डॉ. अजित कानिटकर

नुकत्याच झालेल्या एका विवाहपूर्व समारंभात केले गेलेले संपत्तीचे, ताकदीचे प्रदर्शन फक्त संबंधितांचेच नाही तर आपल्या सगळय़ा समाजाचेच प्रतिनिधित्व करणारे होते. ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ हा आपल्या वाडवडिलांनी दिलेला कानमंत्र बाजूला ठेवून आपण केव्हाच ‘प्रत्येक क्षण आणि मिळेल ती गोष्ट  ओरबाडून घ्या,’ ही वाट धरली आहे.

baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!
loksatta editorial income tax issue notice to congress
अग्रलेख: धनराशी जाता मूढापाशी..
I will continue to question the system through my songs Neha Rathod
मी माझ्या गाण्यांतून व्यवस्थेला प्रश्न विचारत राहणार – नेहा राठोड
lokmanas
लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..

खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी लहानपणी पुण्याहून मामाच्या गावाला, म्हणजे मुंबईला सुट्टीमध्ये जाताना मुंबईची समृद्धी म्हणजे अचंबा वाटायचा. नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची इमारत, त्या काळातील एकमेव सरकता जिना, आलिशान हॉटेलसमोर गाडय़ांमधून उतरणारे परदेशी प्रवासी व या सर्व नेत्रसुखाचा शेवट म्हणजे समुद्रकिनारी खारे दाणे आणि एखाद्या वेळेस चौपाटीवरील भेळपुरी. आम्हा सर्व लहान-थोरांची चैनीची अशी माफक मध्यमवर्गीय कल्पना होती! वर्षांतून एकदाच येणारी ही सुट्टी म्हणजे एकमेव विरंगुळा. पुण्याहून मुंबईला रेल्वेने प्रवास करणे हीसुद्धा चैनच. मामाचे सुरुवातीपासून निवृत्तीपर्यंत एकच एक कार्यालय. ते म्हणजे ‘जीवन के साथ भी जीवन के बाद भी! पण तेही गजबजलेले कार्यालय भारी वाटायचे. मुंबईच्या या प्रवासात लक्षात राहणारी, लक्षात राहिलेली आणखी एक गोष्ट म्हणजे आमचा मामा सेकंड क्लासच्या कुर्ला लोकलमधील धोतर व झब्बा घातलेल्या एका व्यक्तीची लांबून ओळख करून द्यायचा. ‘‘ अरे त्याचे ऑपेरा हौस येथे सोन्या-चांदीचे मोठे दुकान आहे व शेअर बाजारातही त्याचा लाखो रुपयांचा व्यवसाय आहे. पण बघा किती साधा.. लोकलने जातो येतो! ‘‘ थोडक्यात पैसे मिळवले तरी ते खर्च करायचे नाहीत, दाखवणे तर दूरच राहिले हा तो काळ होता- १९७० ते १९८५ चा.

हेही वाचा >>>लडाखची पश्मिना संकटात का सापडली आहे? सरकार तिला वाचवेल का?

कालांतराने विशेषत: नव्वदीच्या दशकानंतर शिक्षित गटातील कुटुंबासाठी विद्या आणि लक्ष्मी यांचे नाते बदलले. ज्यांच्याकडे संगणकातील जी काही थोडी विद्या होती, त्याला लक्ष्मीने आपलेसे केले. रुपयांचे पगार डॉलरच्या पॅकेजमध्ये बदलले. ऑफशोअर-ऑनशोअर. आमचे अमेरिकेतील क्लाएंट असे नवे शब्द बोलण्यात येऊ लागले. वाय टू केच्या जागतिक संकटात भारतातील संगणक क्षेत्रातील अनेकांना हात धुऊन घेता आले. त्यामुळे ‘अंथरूण पाहून पाय पसरणे’ ही मध्यमवर्गीय मानसिकतेची गाडी ‘कमवा आणि साठवा’ या रुळावरून ‘कमवा आणि खर्च करा’ या स्टेशनकडे कधी वळली हे कळले नाही. गेल्या पंधरा वर्षांत सामाजिक माध्यमे एकापेक्षा एक गतीने लोकप्रिय झाल्यामुळे ‘कमवा आणि खर्च करा’ या दोन स्टेशनच्या नंतर सुपरफास्ट वेगाने ‘त्याची जाहिरात करत गावभर फिरा’ या नव्या स्टेशनची भर पडून घोडदौड करू लागली. त्याचेच एक अलीकडचे उदाहरण म्हणजे पश्चिम भारतात शाही थाटात साजरा झालेला एक लग्नपूर्व समारंभ. या कार्यक्रमाला बोलवणाऱ्या यजमानांनी या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांना संपत्तीचे जे विद्रूप प्रदर्शन केले हा या लेखाचा विषय. व होळीच्या निमित्ताने प्रकटनही! आणि एक प्रकारे बदलत्या भारताचेही एक प्रातिनिधिक चित्र जे मला अस्वस्थ करणारे वाटते.

