‘सेनेचे हिंदुत्व आरपीआयला मान्य’ असल्याचे आणि तरीही ‘आपण आंबेडकरवाद सोडलेला नाही’ अशी वक्तव्ये रामदास आठवले यांनी केल्याचे वृत्त (लोकसत्ता, २१ जून) वाचले. आठवले गट पुरस्कृत शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग सुरू झाला, तेव्हापासून त्यांनी आंबेडकरी विचारधारेचे बोट सोडून हिंदुत्वाचे पाय धरल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. आंबेडकरी विचारधारा सत्ता मिळवून देण्यासाठी नव्हे तर देशातील सर्वाधिक उपेक्षित समाज विभागांना ‘मोकळा श्वास’ घेता यावा म्हणून उत्क्रांत झाली असल्याचे आठवलेच काय पण ‘न आठवणारे’ अन्य नेतेदेखील साफ विसरून गेले आहेत. त्यामुळे अशा मंडळींनी आंबेडकर यांना मानले काय आणि न मानले काय, काही फरक राहिलेला नाही.
या लोकांना आता गळून पडलेल्या शेंडीला आणि भगव्या झेंडय़ाला नव्याने ‘स्पर्श’ करण्याची मुळात गरजच काय, हा खरा प्रश्न आहे. ‘ओम भवति भिक्षांदेहि’ म्हणत देशातील प्रस्थापित राजकीय पक्षांच्या दारात उभे राहण्याची पाळी आठवले यांनी स्वत:वर ओढवून घेतली असून जीर्ण झालेला खुंटा हलवून बळकट करण्याचा त्यांचा प्रयत्न एकाच वेळी हिंदुत्वाचे राजकारण समर्थ करणारा आणि त्याच वेळी दलित बहुजनांच्या विकास प्रक्रियेचा बळी घेणारा असल्याचे या सांप्रतकालीन रामदासांना कळतच नसेल असे नाही.
खरी गोष्ट अशी की त्यांना ठाकरे, पवार यांच्याप्रमाणे सतत बातम्यांत राहायचे आहे आणि ही हौस फिटवून घेण्यासाठी त्यांनी नव्या भाषाप्रभुत्वाचा आव आणला आहे. शिवसेना-भाजप सेना -भीमसेना एकत्र आल्या की अखिल भारतीय सत्ताकेंद्र यांच्याच ताब्यात येणार अशी त्यांनी कल्पना करून घेतली आहे. पण या कल्पनेचा अन्वयार्थ लागण्यापूर्वीच त्यांनी सेना-मनसे यांनी एकत्र यावे म्हणून ठेवले आणि उभय पक्षप्रमुखांनी डोळे वटारल्यावर मान फिरवली; इतकी की त्यांना आंबेडकरांचा पुतळादेखील दिसेनासा झाला! याआधी त्यांनी मोदींना हार घातल्याचे (आणि हिंदुत्वाच्या बामणी काव्यासमोर हार मानल्याचे) चित्र सर्वत्र झाले. अगदी अलीकडेच ‘प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर आले तर त्यांना आम्ही राष्ट्रीय अध्यक्षपद देऊ’ अशी हाकाटी त्यांनी केली आणि आपले राजकीय शहाणपण काय दर्जाचे आहे याचे नको तेवढे यथार्थ दर्शन घडविले!
शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा संदर्भ देणाऱ्या आठवलेंना ते हिंदवी आणि आजचे हिंदुत्व यातील फरक कळत नसावा असेच दिसते. शिवरायांनी मुघल राजवटीच्या विरोधात जाऊन स्वराज्याची स्थापना केली हा त्यांचा राजकीय प्रयत्न होता; पण वेळी शिवरायांनी तत्कालीन ब्राह्मण, ९६ कुळी मराठे आणि अन्य सरंजामी मंडळींच्या विरोधातदेखील तीव्र संघर्ष करून शोषित बहुजन- दलित मुस्लिमांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले होते. ते िहदवी होते आणि आज हिंदुत्व असून हे राजकारण एकाच वेळी धर्मनिरपेक्ष लोकशाही, राज्यघटना आणि विविध उपेक्षित समाज विभाग यांच्या विकासाच्या विरोधात जाणारे राजकारण असल्याचे वास्तव समजले असते तर हे रामदास त्या वाटेने गेले नसते. समजूनदेखील त्यांनी जायचे ठरविले असेल तर त्यांनी आंबेडकर यांचे नाव घेण्याचे बंद करायला हवे. स्व-हिमतीवर त्यांनी हवे तर खासदार काय, पंतप्रधानदेखील व्हावे.
