सतीश कामत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ गेल्या गुरुवारी नाशिकजवळील चांदवडमध्ये पोहोचली. त्या निमित्त ‘योद्धा शेतकरी’ शरद जोशी यांनी एके काळी याच चांदवडमध्ये घेतलेल्या शेतकरी महिला अधिवेशनाचे  स्मरण..

AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Neha Hiremath and Accused Fayaz
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
Hospital Ajit Pawar wakad
पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन! फुटपाथवर असलेल्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी नाही

अलीकडच्या काळात नाशिक जिल्हा तिथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळयांमुळे राष्ट्रीय पातळीवर जास्त प्रसिद्ध झाला असला तरी सुमारे ४० वर्षांपूर्वी हा जिल्हा शेतकरी आंदोलनाचं मोठं केंद्र होतं. शेतकरी संघटनेचे नेते कै. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या ऊस आंदोलनामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ सहभाग नोंदवला नाही, तर रक्तही सांडलं. अशा या जिल्ह्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ गेल्या गुरुवारी पोहोचली त्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शेतकरी आणि कांद्याच्या बाजारपेठेचा प्रश्न केंद्रस्थानी होता.

या चांदवड शहराला शेतकरी संघटनेच्या दृष्टीने आणखी ऐतिहासिक महत्त्व आहे. ते म्हणजे, १९८६ साली याच गावात शेतकरी संघटनेतर्फे देशातलं पहिलं शेतकरी महिला अधिवेशन आयोजित करण्यात आलं. त्याला सुमारे २५ हजार महिलांनी हजेरी लावली आणि अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी हा आकडा एक लाखापर्यंत गेला. हे विराट अधिवेशन शेतकरी संघटनेच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरला. त्यातूनच पुढे जोशी यांनी ‘लक्ष्मी मुक्ती’, ‘सीता शेती’ यासारखे शेती व्यवहारात स्त्रियांचा  हक्क प्रस्थापित करणारे अभिनव उपक्रम सुरू केले आणि त्यांना अभूतपूर्व  प्रतिसाद मिळाला.

चांदवड येथील नेमिनाथ जैन विद्यालयाच्या प्रांगणावर ९ ते १० नोव्हेंबर १९८६ हे दोन दिवस अधिवेशन झालं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं चांदवडशी असलेलं नातं लक्षात घेऊन अधिवेशन परिसराला त्यांचं नाव दिलं होतं आणि केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधूनही काही महिला प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये सहभागी झाल्या. विदर्भातील बऱ्याच शेतकरी महिला ६-७ नोव्हेंबरलाच घरची चटणी- भाकरी बांधून चांदवडला हजर झाल्या. नोव्हेंबर महिना असल्याने थंडी कडाक्याची होती. अधिवेशनाच्या आदल्या संध्याकाळी मैदानात काही ठिकाणी रात्रीच्या भाजी-भाकरीसाठी चुली पेटल्या होत्या आणि संघटनेकडून गादी-गिरद्यांची काही अपेक्षा न ठेवता,  जेवणानंतर अनेकजणी तिथेच निवांतपणे झोपी गेल्या. संघटनेकडून प्रवासखर्च सोडाच, राहण्या-जेवण्याचीसुद्धा फार व्यवस्था नसूनही हजारो महिला आल्या होत्या. आजच्या काळात याची कल्पनासुद्धा करता येणार नाही.

हेही वाचा >>> विनानुदानित शाळांना २५ टक्के आरक्षणापासून मोकळीक आणि अनुदानित शाळांवर जबाबदारी?

