वाघाच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू ही घटना दु:खदायकच, पण त्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला वाघ खरोखरीच दोषी आहे का, याची शहानिशा न करताच त्यालाही मृत्यूच्या दारात उभे करण्याचा प्रकार म्हणजे गुन्हा सिद्ध होण्याआधीच फासावर लटकविण्यासारखे. असाच प्रकार मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्य़ात घडला. या जिल्ह्य़ातील ही पहिलीच घटना नाही, तर सात वर्षांपूर्वीसुद्धा असा प्रकार या जिल्ह्य़ाने अनुभवला आहे. जंगलालगतची गावे आणि गावकऱ्यांचा सर्रासपणे जंगलात होणारा शिरकाव, यामुळे दिवसेंदिवस मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत आहे. गावकऱ्यांचे जंगलावर वाढत चाललेले अवलंबन वनविभागालाही रोखता आलेले नाही. त्यामुळे वाघांचे गावकऱ्यांवरील हल्लेदेखील वाढत चालले. मात्र, त्यावरून वाघाला नरभक्षक ठरवणे आणि गोळी घालून ठार करण्याची मागणी करणे हे गुपित अजूनही उलगडले नाही. सात वर्षांपूर्वी राजकारणी आणि गावकऱ्यांच्या दबावाखाली येऊन अशीच चूक वनखात्याने केली. २००७ मध्ये मुल वनपरिक्षेत्रात एका वाघिणीने असाच धुमाकूळ घातला होता. त्या वाघिणीच्या हल्ल्यात अनेक गावकरी बळी गेले, पण या सर्व घटना जंगलाबाहेर नव्हे, तर जंगलात घडल्या होत्या. जंगल आमचे, वाघ तुमचे, असे म्हणणाऱ्या संधिसाधू राजकारण्यांनी त्या वेळी गावकऱ्यांच्या तापलेल्या भावनेवर स्वत:ची पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. वनखाते त्यापुढे नमले आणि ३० ऑक्टोबर २००७ ला एका निरपराध वाघाला नरभक्षक ठरवून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतरही गावकऱ्यांच्या मृत्यूची मालिका सुरूच होती. मारण्यात आलेली वाघीण नव्हे, तर वाघ होता, हे लक्षात आल्यानंतर हेच राजकारणी त्यांच्या वक्तव्यापासून फिरायलाही मागे पडले नाहीत. त्यावर न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झालेली होती. सात वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत सलग वाघांच्या हल्ल्यात १४ बळी गेले आहेत. त्यांपैकी सात बळी एकटय़ा पोंभुर्णा तालुक्यातील आहेत, तर इतर घटना या चार विविध क्षेत्रांतील आहेत. या चारही क्षेत्रांच्या सीमांवर सात गावे अगदी जंगलात घुसल्यागत लागून आहेत. त्यामुळे सरपण गोळा करण्यासाठी, मोहफुले वेचण्यासाठी, गुरेचराईसाठी गावकरी भल्या पहाटे जंगलात शिरतात. त्यांना जंगलात जाण्यापासून रोखणे वनखात्याला जमलेले नाही. पोंभुर्णा आणि परिसरात या सर्व घटना घडल्या आहेत आणि याच परिसरात सुमारे दहा वाघांचे वास्तव्य आहे. जानेवारी-फेब्रुवारीपासून या क्षेत्रात दोन बछडे असलेल्या वाघिणीचे वास्तव्य होते. हे बछडे आता अडीच वर्षांचे असून नुकतेच शिकारीला सरावले आहेत. गावकऱ्यांवर हल्ले करणारा वाघदेखील अडीच वर्षांचा असल्याचा अंदाज आहे. एक घटना वगळता वाघाचे गावकऱ्यांवरील हल्ले हे जंगलाच्या बाहेर नव्हे, तर जंगलातच झालेले आहेत. त्यामुळे, वाघ या प्रकरणात दोषी कसा, याचे स्पष्टीकरण गावकऱ्यांच्च्या मृत्यूचे राजकारण करणारे राजकारणीसुद्धा देऊ शकलेले नाहीत. त्याच वेळी वाघावर नरभक्षक शिक्का मारून ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे नरभक्षकाची नेमकी व्याख्या काय, हे कळायला मार्ग नाही.  कारण जाणून न घेता वाघाला गोळ्या घालून ठार मारण्याची  केली गेलेली मागणी, हा अतिरेक ठरतो. नियमभंग करून सुट्टीच्या दिवशीही वाघ बघायला जाण्यात हेच पुढे असतात. गावकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी त्यामागच्या कारणांची गावकऱ्यांना जाणीव करून न देता, आपली राजकीय पोळी मात्र शेकून घेतात. हे असेच चालत राहिले तर कदाचित सर्वच वाघांवर नरभक्षकाचा ठपका ठेवावा लागेल आणि एकेक करून या साऱ्या वाघांचा बळी द्यावा लागेल. मंगळवारी तसा एक बळी देण्यात आलेलाच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onवाघTiger
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the name man eating tiger
First published on: 20-08-2014 at 01:02 IST