हिटलरवर, त्याच्या राजवटीवर त्या काळातही विनोद करण्यात येत, जाहीररीत्या सांगण्यात येत. हिटलरच्या राजवटीनेही हे शेवटपर्यंत चालवून घेतले. त्यांच्यासाठी तो उदारमतवादी मुखवटा होता. पण खरा चेहरा निराळाच होता, तो विनोदांत दडलेल्या विषण्णतेतून दिसायचा..

रवींद्र कुलकर्णी

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

राजकारण आणि राजकारण्यांवरचे विनोद ही बहुतेकांना आवडणारी गोष्ट आहे. या कारणामुळे नुकतेच प्रसिद्ध झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे ट्रम्प महोदय. २०१७ सालात दूरचित्रवाणीच्या रात्रीच्या कार्यक्रमात त्यांच्यावर तीन हजार १०० विनोद सांगितले गेले. हे लोकशाहीतच घडते असे नाही, तर हुकूमशाहीतदेखील घडते. जनरल झिया जेव्हा केस कापायला जात तेव्हा तो दरवेळी, निवडणुका कधी घेणार असे विचारायचा. झिया काहीतरी वेळ मारून नेणारे उत्तर देत. पण एकदा त्यांनी रागावून नेहमी हा प्रश्न करण्यामागचे कारण विचारले. त्यावर केशकर्तनकार म्हणाला, ‘हा प्रश्न विचारला की तुमचे केस उभे राहतात. मग ते कापणे मला सोपे जाते.’ अशा विनोदात दर्जापेक्षा नेत्याचे व त्याच्या कारभाराचे वैशिष्टय़ दिसते की नाही, याला मह्त्त्व असते. विनोदांना राजकारणी कशी प्रतिक्रिया देतात हेही लक्षणीय असते. हुकूमशाहांचा मुकुटमणी म्हणजे हिटलर. त्याच्या राजवटीत लोक कोणते विनोद जाहीरपणे व खासगीत सांगत असत, त्याचा काय परिणाम होत असे हे सारे रुडॉल्फ हरझोग याच्या ‘डेड फनी : टेलिंग जोक्स इन हिटलर्स जर्मनी’ या पुस्तकात वाचायला मिळते.

हिटलर १९३३ साली सत्तेवर आल्यापासून त्याच्यावर, त्याच्या मंत्र्यांवर आणि त्याच्या धोरणांवर जर्मन नागरिक एकमेकांना व करमणुकीच्या जाहीर कार्यक्रमांत,  ज्याला आता ‘स्टँडअप कॉमेडी’ म्हटले जाते अशा ठिकाणी विनोद सांगत. महत्त्वाचे म्हणजे, काही अपवाद वगळता हिटलरच्या राजवटीने हे शेवटपर्यंत मोठय़ा प्रमाणात चालवून घेतले. त्यामुळे हिटलरचा उदारमतवादी चेहरा जगासमोर येत असे आणि राजवटीचे खरे स्वरूप लपवणे सोपे जात असे. लेखकाने हे विनोद गोळा करताना त्या वेळी जे लोक जाहीरपणे विनोद सांगण्याबद्दल प्रसिद्ध होते त्यांच्या भेटीही घेतल्या. विनोद हा जर्मन जनता त्या काळात कसा विचार करत असे, हे समजण्याचा एक धागा आहे. त्यांच्यासाठी हा ताण हलका करण्याचा एक मार्ग होता.

नाझी राजवटीत घडलेल्या भयंकर कृत्यांची आम्हाला कल्पना नव्हती, असे सांगत जर्मन जनतेने नंतर स्वत:ला जबाबदारीतून मुक्त करून घेण्याचा प्रयत्न केला. पण ते खरे  नव्हते. ‘डाचू’ ही बर्लिनजवळ स्थापन केलेली पहिली छळछावणी! जे लोक त्रासदायक होते त्यांना वेगवेगळय़ा मुदतीसाठी शिक्षा म्हणून तिथे पाठवण्यात आले होते. त्यावर एक विनोद प्रचलित होता-

‘हाय जॉर्ज, कसा आहेस? मला वाटले अजून तू कॅम्पमध्ये आहेस.’

