दिनांक २१ जून २०२२. कोणत्याही सामान्य दिवसासारखाच आणखी एक दिवस. सकाळचा चहा घेतला आणि वर्तमानपत्र चाळायला घेतले. मथळे पाहून सावध झालो. काहीतरी वेगळे घडले होते. गेल्या काही दिवसांपासून काहीतरी धुमसत होते. पण इतक्यातच वादळ उठेल, असे काही वाटले नव्हते, मात्र घडायचे काही थांबत नाही. इथेही तसेच काहीसे झाले होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीला खिंडार पाडले होते.काही चित्रवाणी वाहिन्यांनी त्याचे वर्णन, राजकीय भूकंप असे केले. तेही बरोबरच म्हणा, बऱ्याच दिवसांनी राजकीय क्षेत्राला हादरा देणारी बातमी त्यांना मिळाली होती. आदल्याच दिवशी म्हणजे २० जूनला विधान परिषदेची निवडणूक झाली होती. त्यात महाविकास आघाडीने आणि त्यानंतर काही वेळाने भाजपनेही आपले आक्षेप नोंदविले. साहजिकच त्या आक्षेपांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय घेईपर्यंत मतमोजणी सुरू होऊ शकत नव्हती. काही काळानंतर दोन्ही पक्षांचे आक्षेप फेटाळल्याचा निकाल आला आणि मतमोजणी सुरू झाली. पण ती पूर्ण झाली तेव्हा काँग्रेस आणि शिवसेनेची काही मते फुटल्याचे वास्तवही समोर आले.

त्या धक्क्यातून सावरण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही पक्ष किंबहुना पूर्ण महाविकास आघाडी गुंतलेली असताना वेगळेच डावपेच सुरू होते आणि महाविकास आघाडीला त्याची कल्पनाच आली नाही.वास्तविक महाविकास आघाडीने सत्ताग्रहण केल्यापासूनच त्यांच्या गोटातले आमदार फोडण्याचे ‘पवित्र कार्य’ भाजपने सुरू केले होते. या वेळी मात्र आमदार एकनाथ शिंदे यांच्यासारखा मोठा मासा त्यांच्या गळाला लागला. गळाला एक मासा लागला होता. पण त्याच्या मागोमाग ३० – ३५ छोटे मासेही गेले. आपल्या घरात आपल्याच विरोधात शिजत असलेल्या कटाची कल्पना शिवसेनेला आली नाही. त्यामुळेच आमदार एकनाथ शिंदे आपल्या ताफ्यासहित सुरतेला सहीसलामत पोहोचले. अर्थात त्यांच्यामागे ‘पार्टी विथ डिफरन्स’ असल्याचा दावा करणाऱ्या ‘महाशक्ती’चे हात होते, हे सांगणे न लगे.

वास्तविक ही कुरबूर २०१९ च्या निवडणुकीपासूनच सुरू झाली होती. नेमके सांगायचे झाले तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून युती तोडली तेव्हापासूनच. भाजपसाठी हा केवळ धक्का नव्हता तर जिव्हारी लागलेला अपमानही होता. या अपमानाचे उट्टे काढण्याचे प्रयत्न भाजपने अडीच वर्षे सातत्याने सुरू ठेवले. देवेंद्र फडवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, प्रवीण दरेकर हे भाजपचे सर्व नेते वारंवार सरकार पाडण्याचे दावे करत राहिले.पण ही परिस्थिती कोणी निर्माण केली? २०१९ची निवडणूक होईपर्यंत शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता. मात्र भाजपने मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास ठाम विरोध दर्शवला. आपल्याला खोटे ठरविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे वारंवार करत असूनही भाजप आपल्या निर्णयावर ठाम राहिला. युती टिकवण्याचा प्रयत्न भाजपने केला नाही. शिवसेना स्वबळावर सत्तेत येणे अशक्य होते, तसेच शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपही सत्तेत येऊ शकत नव्हता. याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनुभवी नेतृत्त्वाने घेतला.

