ज्युलिओ एफ. रिबेरो
पाकिस्तानातून जो क्रिकेट संघ सध्या भारतात विश्वचषकाच्या एकदिवसीय सामन्यांसाठी आला आहे, त्यात लक्षणीय खेळाडू अजिबात नसूनसुद्धा या संघाची चर्च अधिक दिसते. ती कशी आणि त्यातून काय उत्पात घडले, याबद्दल ऊहापोह करण्याआधी क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी : आजही आपल्या आसपास, क्रिकेट न पाहणारे लोक आहेत… उदाहरणार्थ आमच्याकडे घरकाम करणारी मेरी. पलीकडच्या खोलीतील टीव्हीवरून येणारे आवाज कुठल्यातरी सामन्याचे आहेत हे तिला स्वयंपाकघरातूनही समजते; पण सामना म्हणजे फुटबॉलचाच, असे तिला वाटते!

‘वेस्ट इंडीज म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे वेस्ट इंडीज’ असे वेस्ट इंडीजचे महान लेखक व्ही. एस. नायपॉल यांनी सुमारे पन्नास वर्षांपूर्वी लिहिले होते. या कॅरिबियन बेटांनी जेव्हा ‘व’च्या बाराखडीतल्या वॉरेल, वीक्स आणि वॉलकॉट या तिघा महान क्रिकेटपटूंची जादू पसरवली, तेव्हाचा तो भारलेला काळ! क्रिकेटचा तितका जोश आता तिथे नाही. भारतीय उपखंडाने वेस्ट इंडिजला उंच फटके मारून बाहेर काढले आहे एकेकाळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाऐवजी वेस्ट इंडीजने क्रिकेटसत्ता म्हणून नाव कमावले होते, ते पद आता भारताकडे आहे.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

भारतालाही क्रिकेटचा इतिहास आहेच. रणजी ट्रॉफीला ज्यांचे नाव देण्यात आले आहे ते सौराष्ट्रातल्या नवानगर संस्थानचे महाराजा रणजीतसिंहजी हे ‘एका लहानशा राज्याचे संस्थानिक, पण महान खेळाचे महाराज’ आहेत, असे ब्रिटिश पत्रकार ए. जी. गार्डिनर (हे ‘अल्फा ऑफ द प्लाउ’ या टोपणनावाने लिहीत) यांनी म्हटले होते. रणजितसिंहांनंतरचे भारतीय क्रिकेट हे ‘क्रिकेट विथ विजय मर्चंट’ होते. अनेकांना मर्चंट हे भारताचे कर्णधार म्हणून माहीत असतील. मुंबईकर विजय मर्चंट हे एरवी एक कापडगिरणी चालवत होते हे जरी फारजणांना माहीत नसले तरी ‘सभ्य क्रिकेटर’ म्हणून ते अनेकांना आठवत असतील.

क्रिकेटमधले राजकारण…

क्रिकेट हा आता ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ राहिलेला नाही. प्रतिभावान खेळाडूंसाठी क्रिकेट हाच व्यवसाय असू शकतो, जिथे खरोखर प्रतिभावान आणि अर्थातच शिस्तबद्ध असल्यास चांगले फायदेशीर जीवन जगता येते. नैसर्गिक प्रतिभेचा शोध घेणारे क्रिकेटदर्दी अनेक आहेत आणि जुन्याजाणत्या खेळाडूंतर्फे चालवल्या जाणाऱ्या अकॅडमींमधून अशा प्रतिभेचे पालनपोषणही होत असते. हा खेळ आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला असल्याने, पैशाचा तोटा नाही.आणि जिथे पैसा आहे तिथे राजकारणीही मागे राहात नाहीत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री राज्य क्रिकेट मंडळांच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले आहेत. हे पदाधिकारी लोक कधी गांभीर्याने क्रिकेट खेळले होते का, की फक्त गल्लीक्रिकेट, सॉफ्ट-बॉल क्रिकेट एवढ्यावरच त्यांची मजल होती हे कुणाला माहीत नाही. तरीही, ते राजकारणातून वेळ काढून आपापल्या परीने क्रिकेटची ‘सेवा’ करत राहातात कारण यातून त्यांचा प्रभाव पसरवण्याची संधी मिळते आणि भरपूर निधीचा मेवाही मिळू शकतो!