‘होतो मी तिथे. आता आलो बाहेर.’

‘तिथला मुक्काम कसा होता?’

‘फारच मजा आली तिथे. आम्ही सकाळी उठायचो. आम्हाला गरम गरम कॉफी मिळे. नंतर दणदणीत नष्टा व्हायचा. जेवणात मटण व जे पाहिजे ते मिळायचे. मग आम्ही खेळ खेळायचो. रात्री चित्रपट दाखवायचे.’

‘अरे, परवा मला मिलर भेटला. त्याने वेगळेच काही सांगितले.’

‘म्हणूनच त्याला तिथे परत पाठवले आहे.’

नाझी पार्टीच्या कामाच्या पद्धतीविषयी लोकांना पहिल्यापासून विश्वास नव्हता. एकदा नाझी पार्टीच्या सभेच्या ठिकाणी स्फोट झाला हिटलर लवकर निघून गेल्याने वाचला. लोकांना हा स्टंट वाटला. लोकांची प्रतिक्रिया, ‘हिटलरच्या हत्येचा प्रयत्न. १० ठार, ५० जखमी व ६ कोटी लोक मूर्ख बनले.’ अशी होती. नाझी राजवट सत्तेवर आल्यावर हिटलरचे छायाचित्र सगळय़ा सरकारी भवनांत लागले पाहिजे, असा फतवा निघाला. वर्नर फिंक हा लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन होता. तो स्टेजवर फोटोची मोठी फ्रेम घेऊन येताना, त्याची फक्त पाठ प्रेक्षकांना दिसत असे. छायाचित्र कोणाचे आहे हे दिसत नसले तरी ते हिटलरचे आहे याची कल्पना लोकांना असे. ते घेऊन येताना फिंक धडपडे व ती फोटो फ्रेम हातातून पडायाला येई. तो ती सावरताना मोठय़ाने बोले, ‘पडू नको, पडू नको!’ आणि श्रोत्यांमध्ये हास्याचा स्फोट होई. त्याला एका स्त्रीने विचारले वाजले किती? तर तो म्हणाला, ‘त्याबद्दल मला बोलायला परवानगी नाही.’  फिंकच्या मते नाझी राजवटीत लोक टोकाचे संवेदनशील झाले होते. लहानशा घंटेच्या हलक्याशा आवाजाला ते जोरदार प्रतिसाद देत आणि मोठा आवाज त्यांना बधिर करून सोडे.

नाझी विचाराने सगळे कुटुंब भारलेले असे. त्यामुळे सामान्य कौटुंबिक जीवन जिकिरिचे  झाले होते. एक मुलगी म्हणाली, ‘माझे वडील एसएमध्ये (निमलष्करी दलात) आहेत, माझा लहान भाऊ एसएसमध्ये (तरुणांची पोलिसांना समांतर असलेली संघटना), माझी आई नाझी पार्टीच्या बायकांच्या संघटनेत आहे आणि मी स्वत: बीडीएममध्ये (तरुणींची संघटना) आहे. आम्ही सगळे वर्षांतून एकदा न्युरेनबर्गच्या शिबिरात भेटतो.’

नाझी पद्धतीने सल्यूट करण्याचे वेड खूप पसरले होते. एकदा हिटलर वेडय़ांच्या रुग्णालयात जातो. एकजण सोडून सगळे त्याला नाझी सल्यूट करतात. हिटलर त्या एकाला विचारतो, ‘तू मला सल्यूट का नाही केला?’ तो सांगतो, ‘मी वेडा नाही. मी येथे नोकरीला आहे.’ एकाने तर आपल्या चिपान्झींनादेखील तसा सल्यूट करणे शिकवले होते. ती माकडे पोस्टमनसकट गणवेशातल्या कुठल्याही व्यक्तीला पाहिल्यावर नाझी सल्यूट करत. हे अधिकाऱ्यांना कळले, तसे हे शिकवणाऱ्या माणसाला ताकीद देण्यात आली. हे बंद झाले नाही तर चिपान्झींना मारून टाकण्यात येईल, असे बजावण्यात आले.