अंथरूण पाहून पाय पसरावेत हा २००० पूर्वीचा मंत्र वेगाने बदलला. टाइम झोनच्या फरकात डॉलर रुपयाचा गुणाकार अनेक मध्यमवर्गीय घरात प्रचलित झाला. अर्थव्यवस्थेची भरभराट ही याच काळात. संपत्तीबद्दलच्या जुन्या कल्पनाही मागे पडल्या. प्रॉफिट इज नॉट अ डर्टी वर्ड हे खुद्द टाटा समूहाच्या प्रमुखांनी सार्वजनिक व्यासपीठावरून सांगितले. अनेकांना ते स्वत:च्या मनातीलच बोलत आहेत असे वाटले. ९७% च्या आयकराच्या दरावरून सरकारला फक्त तीस-पस्तीस टक्के कर देणे म्हणजे एक क्रांतीच. भांडवल बाजाराचा विस्तार याच तीस वर्षांतला. अनेकांना जसा तो बुडवून गेला तसा काहींना पैसेही मिळवून देऊन गेला. निदान अनेकांना आशा व स्वप्ने तर नक्कीच दाखवून. त्यामुळेच भरपूर कमवा याला भरपूर उधळा ही जोड या दोन दशकांत मिळाली. मात्र त्याला तिसऱ्या क्रियापदाची जोड ही मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षांनी विशेषत: सामाजिक माध्यमांचा सुकाळ झाल्यानंतर आणि त्यामुळेच कमवा खर्च करा आणि त्याचा सामाजिक बभ्रा करा, जितका जास्त मोठा तितका तो जास्त चांगला अशी समाजमान्यताही मिळाली. पश्चिम भारतात झालेला हा समारंभ याच मानसिकतेचे एक भव्य उदाहरण.

हेही वाचा >>>जागतिक हवामानाबद्दल आपण सजग रहायला हवे, कारण…

आजुबाजूला पाहिल्यानंतर असे लक्षात येते की ही मानसिकता अनेक स्तरांवर हजारो नवश्रीमंत कुटुंबांमध्ये जाती, धर्म, राज्यविरहित पाझरली आहे. अगदी माझ्या परिचयातील अनेक उदाहरणे आहेत. परिचयातील एका व्यक्तीने त्यांचे फार्म हाऊस बांधले. अतिशय उत्तम जागा. खडकवासला धरणाचा विस्तार घरातून दिसणार अशी मोक्याची जागा. त्या फार्म हाऊसला सजवण्यासाठी लागणारी झुंबरे व काचा आणण्यासाठी हे दाम्पत्य करोनापूर्वी चम्लामध्ये मुद्दाम गेले होते. तेथून लाखो रुपये खर्च करून हे साहित्य घराच्या सजावटीसाठी विकत घेऊन आले! दुसरे उदाहरण वेगळय़ा आर्थिक स्तरातील. माझ्या माहितीच्या एका घरकाम करणाऱ्या महिलेने तिच्या घरच्या श्वानाचा वाढदिवस अतिशय वाजतगाजत साजरा केला. त्यानिमित्ताने केक आणला. त्या श्वानाला माणसाप्रमाणे टोपी वगैरे घालून सजवले, केक कापला, त्याचा व्हिडीओ केला आणि तो परिचितांमध्ये व्हायरल केला. आणखी एक उदाहरण. एका परिचितांचे चिरंजीव तीन-चार वर्षांपूर्वी म्हणजे करोनाच्या अगोदरच्या वर्षांत दर दोन-तीन महिन्यांनी गोव्याला मित्रांच्या कुटुंबाबरोबर जात असत. फेसबुकवर गोव्यातील पंचतारांकित हॉटेल, तेथील जेवण इत्यादीचे रसभरीत वर्णन छायाचित्रांसकट ते करत असत. असे दोन-तीन वर्षे तरी चालले. नंतर असे कळले की या सर्व करमणुकीचे पैसे हे अनेकांना गंडा घालून, शेअर मार्केटमध्ये पैसा दुप्पट करून देतो अशा थापा मारून मिळवलेले होते. आणखी दोन उदाहरणे गेल्या महिन्यातील. परिचित दोन महिलांच्या घरी विवाह कार्यक्रम होते. या महिलांची आर्थिक परिस्थिती मध्यम व निम्न मध्यम वर्गातील म्हणावी अशी. पण लग्नाचा थाट मात्र अभूतपूर्व होता. सुमारे ३० मोठय़ा गाडय़ांमधून वऱ्हाडी आले होते. एका लग्नात दोन हजार मंडळी तरी जेवली असतील. अनेक पुरुषांच्या गळय़ात सोन्याच्या जाडजूड विद्रूप दिसणाऱ्या साखळय़ा व हातभर बांगडय़ांप्रमाणे सोन्याची कडी होती. निदान आठ-दहा लाख रुपयांचा खर्च सहज झाला असेल. त्यासाठी अर्थातच असेल नसेल ती सर्व शिल्लक व त्या जोडीला कर्ज काढून विवाहाचा हा सोहळा सण साजरा करण्याचा कार्यक्रम या दोन कुटुंबांत झाला. चार्वाकाला लाजवेल असे हे ‘ऋण कृत्वा घृतं पिबेत’चे कलियुगातील उदाहरण.

