पाप आणि पुण्य समसमान झाले की माणसाचा जन्म लाभतो, असंही सांगतात. पण त्यात तथ्य नाही. माझे आधीचे जन्मं माणसाचेच असले तरीही त्यात तथ्य नाही. कारण मी जर सत्प्रवृत्त असेन तर मी जेवढे पुण्यकर्म करीन तितकेच पापकर्म मी करूच शकणार नाही. तसेच जर मी दुष्प्रवृत्त असेन तर जितके पापकर्म मी करीन तितकेच पुण्यकर्म मला साधूच शकणार नाही. अर्थात जिथे माझ्या प्रवृत्तीचा ओढा आहे ती गोष्ट अधिकच होणार. मग माणसाचा जन्म लाभतो कसा? श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘काही गोष्टी प्रयत्नसाध्य नाहीत. त्या भाग्याने येतात. मनुष्यजन्म तसा आहे. इतर योनीतून मनुष्यजन्म येणे हातचे नाही.’’ अर्थात माणसाचा हा जन्म माझ्या कर्तृत्वाने मिळालेला नाही तो भाग्याने मिळाला आहे. हे भाग्य कोणतं? तर अनंत जन्मांमध्ये माझ्यात कणभर का होईना सत्याची एक ओढ कधीतरी उत्पन्न झाली असलीच पाहिजे. जन्ममृत्यूच्या चक्रात पिचून कधीतरी मी कळवळून प्रार्थना केलीच असली पाहिजे. त्या प्रार्थनेचं, त्या ओढीचं भाग्य उजळलं आणि मग मला माणसाचा जन्म द्यायचा निर्णय परमात्म्यानं घेतला. मला माणसाचा जन्म दिला तो या चक्रातून सुटण्यासाठी. पण ते माझ्याच्यानं होणं महाकठीण हे लक्षात घेऊन त्यानं सांगितलं की सद्गुरूरूपानं मीच तुझ्या आयुष्यात येईन आणि बंधातून सुटण्याचा मार्गही दाखवीन आणि त्यावरून तुला चालण्याची कलाही शिकवीन. श्रीगोंदवलेकर महाराज यांचंच एक वाक्य आहे, ‘‘आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील, पण गुरू हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे.’’ (प्रवचने/१५ जुलै) तेव्हा प्रत्येक जन्मात ते माझ्याबरोबर असतात, माझी काळजी घेत असतात, मला सुटकेचा मार्ग दाखवीत असतात. आता मला खरंतर कोणत्या ना कोणत्या पशुपक्ष्याचा जन्म लाभणार होता पण भाग्यवशात मला माणसाचा जन्म लाभला. देह जरी माणसाचा लाभला तरी मला खरा जो जन्म लाभणार होता त्या पशुपक्ष्याच्या सवयी माझ्यात प्रधान असतात. उदाहरणार्थ मला कुत्र्याचा जन्म लाभणार होता पण माणसाचा लाभला, तर माझ्या सवयींवर, वृत्तीवर कुत्र्याच्या सवयींचा प्रभाव असेल.. याप्रमाणे. त्यामुळे माझ्या आयुष्यात जेव्हा सद्गुरू येतात तेव्हा ते माझ्या सवयींकडे पाहात नाहीत. कुणाला वाईट म्हणून ते झिडकारत वा नाकारत नाहीत. कारण मी माझ्या सवयींपुढे हतबल आहे, हे ते जाणतात. त्या मी मोडू शकत नाही, हे जाणतात. तरीही माझ्या उद्धारासाठी ते सरसावतात. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच.’’ (प्रवचने/ १८ जुलै) त्या उद्धारासाठीच तर मन, बुद्धी, भावना यांची जोड लाभलेला अजोड असा मनुष्य देह मला लाभला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2013 रोजी प्रकाशित
3. लाभ
पाप आणि पुण्य समसमान झाले की माणसाचा जन्म लाभतो, असंही सांगतात. पण त्यात तथ्य नाही. माझे आधीचे जन्मं माणसाचेच असले तरीही त्यात तथ्य नाही. कारण मी जर सत्प्रवृत्त असेन तर मी जेवढे पुण्यकर्म करीन तितकेच पापकर्म मी करूच शकणार नाही. तसेच जर मी दुष्प्रवृत्त असेन तर जितके पापकर्म मी करीन
First published on: 03-01-2013 at 03:57 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gain