अर्नेस्ट हन्स्टगल हा उद्योगपती हिटलरचा मित्र होता. त्याने हिटलरवर देशाबाहेर प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रांचे पुस्तक संपादित करून प्रसिद्ध केले. त्यातल्या प्रत्येक व्यंगचित्राखाली त्याची कॉमेंट होती. एका व्यंगचित्राखाली त्याने लिहिले, ‘पाहा जग म्हणत होते. नाझी पार्टीचे तुकडे होतील व हिटलर शेवटी एकटाच राहील. पण पार्टी फुटली नाही तरीही आज हिटलर एकटा आहे, हे खरे आहे, कारण बाकीचे पक्ष अंतर्धान पावले आहेत.’

युरोपमध्ये चाललेल्या गडबडीची कल्पना ज्या व्यक्तीला लवकर आली ती व्यक्ती म्हणजे चार्ली चॅप्लिन. जर्मन पत्रकारांचा त्याच्यावर राग होता. गोबेल्स त्याला, ज्युईश टम्ब्लर म्हणे. त्याने स्वत:चे ५० लाख डॉलर गुंतवून ‘ग्रेट डिक्टेटर’ बनवायला घेतला. तो १९३९ला पूर्ण होत होता. जर्मनीची विजयी घोडदौड पाहून चित्रपटाच्या भवितव्याविषयी त्याला शंका निर्माण झाली. पण इंग्लंड हिटलरविरुद्ध उभे राहिले आणि ‘ग्रेट डिक्टेटर’ धो धो चालला. हा काही चॅप्लिनचा सर्वश्रेष्ठ चित्रपट नाही, तो प्रचारकी आहे, असे समीक्षकांचे म्हणणे आहे. पण हे युद्ध होते. त्याच्यावरच्या हल्ल्याची चॅप्लिनने सव्याज परतफेड केली, असे म्हटले पाहिजे.

इंग्लंड व जर्मनी या दोघांनीही रेडिओ हे साधन भरपूर वापरले. बीबीसीवरून हिटलरची टर उडविणारे कार्यक्रम जर्मन भाषेतून प्रक्षेपित होत. शिक्षेची भीती असतानादेखील जर्मन नागरिक ते ऐकत. त्यात मार्टिन म्युलर हिटलरच्या भाषणांची नक्कल करे. ती एवढी खरी वाटे की अमेरिकन सीआयएनेदेखील त्याबद्दल विचारणा केली. दोन्हीकडचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना बीबीसी हे खात्रीशीर बातम्यांचे साधन होते. जर्मन जनता गोबेल्सच्या भाषणांना ‘लंगडय़ा माणसाच्या परिकथा’ म्हणे.

विनोदाविरुद्ध कडक कायदे..

