डॉ. शमसुद्दीन तांबोळी

‘‘मुस्लिमांचे आधुनिकीकरण आणि भारतीयकरण जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच हिंदूंचेही भारतीयकरण झाले पाहिजे,’’ असे हमीद दलवाई म्हणत..

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

मुस्लीम समाजप्रबोधक हमीद दलवाई यांचे ३ मे, १९७७ रोजी वयाची पंचेचाळिशी गाठण्यापूर्वीच निधन झाले. या प्रसंगी तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी आपल्या शोकसंदेशात म्हणाले होते, ‘हिंदूंनाही हमीद दलवाईंची गरज आहे.’ आज या विधानाचे महत्त्व तीव्रतेने जाणवते. दलवाई म्हणत, ‘हा देश समर्थ व्हावा, जगातील शक्तिमान राष्ट्रांच्या पंक्तीला बसावा असे वाटत असेल, तर या समाज विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनावर आधारलेला, भौतिक श्रद्धा बाळगणारा आणि चैतन्यशील झाला पाहिजे. ज्या धर्मश्रद्धा आधुनिकता आणि प्रगतीच्या आड येतात त्या दूर सारण्याची प्रक्रिया पुढे चालवणे म्हणजेच धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल!’

स्वातंत्र्यलढय़ाच्या काळातच उदारमतवादी, आधुनिकतावादी विचारांना चालना मिळाली. भारताला आधुनिक चेहरा देणारी राज्यघटना निर्माण करण्यात आली. आधुनिकतावादी नेतृत्वही लाभले. धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करण्याच्या प्रयत्नात मुस्लीम जमातवादी मानसिकता, मुस्लीम समाजप्रबोधनाचा अभाव आडकाठी ठरू नये, समाजप्रबोधनाची चळवळ प्रबळ व्हावी यासाठी मुस्लिमांचे प्रबोधन झाले पाहिजे हा विचार दलवाईंनी केंद्रस्थानी ठेवला.

‘मी सर्वप्रथम माणूस आहे, त्यानंतर भारतीय आहे आणि शेवटी मी मुस्लीम आहे,’ अशी ठाम भूमिका घेणाऱ्या दलवाई यांचा समावेश डॉ. रामचंद्र गुहा यांनी ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या ग्रंथात केला. या पुस्तकातून दिसणारी दलवाई यांची आधुनिकता लढाऊ आणि तडजोड न करणारी होती. त्यांनी क्रांतिकारी विचार बेधडक मांडून लक्ष वेधून घेतले.’’

साहित्यिक आणि पत्रकार म्हणून प्रतिमा तयार होत असतानाच त्यांचा संपर्क भारतातील बुद्धिजीवी वर्गाशी आला. भारतीय समाजप्रबोधन हा त्यांच्या आकर्षणाचा विषय ठरला. बहुतेक समाजप्रबोधकांनी त्यांच्या कार्याचा आरंभ महिला मुक्तीच्या विचारातून केल्याचे दलवाईंच्या लक्षात आले. राजा राममोहन राय यांच्या संघर्षांतून बंद झालेली सतीची परंपरा आणि महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने दलवाईंना मुस्लीम महिलांच्या समस्यांकडे अंतर्मुख होऊन पाहण्याची प्रेरणा दिली. १८ एप्रिल १९६६ रोजी हमीद दलवाई यांनी सात मुस्लीम महिलांना सोबत घेऊन विधानसभेवर मोर्चा काढला. इस्लामिक जगतातील हा एक ऐतिहासिक मोर्चा ठरला.

