हा गेल्या शतकात इंग्रजीत आलेल्या जागतिक साहित्याचा नकाशा..  देशोदेशींच्या लेखकांनी ऐरणीवर आणलेल्या आधुनिक प्रश्नांची ठिकाणं दाखवणारा आणि साहित्याच्या अक्षांश-रेखांशांवर हे लेखक कुठे  आहेत, यावरही बोट ठेवणारा.. या सदराचा पहिला मानकरी आहे पोर्तुगीज साहित्यात एकहाती आधुनिकवाद आणणारा फर्नादो पेसोआ.
पोर्तुगीज कवी फर्नादो पेसोआला खुद्द पोर्तुगालमध्ये १९४० पर्यंत फारसं कोणी ओळखत नव्हतं. ३० नोव्हेंबर १९३५ या दिवशी लिस्बन शहरी राहत असलेला हा अठ्ठेचाळीस वर्षांचा कवी मरण पावला तेव्हा त्याच्या नावावर फक्त एक कवितासंग्रह, नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या दीडेकशे कविता, काही इंग्रजी कविता आणि काही समीक्षा व राजकीय स्वरूपाचे लेख इतकंच साहित्य जमा होतं.
पण पेसोआचा अमेरिकी अभ्यासक-अनुवादक रिचर्ड झेनिथ याने म्हटल्याप्रमाणे त्याचा लौकिक मृत्यू ही घटनाच एका ‘विशाल’ कवीच्या जन्माचा प्रारंभ होता. त्याच्या मृत्यूनंतर चार-पाच वर्षांनी त्याच्या घरातला मोठा पेटारा उघडण्यात आला आणि बाटलीतून महाकाय जीन निघावा तसा एक महाकाय अस्ताव्यस्त लेखक त्या पेटाऱ्यातून बाहेर आला. पेसोआचं तोवरचं प्रकाशित साहित्य हे केवळ हिमनगाचं टोक होतं याची अभ्यासकांना जाणीव झाली. त्या पेटाऱ्यात त्यांना एकोणतीस वह्य़ा आणि पंचवीस हजारांहून अधिक सुटे कागद – इतकं लेखन सापडलं. यातले काही कागद हस्तलिखित तर काही टंकलिखित होते. काही वाचताही येणार नाहीत इतक्या बारीक अक्षरांत लिहिलेले होते. त्यात शेकडो कविता, कथा, नाटकं, समीक्षा, तत्त्वज्ञान, भाषाविज्ञान, अनुवाद, राजकीय लेखन, ज्योतिष-गूढविद्या या विषयांवरचं लेखन असं सर्व प्रकारचं साहित्य होतं. अर्धवट राहिलेलं लेखन संख्येनं अधिक होतं. या कागदांचं संशोधन, संपादन करून, कागदांच्या त्या गुंताळ्यातून पेसोआच्या काही साहित्यकृती आकाराला आणण्याचा वाङ्मयीन उद्योग गेली सत्तर र्वष अव्याहतपणे चालू आहे.
पेसोआची टोपणनावांनी लिहिण्याची सवय त्याच्या हयातीतच पोर्तुगीज वाचकांच्या परिचयाची झाली होती. पण ही केवळ टोपणनावं नव्हती. त्या प्रत्येक नावाला पेसोआने लौकिक चरित्र (जन्म, शिक्षण, व्यवसाय), वैचारिक आणि वाङ्मयीन भूमिका इत्यादी गोष्टी बहाल केल्या होत्या. अल्बेर्तो कायरो, रिकार्दो रीस, अल्वारो-द-काम्पोस यांच्या नावांनी नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या कविता वाचकांनी वाचल्या होत्या. पण पेसोआचा पेटारा उघडल्यानंतर अभ्यासकांना कळलं की पेसोआने निर्माण केलेल्या अशा कवी-लेखकांच्या कल्पित व्यक्तिरेखांची एकूण संख्या पन्नासच्या आसपास होती. पेसोआने स्वत:च्या नावाने लिहिलेलं साहित्य तर त्यात होतंच. पण त्याशिवाय अनेक अनुवादक, तत्त्वज्ञ, राजकीय भाष्यकार, ज्योतिष-लेखक, इंग्रजीत लिहिणारे दोन कवी, फ्रेंचमध्ये लिहिणारा एक कवी आणि एक पोर्तुगीज भाषेत लिहिणारी कवयित्री यांचा देखील समावेश होता. या प्रत्येकाला आपापलं आयुष्य होतं. अल्वारो-द-काम्पोस हा नेव्हल इंजिनीयर असलेला कवी इंग्लंडमध्ये काही र्वष राहून आला होता, तर रिकार्दो रीस हा व्यवसायाने डॉक्टर होता. पेसोआने त्याला ब्राझीलला पाठवलं आणि तिथंच स्थायिक केलं. या ‘कल्पित’ कवींनी पेसोआच्या बरोबरीने केवळ कविताच लिहिल्या नाहीत, तर परस्परांच्या साहित्याची कठोर चिकित्सा करणारे लेख लिहिले, एकमेकांना पत्रं लिहिली; पेसोआशी आणि परस्परांशी आपापल्या भूमिकांतून वादविवाद केले. या संपूर्ण साहित्याची छाननी अद्यापही चालूच असल्याने, पेसोआचं फार कमी साहित्य आजवर मूळ पोर्तुगीजमध्ये आणि इंग्रजीमध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झालं आहे. पेसोआच्या या पेटाऱ्याचा तळ संशोधकांना अजूनही गवसलेला नाही.
