उत्तराखंड राज्याचा नकाशा हातात धरून पाहिलात, तर या राज्यातील १३ जिल्ह्यांपैकी उत्तरकाशी हा सर्वांत वरचा आणि आकाराने सर्वांत मोठा जिल्हा आहे. याच जिल्ह्यातील धराली गावात ५ ऑगस्टच्या मंगळवारी भूस्खलन आणि खीरगंगा नदीला पूर अशा विचित्र घटनेमुळे हाहाकार माजला. हे अर्धे गाव चिखलात बुडाले. ‘चार धाम’ यात्रेपैकी गंगोत्री आणि यमुनोत्री ही तीर्थस्थाने उत्तरकाशी जिल्ह्यात आहेत. चामोली जिल्ह्यात बद्रीनाथ, तर रुद्रप्रयाग जिल्ह्यात केदारनाथ असून हे दोन्ही जिल्हे उत्तरकाशीलगत आहेत. या तीन जिल्ह्यांनी १९९१ च्या भूकंपापासून अनेक आपत्तींचे फटके खाल्लेले आहेत. तरीही कुणालाच जाग आलेली नाही हे धराली येथील घटनेतून दिसले.
दरड कोसळण्याचे मोठे प्रकार गंगोत्री मार्गावर गेल्या तीन महिन्यांत दरमहा किमान एक, या गतीने झालेले आहेत. एकंदर उत्तराखंडात दरड कोसळण्याच्या घटनांचा अभ्यास ‘इस्रो’ने १९८९ ते २०२३ च्या आकडेवारीवरून केला असता एकंदर ३४ वर्षांत दरडी कोसळण्याचे १२,३१९ प्रकार घडले होते, त्यापैकी ११०० प्रकार एकट्या २०२३ या वर्षात घडले, असे नमूद झाले. त्यानंतरच्या २०२४ या वर्षात तर, फक्त पावसाळ्यातच या राज्यातल्या १८१३ दरडी कोसळल्या. यापैकी निम्म्याहून अधिक प्रकार नेहमीच चारधाम यात्रेच्या मार्गावर होत असतात आणि यात्रेकरू खोळंबतात. यावर ‘उपाय’ म्हणून हा मार्ग ‘बारमाही’ करण्याचे केंद्र सरकारने ठरवले. पण यात्रेकरूंच्या सोयीपेक्षा पर्यावरणाकडे सरकारने लक्ष दिले असते, तर या भागात ‘विकास प्रकल्प’ आणि ‘पायाभूत सुविधां’च्या उभारणीमुळेच वाढणारे उत्पात जरा तरी आटोक्यात राहिले असते. आता तीही शक्यता नाही.
मुळात हिमालय हा ‘तरुण’ – म्हणजे नंतर तयार झालेला पर्वत, त्यामुळे तो तुलनेने ठिसूळ. त्यात उत्तरकाशी, चामोली, टिहरी गढवाल हे उत्तराखंडचे जिल्हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील. या भागात १९९१ उत्तरकाशीत मोठा (६.८ रिक्टर क्षमतेचा) भूकंप झाला, तेवढ्याच क्षमतेचा भूकंप १९९९ मध्ये चामोली जिल्ह्यात झाला, तेव्हा टिहरी धरण प्रकल्प सरकारने रेटल्यामुळे भूकंप-प्रवणता वाढली, असा आरोप झाला. धरण बांधले जाण्यापूर्वी आणि बांधले जात असताना जे अभ्यास झालेले होते, त्यांआधारे हा आरोप खरा असल्याचेही दिसून आले. पण नव्या ‘चारधाम महामार्ग’ प्रकल्पासाठी तर ‘राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक बाब’ म्हणून पर्यावरण पडताळणीचीही गरज नसल्याचे सांगून तो रेटला गेला आहे. याच मार्गावरल्या सिलक्यारा- बारकोट बोगद्याच्या कामात हलगर्जी झाल्यामुळे तब्बल १६ दिवस, ४१ मजूर आतमध्ये अडकून पडले होते.