स्वातंत्र्यानंतर राज्यघटना अस्तित्वात आली. संविधानात्मक मूल्ये समाजात वाढवणाऱ्या व्यक्ती आणि चळवळी हिंदू समाजात आहेत. मात्र काही निवडक उदारमतवादी मुस्लीम सोडले तर मुस्लीम समाजात अशा चळवळीचा अभाव आहे, हे दलवाईंच्या लक्षात आले. या काळात त्यांची मैत्री सेक्युलर आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांशी झाली. १९६८ मध्ये प्रा. अ. भि. शहा आणि दलवाई यांच्या पुढाकाराने ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ची उभारणी झाली.  ध्येयवादी वादळ निर्माण झाले. जात आणि धर्म यांचा प्रभाव, विषमतावादी परंपरा, पोथीनिष्ठ संकुचित वर्तन आणि अंधश्रद्धांवर हल्ले करीत असताना दलवाई यांच्या लक्षात आले की- हे प्रश्न मुस्लीम समाजात मोठय़ा प्रमाणात आहेत. देशाच्या फाळणीनिमित्ताने उभ्या राहिलेल्या धर्मवादी राजकारणाचाही समाजावर प्रभाव आहे. हिंदू मुस्लीम समाजात सामाजिक प्रबोधनाची दरी निर्माण झाल्यास अनर्थ घडेल. मुस्लीम समाजप्रबोधनापासून वंचित राहिल्यास, ते या देशाचा सन्माननीय घटक होऊ शकणार नाहीत. आधुनिक राष्ट्राच्या उभारणीत योगदान देऊ शकणार नाहीत. समाजाला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रबोधनाला वाहून घेणाऱ्या चळवळीची आवश्यकता आहे, या विचारातून दलवाई यांनी २२ मार्च, १९७० रोजी ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना केली.

‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ने मुस्लीम समाजात धर्मनिरपेक्षता रुजावी म्हणून पावले उचलली. मुस्लीम व्यक्तिगत कायद्यामुळे मुस्लीम महिलांना सांविधानिक अधिकार उपभोगता येत नाहीत, तलाक, बहुपत्नीत्व अशा अवमानकारक पद्धतींचा सामना करावा लागतो. संविधानास अपेक्षित समान नागरी कायदा अस्तित्वात यावा, मुस्लीम समाजाने कुटुंब नियोजनाचे उपक्रम अंगीकारावेत, धार्मिक आणि राजकीय नेते जी दिशाभूल करतात त्यास बळी पडू नये, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मदरसा शिक्षण मुस्लीम समाजाच्या मागासलेपणास कारणीभूत आहे. मुस्लीम समाजाने प्रादेशिक भाषेतून किंवा इंग्रजीतून शिक्षण घ्यावे. अंधश्रद्धांचे निर्मूलन करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करावा यासाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने विविधांगी उपक्रमांचे आयोजन केले. दलवाईंना मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेपूर्वी आणि नंतर असा एकत्रित फक्त एका दशकाचा कालावधी लाभला. मात्र या कालावधीतील लोकप्रबोधनाचे कार्य समाजाच्या उद्धारासाठी आणि पर्यायाने वैश्विक मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी होते.

ग्रंथप्रामाण्य न मानता त्याची चिकित्सा करणारे दलवाई हे मुस्लीम समाजातील पहिले सुधारक होते. दलवाईंची ही चिकित्सा मुस्लीम नेतृत्वाला परवडणारी नव्हती म्हणून त्यांनी दलवाईंना विरोध केला. दलवाई निरीश्वरवादी, निधर्मी आणि अश्रद्ध असले तरी मुस्लीम समाजाने अश्रद्ध व्हावे, असा त्यांचा आग्रह नव्हता. ते संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचे समर्थक होतेच शिवाय निकोप धर्मस्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात उभे राहणारेही होते. भारतातील हिंदूत्ववाद ही मुस्लीम जमातवादाची प्रतिक्रिया आहे आणि मुस्लीम जमातवाद नष्ट झाला की देशात हिंदू जातिवाद शिल्लक राहणार नाही, असे दलवाईंचे मत होते. मुस्लिमांचा सुधारणेस प्रतिकार हिंदूत्ववाद आक्रमक होण्यास कारणीभूत आहे, हे वास्तव शहाबानो प्रकरणापासून ते तलाकबंदी कायदा अस्तित्वात येण्यापर्यंत आणि नंतरच्या हिजाब क्रिया प्रतिक्रियेच्या वादंगात दडल्याचे लक्षात येते.

