जगदीश काबरे
सध्या पितृपक्ष सुरू असून सगळीकडे श्राद्ध करण्याची धामधूम आहे. असे विधी करून खरंच आपल्या पितरांना मुक्ती मिळत असेल आणि त्यांचे आत्मे शांत होत असतील तर मग दरवर्षी हीच कर्मकांडे पुन्हा पुन्हा करण्याची गरज काय? ..हिंदू शास्त्राप्रमाणे श्राद्ध/पिंड दान होत नाही तोपर्यंत आत्म्याला स्वर्ग प्राप्त होत नाही वा मुक्ती मिळत नाही, असे समजले जाते. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो.
(१५ दिवसांचा काळ) या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. पण प्रश्न असा पडतो की, असे विधी करून खरंच आपल्या पितरांना मुक्ती मिळत असेल आणि त्यांचे आत्मे शांत होत असतील तर मग दरवर्षी हीच कर्मकांडे पुन्हा पुन्हा करण्याची गरज काय? वर्षभरात ते पुन्हा पुन्हा अशांत का होतात? की वर्षातून एकदाच त्यांना भूक लागते?
दुसरे असे की, पितृपक्ष हा अशुभ पंधरवडा समजला जातो. म्हणून या काळात कुठल्याही प्रकारचे शुभकार्य हाती घेतले जात नाही. याच काळात पितरांना बोलवले जाते, म्हणजे पितरे अशुभ आहेत असे समजायचे काय? मग आपल्याच पितरांना अशुभ समजणारी कर्मकांडे करण्यात काय अर्थ आहे? उलट २१व्या शतकात अशी कर्मकांडे करून हिन्दू समाज अंधश्रद्धेच्या भयाण अंधारात अजूनही जगत आहे, ही वैषम्याची बाब नाही काय? खरे तर हा लोकांच्या मनात भीती पसरवून स्वत:चे पोट भरण्यासाठी निर्मिलेला हा पारंपरिक ब्राम्होद्योग आहे. म्हणून ब्राम्हण अणि कावळा जोपर्यंत अन्न खात नाही तोपर्यंत घरातील कुणीही व्यक्ती जेवत नाही. बरे, श्राद्ध/पिंड दान करण्यासाठी पुरुषच लागतो, स्त्रियांना तो अधिकार नाही. काय कारण? तर म्हणे, पुराणात असे सांगितले आहे की, पुरुषानेच हे विधी केले पाहिजेत, तरच घरात सुखसमृद्धी नांदते.
१) गरुड़ पुराण :- पुत्राशिवाय मनुष्याला मुक्तता नाही. पितृपक्षात मुलाकडून पिंड दान केले नाही तर आत्मा स्वर्गात जात नाही.
२) मार्कंडेय पुराण :- घरातील मुख्य पुरुषाने आपले मृत पितर यांच्या सोबत भूत, देव अणि ब्राह्मण यांनाही अन्न दिले पाहिजे अणि असे केले तरच त्याला समृद्धी, निरोगी शरीर अणि शेवटी मोक्ष मिळतो.
या तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळकट करणाऱ्या गोष्टी आहेत. पुरुषी मानसिकतेत स्त्रियांना दुय्यम स्थान असते, म्हणूनच स्त्रियांना यातील कुठलाही विधी करता येत नाही.
महत्त्वाचे म्हणजे विज्ञानाने आत्म्याचे अस्तित्व अजूनही सिद्ध केलेले नाही. म्हणजे कावळा तुमचा निरोप घेऊन तुमच्या मृत पितारांकडे जातो वा पितारांचा आत्मा कावळ्यात येतो असा समज घट्ट रुजवून मनातील भीतीचा फायदा घेऊन श्राद्धाचे कर्मकांड रचण्यात रचण्यात आले आहे, हे स्पष्ट होत नाही काय? स्वतःला धार्मिक म्हणवणारे बरेच लोक आपल्या आईबापांना जिवंत असताना नीटपणे जेवू घालत नाहीत, त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे वागत असतात. कधी कधी तर त्यांना सरळ वृद्धाश्रमाचा रस्ता दाखिवला जातो. ते मेल्यावर मात्र लोक काय म्हणतील या भीतीपोटी जनरीत पाळत प्रतिष्ठेसाठी श्राद्धाचे जेवण घातले जाते. त्यासाठी हेच लोक ब्राम्हणाला बोलावून मोठा विधी करतात आणि त्याला दक्षिणा देवून तृप्त करत आपल्या मनातील अपराधगंड शमवण्याचा प्रयत्न करतात. माणसे जिवंत असताना त्यांना छळायचे आणि मेल्यावर त्यांच्या नावाने गळे काढत श्राद्ध करून गोडघोडही खायचे, असा दांभिकपणा इतर कुठल्याही धर्मात नाही, आहे तो फक्त हिंदू धर्मातच. म्हणून धर्माच्या धंद्याचे सर्वात हास्यास्पद आणि विकृत रूप असेल तर तो आहे पितृपक्ष, श्राद्ध आणि त्यातील विधी.
