भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात भगवंत सांगतात, ‘‘इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्य: परं मन:। मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे: परतस्तु स:।।’’ (श्लोक ४२वा). म्हणजे इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा आत्मस्वरूप श्रेष्ठ आहे तर मग बुद्धी मनाच्या ताब्यात कशी असेल, असा प्रश्न आहे! मला इथे माउलींचंच रूपक आठवतं. वीरश्रेष्ठ अर्जुन रणांगणावर आप्तांना पाहून मोहव्याकूळ झाला. त्यावर माउली म्हणतात, ‘‘जैसा भ्रमर भेदी कोडें। भलतैसे काष्ठ कोरडें।’’ भुंगा कसा असतो? तो कोणतंही कोरडं लाकूड का असेना, पोखरून टाकतो, पण.. ‘‘परि कळिकेमाजी सांपडे। कोवळिये।। तेथ उत्तीर्ण होईल प्राणें। परी तें कमळदळ चिरूं नेणे। तैसें कठीण कोवळेपणें। स्नेह देखा।।’’ हाच भुंगा पाकळ्या मिटलेल्या कमळात अडकला ना, तर एकवेळ प्राण गमावेल, पण त्या नाजूक पाकळ्या पोखरणार नाही! स्नेहमोह असा कोमल पण महाकठीण आहे! आता मोह मनात उत्पन्न होतो आणि बुद्धीला कह्य़ात घेतोच ना? तर इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा आत्मस्वरूप श्रेष्ठ आहे, हे सांगण्याचं कारण खरा प्राधान्यक्रम कशाला दिला पाहिजे, हे बिंबवणं आहे. नुसती बुद्धी श्रेष्ठ नाही, आत्मस्वरूपस्थ बुद्धी श्रेष्ठ आहे. नुसतं मन श्रेष्ठ नाही, आत्मबुद्धीच्या ताब्यातलं मन श्रेष्ठ आहे. नुसती इंद्रियं श्रेष्ठ नाहीत, आत्मबुद्धीच्या ताब्यातील मनानं संयमित इंद्रियं श्रेष्ठ आहेत! तेव्हा आज मनाच्या ताब्यात बुद्धी असेल, तर मन समर्पित झालं की बुद्धी समर्पित होईल. आता आणखी एक गोष्ट पाहा! मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चार गोष्टींनी आपलं अंत:करण बनलं आहे. म्हणून या चार गोष्टींना अंत:करण चातुष्टय़ म्हणतात. मग इथे मन आणि बुद्धी या दोघांचाच उल्लेख का? कारण मन आणि बुद्धी सूक्ष्म आहेच, पण चित्त आणि अहं अधिकच सूक्ष्म आहे! ‘अहं’ तर मूळ स्फुरणच आहे. ‘मी’पणाचा एकमेव आधार आहे. ‘जे हवं ते कसंही करून मिळवायचंच,’ या वासनेनं युक्त अंत:करणाच्या तमोगुणप्रधान भागालाच ‘अहं’ म्हणतात. त्या प्राप्तीसाठी अंत:करणाचं जे रजोगुणप्रधान अंग इंद्रियांना कामाला जुंपतं त्या अंत:करणाच्या रजोगुणप्रधान अंगालाच ‘मन’ म्हणतात. ‘अहं’च्या स्फुरणानुसार व मनाच्या प्रेरणेनुसार संकल्प उत्पन्न होत असतानाही व कृती घडत असतानाही त्यात योग्य काय, अयोग्य काय, याची जाणीव अंत:करणाचं जे सत्त्वगुणप्रधान अंग करून देत असतं त्यालाच ‘बुद्धी’ म्हणतात. या मन, अहं, बुद्धीच्या प्रत्येक तरंगाचा साठा जिथे होतो, त्याला ‘चित्त’ म्हणतात.  या तिन्हींच्या अनंत तरंगांची साठवण असल्याने हे चित्तही त्रिगुणांनी संस्कारित असतं. अनंत विकार, अनंत संकल्प-विकल्पांनी भरलेलं चित्त मलीन होऊन जातं. मन, बुद्धीच्या कार्यप्रक्रियेत हेच चित्त, अर्थात चित्तातले ठसे सोबत करतात. त्यामुळेच चित्तशुद्धी, मनाचं न-मन आणि बुद्धीची सद्बुद्धी होणं, या गोष्टी साधनेचं लक्ष्य असतात. मन, चित्त आणि बुद्धी सद्गुरूचरणी एकवटली तर ‘अहं’च्या ऐवजी ‘सोऽहं’चं स्फुरण होईल! हे साधण्याचा सोपा उपाय ‘नित्यपाठा’तील पुढील दोन ओव्या सांगतात.