आज समीक्षक म्हणतात, पोर्तुगीज साहित्यात आधुनिकवाद (modernism) पेसोआने अक्षरश: एकहाती आणला. आधुनिकवादातल्या दोन महत्त्वाच्या चळवळी, घनवाद (cubism) आणि प्रतिकवाद (symbolism) यांचा पेसोआ आणि अल्वारो-द-काम्पोस यांच्या कवितांवर प्रभाव आहे. अल्बेर्तो कायरोच्या कवितांमध्ये  झेन तत्त्वज्ञानाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं; तर रिकाडरे रीसच्या कविता अभिजातवादाकडे झुकलेल्या आहेत. ‘बुक ऑफ डिसक्वाएट’ (अस्वस्थ माणसाची नोंदवही) या ‘न-कादंबरी’चा निवेदक आणि नायक (किंवा ‘न-नायक’) बर्नार्दो सोरेस हा काफ्काच्या अस्तित्ववादी नायकांच्या कुळीतला, त्यांचा पूर्वसुरी शोभेल असा आहे. पेसोआच्या कवितांमुळे आणि ‘द बुक ऑफ डिसक्वाएट’, ‘द एज्युकेशन ऑफ द स्टॉइक’ या कादंबरीसदृश गद्य पुस्तकांमुळे तो रिल्के, रॅम्बो, बॉदलेअर, जेम्स जॉईस, काफ्का, काम्यू अशा विसाव्या शतकातल्या महान लेखकांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
साहित्याविषयीचे संकेत मोडणे हे आधुनिकवादातलं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. पेसोआने संकेतांना उद्ध्वस्त करण्याचं कार्य साहित्यनिर्मितीच्या सर्व पातळ्यांवर केलं. ‘बुक ऑफ डिसक्वाएट’ हे महत्त्वाकांक्षी पुस्तक १९१३ पासून पुढे तो मृत्यूपर्यंत लिहीत होता. बर्नाडरे सोरेस हा लिस्बनमध्ये एकटेपण भोगत जगणारा कारकून आपल्या मनातले विचार लिहून ठेवतो, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्याची शेकडो पानं पेटाऱ्यातल्या निरनिराळ्या लिफाफ्यांमध्ये ठेवलेली सापडली. आयुष्याच्या टप्प्यावर अनेक वेळा त्याची या पुस्तकाविषयीची योजना बदलत गेली. एकदा नायकही बदलला. काही नोंदींवर पेसोआने क्रमांक घातले होते, तर काही नोंदी ‘बुक ऑफ डिसक्वाएट’मध्ये समाविष्ट करायच्या किंवा नाहीत याविषयी त्याच्या मनात शेवटपर्यंत संदिग्धता होती. त्यामुळे पेटाऱ्यात सापडलेल्या सर्व नोंदींची छाननी करून त्यापासून ‘बुक ऑफ डिसक्वाएट’ची पोर्तुगीज भाषेतली अंतिम प्रत तयार व्हायला १९८२ साल उजाडावं लागलं. आणि त्यानंतरही प्रकाशित झालेलं हे पुस्तक निर्णायकरीत्या अंतिम प्रत आहेच असं म्हणता येणार नाही. इंग्रजीमध्ये या पुस्तकाची अनेक भाषांतरं उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक आवृत्तीत नोंदींची संख्या वेगवेगळी आहे, क्रम वेगळे आहेत. मूळ पोर्तुगीज आवृत्तीशी प्रामाणिक राहत सर्व