या श्राद्धविधी संबंधित गाडगेबाबांच्या आयुष्यातील एक घटना गो. नी. दांडेकर यांनी गाडगेबाबांचे चरित्र लिहिले आहे, त्यात कथित केलेली आहे. एकदा गाडगेबाबा पंढरपुरला गेले होते. चंद्रभागेच्या तीरावर फिरताना त्यांना दिसले की, एक भट काही लोकांसमोर पिंडदान विधी करत आहे. तो भट त्या लोकांनी तयार केलेले पक्वान्न वरच्या दिशेने फेकत होता व काहीतरी मंत्र पुटपुटत होता.
गाडगेबाबा भटाला म्हणाले, ‘ये काय करुन राहीलाय बाप्पा?’
भट म्हणाला, ‘तुला दिसत नाही का? मी हे अन्न या लोकांच्या स्वर्गातील पितरांना पाठवत आहे.’
संत गाडगेबाबांनी थोडावेळ विचार केला आणि भटाला धडा शिकवायचा हे ठरवले.
गाडगेबाबा चंद्रभागेत उतरले व हातातील गाडग्याने जोरजोरात पाणी भटजीकडे फेकू लागले.
भटाला राग आला. तो रागाने ओरडला, ‘ए मुर्ख माणसा, हे काय करतोस तू?’
गाडगेबाबा शांतपणे म्हणाले, ‘माही अमरावतीले संत्र्याची बाग हाय, तीले पाणी घालतुया.’
त्यांच्या या उत्तरावर भोवतालचे जमलेले सर्वजण हासायला लागले.
भट म्हणाला, ‘अरे वेड्या, इतक्या दूर आमरावतीला येथून पाणी कसे जाईल?’
बाबा पटकन बोलले, ‘तुम्ही मेलेल्या लोकांना स्वरगात जेवण पाठवता. मग म्या इथून फेकलेलं पाणी आमरावतीला का नाही जाणार बाप्पा?’
गाडगे बाबांच्या प्रश्नाने जमलेल्या सगळ्या हसणाऱ्या माणसांची बोबडी वळली आणि त्यांना आपण कोणते मूर्खपणाचे कृत्य करत आहोत हे लक्षात आले. ज्या माणसाने कधी शाळेचा उबंराही ओलंडला नाही तो माणूस आपल्याला शिक्षणाचं महत्व सांगून गेला आणि श्राद्धविधीतील फोलपणाही. तात्पर्य काय तर, बुद्धीचा वापर करा… विज्ञानवादी बना, चिकित्सा करा…
सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे कावळ्यात आपल्या पितरांचा आत्मा येतो असे समजणे! पुनर्जन्म आहे असे मानले तर घरातील वडीलधारी मंडळी मृत्यूनंतर पुढच्या जन्मात कुठेतरी जन्माला आली असतीलच ना? कारण त्यांना ८४ लक्ष फेऱ्यातून जावे लागल्यानंतरच माणूस जन्म मिळतो म्हणे! मग त्यांचे आत्मे अवकाशात लटकून खीर-पुरीसाठी कसे आणि कुठे तळमळत असतात? पुढचा जन्म हा ८४ लक्ष फेऱ्यातून होणारा असेल तर सगळ्यांचे पितर नेमके कावळेच कसे काय होतात? एक कावळा अनेक घरातील श्राद्धाचे अन्न खात असेल तर त्या एकाच कावळ्यात त्या अनेक घरातील अनेक आत्मे एकत्रितपणे सामावलेले असतात काय? कावळा हा पक्षी वर्षभर मेलेले मासे, उंदीर, बेडूक, सडलेले मांस इत्यादी टाकाऊ घाण खाऊन परिसर स्वच्छ करत असतो. तो मांसाहारी जास्त अन् शाकाहारी कमी, हे सत्य लोकांना माहीत असूनही कावळ्याला शाकाहारी समजून, त्यात पूर्वजांचे आत्मे आल्याची अफवा पक्की करून पितृपक्षाचा खेळ मांडला जातो. जो कावळा १२ महिने घाण खातो तोच कावळा एका दिवसापुरता शुभ आणि शुद्ध कसा होतो? ह़ा विरोधाभास आपल्या लक्षात का येत नाही? इतर प्राण्यांमध्ये पितरे का दिसत नाहीत? हे साधे प्रश्न कुठल्याही शाळेत शिकत असणाऱ्या मुलालाही पडत असतील तर मग शिक्षित आणि उच्चशिक्षित लोकांना ते का पडू नयेत? धर्ममार्तंडांच्या हातातले ते एवढे मठ्ठ बाहुले कसे काय होतात?
