सोने धातूची मौल्यवानता आणि अक्षय्य मूल्य हे जगभरात सर्वत्र सारखेच मान्यता पावले असले तरी आम्हा भारतीयांना सोन्याचा खासच सोस! जगभरात सोन्याचे भाव पडू लागले किंवा पडणार म्हटल्यावर लोक आपल्याकडची आहे नाही ती सुवर्णसंपदा रिती करू लागतात; तर आपल्याकडे सोन्याचा भाव खाली येताच खरेदीसाठी झुंबड उडताना दिसते. सोन्याचा जगातील क्रमांक एकचा ग्राहक देश असलेला भारत, म्हणूनच सोन्याचा सर्वात मोठा आयातदारही बनला आहे. देशातील घराघरांत कैक हजार टन सोने पडून आहे तरी गेली दोन-तीन वर्षे आपण सरासरी हजार टन सोन्याची वार्षिक आयात करीत आलो आहोत. कच्च्या तेलानंतर सोने आयातीवर देशाचे सर्वाधिक परकीय चलन खर्ची पडणे, हे डॉलरच्या तुलनेत कमजोर बनलेल्या रुपयाला सोसवणारे नव्हतेच. शिवाय अमेरिका, युरोप या आपल्याकडे तयार वस्त्रे, रत्न-आभूषणे, चर्म उत्पादने वगैरेच्या निर्यात बाजारपेठा मंदीने घेरलेल्या असताना, आयात-निर्यातीच्या बिघडलेल्या संतुलनात सोने आयातीवरील वाढता खर्च चालू खात्यावरील तुटीला खिंडार पाडणाराच ठरतो. त्यामुळेच मग सरकारने गेल्या वर्षभरात भारतीयांच्या सोने हव्यासाला पायबंद म्हणून, सोन्याच्या आयातीवर मोठी शुल्कवाढ करून ती महाग बनविली. सामान्यांना विदेशातून सुवर्ण नाणी आणण्यावर बंदी घालण्यात आली, तर सोन्याची आभूषणे मर्यादित प्रमाणात आणता येतील, पण त्यावर १५ टक्के आयातशुल्क भरावे लागेल, अशी तरतूद करण्यात आली. परिणामी देशांतर्गत सोन्याचा भाव कृत्रिमरीत्या फुगलाच, प्रति डॉलर ६०-६२ च्या घरात अवमूल्यन झालेल्या रुपयाने सोन्याच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत भावात तब्बल २२-२५ टक्क्यांची दरी निर्माण झाली. भावातील ही तफावत म्हणजे सोने तस्करांसाठी कुरणच ठरते. अमेरिका, युरोपीय महासंघातील आर्थिक अडचणीत सापडलेले देश जसजसे उभारीचे संकेत देत आहेत, तसतसे तेथील गुंतवणूकदारांनी सोन्याचा सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेला घरोबा कमी होत चालला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे मोल ओसरतच चालले आहे. तस्करी वाढेल असे विश्लेषक आणि अर्थतज्ज्ञांचे इशारे होतेच आणि उत्तरोत्तर अर्थस्थिती तस्करांसाठी पोषकच बनत चालली आहे. चोरटय़ा मार्गाने देशात सोन्याला पाय फुटल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांमधून स्पष्टही होते. गेल्या वर्षांत एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी चोरटय़ा मार्गाने आलेले जितके सोने पकडले, ते त्याआधीच्या संपूर्ण वर्षांत पकडलेल्या सोन्यापेक्षा दुप्पट होते. तर सोने व्यापाराचा तपशील राखणाऱ्या वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते आधीच्या वर्षांतील सुमारे ९०० टनांवरून यंदाच्या संपूर्ण वर्षांत एकूण सोने आयात ६०० टनांवर उतरेल, पण तस्करीचा आकडा २०० टनांपल्याड गेलेला असेल. म्हणजे आयातशुल्क वाढ, आयात बंदीचे सारे मुसळ केरातच म्हणा! सोन्याला फुटलेले हे चोरटे पाय आता पुरते चव्हाटय़ावर आले असल्याने विमानतळांवरील सुरक्षा यंत्रणेचे लक्ष त्याकडे वळणे स्वाभाविकच आहे. गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस, शुक्रवारी एकटय़ा मुंबई विमानतळावर नऊ तासांत आठ जण सोने आणताना पकडले जाणे हे याचेच द्योतक आहे. गेल्या सप्टेंबरपासूनच देशातील विमानतळांवर सोन्यासाठी नजर ठेवण्याचा ताण सुरक्षा यंत्रणांवर पडू लागला आहे. सारे लक्ष केवळ सोने तस्करीवर एकवटले असताना, अन्य अधिक धोकादायक माल-जिन्नस अधिकाऱ्यांच्या नजरेतून सहीसलामत सुटावेत हा धोकाही बळावला आहे. एकुणात लोकांचा सोन्याचा सोस एकूण अर्थव्यवस्थेला डोईजड बनलाच आहे, आता तो देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही आव्हानात्मक बनू पाहत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold smuggling growing threat to national security
First published on: 21-01-2014 at 12:12 IST