नोंदी (अगदी संशयास्पद नोंदींसह) समाविष्ट असलेलं ‘बुक ऑफ डिसक्वाएट’चं इंग्रजी भाषांतर रिचर्ड झेनिथ याने केलं आहे. लेखन अर्धवट ठेवण्याची किंबहुना त्याला निश्चित ‘आकार’ न देण्याची पेसोआची प्रवृत्ती या एकाच पुस्तकापुरती मर्यादित नाही. ‘द एज्युकेशन ऑफ स्टॉइक’ या पुस्तकाचा कल्पित लेखक बॅरन ऑफ तीव्ह याने, आपण पुस्तकाला पूर्णत्व देऊ शकत नाही म्हणून आलेल्या निराशेपोटी आत्महत्या केल्याचं पेसोआने लिहून ठेवलं आहे. याशिवाय त्याच्या बऱ्याच कथा, नाटकंही अपूर्ण अवस्थेत सापडली आहेत. पेसोआसाठी लेखन ही आयुष्यभर निरंतर चालणारी कृती होती. त्यामुळेच पुस्तक लिहून संपवणं आणि ते प्रकाशित करणं या गोष्टी त्याला अप्रिय असाव्यात.
एखाद्या लेखकाचं व्यक्तिमत्त्व त्याच्या सर्व साहित्यातून सुसंगतपणे उभं राहत असतं, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. पेसोआने या समजुतीलाच सुरुंग लावला. त्याने साहित्य तर निर्माण केलंच, पण त्याचबरोबर या साहित्याच्या निर्मात्यांनाही निर्माण केलं. वाचक हे साहित्य वाचतो, तेव्हा त्यातून त्याला पेसोआच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा, भूमिकेचा थांगही लागत नाही. वाचकाला भेटतो तो रिकार्दो रीस किंवा बर्नार्दो सोरेस. स्वत:च्या लेखनापासून इतकं तटस्थ राहणं पेसोआला कसं साधलं असेल? इतरही लेखक कथा-कादंबऱ्यांतून पात्रांची निर्मिती करून त्यांना त्यांचे त्यांचे विचार, भूमिका देत असतातच. पण अशा पात्रांना त्या कथा-कादंबरीबाहेर मुळीच अस्तित्व  नसतं. अशी पात्रं निर्माण करणं वेगळं आणि त्यांच्या भूमिकेत शिरून कथा, कविता लिहीत राहणं वेगळं. रिकाडरे रीस किंवा अल्बेर्तो कायरो किंवा बर्नार्दो सोरेस हे त्यांच्या कविता-कादंबरीबाहेरही लेखांतून, पत्रव्यवहारांतून, त्यांच्याविषयी पेसोआने लिहिलेल्या नोंदींमधून अस्तित्वात आहेत. मुख्य म्हणजे पेसोआ जिवंत होता तोवर ते त्याच्या मनात अस्तित्वात होते. या ‘अस्तित्वा’त इतक्या साऱ्या लोकांची गर्दी असल्यामुळे मला स्वत:ची स्वतंत्र अशी जाणीवच उरलेली नाही’, अशी तक्रार पेसोआने नोंदवून ठेवली आहे. याचा दुसरा अर्थ असा की, पेसोआ आणि कंपनीने केलेलं संपूर्ण लेखन (कविता, कथा, नाटकं यांच्यासह त्यांची पत्रं, नमित्तिक लेख, नोंदी इत्यादी) ही एकच मोठी जगङ्व्याळ साहित्यकृती मानली पाहिजे. असं मानलं तरच पेसोआचा लेखक म्हणून अफाटपणा काही प्रमाणात समजून घेता येईल.    