दुपारी बरोबर दोन वाजता खुलं अधिवेशन सुरू झालं. व्यासपीठाच्या पडद्यावर एका पाठुंगळी लहान मुलगी आणि हातात खुरपं घेतलेल्या शेतकरी महिलेचं चित्र. आयुष्याची लढाई लढत असलेली झाशीची राणीच जणू! ‘किसानांच्या बाया आम्ही, शेतकरी बाया,’ हे साने गुरुजींचं गीत आणि ‘डोंगरी शेत माझं ग, मी बेणू किती, आलं वरीस राबवलं, मी मरावं किती’ ही प्रसिद्ध कवी कै. नारायण सुर्वे यांची कविता महिलांनी समूह स्वरात गायली आणि सगळं वातावरण भारून गेलं. शेतकरी महिला अधिवेशनात हे गाणं म्हटलं गेलं, ‘हा कवी म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता’ असं सुर्वे यांनी नंतर एका प्रकट मुलाखतीत म्हटलं होतं. काही महिला कार्यकर्त्यांच्या भाषणांनंतर शरद जोशी यांचं भाषण झालं. त्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागात वाढलेली गुंडगिरी आणि महिलांवरच्या अत्याचारांचा उल्लेख करत स्थानिक पातळीवरची सत्ता महिलांच्या हाती दिली तर याला आळा बसेल, असं प्रतिपादन केलं आणि आगामी निवडणुकीत शेतकरी संघटना ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये फक्त महिला उमेदवार उभे करेल किंवा अन्य महिला उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी घोषणा केली. भावी वाटचालीच्या दृष्टीने अधिवेशनातला हा एक महत्त्वाचा निर्णय होता. संघटनेच्या आर्थिक अडचणींबाबतही जोशी आपल्या भाषणात बोलले. त्याला प्रतिसाद म्हणून अधिवेशनाला उपस्थित एका महिलेने स्वत:कडचा सोन्याचा दागिना जोशींना देऊ केला. पण, मी स्त्री-धन घेत नाही, असं सांगून त्यांनी तो नम्रपणे परत केला. शेतकरी महिलांचे कष्ट कमी करण्याची मागणी करणारे ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात आले. जोशींनी भाषणात घोषणा केलेल्या, निवडणुका लढवण्याच्या निर्णयाचाही त्यामध्ये समावेश होता. अधिवेशनाच्या अखेरीला सर्व उपस्थितांनी स्त्रियांच्या सन्मानाचा उद्घोष करणारी प्रतिज्ञा घेतली.

अधिवेशन संपल्यावरही अनेकजणी त्या परिसरात रेंगाळत होत्या. असं मुक्तपणे व्यक्त होणं त्यापैकी अनेकजणी कदाचित प्रथमच अनुभवत होत्या. एकमेकींच्या गळयात पडून निरोप घेताना पुढल्या कार्यक्रमाची आठवण करून देत होत्या. अनेक महिला जोशींचा निरोप घेण्यासाठी भेटत होत्या. त्या सर्वजणी त्यांना ‘भाऊ’ म्हणून संबोधत होत्या. गमतीचा भाग म्हणजे, बहुतेक महिलांचे पतीराजही शेतकरी संघटनेचे सदस्य होते. ते जोशींचा उल्लेख नेहमी ‘साहेब’ असा करायचे. पण या महिलांसाठी जोशी ‘भाऊ’ बनले होते. कारण त्यांच्या आयुष्यातलं दु:ख, वेदना जोशींनी अचूक टिपल्या होत्या आणि त्यांना वाचा फोडण्यासाठी व्यापक व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं. शेतकरी संघटना आता केवळ राज्यातल्या पुरुष शेतकऱ्यांची संघटना राहिली नव्हती. एका कुटुंबाची संघटना बनली होती.

हे अचानक घडलं नव्हतं. तसं पाहिलं तर भारतात आल्यानंतर जोशींनी सुरुवातीच्या काळात स्थानिक पातळीवर काही आंदोलनं केली. त्यामध्ये वांद्रे ते चाकण हा ६४ किलोमीटर लांबीचा पक्का रस्ता व्हावा, या मागणीसाठी त्या भागातील शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ काढला होता. त्यामध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या शिवाय त्यानंतर झालेल्या कांदा, ऊस, तंबाखू इत्यादी पिकांच्या हमीभावाच्या आंदोलनातही महिलांचा लक्षणीय सहभाग होता. १९८२ मध्ये सटाण्याला झालेल्या पहिल्या शेतकरी अधिवेशनात शेतकरी स्त्रियांच्या प्रश्नावर एक स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले आणि तिथून शेतकरी महिलांना स्वतंत्र स्थान देण्याच्या धोरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. चांदवडच्या अधिवेशनापूर्वीही काही ना काही निमित्ताने शेतकरी महिलांच्या छोटया बैठका, प्रशिक्षण शिबिरं होत होती. महिलांनी अधिवेशनाला यावं म्हणून स्वत: जोशी यांच्यासह संघटनेच्या काही प्रमुख महिला कार्यकर्त्यांनी राज्याच्या ग्रामीण भागात खेडोपाडी फिरून प्रचार आणि नियोजन केलं होतं. अलीकडच्या काळात चाललेली शेतकरी आंदोलनं पाहिली तर सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी जोशींच्या शेतकरी संघटनेची आंदोलनं किंवा या महिला अधिवेशनासारखा उपक्रम संयोजन, संघटन कौशल्याच्या दृष्टीने अचंबित करणारे आहेत. कारण त्या काळात प्रचाराची, संपर्काची साधनं खूपच कमी होती. शिवाय, शेतकरी संघटनेची आर्थिक ताकदही फारशी नव्हती. पण जोशींच्या विचाराने भारावलेल्या कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली होती. संघटनेच्या पाच-सहा वर्षांच्या वाटचालीत झालेल्या या पूर्वतयारीने महिला अधिवेशन यशस्वी करण्यात मोलाचा हातभार लावला.

