाहीर होणार आहेत. निवडणुका या लोकशाहीचा निर्णायक आवाज असतात आणि महाराष्ट्राच्या स्थानिक राजकीय स्तरावरील दाबून ठेवलेल्या याच आवाजाला आता जवळजवळ एका दशकानंतर व्यक्त होण्याची संधी प्राप्त होणार आहे. स्वत:च्या आवश्यकतेनुसार आणि सोयीप्रमाणे अचानक अनपेक्षितपणे काहीतरी गडबड करून सगळा कार्यक्रम बदलण्याची वा होत्याचे नव्हते करण्याची राजकीय नेत्यांची हातोटी पहाता, प्रत्यक्षात जेव्हा निवडणुका होतील तेव्हाच त्या आपण खऱ्या मानू. असे असतानादेखील आज, निवडणुका जवळ आल्याची लक्षणे सुस्पष्टपणे दिसू लागली आहेत.
त्यामुळे यंदाचा योग हा अडलेल्यांचा मार्ग मोकळा करणार अशी खात्री वाटते. मग आता निवडणुका होणारच आहेत तर त्या होणार असल्याची कोणती लक्षणे कशी दिसू लागतात, समोर येतात, याची थोडी जिज्ञासा बाळगल्यास ते त्याविषयीची निरीक्षणे वाचणे मजेशीर ठरते. बाजूने गेले तरी कधी न बघणारे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे राजकारणी जेव्हा तोंड फाटेपर्यंत स्मित हास्य करून आपले लक्ष त्यांच्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याहीपलीकडे जाऊन संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतात, तेव्हा समजावे यांची परीक्षा जवळ आली आहे. प्रजेला अचानक राजा म्हणजेच ‘मतदार राजा’ म्हणून संबोधले जाऊ लागते आणि वेळ मारून नेईपर्यंत नेते ‘सेवका’चा अवतार धारण करतात. लहान मोठ्या मागण्या उडवून लावणारे हात आता जोडलेले दिसू लागतात. आदेश, फर्मान, धमक्या यांच्या जागी आता यांच्या मुखातून संतांची सुवचने, ओव्या, अभंग ऐकायला मिळतात. कधीही झोळी उचलून वनवासाला निघून जातील, या आविर्भावात आता ते दारोदारी फिरताना, चौकाचौकात- नाकानाक्यांवर उभे दिसतात. आपली अलिशान चारचाकी सोडून आता ते वरचेवर ११ नंबरच्या वाहनाने (पायी) फिरताना दिसतात. कायम मिरवले जाणारे यांच्या अंगावरील ‘पच्चास तोला’ दागिने गायब होतात; कपडे साधे व फिके होतात. पाच वर्षांत कधी न दिसलेल्या समस्या आता अचानक दाखवणारी दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त होते व त्याविरुद्ध गळा फाडून बोलण्यासाठीचा यांना अचानक कंठ फुटतो.
समाजमाध्यमांवरच्या प्रत्येक प्रभावी मंचावर त्यांचा प्रमोशनल भडीमार सुरू होतो. घेणारे हात आता या अल्पकालावधीसाठी का होईना पण देणारे होतात. आता यांना सर्वांचे वाढदिवस, वर्धापनदिन वगैरे विशेष दिवसांचे स्मरण होते आणि हे सारे काही सार्वजनिकरित्या साजरे करण्याचा त्यांचा अट्टहास सुरू होतो. कोणताही कार्यक्रम ‘स्पॉन्सर’ होण्यास ते तयारच असतात. आता मतदारसंघात होणाऱ्या प्रत्येक बारश्यापासून ते अंत्ययात्रेत त्यांची उपस्थिती दिसते. जुन्याजाणत्या पण पूर्णपणे बाजूला पडलेल्या ज्येष्ठ – वरिष्ठांना आता आमंत्रणे येऊ लागतात आणि त्यांच्या आशीर्वादांची व मार्गदर्शनाची यांना अचानक गरज निर्माण होते.
भष्टाचाराच्या प्रकरणांचा अचानक पाऊस पडू लागतो. रोज नवनवीन भानगडी परस्परविरोधी आरोपांतून बाहेर पडतात. पक्षापक्षांत चिखलफेकीचा खेळ सुरू होतो. विरोधी पक्षाला वा त्यातील विरोधकांनाच नव्हे तर पक्षांतर्गत विरोधकांचा आणि प्रतिस्पर्ध्यांचाही काटा काढण्याचे षडयंत्र आकार घेऊ लागते. त्यातूनच पक्षांतराला प्रोत्साहन मिळते व त्याचे अनेक समारोह याकाळात साजरे होतात. समाजात ज्यांच्या शब्दाला वजन आहे, मान आहे, अशांना आपल्याकडे खेचण्यासाठी साम- दाम- दंड- भेद नीती वापरली जाऊ लागते. कधीच न फिरकणारे, आता मत मागण्यसाठी चार – पाच वेळा दारावर येण्याचा विक्रम करतात. बाबा- बुवा, ज्योतिषांची मागणी वाढते. रेडे- बकरे- कोंबडे कापण्याच्या विधींमध्ये अचानक वृद्धी होते. फायनान्सर्सची फौज उभी करून आपली ‘मनी पाॅवर’ मजबूत करण्यासाठी मग राजकीय आश्रयाखाली उद्योगधंदे करणाऱ्या धनिकांना फोन जाऊ लागतात. सिनेकलाकार, प्रसिद्ध खेळाडू वगैरेंसारख्या सेलिब्रिटींच्या वेळा बुक करून ठेवल्या जातात.
