भारतातील टपाल सेवा इंग्रजांनी सुरू केल्यानंतर तिच्या आजवरच्या प्रवासात अनेक आमूलाग्र बदल घडत गेले. आजमितीला भारतीय डाक विभागाची व्याप्ती ही जगामध्ये सगळ्यात मोठं आणि सर्वाधिक पोस्ट ऑफिसेसची संख्या असणारं खातं म्हणून आहे. या विभागाची सुरुवात, प्रवास आणि स्वरूप याची माहिती देणाऱ्या टिपणाचा हा पहिला भाग..
महाकवी कालिदासाचं ‘मेघदूत’ हा खऱ्या अर्थाने भारतीय साहित्य आणि समाजामधला ज्ञात पहिला ‘पोस्टमनचा’ अवतार मानायला हवा. प्राचीन काळी पत्रव्यवहाराची एक वेगळी संकल्पना होती. हा पत्रव्यवहार मात्र समाजातल्या उच्चभ्रूंसाठीच मर्यादित होता. तो राजा-महाराजांचा किंवा दोन वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा अथवा प्रशासकीय असा मर्यादित उल्लेख भारतीय इतिहासामध्ये आढळतो, पण खऱ्या अर्थाने पत्राचारा तोही सर्वसामान्यांकरिता सुरू करण्याचं श्रेय ब्रिटिश सरकारला जातं. इंग्रजांनी देशामध्ये सुरू केलेला हा त्या काळातला सर्वात महत्त्वाच्या खात्याचा इतिहास आणि त्याच्या प्रशासकीय रचनेचा आज आपण विचार करू.
भारतामध्ये त्या काळी इंग्रजांबरोबर डच, पोर्तुगीज, फ्रेंच, डॅनिश वसाहती होत्या. त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टल सेवा होत्या. इंग्रजांच्या आधिपत्याखालील ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई, चेन्नई आणि कोलकाता इथं १७६४ ते १७६६ च्या दरम्यान ही पोस्टाची सेवा उपलब्ध करून दिली, पण तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगने खऱ्या अर्थाने लोकांसाठी ती मोकळी केली १७७४ मध्ये कोलकात्यात! याआधी ही सेवा फक्त ईस्ट इंडिया कंपनीसाठीच वापरण्यात येत होती.
हळूहळू ही सेवा कंपनी सरकारच्या आधिपत्याखालील बाकी ठिकाणीसुद्धा सुरू करण्यात आली. १८३७ मध्ये Post Office Act आणण्यात आला आणि त्यानुसार कंपनीच्या आधिपत्याखाली असणाऱ्या साम्राज्यामध्ये पत्रव्यवहार आणि टपाल वाटण्याचे एकछत्री अधिकार सरकारला मिळाले. सरकारने भारतामध्ये चालणाऱ्या तत्कालीन व्यवस्थेची शहानिशा करण्यासाठी १८५० मध्ये एका आयोगाचं गठन केलं आणि त्यानुसार एक समान व्यवस्था स्थापित करण्यासाठी पोस्टमास्तरांना स्टॅण्डर्डाइज्ड मॅन्युअल देण्यात आलं. यामध्ये पोस्टेजच्या सेवाशुल्क आकारणीच्या संकल्पनेलासुद्धा बदलण्यात आलं. पूर्वी वजन आणि अंतर दोन्हींना धरून पोस्टेज सेवाशुल्क घेत असत. या आयोगाने फक्त अंतर हा निकष ठरवला.
पोस्ट खात्याने वेग पकडला तेव्हा भारतामध्ये रेल्वेचा उदय झाला. खऱ्या अर्थाने भारताच्या पहिल्या १८५७च्या स्वातंत्र्यलढय़ाचे दोन शत्रू ठरले भारतीय रेल आणि पोस्ट खातं!