जर्मनीची पीछेहाट सुरू झाली, तसे हे विनोद नागरिकांची उमेद खच्ची करतील अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटू लागली. त्याविरुद्धच्या कायद्यांची कडक अंमलबजावणी सुरू झाली. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, १९४४ मध्ये २०७९ जणांना या कारणासाठी मृत्यूला सामोरे जावे लागले. सरकारच्या मते नट रोबर्ट डोर्सेचे विनोद मनोधैर्य खच्ची करणारे होते. त्याला अनेकदा मैत्रीपूर्ण भाषेत ताकीद देण्यात आली. तरी त्याने मर्यादा ओलांडणारे विनोद जाहीररीत्या सांगणे सोडले नाही. ‘एकदा हिटलरची मिरवणूक सुरू असते. त्याच्या स्वागतासाठी तरुण मुली रस्त्यात पुष्पगुच्छ घेऊन उभ्या असतात. एका मुलीच्या हातात मात्र गवत असते. ते हिटलरला देताच, तो विचारतो, ‘याचे मी काय करू?’ ती तरुणी म्हणते, ‘हे तुम्ही खाल्ल्यावर जर्मनीला चांगले दिवस येतील, असे म्हणतात.’ गवत खाणे म्हणजे हार मान्य करणे या जर्मन वाक्प्रचाराभोवती त्याने हा विनोद रचला होता. रोबर्ट डोर्सेला काम मिळणे हळूहळू बंद झाले. शेवटी त्याचे डोके हिटलरने गिलोटिनखाली उडवले व त्याचे बिल कुटुंबीयांना पाठवले. विनोद सांगणे ही तारेवरची कसरत होती. वर्नर फिंकसारख्यांना ती बरोबर जमली.

छळछावण्यांमधील ज्यूदेखील विनोद करत. त्यांच्याकडे दुसरे हत्यार नव्हते. ते विनोद करुण आहेत. दोन ज्यूंना गोळय़ा घालून मारण्यासाठी तयार केलेले असते. आयत्या वेळी त्यांना गोळय़ा घालून मारण्याऐवजी फाशी देण्याचे ठरते, तसे एक ज्यू दुसऱ्याला म्हणतो, ‘मी सांगत होतो, त्यांच्याकडच्या गोळय़ा संपत आल्या आहेत.’  ज्यू कलाकारांवर संक्रांत लगेच ओढवली. कर्ट गेरोन व फ्रित्झ गृनबाउमसारखे ज्यू कलाकार हे चांगले नट होते. तर विली रोझेन संगीतकार होता. त्यांना काम मिळणे बंद झाले. नंतर ते छळछावण्यांत मेले. गृनबाउम हा विनोदी नट होता. वेगवेगळय़ा छळछावण्यांमध्ये त्याला पाठविण्यात आले. तो त्या ठिकाणी पोहोचण्याआधी त्याची कीर्ती पोहोचलेली असे. विनोदी कार्यक्रम केले नाहीत तर त्याला मारहाण होत असे. शेवटी डाचू छावणीत विनोदी कार्यक्रम सादर करताना तो स्टेजवर दमून पडला व त्याचा मृत्यू झाला. कर्ट गेरोनची हृदयद्रावक कहाणी लेखकाने दिली आहे. तो जर्मनीतला मोठा नट व दिग्दर्शक होता. त्याने मार्लिन डिट्रिचबरोबर काम केले होते.

हिटलरने आत्महत्या केल्यानंतर मात्र जर्मन नागरिकांनी त्याच्यावर विनोद केले नाहीत. त्यांना बसलेला धक्का प्रामाणिक होता. या व्यक्तीवर त्यांनी विनोद केले होते, पण त्याच्यासाठी ते शेवटपर्यंत लढलेही होते. या पुस्तकातले विनोद वाचताना हसायला येते पण त्यांच्यावर विषण्णतेची छाया पडलेली आहे. निरंकुश सत्तेपुढे असल्या विनोदांची ताकद चिमुकली होती, म्हणून त्या वेळच्या सत्ताधीशांनी ते मोठय़ा प्रमाणात चालवून घेतले. ट्रम्प म्हणजे काही हिटलर नाहीत पण त्यांनी वात आणला होता. त्यांच्यावर लिहिताना ‘शिकागो सन टाइम्स’च्या क्रिएटिव्ह टीमच्या प्रमुखाने म्हटले. ‘विनोद कितीही गंभीर व भयंकर गोष्ट हाताळू शकतो. पण ट्रम्प यांच्यावर विनोद करणे, म्हणजे त्यांची ताकद वाढवणे होय.’ हिटलरच्या राजवटीला हे पहिल्यापासून माहीत असावे.