आपल्या मध्ययुगीन संतांनीही श्राद्धपक्षाविषयी चांगलीच कानउघडणी केलेली आहे.
१) तुकाराम महाराज म्हणतात,
जित्या नाही अन्न |
मेल्यावरी पिंडदान |
हे तो चाळवाचाळवी ||
२) एकनाथ महाराज म्हणतात,
जिता मायबापा न घालिती अन्न|
मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान ||१||
पहा पहा संसारीचा कैसा आचारु|
जिता अबोला मा मेल्या उच्चारू ||२||
जित्या मायबापा न करिती नमन |
मेल्यामागे करिती मस्तक वपन ||३||
जित्या मायबापा धड्गोड नाही |
श्राद्धी तळणमळण परवडी पाही ||४||
जित्या मायबापा गालीप्रदन |
मेल्या त्याचेनी नावे देती गोदान ||५||
जित्या मायबापा नेदी प्यायला पाणी|
मेल्या पितरालागी बैसती तर्पणी ||६||
प्याया पाणी न घालिती सासरा जिता|
पिंडापासी येती मग दंडवता ||७||
एका जनार्दनी कृपेचे तान्हे |
विधीनिषेध दोन्ही आतळो नेदी माने ||८||
३) संत कबीर सांगतात,
जिंदा बापाको रोटी न खिलावे,
मरे बाप पाछतायो…
मुठभर चावल दाबे धरके
कौवा बाप बुलय्यो।
४) गाडगेबाबा म्हणतात,
‘पिंड दान करू नका. ही भटा-बमाणांची पोटभरी परंपरा बंद करा. गरिबांना अन्न द्या, त्यांच्या मुलांना शिकवा. मृत झालेल्या वाडवडिलांची स्मृती जतन करा, त्यानी केलेल्या चांगल्या कामाचे अनुकरण करा. त्यांचे चांगले विचार आत्मसात करा. हाच त्यांचा योग्य स्मृती दिन होऊ शकतो.’
पण आपल्या लबाड पुरोहित पंडितांना दोन्ही हातात लाडू हवे असतात. त्यामुळे मरण्याआधी पुढच्या जन्म सुखाचा जाण्यासाठी ते विधी करायला लावतात आणि मृत्यूनंतरही पितरांचा धाक दाखवून त्यांच्या मुलांच्या सुखासाठी कर्मकांड करायला लावून त्यांच्याकडूनही आपल्या पोटोबासाठी खीर-पुरीची व्यवस्था करतात. असे केल्याने सुखसमृद्धी येईल असा दावा केला जातो. परंतु इतिहास साक्षी आहे की, हजारो वर्षे हे सर्व करूनही ही धार्मिक माणसे गरीबच राहिली आहेत आणि भट पुरोहित तुंदीलतनु झाले आहेत. जे मुळातच श्रीमंत आहेत ते पितरांच्या नावाखाली फक्त आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी श्राद्ध पक्ष करत असतात. म्हणूनच श्राद्धाचे सोंग घराघरात अत्यंत उसन्य गांभीर्याने केले जाते… तेही सु(?)शिक्षित कुटुंबात! खरंच किती लाजीरवाणा प्रकार आहे हा!!
‘शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार’ या ‘सुधारका’तील लेखात आगरकर म्हणतात, ‘हिंदूंनो, तुम्ही इतके गतानुगतिक कशासाठी होऊन बसला आहांत? मनुष्याच्या जन्माला येऊन असे मेषासारखे वर्तन का करता? डोक्यात जो मेंदू आहे त्याची माती का होऊ देता? जिवंत माणसाच्या आहारास लागणारे पदार्थ तुम्ही मेलेल्या माणसास अर्पण करता याचा अर्थ काय? मृत शरीराची राख झाल्यावर त्याच्या नावाने तुम्ही जें अन्न-पाणी देतां त्याचा उपभोग कोण घेतो? आत्म्याला नाक, तोंड, पोट असे अवयव असतात का? असतील तर जिवंतपणा आणि मृतावस्था यांत भेद काय? खुळ्यांनो! असे पोराहून पोर कसे झालांत?’ विचार तर कराल…!?
jetjagdish@gmail.com