हा झाला इतिहास, पण आजच्या e-mail आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारतीय पोस्ट खात्याचं काय महत्त्व आहे आणि त्याचा वापर किती लोक करतात हा कुतूहलाचा विषय आहे. पोस्टाचं खातं इंडियन पोस्टल सव्र्हिस बोर्ड चालवतं. भारतीय डाक सेवाचा अधिकारी या खात्याचा सेक्रेटरी असतो, तर भारतीय टपाल मंडळाचा पदसिद्ध अध्यक्षदेखील असतो. अध्यक्षासहित यामध्ये सात सदस्य असतात. पूर्ण देशामध्ये पोस्ट सेवा देण्यासाठी देशाला बावीस सर्कल्समध्ये वाटण्यात आलेलं आहे. साधारणत: राज्याचं एक सर्कल आहे. (फक्त गुजरातमध्ये दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली, तर महाराष्ट्राबरोबर गोवाही जोडलेलं आहे) तर पूवरेत्तर राज्यांसाठी एक सर्कल आहे. प्रत्येक सर्कलचा एक मुख्य पोस्टमास्तर जनरल हा प्रमुख असतो. प्रत्येक सर्कल काही विभागांमध्ये विभागलेलं असतं. प्रत्येक विभागाचा प्रमुख पोस्टमास्तर जनरल असतो. त्याच्या अंतर्गत काही जिल्ह्य़ांचा मिळून वरिष्ठ टपाल अधीक्षक असतो. त्यासाठी जिल्हा स्तरावरचं पोस्ट कार्यालय आणि गावांच्या स्तरावरची पोस्ट ऑफिसेस असतात. आजच्या घडीला (२००९ च्या आकडेवारीनुसार) १,५५,०१५ पोस्ट ऑफिसेस भारतात आहेत. त्यापैकी १,३९,१४४ कार्यालयं ही ग्रामीण भागामध्ये आहेत. भारतीय डाक विभागाची व्याप्ती ही जगामध्ये सगळ्यात मोठं आणि सर्वाधिक पोस्ट ऑफिसेसची संख्या असणारं खातं म्हणून आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर फक्त २३,३४४ डाकघरं असणाऱ्या या खात्याची प्रगती सात पटीने मागच्या सहा दशकांमध्ये झाली आहे. एका पोस्ट ऑफिसच्या खाली साधारणपणे २१ किलो मिटरचा भाग किंवा ७११५ एवढय़ा लोकसंख्येला सेवा पुरवण्याचं काम असतं.
डाक विभाग हा भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. डाक विभागाच्या अखत्यारीत पूर्वी येणारं सर्वाधिक चर्चेतलं खातं होतं टेलिग्राफ विभाग. आता मागील वर्षी ही सेवा बंद करण्यात आली आहे, पण या सेवेचा जितका उपयोग होता त्यापेक्षा जास्त धास्ती भारतीयांच्या मनामध्ये होती!
पहिली भारतीय हवाई टपाल वाहतूक सुरू करण्याचं श्रेय हेन्री पेक्वेल या फ्रेंच पायलटला जातं. १८ फेब्रुवारी १९११ मध्ये त्याने अलाहाबादवरून नैनीपर्यंत उड्डाण करून या सेवेचा प्रारंभ केला होता. आज भारतीय टपाल विभाग SAL (Surface Air Lifted) सेवेचा सदस्य आहे. यामध्ये जगभरात ३९ देश आहेत. भारतीय पोस्ट विभाग एअर इंडियाबरोबर भारतामध्ये ‘एअर मेल’ची सेवा चालवतो. याबरोबर टपाल विभागाचं इंग्रजांना महत्त्व कितपत आहे, हे समजण्यासाठी एक छोटीशी माहिती लिहिणं क्रमप्राप्त वाटते. आपण जेव्हा अमुक एका शहराचं अंतर तमुक एका शहरापर्यंत इतकं किलोमीटर आहे, असं म्हणतो, तेव्हा ते अंतर त्या शहरामध्ये G.P.O. (General Post Office) पासून ते दुसऱ्या शहरातल्या पोस्ट ऑफिसपर्यंतच असतं!
भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटाची सुरुवात सिंध जिल्ह्य़ामध्ये १८५२ मध्ये झाली. १८५४ पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचं प्रचलन सुरू झालं. भारतातलं पहिलं रंगीत तिकीट छापण्यासाठी १९३१ साल उजाडावं लागलं. पहिलं स्वातंत्र्योत्तर तिकीट १९४७ मध्ये निघालं आणि त्यावर भारतीय झेंडा होता. त्यानंतर भारतामध्ये टपाल तिकिटांची रेलचेल झाली. नुकतंच काही वर्षांपूर्वी, तुमच्या निवडीनुसार तिकिटं छापण्याची सुरुवात टपाल खात्यानं प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली आहे.
भारतीय डाक विभाग आजच्या घडीलाe-post आणि e-bill post, स्पीड पोस्ट, बिजनेस पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, एक्स्प्रेस पार्सल पोस्ट, मीडिया पोस्ट, रिटेल पोस्ट, ग्रीटिंग पोस्ट, स्पीड नेट, इंटरनॅशनल मेल्स आणि इंटरनॅशनल ई.एम.एस. या पोस्टाच्या सेवा चालवतं. भारतीय टपाल खात्याचं सगळ्यात जुनं आणि खेडोपाडी पोहोचलेलं काम म्हणजे त्याच्या आर्थिक सेवांचं आहे. या सेवांमध्ये आपल्या सगळ्यांच्या परिचयाची ‘मनी ऑर्डर’ सेवा, इंटरनॅशनल मनीऑर्डर सेवा, पोस्टाची बचत बँक, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (EFT), तात्काळ मनीऑर्डर सेवा आणि डाक बीमा योजना (Postal Life Insurance) या सेवांचा सहभाग आहे.
भारतीय डाक खात्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की, त्यावर लिहिण्यासाठी बराच वेळ लागेल, पण या खात्याने सुरू केलेल्या अभिनव ‘पिन कोड’ क्रमांकाच्या योजनेचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. Postal Index Number (PIN) हा सहा आकडी क्रमांक आहे. भारतामध्ये ही संकल्पना १५ ऑगस्ट १९७२ मध्ये सुरू करण्यात आली. आजच्या घडीला देशामध्ये नऊ PIN विभाग आहेत. यामध्ये पहिले आठ विभाग हे देशाच्या वेगवेगळ्या भागांसाठी आहेत, तर नववा विभाग हा आर्मी पोस्टल सव्र्हिस (APS) साठी आहे. यामधला पहिला आकडा हा या विभागाला दर्शवीत असतो. पहिले दोन आकडे मिळून सब रीजन किंवा पोस्टाच्या सर्कलचे प्रतिनिधित्व करतात आणि पहिले तीन आकडे एकत्रित ‘Sorting District’ ला दर्शवीत असतात, तर शेवटचे तीन आकडे ‘Delivery Post Office’ ला दर्शवण्याचं काम करतात. यामध्ये दोन उत्तर, दोन दक्षिण, दोन पश्चिम, दोन पूर्व असं विभागांचं वर्गीकरण आहे. उदाहरणार्थ पहिले दोन आकडे दिल्लीसाठी ११ आहेत, तर महाराष्ट्रासाठी ४० ते ४४ आहेत.
भारतीय डाक खात्याला चालवण्यासाठी भारतीय डाक सेवा, तिचा उगम, डाक खात्याच्या ‘Project Arrow’ आणि आता त्यांच्या भारतीय बँकिंग क्षेत्रामधलं पदार्पण त्याचबरोबर या सर्वामध्ये डाक खात्याचा घसरता महसूल, माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतिसेवेत ढिली होणारी पकड आणि नवनवीन योजनांचा विचार पुढच्या भागामध्ये करू.
*लेखक भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2014 रोजी प्रकाशित
भारतातील टपाल सेवेची व्याप्ती
भारतातील टपाल सेवा इंग्रजांनी सुरू केल्यानंतर तिच्या आजवरच्या प्रवासात अनेक आमूलाग्र बदल घडत गेले.

First published on: 30-07-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व प्रशासनयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian administration breadth of indian post service