निवडणुकीचा प्रत्येक कार्यक्रम संस्मरणीय, परिणामकारक, चर्चेचा विषय ठरण्यासाठी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांना कामे दिली जातात. ‘पेड न्यूज’साठी चढाओढ सुरू होते. लोकांना खुश करण्यासाठी भुलथापांच्या पुड्या सोडल्या जातात. अचानक जन्माला आलेल्या नवनवीन योजना, प्रकल्प, संधींवर चर्चा करण्यासाठी नागरिकांच्या सभा आयोजित होऊ लागतात. रवी एकसंघ असलेला समाज आता पक्षीय कल वा राजकीय प्राधान्यावर विभागलेला दिसतो. जात, धर्म, अस्मिता वगैरेंना नवीन झळाळी मिळते. इतिहासाची उजळणी सुरू होते. धर्म- जात- भाषा यांची समिकरणे मांडून कोणाला कोणाशी भिडवायचे याचे कट शिजू लागतात. पाण्याला आग लागावी अशी भाषणे कानी पडू लागतात. नॅरेटिव्ह सेट करणाऱ्या इमोशनल ड्राम्यांचे रिल किड्यांसारखे व्हायरल होऊ लागतात. व्होट- बँक पॉलिटिक्समुळे एखाद्या समाज घटकावर अचानक माहेरबानीची खैरात सुरू होते. लोकशाहीचा पाठ पढवला जातो आणि तुमचे एक मत किती अमूल्य आहे याची तुम्हाला शंभरदा आठवण करून दिली जाते. ‘रात्रीचे खेळ’ सुरू होतात आणि सांताक्लॉजने यावे आणि भेट देऊन जावे याप्रमाणे पक्षाचे कार्यकर्ते अचानक रात्री घरी येऊन पाकीट किंवा पॅकेट देऊन जातात. निवडणुकीची पूर्वसंध्या ही उत्सव व उत्सवाचे परमोच्च शिखर गाठते. पाहिजे ते खा- आवडेल ते प्या, फक्त उद्या मत आम्हालाच द्या. घरून मतदानकेंद्रांवर नेण्यासाठी गाड्या सज्ज होतात आणि तेवढेही चालणे शक्य नसेल तर मतदाराला डोक्यावर घ्यायलाही कार्यकर्ते तयार असतात.
उमेदवारांकडून निवडणुकीमध्ये होणाऱ्या अनधिकृत छुप्या खर्चाचा हिशोब केला तर, एरवी विकसनशील समजला जाणारा भारत हा सर्वांत विकसीत असा जगाचा पोशिंदा वाटू लागतो. निवडणुकांवेळी होणारी सेवा, दानधर्म, परोपकार तर देवालाही लाजवेल असे असतात. निवडणूक प्रचारातील नेत्यांची सर्वसमावेशकता दर्शवणारी भाषणे ऐकली तर वाटेल या देशात जात- धर्म- भाषा- पंथ वगैरे भेद औषधालाही सापडणार नाहीत. राजकीय पक्षांच्या वचननाम्यातील उदारता तर असा भास निर्माण करते की इथे माणसाने फक्त जन्म घेण्याचे कष्ट घ्यावेत, बाकी पुढच्या जगण्याची सगळी व्यवस्था हेच बघणार.
स्वर्गाहून सुंदर अशी ही स्वप्नवत परिस्थिती तुम्ही तुमचे मत टाकताच त्या ईव्हीएमवर वाजणाऱ्या ‘बीप’च्या आवाजाबरोबरच बदलते. गालावर थापड मारून कोणीतरी रम्य स्वप्नातून उठवत आहे, असे वाटते. ‘आता तुम्हाला मूर्ख बनविण्यासाठी पाच वर्षांनंतर भेटू. विवेकबुद्धि गहाण ठेवून आपण या नाटकात सामील झालात, फसलात त्याबद्दल धन्यवाद,’ असे कोणीतरी म्हणत असल्याचे जाणवते. हा पश्चात्तापाचा भाव आता सवयीप्रमाणे प्रत्येक निवडणुकीनंतर आपसूकच आणि नैसर्गिकपणे इथल्या प्रत्येक मतदाराच्या मनात उत्पन्न होतोच होतो. तेव्हा, निवडणुकीनंतर जर डोक्याला हात लावण्याची वेळ येणारच असेल तर निदान निवडणुकीआधी तरी ती जवळ आल्याची मजेशीर लक्षणे आणि त्यांतील राजकीय नौटंकीची गंमत अनुभवण्यापासून स्वत:ला का वंचित ठेववे?
ajit.kavatkar@gmail.com