एकनाथ शिंदे यांनी बंडाला कोणताही तात्त्विक मुलामा दिला, तरी शिंदेंच्या बंडखोरीत राजकीय स्वार्थाशिवाय दुसरे काहीच आढळत नाही. उद्धव ठाकरे यांनी लगोलग आपले विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना शिंदे यांची समजूत काढण्यासाठी सुरतला पाठविले. ही भेट झाली व अर्धा तास चर्चाही झाली. काँग्रेस राष्ट्रवादीशी असलेली महाआघाडी सोडण्याची अट शिंदे यांनी घातली. पुढे काय झाले ते सर्वांनी पाहिलेच आहे.पण ही भूमिका घ्यायला एकनाथ शिंदेंनी फारच उशीर केला आहे. जे कारण त्यांनी बंडखोरीसाठी दिले आहे, तेच खरे कारण असते, तर त्यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळीच ही भूमिका घ्यायला हवी होती. ते तर त्यांनी केले नाहीच, मात्र महाआघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदही उपभोगले. त्यामुळे सध्याच्या त्यांच्या भूमिकेला फारतर संधीसाधूपणा म्हणता येईल.

‘हिंदुत्व’ की मराठीभाषक तरुण ?

बाळासाहेबांचे नाव घेत ‘त्यांचे हिंदुत्व खरे होते,’ असे शिंदे म्हणाले, मात्र शिवसेना स्थापन झाली तेव्हा भाजप आणि हिंदुत्व हे शब्दही शिवसेनेच्या कोशात नव्हते. शिवसेनेचा जन्म मराठी तरुणांच्या कल्याणासाठी झाला होता. प्रगतीच्या आणि विकासाच्या कुठल्याच टप्प्यावर मराठी तरुण दिसत नव्हता. हा तरुण प्राधान्याने हिंदू समाजाच्या चातुर्वर्णीय रचनेत बराच खाली होता. या वंचित मराठी तरुणाला आत्मभान देणारे बाळासाहेब ठाकरेच होते. आणि या मराठी माणसाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वात काहीच स्थान नव्हते. सावरकरांनी १९२३ साली आपला ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात प्रथमच त्यांनी हिंदुत्वाची संकल्पना आणि प्राचीन हिंदू संस्कृती विशद करून सांगितली आहे. या ग्रंथात या तळागाळातल्या वंचित शोषित तरुणाला काहीच स्थान नाही.

बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाविषयी बोलताना सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथाचा अभ्यास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.या रहस्यमय (की शोकांत) नाटकाचा शेवटचा अंक या सगळ्या घटनांवर मात करणारा आहे. २१ जूनच्या रात्री बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंबरोबर किमान ३५ ते ४० आमदार आहेत, असे सर्वांचेच म्हणणे आहे (खरा आकडा अजूनही कळलेला नाही) पण हा प्रवाह तिथेच आटला नाही. आणखी काही आमदारांनीही गुवाहाटीची वाट धरली. काही खासदारांनीही आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे जाहीर आश्वासन एकनाथ शिंदेंना दिले. खासदार-आमदारांच्या या शेवटच्या तुकडीने आम्ही इतरांपेक्षा अधिक प्रामाणिक आहोत, हे सिद्ध करण्यासाठी की काय आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागू नये, म्हणून आम्ही हा मार्ग स्वीकारला अशी जाहीर कबुली दिली. खरे म्हणजे या नाटकाचा शेवटचा अंक इथे संपायला हवा.

पण उद्या आठवडा उलटेल, तरीही शिंदे महाराष्ट्रात नाहीत. त्यांना साथ देणारे बहुतेक आमदारही अद्याप महाराष्ट्राबाहेर आहेत. शिंदे यांनी इथेही उशीर केला आहे. पण उजाडणारा प्रत्येक दिवस काही नवे नाट्य घेऊन उभा राहात आहे. तेव्हा आपण इथे स्वल्पविराम घेऊ या!

arumukadam@gmail.com