अधिवेशनाहून परत येत असताना नाशिकमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री कै. विनायकराव पाटील यांची सहज भेट घेतली. गप्पांमध्ये महिला अधिवेशनाचा विषय निघाला. त्यावर टिप्पणी करताना विनायकराव म्हणाले, ‘यापूर्वी दोन व्यक्तींनी आमच्या घरातल्या महिलांना घराबाहेर पडण्यास उद्युक्त केलं. त्यापैकी एक होते, संत तुकडोजी महाराज आणि दुसरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे! या दोन्ही व्यक्तींबद्दल आमचा काही आक्षेप नव्हता. कारण तुकडोजी महाराज अध्यात्म सांगायचे, तर बाबासाहेब शिवचरित्र कथा!  शरद जोशी ही तिसरी व्यक्ती आहे, जिने आमच्या घरातल्या महिलेला आपल्या हक्कांसाठी घराबाहेर पडण्यास उद्युक्त केलं आणि हा माणूस आमच्यासाठी जास्त धोकादायक आहे.’ असं म्हणत ते नेहमीप्रमाणे मिश्किल हसले. या बोलण्यामध्ये राजकीय पदर होता, पण त्याचबरोबर जोशींच्या कर्तबगारीचं कौतुकही होतं. शेतकरी चळवळीतले एक बिनीचे शिलेदार कै. माधवराव खंडेराव मोरे हे विनायकरावांचे मामा. त्यामुळे त्याही बाजूने ते स्वत: चळवळीच्या पाठीशी होतेच.

या अधिवेशनापूर्वी १९८५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेने स्वत:चे उमेदवार उभे केले नव्हते. पण निवडणूक निकालावरून जोशींच्या असं लक्षात आलं की, एरवी आपल्या सभा-आंदोलनांना लाखोंनी गर्दी करणारे शेतकरी निवडणुकीच्या वेळी मात्र आपापल्या पक्षांच्या तंबूंचा आसरा घेतात. या महिला अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी समाजातील उरलेल्या ५० टक्के मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. कारण तोपर्यंत संघटनेचा राजकारणातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग उघड झाला होता. पुरुषांपेक्षा महिला जास्त कृतज्ञता बुद्धीच्या असतात, असंही एक निरीक्षण यामागे होतं. अधिवेशनानंतर काही दिवसांनी भेट झाली तेव्हा या ‘छुप्या अजेंडया’बद्दल छेडलं असता जोशींनीही हसत हसत मूकपणे दुजोरा दिला.

आपण दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन उत्साहाने साजरा करत असलो तरी एरवी आर्थिकदृष्टया दुर्बल किंवा ग्रामीण भागातल्या महिलेची स्थिती तशी हलाखीचीच असते. या पार्श्वभूमीवर या महिला अधिवेशनाने राज्यातल्या शेतकरी महिलेला प्रथमच तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची क्षमतेची जाहीर जाणीव करून दिली. त्यामुळे चांदवड हे तिच्यासाठी भौगोलिक नकाशावरचं गाव न राहता तिच्या सुप्त शक्तीच्या जागराचं केंद्र बनून राहिलं आहे. pemsatish.kamat@gmail.com