रॉजर बिन्नी हा सालस, शांत अँग्लो-इंडियन अष्टपैलू खेळाडू १९८३ मध्ये कपिलदेवच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकणाऱ्या संघात होता, तो पुढे अनेकांच्या विस्मृतीतही गेला आणि बेंगळूरुमध्ये राहू लागला. पण बिन्नी यांना क्रिकेटजगतातील सर्वाधिक श्रीमंत, सत्तावान अशा ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी नेमण्यात आले. तरीही भारतीय क्रिकेटचे निर्विवाद नियंत्रक म्हणून या ‘बीसीसीआय’चे सरचिटणीस जय शाह यांचेच नाव घेतले जाते. त्यांचे वडील देशातील दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची व्यक्ती आहेत. तर जय शहा हे देशातील क्रिकेटक्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहेत.

अमित शाह हे नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यास प्रेक्षक म्हणून आले होते. तेवढेच चार विसाव्याचे क्षण त्यांना मिळाले असतील. त्यातही ते सपत्नीक आणि लहानग्या नातीलाही घेऊन आले होते, ही सोबत त्यांना एरवीच्या राजकीय धबडग्यात ज्यांच्या-ज्यांच्यासह असावे लागते, त्या तुलनेत सुखदच म्हणावी अशी! हा सामना पाहावयास आलेल्या समस्त १.२० लाख प्रेक्षकांच्या- यापैकी बहुतेकजण जेव्हा केव्हा जिथे कुठे निवडणुका होतील तिथे मतदानही करणारच असतील म्हणून एवढ्या मतदारांच्या- स्मृतीत अमित शहा यांची उपस्थिती कोरली गेली असेल. फक्त तिथे उपस्थित असलेलेच नव्हे तर टीव्हीवरून हा सामना पाहणारे लक्षावधी लोकही अमित शहांना पाहात होते… कधी नातीला मांडीवर घेताना, कधी तिला शेजारी बसवल्यावर तिचे हात नीट ठेवताना!

या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला, तोही ज्या स्टेडियमला दिलेले वल्लभभाई पटेलांचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे करण्यात आले त्या क्रीडागारात मिळवला, याचे करायचे तेवढे भांडवल भाजपची प्रचारयंत्रणा करेलच. हांगझो येथील आशियाई खेळांमध्ये भारतीय पथकाने शंभराहून अधिक पदके मिळवली. याचेही श्रेय मोदींना मिळेलच. भाजप हा आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी जे केले नाही ते करून दाखवणारा पक्ष ठरतो आहे आणि हे विधान अगदी वैचारिक विरोधक, टीकाकार तसेच राजकीय विरोधी पक्षांतील नेते यांच्या अटकांना सुद्धा लागू आहे. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी- पारतंत्र्यकाळातल्या ब्रिटिशांचा अपवाद वगळता- टीकाकारांना आणि राजकीय विरोधकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या नित्यनेमाने गजांआड केले नव्हते , हे मी ९४ वर्षांचे आयुष्य जगल्यानंतर स्वत:च्या माहितीनुसार सांगू शकतो आहे.

असो. क्रिकेटबद्दलच बोलायचे तर, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत काही लक्षात राहण्याजोगे निकाल आले. इंग्लंड ही क्रिकेटची जननी, पण अननुभवी, नवख्या अफगाणिस्तानपुढे इंग्लंडचा पराभव झाला. इतिहासातही, अफगाणांनी ब्रिटिशांना कधीच आपल्या भूमीवर कब्जा करू दिला नव्हता, झारकालीन रशिया आणि वसाहतवादी इंग्लंड या दोघांना अफगाण भूमी जिंकता आली नाही. आताच्या तरुण अफगाण संघात फिरकी गोलंदाज चमकदार ठरले, त्यांनी ६२ धावांच्या फरकाने इंग्लंडचा पराभव केला.

