संतोष प्रधान

काँग्रेसमध्ये फारसे भविष्य नसलेल्या नेतेमंडळींना सत्तेतील भाजपचे वेध लागले आहेत. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला तेव्हाच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची घोषणा केली. गुलाम नबी आझाद हे लवकरच जम्मू आणि काश्मीरमध्ये स्वतंत्र पक्षाची स्थापना करणार आहेत. त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. आझाद यांना राज्यसभेत निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले होते. आझाद हेसुद्धा भाजपला अनुकूल अशीच भूमिका घेण्याची चिन्हे आहेत. राज्यात नारायण राणे यांनी अशाच पद्धतीने स्वतंत्र पक्ष स्थापन करून तो पक्ष नंतर भाजपमध्ये विलीन केला होता.

narendra modi sonia gandhi pti
“मैदान सोडून पळून जाणारे आता…”, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला
Buldhana Lok Sabha constituency, independent candidate, won, history of buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, buldhana news,
बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची यादी अलीकडे लांबत चालली आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत कॅप्टन अमरिंदरसिंग, कपिल सिब्बल, सुश्मिता देव, जितेंद्र प्रसाद, सुनील जाखड, आरपीएन सिंह, माजी मंत्री अश्वनी कुमार, हार्दिक पटेल, कुलदीप बिष्णोई या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षांमध्ये प्रवेश केला. कपिल सिब्बल व सुश्मिता देव वगळता अन्य सर्वांनी भाजपचाच मार्ग पत्करला.

काही नेतेमंडळींना सत्तेविना राहवत नाही. काँग्रेसला चांगले दिवस येतील, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. अशा वेळी नाराज किंवा काँग्रेसमध्ये राहून फारसे भविष्य नसलेल्या नेत्यांनी भाजपचा आधार घेतला. भाजपलाही आपला जनाधार वाढवायचा असल्याने अन्य पक्षांतील नेत्यांचे स्वागतच झाले.

राहुल गांधी यांच्यावर शरसंधान करत गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. राजीनामापत्रात त्यांनी पक्षाच्या सद्य:स्थितीचे सारे खापर राहुल गांधी यांच्यावर फोडले. नवज्योतसिंग सिद्धू यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविले होते. मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्याने अमरिंदरसिंग यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाबमध्ये भाजपला शीख समाजातील चेहरा हवाच होता. कारण आतापर्यंत पंजाबमध्ये भाजपने हिंदू मतदार डोळ्यांसमोर ठेवून राजकारण केले होते. अकाली दलाबरोबर असलेल्या युतीत अकालींमुळे शीख समाजाची तर भाजपमुळे हिंदू समाजाची अशा पद्धतीने शीख व हिंदू मतांच्या आधारे अकाली दल-भाजपला १० वर्षे सत्ता उपभोगता आली. पण कृषी कायद्यावरून अकाली दलाने भाजपशी असलेली युती तोडली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकाली दल आणि भाजप स्वतंत्रपणे लढले. स्वबळावर लढताना भाजपचे केवळ दोनच आमदार निवडून आले. पंजाबमध्ये अकाली दल कमकुवत झाला आहे. माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल हेच पराभूत झाले. पंजाबमध्ये अकाली दलाला फारसे भविष्य दिसत नाही. अशा वेळी पंजाबमध्ये स्वबळावर उभे राहण्याची भाजपची योजना आहे. भाजपला चेहरा हवा होता. दिल्लीत भाजपचा आम आदमी पार्टीशी संघर्ष सुरू आहे. पंजाबमध्येही सत्ताधारी आम आदमी पार्टीशी दोन हात करण्याची भाजपची योजना आहे. या दृष्टीने अमरिंदरसिंग यांना भाजपने जवळ केले आहे.

भाजपच्या या राजकीय खेळीकरिता ८० वर्षीय अमरिंदरसिंग कितपत उपयुक्त ठरतील याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जाते. अमरिंदरसिंग यांचा जनमानसाशी तेवढा संपर्क राहिलेला नाही. विधानसभा निवडणुकीत पंजाब लोक काँग्रेस या अमरिंदरिसंग यांच्या पक्षाचा पार धुव्वा उडाला आणि ते स्वत:च पतियाळा या त्यांच्या बालेकिल्ल्यात २० हजार मतांनी पराभूत झाले होते. आम आदमी पार्टी आणि मुख्यमंत्री भगतसिंह मान यांना राजकीयदृष्ट्या त्रास देण्याकरिता भाजप अमरिंदरसिंग यांचा वापर करून घेईल. भाजपची ताकद आणि अमरिंदरसिंग यांचे नेतृत्व यातून भाजप अधिक आक्रमक भूमिका घेऊ शकतो.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर कपिल सिब्बल यांनी समाजवादी पार्टीचा आधार घेतला. समाजवादी पार्टीच्या मदतीने ते राज्यसभेवर पुन्हा निवड़ून गेले. गुलाम नबी आझाद हे लवकरच नवीन पक्षाची स्थापना करणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता हस्तगत करण्याची भाजपची योजना आहे. यासाठी गुलाम नबी आझाद यांचा वापर करून घेतला जाईल, अशी चिन्हे आहेत. नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहमुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाच्या मतांमध्ये फूट पाडण्याकरिता आझाद यांचा वापर करून घेतला जाईल. काश्मीर खोऱ्यात मत विभागणीचा भाजपचा प्रयत्न असेल. कारण जम्मूतील वाढलेल्या जागांच्या आधारे आमदारांचे संख्याबळ वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. खोऱ्यात गुलामनबी यांचा पक्ष यशस्वी झाल्यास ते भाजपला फायदेशीर ठरू शकते. यामुळेच भाजपला गुलाम नबी आझाद, अमरिंदरसिंग यांच्यासारखे बंडखोर काँग्रेस नेते उपयुक्त ठरू शकतात.

राज्यात कोकणात शिवसेनेला शह देण्याकरिता भाजपने नारायण राणे यांचा वापर करून घेतला. अर्थात शिवसेना एकसंध असताना राणे यांचा प्रयत्न तेवढा यशस्वी झाला नव्हता. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर कोकणात शिवसेनेचे किती नुकसान होते हे बघणे महत्त्वाचे असेल. काँग्रेससह विविध पक्षांतील बंडखोर आणि फुटीर नेत्यांचा उपयोग स्वत:च्या फायद्यासाठी करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

santosh.pradhan@expressindia.com