विशेषत: उत्तरकाशी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती खरोखरच दरडी, डोंगर कोसळण्याच्या दृष्टीने संवेदनशील आहे. या जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून ८०० मीटर ते ६९०० मीटर असे चढउतार आहेत. गंगा आणि यमुना या नद्यांच्या उगमांची मंदिरे उत्तरकाशी जिल्ह्यातच असली तरी, अन्यही अनेक नद्या या जिल्ह्यातील हिमनद्यांपासून (ग्लेशियरपासून) उगम पावतात आणि अखेर गंगा अथवा यमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवाहांना मिळतात. यापैकी नुकत्याच आपत्तीग्रस्त झालेल्या धराली गावातली ‘खीरगंगा’ नदी ही तर ठिसूळ डोंगरांचा मातकट गाळ घेऊनच वाहात असते. किंबहुना, या गाळाने नदीचे पाणी जाडसर – खिरीसारखे- झालेले असते, म्हणून तर तिला ‘खीरगंगा’ हे नाव मिळाल्याचे या नदीकाठचे मूळ रहिवासी सांगत असतात. या नदीने धराली गावात चिखलाचा पूर आणला, अर्धे गाव चिखलाखाली गेले, ते याचमुळे. परंतु धराली येथील आपत्तीचे कारण आधी ‘मेघोत्पात’ असे सांगितले गेले, त्यात तथ्य नसल्याचे आता उघड होते आहे.
ग्लेशियर (हिमनदीचे कवच) फुटले आणि म्हणून पाण्याचा प्रचंड साठा अफाट वेगाने खाली झेपावला, त्या लोंढ्यापासून वाचण्यासाठी वेळही मिळू शकला नाही. असे यापूर्वीच्या दशकभरात कधी घडलेले त्यामुळे ही घटना ‘फार दुर्मीळ’ असल्याचे अनेकांना वाटेल. पण तसे नाही. उत्तराखंडातल्या हिमनद्यांची कवचे वेगाने वितळू लागली आहेत. सन १९७५ ते २००० या २५ वर्षांत हा वेग वर्षाला सरासरी ०.२५ चौरस मीटर हिमकवचाची हानी, एवढा होता- तो आता सन २००० ते २०२३ च्या आकडेवारीनुसार वर्षाला सरारी ०.९३ चौरस मीटर इतका झाला आहे.
हिमनद्यांचे कवच वितळण्याचा वेग वाढला, याचे कारण जागतिक तापमानवाढीपर्यंत अर्थातच जाते. या भागात तापमानवाढीचा परिणाम असा की, आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे पावसाचे स्थानिक प्रमाण वाढू शकते. सध्या हे आर्द्रता प्रमाण सात टक्क्यांपर्यंत वाढते, असा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. पावसामुळे डोंगरांची धूप, दरडी कोसळण्याचा धोका वाढणे हे चक्र सुरूच राहाणार. त्यामुळे उत्तरकाशी, चामाेली आणि रुद्रप्रयागच्या दुर्गम व उंच भागांमध्ये स्वयंचलित वेधशाळा उपकरणे (एडब्ल्यूएस- ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स) चे जाळे उभारण्यासाठी हवामान क्षेत्रातील अनेक जाणकार आग्रही आहेत. या उपकरणांतील विदेचा संगणकीय अल्गोरिदमद्वारे क्षणोक्षणी आढावा घेऊन धोक्याचे पूर्वानुमान करता येऊ शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
थोडक्यात, उत्तराखंडच्या नैसर्गिक आपत्तींचे वाढीव संकट हे दुहेरी आहे. भागाची भौगोलिक स्थिती हे पहिले कारण; तर या हवामान बदल- जागतिक तापमानवाढ- हे दुसरे. पण तिसरेही कारण या संकटामागे आहे, ते म्हणजे पर्यावरणाचा विचारच न करता होत असलेला विकास. हा फक्त सरकारप्रणीत आणि महामार्गांचा विकास नव्हे, तर ‘पर्यटन विकासा’च्या नावाखाली कितीही हॉटेलांना परवानगी देणे, या हॉटेलांची कामचलाऊ बांधकामे, त्यातून वाढू शकणारी मनुष्यहानी याचाही विचार करावा लागेल. मुळात नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील भागात पर्यटनाला चालना किती द्यायची हेच योजनाबद्धरीत्या ठरवावे लागते. प्रसंगी पर्यटनवाढीला आळाच घालावा लागतो. महाराष्ट्राच्या ‘कास पठारा’पासून आपण पाहातो आहोत की पर्यटन-नियोजनाचे धडे कधी तरी घ्यावेच लागतात.
असे असताना चार धाम यात्रेचा मार्ग बारमाही करण्याच्या बढाया मारल्या जातात, त्यासाठी ‘राष्ट्रीय सुरक्षा’ हे असे कारण पुढे केले जाते की, त्याची कुणी माहितीही मागू शकणार नाही आणि विरोधही करू शकणार नाही.त्यामुळेच चारधाम यात्रेच्या टापूमध्ये ‘नैसर्गिक’ संकटांचे फटके बसण्याचे प्रमाण तिहेरी कारणांनी वाढू शकते.