कमवा-उधळा- जाहीर वाच्यता करा याचे आणखी एक लक्षण म्हणजे प्रचंड प्रमाणात वाढलेले देशी व परदेशी प्रवासाचे प्रमाण. त्यामध्येही लाटा येत असतात. या लाटा कशा तयार होतात हा एक अभ्यासाचाच विषय आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी युरोपमध्ये नॉर्दन लाइट्स पाहायला जाण्याची एक फॅशन होती. परिचयातील जो तो उठतो तो युरोपमध्ये कडाक्याच्या थंडीत दोन-तीन मिनिटे दिसणारा तो प्रकाश पाहायला जात होते. मग मालदीवची लाट. सिनेनटांनी त्यांचे रंगीबेरंगी, सनसनाटी फोटो सोशल मीडियावर टाकल्यामुळे अनेकांना मालदीव देशाचा भूगोल कळला! गेले तीन-चार महिने जो तो व्हिएतनाममध्ये प्रवासाला जातोय. जणू काही इतके दिवस तो देश व तेथील प्रेक्षणीय स्थळे अस्तित्वातच नव्हती. करोनाकाळानंतर या मानसिकतेचे वर्णन काहींनी हट्टाने केलेला प्रवास (revenge travel) असे केले. जणू काही उद्याचा दिवस उजाडेल का उजाडणार नाही याची शाश्वती नसल्यामुळे, आहे तो दिवस पदरात पाडा आणि असेल नसेल ते सर्व पैसे खर्च करून प्रवास करा, खादाडी करा, वस्तू विकत घ्या, महागडय़ा गाडय़ा विकत घ्या. एक घर असेल तर फार्म हाऊस घ्या, एक फार्म हाऊस असेल तर समुद्राच्या काठी बीच हाऊस, ते असेल तर दुबईमध्ये एक घर घ्या, अशी ही कमवा- उधळा व दाखवाची शर्यत चालू आहे.

गरीब व गरिबी कोठे गेली?

अर्थव्यवस्थेची भरधाव वेगाने होणारी वाटचाल, भांडवल बाजाराचे उच्चांक, कोटय़वधींची लग्ने होत असताना देशात खरंच आता गरीब शिल्लकच नाहीत की काय असाही प्रश्न अनेक सुशिक्षित विचारताना दिसतात. त्यांच्या दृष्टीने ‘अच्छे दिन’ आलेच आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बाजारात गडगडलेले शेतमालाचे भाव या आता छोटय़ा बातम्या म्हणून जेव्हा दिसतात तेव्हा गरिबी नाहीच ही समजूत पक्की होत जाते. एकीकडे २५-३० लाखांच्या गाडय़ांचे वार्षिक विक्रीचे उच्चांक यांचे आकडे येत असताना दुसरीकडे १०० रिक्त जागांसाठी एक लाख युवक अर्ज भरून नोकरीच्या रांगेत उभे आहेत हे चित्र मनात विषण्णता निर्माण करते. ज्या महात्म्याने गरज आणि आसक्ती     (need and greed ) यात तारतम्य ठेवा असे सांगितले तो मान खाली घालून सरकारी कार्यालयाच्या भिंतीवर आहे. दुसरा एक महात्मा टॉलस्टॉय रशियात होता. तोही गोष्टीतून सांगत होता की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऊर फुटून दौड केल्यानंतर संध्याकाळी माणसाला अखेरच्या विश्रामासाठी जागा कितीशी लागते? फक्त तीन-चार फुटांचा छोटासा खड्डा.

दुर्दैवाने या गोष्टी बहुधा आता कोणाच्याच कानावर पडत नाहीत. कारण कमवा उधळा  हाच नवश्रीमंत वर्गाचा नवा मंत्र झाला आहे. होळीच्या दिवशी त्यामुळे शिव्या कोणाला द्यायचा, या व्यक्तींना, त्यांच्या या प्रवृत्तीला की आणखी कशाला हेच समजत नाही..

Kanitkar. ajit@gmail. com