प्रदीप देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवासी कंपन्यांसाठी काहीच नियमावली नाही?
चारधाम यात्रेसंदर्भात पुण्याच्या प्रवासी कंपनीशी संबंधित बातमी वाचली. गेल्या महिन्यात आम्हालाही मुंबईच्या एका (आता दिवाळखोरीत निघालेल्या) ट्रॅव्हल कंपनीचा असाच विदारक अनुभव आला.
विविध ठिकाणच्या आम्ही वीस पर्यटकांनी आठ दिवसांच्या उत्तरांचल टूरसाठी आगाऊ पसे भरून नोंदणी केली होती. परंतु या कंपनीने बस आणि हॉटेलांची जुनी देणी थकविल्यामुळे आमची चांगलीच अडचण झाली. दिल्ली ते ननिताल प्रवासात बसचालकाने त्याच्या मुख्य कार्यालयाच्या निर्देशावरून संध्याकाळी जंगलातच बस रोखून धरली. ननितालच्या सार्थक हॉटेलच्या मालकाने रात्री बारा वाजता पोलीस बोलाविले आणि नियोजित दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून चेकआउट करण्यास मज्जाव केला. पूर्ण पसे आगाऊ भरूनही आम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अखेरीस आमच्या ग्रुपमधील एका सद्गृहस्थांनी दिल्लीमधील अत्यंत मोठय़ा नेत्याशी संपर्क साधला. त्यांच्या सत्वर मध्यस्थीने आणि एका सहृदय मराठी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या तत्काळ कृतीमुळे स्थानिक पोलीस प्रशासन हलले. त्यांनी ताबडतोब पवित्रा बदलला आणि आम्हाला हॉटेल सोडण्यास परवानगी दिली. त्यानंतर कॉब्रेट पार्क येथे आमच्या टूरसोबत असलेला व्यवस्थापक आम्हाला त्या जंगलात सोडून पळून गेला. त्या अर्थशून्य सफारीवरून आम्ही परतलो तेव्हा सफारी जीप्सच्या मालकांनी आम्हाला घेरले आणि पसे चुकवण्यासाठी दमदाटी केली. परक्या मुलखात नाइलाजाने आम्हाला पसे भरावे लागले. या बातम्या काही वृत्तपत्रांत छापून आल्या होत्या, त्यावरही ‘ही टूर माझी नाही’ आदी दावे मूळ कंपनीच्या चालकांनी करून पाहिले, ते आमच्याकडील पावत्यांमुळे खोटे ठरले.
परंतु या संपूर्ण अनुभवामधून आम्ही हे शिकलो की टूर कंपनी कितीही नावाजलेली असली तरी प्रवासी तिच्यावर पूर्णत: विसंबून राहू शकत नाहीत. प्रवासी कंपन्या हॉटेल बुकिंग, बस बुकिंग व्हाउचर्स यांच्या प्रती प्रवाशांच्या हाती आगाऊ देत नसल्याने केवळ त्यांच्या नावाच्या आणि देवाच्या भरवशावर टूर पार पाडावी लागते. प्रवासी कंपन्यांसाठी सरकारने याबाबतीत काही नियमावली जारी करणे आता आवश्यक बनत आहे.