दलवाई म्हणतात, ‘‘ज्या हिंदूंना मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार करायचा आहे ते हिंदूंना सनातनी बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ज्या हिंदूंना हिंदू समाजाला आणि पर्यायाने देशाला आधुनिकतेच्या रस्त्यावर न्यायचे आहे ते मुस्लीम जातीयवाद्यांना मिठय़ा मारीत आहेत! हे दृश्य बदलले पाहिजे.’’ हे निरीक्षण आजही जसेच्या तसे पाहायला मिळते. तलाकबंदी, हिजाबबंदी, अजान बंदी वगैरे विषय जेव्हा पटलावर येतात तेव्हा मुस्लीम जमातवाद्यांच्या पाठीशी अनेक हिंदू पुरोगामी उभे राहतात. अलीकडे तथाकथित लव्ह जिहादचा मुद्दा पुढे करून हिंदूत्ववादी संघटना जनआक्रोश मोर्चे काढत आहेत. मुस्लीमविरोधी विखारी वक्तव्यांचा ऊत आला आहे. धार्मिक ध्रुवीकरण वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. यातून एकात्मता धोक्यात येत आहे. जमातवादी मुस्लीम भगवा लव्ह जिहादचा नारा देऊन मुस्लीम मुलींना एकटय़ा घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना मोबाइल फोन देऊ नका, त्यांच्यावर नजर ठेवा वगैरे भाषा करीत आहेत. आजपर्यंतच्या सुधारकांनी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहांचे समर्थन करून त्यास प्रोत्साहन दिले आहे. आज मात्र असे विवाह रोखण्यासाठी शासन समिती स्थापन करीत आहे. दलवाई म्हणत, ‘‘मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार करणाऱ्या हिंदूंच्या मी बाजूचा आहे आणि हिंदूंना सनातनी बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा विरोधक आहे. त्याचबरोबर हिंदूंना आधुनिक बनवणाऱ्यांना माझा पाठिंबा आहे, परंतु मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार न करण्याच्या त्यांच्या धोरणांचा मी विरोधक आहे.’’

आज मुस्लीम समाजात आधुनिक शिक्षण घेणाऱ्यांचे मराठी भाषेचा स्वीकार करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुस्लीम जन्मदर कमी झाला आहे. पीडित महिला न्यायालयाची दारे ठोठावत आहेत.  मशिदीत सन्मानाने प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करीत आहेत. एनआरसीविरोधी आंदोलनांत अनेक मुस्लीम महिला पुढे आल्या आहेत. तथापि मुस्लीम समाजप्रबोधनाचे प्रश्न सुटलेले नाहीत. हे प्रश्न घेऊन मुस्लीमविरोधी वातावरण निर्माण करण्याची प्रत्येक संधी हिंदूत्ववादी संघटना साधतात.

समान नागरी कायदा हा सांविधानिक कर्तव्याचा विषय आहे. मात्र आज हा विषय मुस्लीमविरोधी ठरला आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा देश झाला आहे. मुस्लीम समाज आज लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्नशील आहे. तरीही या मुद्दय़ावर मुस्लिमांना लक्ष्य करण्यात येते.  यासंदर्भात लोकशिक्षणासाठी धोरणात्मक प्रयत्नांची गरज आहे. मात्र राजकीय हितासाठी या मुद्दयांचा वापर करण्यात येतो. नेत्यांनी लोकानुनय, लोकशिक्षण, लोकप्रियता याबाबत विवेकी समतोल राखला पाहिजे, समान नागरिकत्वाच्या पायावरच राष्ट्रीय एकात्मतेची इमारत अभी राहू शकेल यावर दलवाईंचा विश्वास होता. ते म्हणत, ‘‘मुस्लिमांचे आधुनिकीकरण आणि भारतीयकरण जसे महत्त्वाचे आहे तेवढेच हिंदूंचेही भारतीयकरण झाले पाहिजे.’’ सर्वसमावेशकता, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, सेक्युलॅरिझम, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानात्मक मूल्यांच्या बाबतीत जे प्रश्न निर्माण झाले आहेत या पार्श्वभूमीवर वाजपेयी यांचे ‘हिंदूंनाही हमीद दलवाईंची गरज आहे,’ हे विधान महत्त्वाचे ठरते.

लेखक मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत.

tambolimm@rediffmail.com