बेहिशेबी पैशाचे पुढे काय झाले?

पण तरीही विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गर्दी खेचणारा सामना भारत वि. पाकिस्तान हाच होता. या सामन्याची तिकिटे संपल्याची चर्चा तर सामन्याआधी कित्येक दिवसांपासून सुरू होती. मुळातच या सामन्यांची तिकिटे सामान्य माणसाला परवडण्याजोगी नव्हती, त्यात ती चटकन संपलीसुद्धा… पण हीच तिकिटे नंतर काही नवश्रीमंतांसाठी लाखा-लाखांच्या किमतींना उपलब्ध झाली म्हणतात. हे जर खरे असेल (आणि अनेक नागरिकांप्रमाणेच मलादेखील ते खरे वाटते आहे), तर ‘सक्तवसुली संचालनालय’ अर्थात ‘ईडी’ने याची चौकशी करणे आवश्यक आहे.

तो बेहिशेबी पैसा गेला कुठे? हा पैसा काही ‘बीसीसीआय’ किंवा गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या तिजोरीत किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला नसणारच. पण मधल्यामध्ये काही व्यक्ती प्रचंड श्रीमंत झाल्या असतील! या व्यक्ती कोण आहेत? ते कोणत्याही राजकीय पक्षांशी जुळलेले आहेत का? येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हा काळा पैसा वापरला जाईल का? गुजरात पोलिसांना आणि विशेषत: अहमदाबादच्या पोलिसांना या संपूर्ण घोटाळ्याची माहिती असणे आवश्यक आहे, परंतु त्यांचे तोंड बंद केले जाईल. नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी‘ईडी’ प्रमाणेच, ईसी अर्थात निवडणूक आयोगानेही या चौकशीत सहभागी व्हावे. गुजरातचे लोक अशा प्रकारच्या घपल्यांना फार मनावर घेणार नाहीत कदाचित, परंतु ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ असल्याचा दावा करणाऱ्या पक्षाने अशा अफवांकडे दुर्लक्ष केल्यास काय संदेश जाईल? अखेर, यात बराच पैसा गुंतलेला आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवरच भारत-पाकिस्तान या दोघा दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा हा विशिष्ट सामना खेळवला जाण्यामागे या स्टेडियमची आसनक्षमता एवढेच एक कारण होते असे वाटत नाही. हे स्टेडियम एक लाख २० हजार जणांना सामावून घेण्यासाठी बांधले गेले आहेच, यात प्रश्न नाही. पण ही स्पर्धा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच होते. भारतीय विजयामुळे राष्ट्रवादी भावना उचंबळल्या की मग पक्षाच्या प्रचारयंत्रणेद्वारे थेट सर्वोच्च नेत्यापर्यंत ही लोकभावना भिडवली जावी, असेही हिशेब याच स्टेडियमच्या निवडीमागे असावेत. त्यात नावे ठेवण्याजोगे काही नाही. पण पैशाच्या वेहिशेबी व्यवहाराचा भागही यात आहे आणि तो मात्र या साऱ्या प्रकारावर शंका घेण्यास पुरेसा आहे. जर ‘न्यूजक्लिक’ या वृत्त-संकेतस्थळामध्ये चिनी गुंतवणूक असल्याच्या कुठल्याशा बातमीवर विसंबून दिल्ली पोलीस आणि ईडी यांच्यामार्फत कारवाई होऊ शकते, त्या संकेतस्थळाच्या संचालक व प्रवर्तकांना अटकही होऊ शकते, तर मग सर्वांना सारख्या न्यायाचे तत्त्व कायम ठेवण्यास काय हरकत आहे? १४ ऑक्टोबरच्या एकाच दिवशीच्या तिकिटांसाठी काळाबाजार झाला काय आणि झाला असल्यास तो कोणी केला, पैसा कोणाकडे गेला, याची चौकशी होणे गरजेचे ठरते.