राजेश आजगांवकर, जोगेश्वरी

नियम मोडणाऱ्यांमुळे पाळणाऱ्यांनाही खोडा
मुंबई वा अन्य शहरांत खर्च आणि वेळ वाचण्याच्या दृष्टीने दुचाकीवरून प्रवास करणेच बऱ्याचदा इष्ट ठरते, परंतु दुचाकीस्वारांना मुंबईतील अनेक उड्डाणपूल, सागरी सेतू तसेच नव्याने झालेला मुक्त मार्ग यावरून जाण्यास मनाई आहे. म्हणजे या नवीन रस्त्यांमुळे इतर रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये थोडी घट झाली असली तरी दुचाकीस्वारांना प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत फारशी घट झाली नाही. तसेच वाहतूक कोंडी, सिग्नल आणि रस्त्यांची दुर्दशा यांना पूर्वीप्रमाणेच तोंड द्यावे लागत आहे.
चारचाकी वाहनांना होणाऱ्या अडचणी आणि दुचाकीस्वारांचे होणारे अपघात ही या मनाईमागील प्रमुख कारणे आहेत. अती वेग, एकमेकांशी स्पर्धा, हेल्मेट न वापरणे यांमुळे अपघातास कारण होणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण अल्प असले तरी त्याचा परिणाम इतरांवर होतोच.
नाशिक येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले आणि लगेच तेथे दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला. या आणि अशा घटनांमुळे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या अनेक नागरिकांची अडचण होते हे प्रशासनाने (आणि नियम न पाळणाऱ्या दुचाकीस्वारांनीसुद्धा) लक्षात घ्यायला हवे. प्रशासनाने नवीन रस्त्यांवर दुचाकीस्वारांना मुभा द्यावी, ही अपेक्षाही मग रास्तच ठरेल.
अभिषेक पराडकर, वरळी (मुंबई)

तारेमधला ‘रोमन’ तांब्या!
‘कट्ट कड कट्ट’ हा अग्रलेख (शनिवारचे संपादकीय, १५ जून) वाचून वयाच्या ९८ व्या वर्षी, माझ्या आयुष्यातील एक तार आठवली. माझे ज्येष्ठ बंधू व काँग्रेस सेवादलाचे भूतपूर्व प्रमुख संघटक कै. स. वा इनामदार हे सन १९३२ मध्ये स्वातंत्र्यलढय़ात राजबंदी असताना त्यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करावी लागली. अशातच, त्यांनी हिकमतीने केलेल्या पलायनाप्रकरणी दुसरा खटला शस्त्रक्रियेची जखम भरली नसतानाच विसापूर येथे चालविण्यात आला. त्या वेळी तेथे गेलेले माझे दुसरे वडील बंधू बा. वा. इनामदार यांनी बंधूंना जखमेमुळे तहान अधिक लागत असल्याचे पाहून, त्यांना पुन्हा रेल्वेने साताऱ्याला नेले जाण्यापूर्वीच मला तारेने कळविले : ं३३ील्ल ि २३ं३्रल्ल ्रेी्िरं३ी’८ ६्र३ँ ऋ्र१‘्रूँं ३ंेु८ं तारेतील ‘फिरकीचा तांब्या’ हे शब्द रोमन लिपीतून कळण्यास जड गेले, पण अर्थबोध होऊन मी तो तांब्या स्टेशनावर पोहोचविला!
व. वा. इनामदार, वांद्रे (पूर्व)  

योजनाच बंद करा
निराधार योजनेतील घोटाळ्याची बातमी (लोकसत्ता २० आणि २१ जून) वाचली आणि आता तरी अशा भीक घालणाऱ्या योजना बंद कराव्यात अशी सद्बुद्धी सरकारला सुचेल अशी आशा वाटली.  या योजनेचा थोडाही फायदा लाभार्थीना होत असता तर ही योजना खपवून घेता आली असती, ही योजना म्हणजे सरकारचे गरिबांना मदत करण्याचे ढोंग आहे. अशा भ्रष्टाचाराने माखलेल्या आणि अनुत्पादक योजना चालवण्यापेक्षा सरकारने विकास कामासाठी या पशाचा वापर करावा.
ओंकार चेऊलवार, परभणी</strong>

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindutva ambedkar hinduism and wiseness of athawale
First published on: 22-06-2013 at 12:54 IST