भपकेबाजपणा टाळा, लोकांच्यात मिसळा असा संदेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्याने आता प्रतिमाबांधणीचा प्रयोग नव्याने करण्यासाठी राष्ट्रवादीच्या तंबूत धावपळ सुरू झाली आहे. खरे म्हणजे, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर, नेमके काय चुकले याचा शोध घेण्यासाठी नवे चिंतन किंवा आत्मपरीक्षण करण्याची या पक्षाला गरजच नाही. ज्या ज्या वेळी चुका झाल्या, त्या त्या वेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी करावी लागलेली कसरत ही मोठी राजकीय करमणूक ठरली होती. त्यामुळे, पराभवानंतरचे आत्मचिंतन हा केवळ राजकीय कर्मकांडाचा भाग ठरला आहे. आपल्या चुकांचा पाढा ढळढळीतपणे समोर दिसत असताना पराभवाची मीमांसा करण्यासाठी चिंतन बैठका घेताना खरे म्हणजे शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याची परिस्थितीही काहीशी अवघडल्यासारखीच झाली असेल. तरीही, लोकसभेनंतर पक्षाची जी काही विकलांग अवस्था झाली आहे, त्यातून सावरण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुका हाच एकमेव शिल्लक मार्ग असल्याने, असे सोपस्कार करावेच लागतात. भाजपच्या आक्रमक प्रचारशैलीचा प्रतिवाद करण्यात पक्ष कमी पडला, समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याची भाजपसारखी शक्कल राष्ट्रवादीला सुचली नाही अशी तकलादू कारणे देत आता पराभवाची मीमांसा केली जात असली, तरी पराभवाची ही खरी कारणे नाहीत, हे पक्षातील सर्वानाच माहीत असेल यातही शंका नाही. मुळात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात काँग्रेस आघाडीसोबत सत्तेवर असला तरी त्याचे अस्तित्व आणि ताकद महाराष्ट्रापुरतीच आहे. त्यामुळे, जय किंवा पराजय, जे काही पदरात पडेल, त्याच्या मीमांसेसाठी महाराष्ट्रातील कर्तृत्वाचा आणि कर्तबगारीचाच आढावा घेणे इष्ट असते, हेही सारे नेते जाणून असतात. लोकसभा निवडणुकीतील पराभवाला मोदी लाटेचा तडाखा हे जसे निमित्त असेल, तसेच, पक्षाच्या काही मंत्री/ नेत्यांची कर्तबगारी हेदेखील कारण असणार हे ओघानेच येते. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मंत्रिपद भूषविणाऱ्या अजित पवार यांच्या वक्तव्यांमुळे पक्ष आणि राज्याचे सरकारही काही वेळा अडचणीत आले होते. अशा वेळी त्यातून बाहेर पडणे किती अवघड असते, याचा प्रत्यक्ष अनुभव खुद्द अजित पवार यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही घेतला  होता. केवळ जीभ सैल सोडल्यामुळे घडलेल्या चुका अंगाशी आल्याचे दिसताच, शामियाने उभारून एखाद्या नदीकाठी सूर्यास्तापर्यंत उपवास करून प्रायश्चित्त घेण्याने अशा चुकांवर पांघरूण घालण्याइतके आता मतदारांचे मन उदार राहिलेले नाही. नेमके हेच लक्षात घेतले नाही, हेही पराभवामागचे एक कारण असू शकते. राजकारणात काही निर्णय चुकतात, त्याचे परिणामही भोगावे लागतात, पण त्यातून सावरणे शक्य असते. मात्र एखादी कृती चुकली तर त्यातून सावरणे किंवा बाहेर पडणे अवघड असते. दुष्काळी परिस्थितीवर अजित पवार यांनी केलेल्या विनोदी शेरेबाजीनंतरच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास आणि सावरण्यास पक्षाला आणि अजित पवार यांना काही काळ लागेल, हे शरद पवार यांनी तेव्हाच ओळखले असणार. आता लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या मीमांसेत राजकीय खापरफोडीचे प्रयोग करावे लागणार असल्याने या चुकांची जाहीर कबुली देणे शक्य नसले, तरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जीभ सैल सोडू नका हाच सल्ला बहुधा शरद पवार यांनी दिला असावा. विधानसभा निवडणुका ही तर पक्षाची अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याने, ढासळलेली प्रतिमा पुन्हा उभी करण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. कारण महाराष्ट्र हाच पक्षाच्या भवितव्याचा आधार आहे.