पेसोआच्या संदर्भातली गुंतागुंत इथेच थांबत नाही. एका ठिकाणी अल्वारो-द-काम्पोस म्हणतो, ‘‘फर्नादो पेसोआ, काटेकोरपणे सांगायचं तर, अस्तित्वातच नाही.’’ या विधानामुळे पेसोआ आणि त्याने निर्माण केलेले कवी-लेखक यांच्यातली, प्रत्यक्ष आणि काल्पनिक यांच्यातली, भेदरेषाच नाहीशी होऊन जाते. पुढे १९६०नंतरच्या नव्या जगात बार्थ, देरीदा आणि  फुको या तत्त्वज्ञांनी साहित्याची निर्मिती, लेखक या संकल्पनांविषयी मांडलेले नवे सिद्धांत पेसोआने विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच आपल्या ‘लेखनाच्या प्रयोगशाळे’त आपल्या पद्धतीने वापरून टाकले होते असं आता साहित्याचे काही अभ्यासक म्हणू लागले आहेत.
आज विश्वसाहित्यात मानाचं स्थान प्राप्त झालेल्या या लेखकाभोवती मिथकांची वलयं बरीच तयार झाली आहेत. पण त्याचबरोबर लेखक-कलावंतांवरच्या त्याच्या प्रभावाची वलयंही दिवसेंदिवस अधिकाधिक विस्तारत आहेत. पास्कल मर्सयिर या जर्मन कादंबरीकाराच्या कादंबऱ्यांमध्ये पेसोआच्या साहित्याचे संदर्भ पेरलेले दिसतात. तर एन्रिक विला-मातास या स्पॅनिश लेखकाच्या जवळजवळ प्रत्येक कादंबरीत पेसोआ एक पात्र म्हणून भेटतो. मॅन्युएल-द-ऑलिविएरा या पोर्तुगीज दिग्दर्शकाच्या प्रत्येक चित्रपटात पेसोआचा एक तरी संदर्भ असतो. ‘द पोर्तो ऑफ माय चाईल्डहूड’ या चित्रपटात तर त्याने एका जुन्या चित्रफितीद्वारे प्रत्यक्ष पेसोआचंच दर्शन घडवलं आहे. इटालीयन कादंबरीकार आंतोनिओ ताब्बूची याने ‘द लास्ट फोर डेज ऑफ फर्नादो पेसोआ’ ही कादंबरी लिहिली आहे. पोर्तुगीज कादंबरीकार जुझे सारामागु याच्या ‘द इयर ऑफ डेथ ऑफ रिकार्दो रीस’ या कादंबरीत फर्नादो पेसोआच्या मृत्यूची बातमी वाचून ब्राझीलमध्ये स्थायिक झालेला रिकार्दो रीस हा त्याचा कवीमित्र पुन्हा पोर्तुगालमध्ये लिस्बनला परतून एका हॉटेलमध्ये उतरतो. कबरीतून बाहेर येऊन रीसला भेटतो. शेजारच्या स्पेनमध्ये तेव्हा यादवी युद्ध सुरू आहे. तिथले लाखो स्थलांतरित लिस्बनमध्ये आश्रयाला आले आहेत. त्या अस्थिर राजकीय-सामाजिक वातावरणात पेसोआने रीससोबत केलेल्या चर्चा म्हणजे ही कादंबरी.
थोडक्यात, पेसोआ आणि त्याच्या मांदियाळीच्या कविता आणि गद्य साहित्य आज इंग्रजीसह अनेक भाषांत भाषांतरित होत आहे. मराठीत पेसोआ फारसा कोणाला ठाऊक नसला तरी शेजारच्या हिंदीत तो बराचसा अवतरलेला आहे. ‘एक बेचन का रोजनामा’ हा ‘द बुक ऑफ डिसक्वाएट’चा हिंदी अनुवाद आहे. पेसोआने कल्पित लेखक-कवींच्या द्वारे सुरू केलेलं लेखन अद्यापही थांबलेलं नाही. आता तर ते त्या पेटाऱ्याबाहेर वेगवेगळ्या दिशांनी वाढत आहे. आणि पेसोआदेखील या लेखनात एक कल्पित लेखक म्हणून, पात्र म्हणून सामावला आहे. पेसोआचं हे जग खरोखरच अद्भुत आहे.
पुढील शनिवारच्या ‘बुकमार्क’मध्ये   गिरीश कुबेर यांचे ‘बुक-अप’ हे पाक्षिक सदर