‘कमानकला’ हा शब्द आर्किटेक्चरसाठी मराठी प्रतिशब्द म्हणून काहीजण अगदी आग्रहाने वापरतात. ‘वास्तुरचना’ असताना ‘कमानकला’ कशाला, असे बाकीच्या अनेकांचे मत असते. मात्र इस्लामी राज्यकर्त्यांच्या काळातील आर्किटेक्चरला ‘कमानकला’ इतका चपखल शब्द नाही! इसवी सन १२०६ ते १८५७ या काळात कधी ना कधी, कुठे ना कुठे इस्लामी शासक भारतात होते. त्यांनी धार्मिक व निधर्मी उपयोगासाठी अनुक्रमे मशिदी, मिनार, दर्गे आणि महाल, दरवाजे, निरीक्षण मनोरे आदी प्रकारच्या इमारती बांधल्या. या मोठय़ा काळात मूळच्या इस्लामी शैलीचे भारतीयीकरण होत गेले. ते कसे झाले, हे सांगण्यासाठी पुरातत्त्व विभागातील माजी संचालक व शिलालेख विभागाचे माजी प्रमुख जियाउद्दीन देसाई यांनी इतिहासाची कालानुक्रमे साक्ष काढणारे हे पुस्तक सिद्ध केले. गेली अनेक वर्षे ‘आउट ऑफ प्रिंट’असलेले हे सरकारी प्रकाशन नव्या आवृत्तीमुळे पुन्हा उपलब्ध झाले आहे. आर्ट पेपरवरील सुमारे ४५ रंगीत फोटोंमुळे त्याला दृश्यमूल्य आले आहे. शिवाय काही कृष्णधवल यथार्थ रेखाटने आहेत.
मामुल्क, खल्जी, तुघलक, सयीद, लोदी, सूर आणि मुघल अशा घराण्यांच्या कालखंडात भारतीय- इस्लामी कमानकला कसकशी बदलली, हे सांगताना लेखकाने परखड निष्कर्ष न काढता, केवळ वर्णने करण्याचा मार्ग पत्करला आहे. मात्र त्यातून असे लक्षात यावे की, अन्य घराण्यांच्या काळात जे भारतीयीकरण आपातत: होत होते, त्याला मुघल कालखंडात मात्र द्रष्टेपणाची जोड मिळाली. या देशात इथल्या पद्धतींचा वापर झाला पाहिजे, अशी धारणा अकबरासारख्या राजाची जरूर होती, परंतु अगदी सुरुवातीला, म्हणजे सन १२०८ मध्ये कुतुबमिनार उभारणी सुरू करणारा कुतुबुद्दीन ऐबकने ‘हिंदू मंदिरांच्या अवशेषांचा वापर बांधकाम साहित्य म्हणून केला’ आणि ‘बहुसंख्य कारागीरही हिंदूच होते’ असा स्पष्ट उल्लेख पहिल्याच प्रकरणात देसाई यांनी केला आहे. यातून कुठलाही राजकीय निष्कर्ष त्यांनी काढलेला नाही, पण तथ्य मांडले आहे. (कुतुब मिनारच्या भिंतींवर हिंदू मंदिरांतील नक्षी व मंत्र दिसतात, असे दावे सनसनाटी वाटू नयेत, यासाठी हे वाचन उपयोगी पडावे). कमानकलेतल्या बदलांकडे अगदी निरपेक्षपणेच पाहाण्याच्या देसाई यांचा दृष्टिकोन एरवी कंटाळवाणा ठरला असता, पण त्यांनी पानोपानी दिलेला तपशील आणि मुख्य म्हणजे तपशील देताना त्यांनी ‘यावरून त्याची आठवण व्हावी’ अशा रीतीने, कमानकलेच्या दृश्य आणि तांत्रिक वैशिष्टय़ांची केलेली चर्चा या प्रस्तुत पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत.
प्रादेशिक शैलींची सविस्तर चर्चा पुस्तकात असल्याने मुलतान आणि गुजरात, माळवा आणि खान्देश, अशा साधारण सारख्या वाटणाऱ्या शैलींतले भेद समजतात. तसेच काश्मीर, सिंध, बंगाल व जौनपूर शैलीची ओळख होते. दखनी शैलीच्या पाच उप-शैलींची (विशेषत: आदिलशाहीची ) चर्चा या पुस्तकात असल्यामुळे महाराष्ट्रीयांसाठी ते विशेष महत्त्वाचे ठरावे, कारण दौलताबादचा चाँदमिनार आणि विजापूरचा गोलघुमट किंवा मलिकअंबराच्या कमानी हे एकमेकांपासून निराळे कसे याची नेमकी जाणीव वाचनातून विकसित होऊ शकेल.
इंडो- इस्लामिक आर्किटेक्चर: जियाउद्दीन देसाई,
प्रकाशन विभाग , नवी दिल्ली
पाने : ६० + ४० , किंमत : ११५ रुपये.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2013 रोजी प्रकाशित
इस्लामी कमानकलेच्या भारतीयीकरणाची ओळख!
‘कमानकला’ हा शब्द आर्किटेक्चरसाठी मराठी प्रतिशब्द म्हणून काहीजण अगदी आग्रहाने वापरतात. ‘वास्तुरचना’ असताना ‘कमानकला’ कशाला, असे बाकीच्या अनेकांचे मत असते. मात्र इस्लामी राज्यकर्त्यांच्या काळातील आर्किटेक्चरला ‘कमानकला’ इतका चपखल शब्द नाही! इसवी सन १२०६ ते १८५७ या काळात कधी ना कधी, कुठे ना कुठे इस्लामी शासक भारतात होते.
First published on: 09-02-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व बुक - वर्म बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian identification of islami arch art